व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वडिलांनो, प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही वेळ काढत आहात का?

वडिलांनो, प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही वेळ काढत आहात का?

“सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो.”—उप. ३:१.

१, २. बऱ्याच मंडळ्यांमध्ये विभागीय पर्यवेक्षकांना काय दिसून आलं आहे?

एका मंडळीत, विभागीय पर्यवेक्षकांची वडिलांसोबतची सभा संपत आली होती. त्यांनी त्या सर्व बांधवांकडे प्रेमानं पाहिलं. बांधवांपैकी काही जण तर त्यांच्या बाबांच्या वयाचे होते. पण, मंडळीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या त्या बांधवांकडे पाहून त्यांना खूप समाधान वाटलं. तरीसुद्धा, एक महत्त्वाची चिंता विभागीय पर्यवेक्षकांना सतावत होती. म्हणून त्यांनी विचारलं, “बांधवांनो, मंडळीत जबाबदाऱ्या घेण्यासाठी इतरांना प्रशिक्षित करण्याच्या बाबतीत तुम्ही काही पावलं उचलली आहेत का?” विभागीय पर्यवेक्षकांनी मागच्या भेटीतही आपल्याला या बाबतीत प्रोत्साहन दिलं होतं याची वडिलांना जाणीव होती. त्यामुळे सगळे शांत होते. शेवटी, त्यांच्यापैकी एकाने कबूल केलं, “नाही ब्रदर, फारसं काही केलेलं नाही.” इतर वडीलही त्यांच्याशी सहमत होते.

या वडिलांच्या जागी तुम्ही असता, तर कदाचित तुम्हीही असंच उत्तर दिलं असतं. अनेक विभागीय पर्यवेक्षकांच्या पाहण्यात आलं आहे, की बऱ्याच मंडळ्यांमध्ये तरुण व वयस्क बांधवांना जबाबदाऱ्या हाताळण्याचं प्रशिक्षण देण्याकडे वडिलांनी जास्त लक्ष पुरवण्याची गरज आहे. पण, हे म्हणावं तितकं सोपं नाही. का बरं?

३. (क) इतरांना प्रशिक्षित करणं महत्त्वाचं आहे हे बायबलमधून कशा प्रकारे दिसून येतं, आणि हा विषय आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचा का आहे? (तळटीप पाहा.) (ख) इतरांना प्रशिक्षण देणं काही वडिलांना कठीण का वाटू शकतं?

वडील या नात्याने, इतर बांधवांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळ काढणं किती महत्त्वाचं आहे याची तुम्हाला जाणीव असेल. * तसंच, आध्यात्मिक दृष्टीने मंडळीची काळजी घेण्यासाठी आणि भविष्यात नवीन मंडळ्या स्थापन करण्यासाठी प्रशिक्षित बांधवांची खूप गरज आहे हेही तुम्हाला माहीत असेल. (यशया ६०:२२ वाचा.) शिवाय, ‘इतरांना शिकवणं’ महत्त्वाचं आहे असं बायबलमध्येही सांगण्यात आलं आहे. (२ तीमथ्य २:२ वाचा.) पण हे सर्व माहीत असूनही, यासाठी वेळ काढणं काही वडिलांना कठीण जातं. कारण त्यांच्यावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, तसंच कामाच्या ठिकाणीही अनेक जबाबदाऱ्या असतात. शिवाय, मंडळीची आणि इतरही बरीच महत्त्वाची कामं त्यांना करावी लागतात. या सर्व कामाच्या व्यापात इतरांना प्रशिक्षित करण्यासाठी त्यांच्याजवळ वेळच उरत नाही. तरीपण, इतरांना प्रशिक्षण देणं इतकं महत्त्वाचं का आहे याबद्दल आता आपण चर्चा करू या.

प्रशिक्षण—काळाची गरज

४. काही वेळा, वडील इतर बांधवांना प्रशिक्षण देण्याचं लांबणीवर का टाकतात?

काही वडिलांना मंडळीतील बांधवांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळ काढणं कठीण का वाटतं? कदाचित ते असा विचार करत असतील: ‘मंडळीची इतर कामं जास्त महत्त्वाची आहेत आणि ती वेळच्या वेळी पूर्ण करावीच लागतात. प्रशिक्षण तर नंतरही देता येईल. त्यामुळे मंडळीचं काम काही थांबणार नाहीए.’ पण, असा विचार करणं योग्य आहे का? इतर कामं जास्त महत्त्वाची असतील हे कबूल आहे. पण, बांधवांना प्रशिक्षण देण्याचं लांबणीवर टाकल्यास नकळत मंडळीचं नुकसान होऊ शकतं.

५, ६. (क) गाडी चालवणाऱ्याच्या उदाहरणावरून कोणता धडा शिकायला मिळतो? (ख) मंडळीत प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत आपण हे उदाहरण कसं लागू करू शकतो?

एक उदाहरण घेऊ या. गाडी चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी वेळोवेळी ऑईल बदली करणं गरजेचं आहे हे गाडी चालवणाऱ्याला माहीत असतं. पण हे पेट्रोल भरण्याइतकं महत्त्वाचं नाही असं कदाचित त्याला वाटत असेल. ऑईल बदललं नाही तरीसुद्धा गाडी काही लगेच थांबणार नाही; त्यामुळे ते नंतरही बदलता येईल असा कदाचित तो विचार करेल. पण, असा विचार करण्यात एक धोका आहे. योग्य वेळी ऑईल न बदलल्यास गाडीचं नुकसान होऊ शकतं. आणि नंतर गाडीच्या दुरुस्तीसाठी कदाचित बराच वेळ आणि पैसा खर्च करावा लागू शकतो. मग, या उदाहरणावरून कोणता धडा शिकायला मिळतो?

वडिलांना मंडळीची बरीच महत्त्वाची कामं वेळच्या वेळी पूर्ण करावी लागतात. जर त्यांनी ही कामं केली नाहीत तर मंडळीचं नुकसान होऊ शकतं. गाडी चालवणाऱ्याने ज्याप्रमाणे नियमितपणे गाडीत पेट्रोल टाकलं पाहिजे त्याचप्रमाणे वडिलांनीही “श्रेष्ठ” गोष्टींना म्हणजे जास्त महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य दिलंच पाहिजे. (फिलिप्पै. १:१०) पण, काही वडील ही महत्त्वाची कामं करण्यातच इतके गुंतलेले असतात की इतर बांधवांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्याजवळ वेळच नसतो. हे गाडीचं ऑईल बदलण्याकडे दुर्लक्ष करण्यासारखंच आहे. बांधवांना प्रशिक्षण देण्याचं काम वडिलांनी लांबणीवर टाकल्यास आज ना उद्या अशी वेळ येईल, जेव्हा मंडळीतील महत्त्वाची कामं करण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित बांधव उपलब्ध नसतील.

७. प्रशिक्षण देण्यासाठी वेळात वेळ काढणाऱ्या वडिलांकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहिलं पाहिजे?

त्यामुळे, प्रशिक्षण देणं तितकं महत्त्वाचं नाही असं कधीही समजू नका. ज्या वडिलांना मंडळीच्या भविष्याची काळजी असते आणि जे इतरांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळात वेळ काढतात ते सुज्ञपणाने कार्य करतात. खरंतर, हे बांधव मंडळीसाठी एक मोठा आशीर्वाद आहेत. (१ पेत्र ४:१० वाचा.) यामुळे मंडळीला कशा प्रकारे फायदा होतो?

वेळेचा योग्य वापर

८. (क) वडिलांनी इतरांना प्रशिक्षित का केलं पाहिजे? (ख) जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करत असलेल्या वडिलांवर कोणती महत्त्वाची जबाबदारी आहे? (“ प्रशिक्षण देण्याची हीच वेळ आहे!” असं शीर्षक असलेली चौकट पाहा.)

सर्वात अनुभवी वडिलांनीही हे नम्रपणे मान्य केलं पाहिजे, की जसजसं त्यांचं वय वाढत जाईल तसतशी त्यांना पूर्वीसारखी सगळी कामं करणं जमणार नाही. (मीखा ६:८) तसंच, “समय व प्रसंग” यांमुळे कधीकधी अनपेक्षित घटना घडू शकतात आणि वडिलांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडणं कठीण जाऊ शकतं. (उप. ९:११, १२, पं.र.भा.; याको. ४:१३, १४) म्हणूनच, अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या वडिलांनी तरुण बांधवांना प्रशिक्षित करण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. असं करण्याद्वारे ते यहोवाच्या लोकांबद्दल प्रेम आणि काळजी असल्याचं दाखवतात.—स्तोत्र ७१:१७, १८ वाचा.

९. इतरांना प्रशिक्षण देणं आज इतकं महत्त्वाचं का आहे?

इतरांना प्रशिक्षित करणारे वडील एक आशीर्वाद आहेत असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे, त्यांच्या प्रयत्नांमुळे मंडळीची आध्यात्मिक वाढ होण्यास हातभार लागतो. प्रशिक्षण दिल्यामुळे जबाबदाऱ्या हाती घेण्यास जास्त बांधव तयार होऊ शकतील. हे बांधव विश्वासू राहण्यास आणि एकता टिकवून ठेवण्यास इतरांना मदत करतील. आज या शेवटल्या काळात तर हे महत्त्वाचं आहेच, पण येणाऱ्या मोठ्या संकटाच्या वेळीही हे अत्यंत महत्त्वाचं असेल. (यहे. ३८:१०-१२; मीखा ५:५, ६) म्हणून, प्रिय वडिलांनो इतरांना प्रशिक्षित करण्यासाठी नियमितपणे वेळ काढा आणि याची सुरवात अगदी आजपासूनच करा.

१०. इतरांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळ मिळावा म्हणून कदाचित वडिलांना काय करावं लागू शकतं?

१० तुमचा जवळजवळ सगळाच वेळ मंडळीची महत्त्वाची कामं करण्यात खर्च होतो याची आम्हाला जाणीव आहे. तरीपण, तुम्हाला वेळात वेळ काढून इतरांना प्रशिक्षण द्यावं लागेल. (उप. ३:१) पण, तुमचे हे प्रयत्न नक्कीच सार्थक ठरतील, कारण यामुळे पुढे मंडळीला खूप फायदा होईल.

योग्य वातावरण निर्माण करा

११. (क) वेगवेगळ्या ठिकाणच्या वडिलांनी दिलेल्या सल्ल्यांबद्दल कोणती गोष्ट विशेष आहे? (ख) नीतिसूत्रे १५:२२ नुसार या वडिलांनी सुचवलेल्या सल्ल्यांवर चर्चा करणं महत्त्वाचं का आहे?

११ मंडळीतील बांधवांना प्रशिक्षण देण्यात यशस्वी ठरलेल्या काही वडिलांना अलीकडेच विचारण्यात आलं, की तुम्ही हे नेमकं कसं करता? * हे सर्व वडील वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या परिस्थितींत असूनसुद्धा विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी दिलेले सल्ले खूप मिळतेजुळते होते. यावरून काय दिसून येतं? हेच, की बायबलवर आधारित असलेलं प्रशिक्षण जगातल्या कुठल्याही ठिकाणी आणि कुठल्याही मंडळीत प्रभावी ठरतं. (१ करिंथ. ४:१७) म्हणून, या आणि पुढच्या लेखात आपण या वडिलांनी दिलेल्या काही सल्ल्यांवर चर्चा करू या. (नीति. १५:२२) या दोन लेखांत आपण प्रशिक्षण देणाऱ्यांना ‘प्रशिक्षक,’ आणि ज्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्यांना ‘शिकणारे’ किंवा ‘प्रशिक्षण घेणारे’ असं म्हणुयात.

१२. प्रशिक्षकाने काय करण्याची गरज आहे, आणि का?

१२ सर्वात आधी प्रशिक्षकाने योग्य वातावरण निर्माण केलं पाहिजे. हे महत्त्वाचं का आहे? ज्या प्रकारे शेतकरी बी पेरण्याआधी जमिनीची मशागत करतो, त्याच प्रकारे प्रशिक्षकाने शिकणाऱ्या बांधवाला नवीन गोष्टी शिकवण्याआधी त्याच्या मनाची तयारी करणं गरजेचं आहे. प्रशिक्षणासाठी योग्य वातावरण कसं तयार केलं जाऊ शकतं? यासाठी वडील पूर्वी होऊन गेलेल्या एका कुशल प्रशिक्षकाच्या अर्थात शमुवेल संदेष्ट्याच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात.

१३-१५. (क) यहोवाने शमुवेलाला काय सांगितलं? (ख) शमुवेलाने शौलाला नव्या जबाबदारीसाठी कशा प्रकारे तयार केलं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ग) शमुवेलाबद्दलचा हा वृत्तान्त वडिलांसाठी आज कसा उपयोगी ठरू शकतो?

१३ आजपासून ३,००० पेक्षा जास्त वर्षांआधी यहोवाने वृद्ध शमुवेल संदेष्ट्याला म्हटलं: “उद्या या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामिनी देशाचा एक मनुष्य पाठवेन, त्यास अभिषेक करून माझ्या इस्राएल लोकांवर अधिपती नेम.” (१ शमु. ९:१५, १६) यहोवाचे हे शब्द ऐकल्यावर शमुवेलाला याची जाणीव झाली की इस्राएल राष्ट्राचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आता त्याला दुसऱ्याच्या हाती सोपवावी लागणार होती. यहोवाची इच्छा होती की राष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी त्याने एका राजाला नेमावं. पण आधी या नव्या जबाबदारीसाठी त्या मनुष्याच्या मनाची तयारी करावी, असं शमुवेलाने ठरवलं. आणि यासाठी त्याने एक योजना आखली.

१४ दुसऱ्या दिवशी, शमुवेल शौलाला भेटला तेव्हा यहोवाने त्याला सांगितले: “ज्या पुरुषाविषयी मी तुला सांगितले होते तो हा.” हे ऐकताच शमुवेलाने आपल्या योजनेप्रमाणे केले. शौलाशी बोलण्याची संधी मिळावी म्हणून शमुवेलाने त्याला व त्याच्या एका सेवकाला आपल्यासोबत भोजन करण्याचं आमंत्रण दिलं. मेजवानीच्या वेळी भोजनगृहात शमुवेलाने शौलाला व त्याच्या सेवकाला प्रमुखस्थानी बसवलं आणि उत्तमोत्तम पदार्थ त्यांना वाढले. शमुवेल म्हणाला: “हे पाहा, हे राखून ठेवलेले आहे. हे आपल्यासमोर ठेवून खा.” भोजनानंतर शमुवेलाने शौलाला आपल्या घरी नेलं. मार्गात त्यांना एकमेकांशी निवांत बोलण्याची संधी मिळाली. शमुवेलाच्या घरी आल्यानंतर ते घराच्या छतावर गेले आणि तिथं शमुवेलाने रात्री उशिरापर्यंत “शौलाशी एकांतात बोलणे केले.” दुसऱ्या दिवशी शमुवेलाने शौलाचा अभिषेक करून त्याचे चुंबन घेतले आणि त्याला पुढील सूचना दिल्या. त्यानंतर, शौल निघून गेला. आता तो पुढील कामगिरीसाठी तयार होता.—१ शमु. ९:१७-२७; १०:१.

१५ शमुवेलाने शौलाला एका राष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी अभिषिक्त केलं होतं. अर्थात, एका राजाला अभिषिक्त करणं आणि मंडळीत वडील किंवा सेवा सेवक म्हणून काम करण्यासाठी एखाद्याला प्रशिक्षण देणं, यात बराच फरक आहे. तरीपण, शमुवेलाने ज्या प्रकारे शौलाच्या मनाची तयारी केली त्यावरून वडील बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतात. त्यांपैकी दोन गोष्टींवर आता चर्चा करू या.

मित्र बनून उत्सुकतेने प्रशिक्षण द्या

१६. (क) इस्राएली लोकांनी राजाची मागणी केली तेव्हा शमुवेलाला कसं वाटलं? (ख) यहोवाने शमुवेलाला शौलाचा अभिषेक करायला सांगितलं तेव्हा त्याने काय केलं?

१६ मागेपुढे पाहू नका तर शिकवण्यास उत्सुक असा. इस्राएली लोकांना राजा हवा आहे हे शमुवेलाने ऐकलं तेव्हा पहिल्यांदा तो निराश झाला आणि त्याला नाकारल्यासारखं वाटलं. (१ शमु. ८:४-८) यहोवाला एकदा नाही, तर तीन वेळा शमुवेलाला सांगावं लागलं की त्याने लोकांचं ऐकावं आणि त्यांच्यावर राजा नेमावा; कारण खरं पाहता शमुवेलाला असं करण्याची इच्छा नव्हती. (१ शमु. ८:७, ९, २२) पण, सुरवातीला जरी शमुवेलाच्या भावना अशा असल्या, तरीसुद्धा जो मनुष्य त्याची जागा घेऊन यापुढे राष्ट्राचं नेतृत्व करणार होता त्याच्याविषयी शमुवेलाच्या मनात ईर्ष्या किंवा राग उत्पन्न झाला नाही. यहोवाने त्याला शौलाचा अभिषेक करण्यास सांगितलं तेव्हा शमुवेलाने मुळीच मागेपुढे पाहिलं नाही. त्याने लगेच यहोवाच्या आज्ञेचं पालन केलं. आणि त्यानं हे फक्त करायचं म्हणून केलं नाही तर यहोवावर मनापासून प्रेम असल्यामुळे केलं.

१७. आज वडील शमुवेलाचं अनुकरण कसं करतात, आणि यामुळे त्यांना आनंद का होतो?

१७ आजही असे अनेक अनुभवी वडील आहेत, ज्यांनी शमुवेलाच्या उदाहरणाचं अनुकरण करून इतरांना प्रेमळपणे प्रशिक्षण दिलं आहे. (१ पेत्र ५:२) हे प्रेमळ वडील इतरांना शिकवायला उत्सुक असतात. त्यांच्यावर असलेल्या मंडळीतील काही जबाबदाऱ्या इतरांवर सोपवताना त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना नसते. याउलट, मंडळीतील इतर बांधव आपले सहकारी आहेत आणि मंडळीची देखभाल करण्यात ते आपल्याला मोलाची मदत देऊ शकतात असा दृष्टिकोन ते बाळगतात. (२ करिंथ. १:२४; इब्री १३:१६) आणि जेव्हा हे नवीन बांधव यहोवाच्या लोकांच्या फायद्यासाठी आपल्या क्षमतांचा वापर करू लागतात, तेव्हा निःस्वार्थ भावनेने त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या वडिलांना मनापासून आनंद होतो.—प्रे. कृत्ये २०:३५.

१८, १९. प्रशिक्षणासाठी एखाद्या बांधवाच्या मनाची तयारी करण्यासाठी एक वडील काय करू शकतात, आणि हे महत्त्वाचं का आहे?

१८ फक्त प्रशिक्षक असू नका तर मित्र बना. शमुवेल शौलाला भेटला तेव्हा तो लागेचच त्याचा अभिषेक करू शकला असता. पण त्याने असं केलं नाही. कारण जर त्याने असं केलं असतं तर राष्ट्राला राजा तर मिळाला असता, पण देवाच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी तो समर्थ नसता. म्हणूनच, आधी शमुवेलाने त्या नव्या जबाबदारीसाठी शौलाचं मन तयार केलं. शौलाचा अभिषेक करण्याआधी ते एकत्र जेवले, एकमेकांसोबत निवांतपणे बोलले आणि विश्रांतीदेखील घेतली. आणि योग्य वेळ आल्यावर शमुवेलाने नव्या राजाचा अभिषेक केला.

प्रशिक्षणाची सुरवात मैत्रीने होते (परिच्छेद १८, १९ पाहा)

१९ आजही हीच गोष्ट लागू होते. एखाद्या बांधवाला प्रशिक्षण द्यायला सुरवात करण्याआधी एका वडिलाने त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिकणाऱ्या बांधवाशी मैत्री वाढवण्यासाठी वडील काय करतील हे त्यांच्या परिस्थितीवर आणि संस्कृतीवर अवलंबून आहे. पण तुम्ही कुठेही राहत असला, तरी शिकणाऱ्या बांधवासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही इतर महत्त्वाच्या कामांतून वेळ काढला पाहिजे. असं केल्यास, त्याला मदत करण्याची तुम्हाला खरोखरच इच्छा आहे याची त्याला जाणीव होईल. (रोमकर १२:१० वाचा.) अशा रीतीने, प्रेमळपणे त्याच्याबद्दल काळजी व्यक्त केल्यामुळे आणि त्याच्याकडे विशेष लक्ष दिल्यामुळे शिकणाऱ्या त्या बांधवाला मनापासून कृतज्ञता वाटेल.

२०, २१. (क) चांगला शिक्षक कोणाला म्हणता येईल? (ख) पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?

२० कोणत्याही चांगल्या शिक्षकाला इतरांना शिकवायला मनापासून आवडतं हे खरं आहे. पण, ज्याला तो शिकवतो त्या व्यक्तीवर त्याचं मनापासून प्रेम असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. (योहान ५:२० पडताळून पाहा.) पण असं का म्हणता येईल? कारण जर शिकणाऱ्याला जाणवलं की तुम्हाला त्याची खरोखरच काळजी आहे, तर तो तुमच्याकडून शिकायला उत्सुक असेल. तेव्हा, वडिलांनो, फक्त शिकवण्यासाठीच उत्सुक असू नका, तर एक चांगला मित्र बनण्याचाही प्रयत्न करा.—नीति. १७:१७; योहा. १५:१५.

२१ एकदा का शिकणाऱ्याचं मन तयार झालं की मग वडील त्याला प्रशिक्षण द्यायला सुरवात करू शकतात. यासाठी ते कोणत्या पद्धतींचा वापर करू शकतात? याची चर्चा आपण पुढील लेखात करू या.

^ परि. 3 हा आणि यापुढचा लेख खासकरून वडिलांना उद्देशून आहे. पण यांतील माहिती सर्वांसाठीच उपयोगी आहे. असं का? कारण या माहितीमुळे बांधवांना याची जाणीव होईल की मंडळीत जास्त योगदान देण्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. मंडळीत साहाय्य करण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित बांधव असल्यास सर्वांनाच यामुळे फायदा होईल.

^ परि. 11 हे वडील ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, बेल्जियम, ब्राझील, फ्रान्स, फ्रेंच गायाना, जपान, कोरिया, मेक्सिको, नामिबिया, नायजीरिया, रीयूनियन, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका इथं राहतात.