व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धीरानं सहन करण्यास तुम्हाला कशामुळे मदत होऊ शकते?

धीरानं सहन करण्यास तुम्हाला कशामुळे मदत होऊ शकते?

अनिता यहोवाची साक्षीदार बनली तेव्हा तिचा पती तिच्यावर खूप रागावला. * तो तिला सभांना जाऊ द्यायचा नाही. आणि तिनं देवाचं नाव घेऊ नये असंही त्यानं बजावून सांगितलं. तिनं यहोवाचं नाव घेताच त्याचा पारा चढायचा.

तसंच, अनितानं आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवावं किंवा त्यांना सभेला न्यावं हेही त्याला मान्य नव्हतं. त्यामुळे पतीच्या नकळत आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवणं अनिताला फार कठीण गेलं.

अनिताप्रमाणे कदाचित तुमच्याही कुटुंबातील एखादा सदस्य तुम्हाला यहोवाची सेवा करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असेल. बऱ्याच काळापासून कदाचित तुम्ही आजारी असाल; तुमच्या मुलाचा, पतीचा किंवा पत्नीचा मृत्यू झाला असेल; किंवा मग तुमच्या कुटुंबातील एखादी प्रिय व्यक्ती सत्य सोडून गेली असेल. अशा परिस्थितीतही यहोवाला विश्वासू राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

प्रेषित पौलानं लिहिलं: “तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे.” (इब्री १०:३६) तर मग, धीरानं सहन करण्यासाठी तुम्हाला कशामुळे मदत होईल?

मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा

कठीण परिस्थितीचा धीरानं सामना करण्यासाठी आपण यहोवावर विसंबून राहणं गरजेचं आहे. त्यामुळे मदतीसाठी त्याला प्रार्थना करा. आपल्या पतीचा अचानक मृत्यू झाल्यानंतर अॅना नावाच्या एका बहिणीनं असंच केलं. त्यांच्या लग्नाला तीस वर्षं झाली होती. ती म्हणते, “एके दिवशी ते कामावर गेले आणि परत आलेच नाही. ते फक्त ५२ वर्षांचे होते.”

अॅना नोकरी करत असल्यामुळे ती व्यस्त राहायची. पण, यामुळे तिचं दुःख कमी झालं नाही. मग तिनं काय केलं? ती म्हणते, “मी माझं मन यहोवापुढं मोकळं केलं आणि मदतीसाठी अक्षरशः त्याच्याकडे भीक मागितली.” यहोवानं तिला नेहमी मदत केली असं तिला वाटतं. कारण, प्रत्येक वेळी प्रार्थना केल्यानंतर तिला अगदी स्वस्थ आणि शांत वाटायचं. ती पुढं म्हणते, “यहोवा माझ्या पतीचं पुनरुत्थान करेल याची मला पूर्ण खात्री आहे.”—फिलिप्पै. ४:६, ७.

यहोवा आपल्या सेवकांच्या प्रार्थना ऐकेल असं अभिवचन तो आपल्याला देतो. (स्तो. ६५:२) तसंच, त्याची सेवा करत राहण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी तो पुरवत राहील असं अभिवचनही तो देतो. अगदी कठीण परिस्थितीतही विश्वासू राहण्यासाठी यहोवा तुम्हाला नक्कीच मदत करेल.

नेहमी आपल्या बांधवांच्या सहवासात राहा

धीरानं सहन करण्यासाठी यहोवानं दिलेला आणखी एक मार्ग म्हणजे ख्रिस्ती मंडळीतले आपले बंधुभगिनी. पहिल्या शतकातील थेस्सलनीकातील बांधवांच्या उदाहरणावरून आपण बरंच काही शिकू शकतो. त्यांचा क्रूरतेनं छळ केला जात होता तेव्हा त्यांनी एकमेकांना खूप मदत केली. त्या वेळी त्यांनी एकमेकांना उत्तेजन देण्याची खूप गरज होती. (१ थेस्सलनी. २:१४; ५:११) ते नेहमी एकमेकांच्या सहवासात राहिले आणि त्यांचं एकमेकांसोबतच नातंदेखील खूप मजबूत होतं. यामुळे, यहोवाला विश्वासू राहण्यासाठी एकमेकांना मदत करणं त्यांना शक्य झालं. थेस्सलनीकातील बांधवांप्रमाणे विश्वासू राहण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

आपणदेखील मंडळीतील बांधवांसोबत मैत्री केली पाहिजे आणि त्यांना नेहमी उत्तेजन दिलं पाहिजे; खासकरून ते कठीण परिस्थितीचा सामना करतात तेव्हा. (रोम. १४:१९) प्रेषित पौलालाही छळामुळे आणि इतर समस्यांमुळे खूप त्रास झाला. पण, यहोवानं त्याला धीरानं सहन करण्यासाठी लागणारी मदत पुरवली. उदाहरणार्थ, यहोवानं बांधवांद्वारे पौलाला उत्तेजन दिलं. या बांधवांबद्दल प्रेषित पौल म्हणतो, “त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे.” (कलस्सै. ४:१०, ११) या बांधवांचं पौलावर खूप प्रेम होतं. त्यामुळे, जेव्हा कधी त्याला मदतीची गरज भासली तेव्हा त्यांनी त्याला सांत्वन आणि उत्तेजन दिलं. तुम्हालासुद्धा असे काही प्रसंग आठवतात का जेव्हा तुमच्या मंडळीतील बंधुभगिनींनी तुम्हाला उत्तेजन दिलं होतं?

वडिलांची मदत घ्या

मंडळीतले वडील, यहोवानं पुरवलेली आणखी एक मदत आहे. ती म्हणजे. हे बांधव तुम्हाला उत्तेजन देऊ शकतात. आणि बायबलमधून चांगला सल्लादेखील देऊ शकतात. बायबल म्हणतं, की ते “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा . . . रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाळ खडकाची छाया” असे आहेत. (यश. ३२:२) हे बांधव आपल्याला मदत करण्यासाठी तयार असतात हे जाणून आपल्याला किती दिलासा मिळतो! तेव्हा, एखादा कठीण प्रसंग असल्यास वडिलांकडून मदत मागा. यहोवाची सेवा करत राहण्यासाठी ते तुम्हाला मदत करू शकतात.

हे खरं आहे की वडील आपल्या सर्व समस्या काढून टाकू शकत नाहीत. शिवाय, तेसुद्धा आपल्याप्रमाणेच अपरिपूर्ण आहेत. (प्रे. कृत्ये १४:१५) पण, तरी समस्येत असताना आपण एखाद्या वडिलांकडे जातो आणि ते आपल्यासाठी यहोवाकडे प्रार्थना करतात तेव्हा आपल्याला किती बरं वाटतं! (याको. ५:१४, १५) इटलीतील एका बांधवांचं उदाहरण घ्या. अनेक वर्षांपासून गंभीर स्वरूपाचा आजार असलेल्या या बांधवाला एका वडिलानं उत्तेजन दिलं. ते म्हणतात, “बांधवांचं प्रेम, त्यांची आपुलकी आणि त्यांच्या भेटीमुळे धीरानं सहन करणं मला शक्य झालं.” तुम्हाला जर एखादी समस्या असेल तर तुम्ही वडिलांची मदत घ्यावी अशी स्वतः यहोवाची इच्छा आहे.

यहोवाची सेवा करत राहण्याकडे लक्ष द्या

आपण जर यहोवाची सेवा करण्याकडे लक्ष दिलं, तर तो आपल्याला कशी मदत करतो हे आपल्याला पाहायला मिळेल. जॉन नावाच्या बांधवानं असंच केलं. तो ३९ वर्षांचा असताना त्याला कॅन्सर झाला. इतक्या कमी वयात कॅन्सर झाला आहे ही गोष्ट त्याला अन्याय झाल्यासारखी वाटत होती. त्याला त्याच्या पत्नीची आणि तीन वर्षांच्या मुलाची खूप काळजी वाटत होती. तो म्हणतो, “माझ्या पत्नीला फक्त आमच्या मुलाचीच नाही तर माझीही काळजी घ्यावी लागत होती. तसंच, तिला सतत माझ्यासोबत दवाखान्यात यावं लागायचं.” जॉनला उपचारामुळे खूप थकल्यासारखं व्हायचं आणि त्याला पोटाचा त्रासदेखील सुरू झाला. पण, त्याची समस्या एवढ्यावरच थांबली नाही. जॉनला कळलं की त्याचे वडील आता जास्त दिवस जगणार नाहीत आणि त्यांचीही काळजी घेण्यासाठी कुणाचीतरी गरज पडणार होती.

या कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी जॉनला आणि त्याच्या कुटुंबाला कशामुळे मदत झाली? जॉनला खूप थकल्यासारखं वाटत असलं तरी आपल्या कुटुंबानं नियमित सभेला उपस्थित राहावं आणि यहोवाच्या सेवेत व्यस्त राहावं याकडे त्यानं लक्ष दिलं. तो म्हणतो, “कठीण परिस्थितीत असतानाही आम्ही सर्व सभांना उपस्थित राहायचो, प्रत्येक आठवडी प्रचाराला जायचो आणि नियमित रीत्या कौटुंबिक उपासना करायचो.” यहोवासोबतचं नातं मजबूत ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे जॉनला कळलं होतं. सुरवातीला जरी तो घाबरला, चिंतीत झाला तरी नंतर मात्र तो सावरला. त्याला माहीत होतं की यहोवाचं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याला हवी असलेली मदत तो नक्की पुरवेल. अशाच प्रकारची मदत यहोवा तुम्हालादेखील देऊ शकतो. चिंतेत असताना किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटत असताना यहोवा तुम्हाला मदत करू शकतो. जॉन म्हणतो, “यहोवानं जसं मला बळ दिलं, तसं तुम्हालाही देईल.”

समस्येत असताना पौलाचे शब्द नेहमी लक्षात ठेवा. त्यानं म्हटलं, “तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे.” यहोवाला प्रार्थना करण्याद्वारे नेहमी त्याच्यावर विसंबून राहा. मंडळीतील बांधवांच्या सहवासात राहा आणि वडिलांकडे मदत मागा. तसंच, यहोवाची सेवा करण्याकडे आपलं लक्ष केंद्रित करा. तुम्ही आता एखाद्या समस्येत असाल किंवा भविष्यात एखादी समस्या तुमच्यावर आली, तरी यहोवा तुम्हाला तिचा सामना करण्यासाठी नक्की मदत करेल हा भरवसा बाळगा.

^ परि. 2 काही नावं बदलण्यात आली आहेत.

[३१ पानांवरील चित्र]

इतरांनी कशा प्रकारे धीरानं सहन केलं यावर जर आपण विचार केला, तर आपल्यालाही धीरानं सहन करण्यास मदत होईल