व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा देवासोबत तुमचं खरंच जवळचं नातं आहे का?

यहोवा देवासोबत तुमचं खरंच जवळचं नातं आहे का?

“देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.”—याको. ४:८.

१. यहोवासोबतचा आपला नातेसंबंध आणखी घनिष्ठ करण्याची गरज का आहे?

तुम्ही यहोवाचे साक्षीदार असाल तर तुमच्याजवळ एक खूप मौल्यवान गोष्ट आहे. ती म्हणजे यहोवासोबतचं तुमचं नातं. पण, सैतानाच्या जगाचा प्रभाव आणि आपल्या स्वतःच्या कमतरता यांमुळे देवासोबतचा आपला नातेसंबंध कमजोर होऊ शकतो. त्यामुळे, आपण नेहमी यहोवासोबतचं आपलं नातं आणखी घनिष्ठ करत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

२. (क) नातेसंबंध म्हणजे काय? (तळटीप पाहा.) (ख) आपण यहोवाच्या आणखी जवळ कसं जाऊ शकतो?

यहोवा तुम्हाला एक खरीखुरी व्यक्ती वाटते का? तो तुम्हाला एखाद्या जवळच्या व्यक्तीसारखा वाटतो का? त्याच्यासोबतचं तुमचं नातं आणखी मजबूत करण्याची तुमची इच्छा आहे का? असल्यास, तुम्ही याकोब ४:८ यात दिलेल्या सल्ल्याचं पालन केलं पाहिजे. तिथं म्हटलं आहे: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” या वचनानुसार यहोवासोबतच्या तुमच्या नातेसंबंधात यहोवाचं आणि तुमचंही योगदान असतं. * जर तुम्ही यहोवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर तोही तुमच्या जवळ येईल. आणि तुम्ही जितका जास्त प्रयत्न कराल, तितकाच यहोवा तुम्हाला आणखी खरा वाटू लागेल. त्याच्यासोबतचं तुमचं नातं इतकं जवळचं होईल की तुम्हीही येशूसारखाच आत्मविश्वास व्यक्त करण्यास प्रवृत्त व्हाल. येशूने म्हटलं: “ज्याने मला पाठवले तो खरा आहे” आणि “मी तर त्याला ओळखतो.” (योहा. ७:२८, २९) पण, यहोवाच्या आणखी जवळ जाण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

तुम्ही यहोवाशी कसं बोलू शकता? (परिच्छेद ३ पाहा)

३. आपण यहोवासोबत संवाद कसा साधू शकतो?

तुम्हाला जर यहोवासोबतचं तुमचं नातं आणखी मजबूत करायचं असेल तर यहोवा आणि तुम्ही नियमित रीत्या एकमेकांशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. पण, हे कसं शक्य होईल? समजा तुमचा मित्र खूप लांब राहत असेल आणि तुम्हाला त्याच्याशी बोलायचं असेल, तर तुम्ही काय कराल? कदाचित तुम्ही त्याला पत्र लिहाल किंवा फोनवर त्याच्याशी बोलाल. त्याच प्रकारे, जेव्हा तुम्ही यहोवाला नियमित रीत्या प्रार्थना करता तेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलत असता. (स्तोत्र १४२:२ वाचा.) पण, मग यहोवाला तुमच्याशी बोलण्याची संधी तुम्ही केव्हा देऊ शकता? तुम्ही जेव्हा नियमित रीत्या त्याचं वचन, बायबल वाचता आणि त्यावर खोलवर विचार करता तेव्हा तुम्ही यहोवाला तुमच्याशी बोलण्याची संधी देत असता. (यशया ३०:२०, २१ वाचा.) यहोवासोबत अशा प्रकारे संवाद साधल्यामुळे तुमचा त्याच्यासोबतचा नातेसंबंध घनिष्ठ आणि मजबूत कसा होऊ शकतो, हे आता आपण पाहू या.

यहोवाला तुमच्याशी बोलू द्या

४, ५. बायबलचा अभ्यास करताना यहोवा कशा प्रकारे तुमच्याशी बोलतो? एक उदाहरण द्या.

देवाने बायबलमध्ये दिलेला संदेश सर्वांसाठी आहे हे आपल्याला माहीत आहे. पण, बायबलद्वारे यहोवाच्या आणखी जवळ येण्यास वैयक्तिक रीत्या तुम्हाला मदत होऊ शकते का? हो, नक्कीच! यासाठी, नियमितपणे बायबलचं वाचन आणि त्यावर विचार करताना, तुम्ही जे वाचत आहात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याकडे लक्ष द्या. आणि शिकलेल्या गोष्टी आपल्याला कशा लागू करता येतील यावरही विचार करा. असं केल्यानं तुम्ही यहोवाला तुमच्याशी बोलण्याची संधी देत असता. तो तुम्हाला मदत करणाऱ्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसारखा बनतो आणि तुमचं त्याच्यासोबतचं नातं आणखी घनिष्ठ होतं.—इब्री ४:१२; याको. १:२३-२५.

उदाहरणार्थ, “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका,” हे येशूचे शब्द तुम्ही वाचत आहात अशी कल्पना करा. हे शब्द वाचल्यावर तुम्हाला काय वाटतं याकडे लक्ष द्या. तुम्ही यहोवाला तुमच्या जीवनात प्रथम स्थानी ठेवण्याचा मनापासून प्रयत्न करत असाल, तर तो तुमच्या प्रयत्नांबद्दल समाधानी असल्याचं तुम्हाला जाणवेल. पण, कदाचित येशूचे शब्द वाचल्यावर, आपण आपलं राहणीमान आणखी साधं करण्याची आणि देवाच्या सेवेला जीवनात आणखी महत्त्व देण्याची गरज आहे याची जाणीव तुम्हाला होईल. जर तुम्हाला असं वाटलं, तर यहोवाच्या आणखी जवळ जाण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हे तो तुम्हाला सांगत आहे हे ओळखा.—मत्त. ६:१९, २०.

६, ७. (क) आपण बायबलचा अभ्यास करतो तेव्हा यहोवासोबतच्या आपल्या नात्यावर याचा कसा परिणाम होतो? (ख) बायबल अभ्यास करण्याचा मुख्य हेतू काय असला पाहिजे?

यहोवाची सेवा आणखी चांगल्या प्रकारे करता यावी म्हणून कोणते बदल केले पाहिजेत हे आपल्याला बायबलचा अभ्यास करताना शिकायला मिळतं. पण, त्यासोबतच यहोवाच्या प्रेमळ कृत्यांबद्दल आणि त्याच्या सुंदर गुणांबद्दलही आपल्याला शिकायला मिळतं. या गोष्टी शिकल्यामुळे त्याच्यावर असलेलं आपलं प्रेम आणखी गहिरं होतं. आणि जसजसं आपलं त्याच्यावर असलेलं प्रेम वाढत जातं, तसतसं त्याचंही आपल्यावर असलेलं प्रेम वाढत जातं. आणि अशा रीतीनं त्याच्यासोबतचं आपलं नातं दिवसेंदिवस मजबूत होतं.—१ करिंथकर ८:३ वाचा.

यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडायचा असेल, तर बायबलचा अभ्यास करताना आपला हेतू योग्य असला पाहिजे. येशूने म्हटलं: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहा. १७:३) बायबल वाचताना बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात हे खरं आहे. पण, यहोवाला एक व्यक्ती म्हणून चांगल्या प्रकारे जाणून घेणं हाच आपला मुख्य हेतू असला पाहिजे.—निर्गम ३३:१३ वाचा; स्तो. २५:४.

८. (क) यहोवाने अजऱ्याच्या बाबतीत जे केलं त्याबद्दल काहींना कदाचित काय वाटू शकतं? (ख) तुम्ही जर यहोवाला ओळखत असाल तर तो जे काही करतो त्याबद्दल तुम्हाला कोणती खात्री असेल?

यहोवा विशिष्ट प्रकारे का वागला हे बायबलच्या सर्वच अहवालांत स्पष्टपणे सांगितलेलं नाही. पण, जर यहोवा आपल्याला अगदी जवळची व्यक्ती वाटत असेल, तर असे अहवाल वाचताना आपल्या मनात शंका निर्माण होणार नाही. एक उदाहरण पाहू या. अजऱ्या हा यहुदाचा राजा होता. तिथले लोक खोट्या देवतांची उपासना करायचे. अजऱ्या मात्र त्यात सामील झाला नाही. तर “परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी.” (२ राजे १५:१-५) पण, यहोवाने अजऱ्याला शिक्षा दिली आणि त्याला कोड लागलं. असं यहोवाने का केलं असावं? याबद्दल या विशिष्ट अहवालात काहीच सांगितलेलं नाही. तर मग, यहोवानं जे केलं त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? काही कारण नसताना त्याने अजऱ्याला शिक्षा दिली, असा विचार तुमच्या मनात येतो का? नाही. कारण तुम्ही जर यहोवाला चांगल्या प्रकारे ओळखत असाल तर तो नेहमी योग्य तेच करतो याची तुम्हाला खात्री असेल. त्याचं शासन नेहमीच “योग्य” असतं. (यिर्म. ३०:११) तेव्हा, यहोवानं अजऱ्याला शिक्षा का दिली हे जरी माहीत नसलं, तरी यहोवानं जे केलं ते योग्यच होतं हा भरवसा तुम्ही बाळगू शकता.

९. यहोवाने अजऱ्याला शिक्षा का दिली हे आपल्याला कशावरून समजतं?

पण, बायबलमध्ये अजऱ्या राजाबद्दल इतकीच नाही, तर आणखीनही काही माहिती देण्यात आली आहे. त्याला उज्जीया राजा म्हणूनदेखील ओळखलं जायचं. (२ राजे १५:७, ३२) २ इतिहास २६:३-५, १६-२१ मध्ये आपल्याला ही अधिक माहिती सापडते. तिथं असं सांगितलं आहे, की अजऱ्या “परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते . . . करी.” पण त्यात असंही सांगितलं आहे की पुढे “त्याचे हृदय उन्मत होऊन तो बिघडला.” जे काम फक्त याजक करू शकत होते ते करण्याचा त्यानं प्रयत्न केला. तो जे करत आहे ते योग्य नाही असं ८१ याजकांनी त्याला सांगितलं आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्नदेखील केला. पण, त्यानं काय केलं? तो इतका गर्विष्ठ बनला होता की तो त्या याजकांवरही रागावला! बायबलमध्ये दिलेल्या या अधिक माहितीमुळे, यहोवाने अजऱ्याला शिक्षा का दिली असावी हे समजण्यास आपल्याला मदत होते.

१०. (क) यहोवा जे काही करतो त्यामागची कारणं जाणून घेणं नेहमीच गरजेचं का नसतं? (ख) यहोवा जे करतो ते नेहमीच योग्य असतं अशी खात्री बाळगण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल?

१० यातून आपल्याला कोणती महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते? यहोवाने अजऱ्या राजाला शिक्षा का दिली हे समजून घेण्यासाठी बायबलमध्ये आपल्याला पुरेशी माहिती देण्यात आलेली आहे. पण, जेव्हा बायबलमध्ये पुरेशी माहिती दिलेली नसते तेव्हा काय? यहोवानं जे केलं ते योग्य होतं की नव्हतं, अशी शंका त्या वेळी तुमच्या मनात येईल का? की, यहोवा नेहमी योग्य तेच करतो; आणि अशी खात्री बाळगण्यासाठी बायबलमध्ये भरपूर पुरावे आहेत असा तुम्ही विचार करणार? (अनु. ३२:४) तुम्ही यहोवाला व्यक्ती या नात्यानं जितकं जास्त ओळखाल तितकंच त्याच्यावर असलेलं तुमचं प्रेम आणि भरवसा वाढत जाईल. आणि मग, तो जे काही करतो त्यामागची कारणं जाणून घेण्याची तुम्हाला गरज वाटणार नाही. तुम्ही जसजसा बायबलचा अभ्यास करत राहाल, तसतसा यहोवा तुम्हाला आणखी खरा वाटू लागेल आणि त्याच्यासोबतचं तुमचं नातं दिवसेंदिवस घनिष्ठ होत जाईल.—स्तो. ७७:१२, १३.

प्रार्थनेद्वारे यहोवाशी बोला

११-१३. यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो अशी खात्री तुम्हाला का वाटते? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

११ आपण प्रार्थना करतो तेव्हा यहोवाच्या आणखी जवळ येतो. प्रार्थनेत आपण त्याची स्तुती करतो, त्याचे आभार मानतो आणि त्याच्याकडे मदतदेखील मागतो. (स्तो. ३२:८) पण, यहोवासोबतचा नातेसंबंध आणखी मजबूत करण्याची तुमची इच्छा असेल, तर तो तुमच्या प्रार्थना ऐकतो अशी खात्री तुम्हाला असणं गरजेचं आहे.

१२ देव आपल्या प्रार्थना ऐकत नाही, असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि प्रार्थना फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी असते असं ते म्हणतात. त्यांच्या मते, प्रार्थना केल्यामुळे आपल्या समस्यांवर स्पष्टपणे विचार करायला आणि त्यांवर उपाय शोधायला आपल्याला मदत मिळते. प्रार्थनेमुळे वरील गोष्टी करणं शक्य होतं हे खरं आहे. पण, आपण यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा तो खरोखरच आपली प्रार्थना ऐकत असतो. अशी खात्री आपण का बाळगू शकतो?

१३ यहोवा आपल्या सेवकांच्या प्रार्थनांचं उत्तर देतो हे येशूनं पृथ्वीवर येण्याआधी पाहिलं होतं. शिवाय, पृथ्वीवर आल्यानंतर येशूने स्वतःदेखील प्रार्थनेत यहोवाजवळ आपल्या मनातले विचार आणि भावना व्यक्त केल्या. एकदा तर तो रात्रभर यहोवाला प्रार्थना करत होता. (लूक ६:१२; २२:४०-४६) जरा विचार करा: यहोवा प्रार्थना ऐकत नाही असं जर येशूला वाटलं असतं, तर त्याने असं केलं असतं का? खरंतर, येशूने आपल्या अनुयायांनाही, यहोवाला प्रार्थना कशी करावी हे शिकवलं. यहोवा प्रार्थना ऐकत नाही असं जर येशूला वाटलं असतं, तर त्याने त्यांना प्रार्थना करायला शिकवलं असतं का? नक्कीच नाही. यावरून हे स्पष्ट होतं की यहोवा खरोखरच आपल्या प्रार्थना ऐकतो याची येशूला पूर्ण खात्री होती. त्याने तर आपल्या पित्याला असं म्हटलं: “बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो; मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस.” येशूप्रमाणे आपणदेखील ही खात्री बाळगू शकतो की यहोवा नेहमी आपली प्रार्थना ऐकतो.—योहा. ११:४१, ४२; स्तो. ६५:२.

१४, १५. (क) प्रार्थनेत आपल्या विनंत्या जास्त स्पष्टपणे व्यक्त केल्यामुळे कोणता फायदा होतो? (ख) यहोवाच्या आणखी जवळ जाण्यास एका बहिणीला कशामुळे मदत झाली?

१४ यहोवा आपल्या प्रार्थनांचे उत्तर कसं देतो हे नेहमीच आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही. पण, प्रार्थनेत तुमच्या विनंत्या तुम्ही जितक्या जास्त स्पष्टपणे व्यक्त कराल, तितकंच यहोवानं त्या प्रार्थनेचं कशा प्रकारे उत्तर दिलं हे तुम्हाला स्पष्टपणे दिसून येईल. आणि यामुळे तो तुम्हाला आणखी खरा वाटू लागेल. तुमच्या मनातल्या सर्व चिंता तुम्ही मोकळेपणानं यहोवाजवळ व्यक्त केल्या, तर तो तुमच्या आणखी जवळ येईल.

१५ कल्पना नावाच्या एका बहिणीचं उदाहरण विचारात घ्या. * ती अगदी नियमित प्रचारकार्याला जायची. पण, त्यातून तिला आनंद मिळत नव्हता. ती म्हणते, “मला सेवेत जायला आवडायचं नाही. अजिबात आवडायचं नाही.” ही बहीण रिटायर झाल्यानंतर एका वडिलानं तिला पायनियरिंग करण्याचं उत्तेजन दिलं. ती म्हणते, “त्यांनी चक्क माझ्या हातात फॉर्म दिला. मी पायनियरिंग सुरू तर केली, पण प्रचारकार्य आवडावं म्हणून मी दररोज यहोवाला प्रार्थना करायचे.” यहोवानं तिच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं का? तीन वर्षं पायनियरिंग केल्यानंतर आता ती बहीण म्हणते: “सेवाकार्यात जास्त वेळ घालवल्यामुळे आणि इतर बहिणींकडून बरंच काही शिकल्यामुळे हळूहळू मी चांगली साक्ष द्यायला शिकले. आज मला प्रचारकार्य आवडत नाही, तर अगदी मनापासून आवडतं. शिवाय, यहोवासोबतचं माझं नातं पूर्वीपेक्षा खूप जास्त जवळचं झालं आहे.” खरंच, या बहिणीला प्रार्थनेमुळे यहोवाच्या जवळ येण्यास मदत झाली.

यहोवाच्या आणखी जवळ येण्याचा प्रयत्न करत राहा

१६, १७. (क) यहोवासोबतचं नातं आणखी मजबूत करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? (ख) पुढच्या लेखात कशाविषयी चर्चा करण्यात येईल?

१६ आपण आयुष्यभर यहोवाच्या अधिकाधिक जवळ येण्याचा प्रयत्न करत राहू शकतो. तेव्हा, बायबलचा नियमित अभ्यास करण्याद्वारे यहोवा तुम्हाला काय सांगतो ते ऐकण्याचा प्रयत्न करत राहा. तसंच, प्रार्थना करण्याद्वारे त्याच्याशी सतत बोलत राहा. असं केल्यामुळे, यहोवासोबतचं तुमचं नातं दिवसेंदिवस आणखी घनिष्ठ होत जाईल आणि यामुळे संकटांत टिकून राहायला तुम्हाला मदत मिळेल.

यहोवाच्या आणखी जवळ येण्याचा प्रयत्न करत राहा (परिच्छेद १६, १७ पाहा)

१७ पण, कधीकधी यहोवाला सतत प्रार्थना करूनसुद्धा आपल्या समस्या आहेत तशाच राहतात. अशा वेळी, यहोवावर असलेला आपला भरवसा हळूहळू कमी होऊ शकतो. यहोवा आपल्या प्रार्थना ऐकत नाही असं कदाचित आपल्याला वाटू लागेल. आणि, त्याच्यासोबत खरंच आपलं जवळचं नातं आहे का, अशी शंका आपल्या मनात येऊ शकेल. तुम्हाला असं वाटू लागल्यास तुम्ही काय करू शकता? याविषयी पुढच्या लेखात चर्चा करू या.

^ परि. 2 नातेसंबंध म्हणजे, दोन व्यक्तींच्या एकमेकांबद्दलच्या भावना आणि त्यांचा एकमेकांसोबतचा व्यवहार. नातेसंबंध मजबूत ठेवण्यात दोघांचाही सहभाग असतो.

^ परि. 15 नाव बदलण्यात आलं आहे.