व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रभूच्या प्रार्थनेनुसार जीवन जगा—भाग २

प्रभूच्या प्रार्थनेनुसार जीवन जगा—भाग २

“तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता . . . जाणून आहे.”—मत्त. ६:८.

१-३. यहोवा आपल्या गरजा जाणतो याची एका बहिणीला खात्री कशी पटली?

२०१२ साली जर्मनीत असताना लॅना नावाच्या पायनियर बहिणीला एक असा अनुभव आला, जो ती कधीच विसरू शकत नाही. ट्रेनमधून एअरपोर्टला जात असताना, प्रचार करण्याची संधी तिला मिळावी अशी प्रार्थना तिनं यहोवाला केली. एअरपोर्टवर आल्यावर तिला कळलं की काही कारणामुळे तिची फ्लाईट रद्द झाली आहे. आणि आता दुसऱ्या फ्लाईटसाठी तिला एक दिवस थांबावं लागणार होतं. तिच्याजवळ जास्त पैसे उरले नव्हते आणि त्यामुळे आता रात्री मुक्काम कुठं करावा असा प्रश्न तिला पडला. म्हणून तिनं परत एकदा यहोवाला प्रार्थना केली. यानंतर जे घडलं त्यावरून तिला वाटतं की यहोवानं तिच्या दोन्ही प्रार्थनांचं उत्तर तिला दिलं.

तिची प्रार्थना संपताच, तिला एका मुलानं येऊन म्हटलं, “हाय लॅना, तू इथं कशी काय?” तो मुलगा तिचा शाळेतला वर्गसोबती होता. तो दक्षिण आफ्रिकेला जात होता आणि त्याची आई व आजी त्याला एअरपोर्टवर सोडायला आल्या होत्या. लॅनानं त्यांना सांगितलं की तिची फ्लाईट रद्द झाली आहे आणि रात्री राहण्यासाठी तिच्याकडे ठिकाण नाही. हे ऐकून त्या मुलाच्या आईनं आणि आजीनं लॅनाला आपल्या घरी बोलावलं. घरी आल्यावर त्यांनी तिला तिच्या विश्वासाबद्दल बरेच प्रश्न विचारले. तसंच पायनियर म्हणून ती नेमकं काय करते हेदेखील त्यांना जाणून घ्यायचं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी लॅनानं त्यांच्यासोबत बायबलवर चर्चा केली आणि त्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली. एखाद्या यहोवाच्या साक्षीदारानं त्यांना पुन्हा येऊन भेटावं म्हणून त्यांचा पत्ता आणि फोन नंबर तिनं घेतला. नंतर लॅना सुखरूप आपल्या घरी परतली आणि ती आजही पायनियर म्हणून सेवा करत आहे. या अनुभवावरून तिला असं वाटतं की यहोवानं तिच्या प्रार्थना ऐकल्या होत्या आणि तिची गरज ओळखून तिला मदतही केली होती.—स्तो. ६५:२.

४. आपण या लेखात कशावर चर्चा करणार आहोत?

आपल्यावर एखादी समस्या येते तेव्हा आपण सहसा मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करतो. आणि अशा वेळी तो आपल्या प्रार्थना ऐकतो. (स्तो. ३४:१५; नीति. १५:८) पण प्रभूच्या प्रार्थनेतून आपल्याला हे समजतं की यापेक्षाही जास्त महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, ज्यांबद्दल आपण प्रार्थना केली पाहिजे. या लेखात आपण प्रभूच्या प्रार्थनेतील शेवटच्या चार विनंत्यांवर चर्चा करू या. आणि त्यामुळे यहोवाला विश्वासू राहण्यास आपल्याला कशी मदत मिळते हेदेखील पाहू या.—मत्तय ६:११-१३ वाचा.

“आमची रोजची भाकर आज आम्हास दे”

५, ६. आपल्याला काही कमी नसली, तरी “आमची रोजची भाकर” आम्हाला दे अशी विनंती करण्यास येशूनं का शिकवलं?

“माझी रोजची भाकर” मला दे असं येशूनं शिकवलं नाही, तर “आमची रोजची भाकर” आम्हाला दे असं त्यानं शिकवलं. येशूच्या शब्दांचा अर्थ एका बांधवानं जे म्हटलं त्यावरून आपल्याला समजतो. आफ्रिकेत राहणारे व्हिक्टर नावाचे विभागीय पर्यवेक्षक असं म्हणतात, “घराचं भाडं कसं भरायचं, उद्याच्या जेवणाचं काय, या गोष्टींची चिंता आम्हाला करावी लागत नाही. यासाठी खरंतर मी दररोज यहोवाचे मनापासून आभार मानतो. मंडळीतले बांधव आमच्या रोजच्या गरजा भागवतात. आणि या बांधवांसाठी मी आठवणीनं यहोवाजवळ प्रार्थना करतो. त्यांना आर्थिक समस्यांना तोंड देता यावं अशी मागणी मी यहोवाजवळ करतो.”

आपल्याला कदाचित खाण्यापिण्याची कमी नसेल, पण आपल्या बऱ्याच बांधवांना आहे. बरेच बांधव गरीब आहेत. शिवाय, एखाद्या विपत्तीमुळे त्यांचं खूप नुकसान झालं आहे. आपण अशा बांधवांसाठी प्रार्थना तर केलीच पाहिजे. पण सोबतच आपण त्यांना मदतदेखील केली पाहिजे. जसं की, आपण त्यांना काही अन्नसामग्री किंवा वस्तू देऊ शकतो. तसंच, आपण जगभरातील कार्याकरता नियमितपणे दान देऊ शकतो. कारण हे दान आपल्या गरजू बांधवांना मदत पुरवण्यासाठी वापरलं जातं.—१ योहा. ३:१७.

७. आपण उद्याची चिंता करू नये, हे येशूनं कसं शिकवलं?

प्रार्थना कशी करावी हे शिकवल्यानंतर, आपण भौतिक गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करू नये असंदेखील येशूनं शिकवलं. त्यानं म्हटलं की जर यहोवा रानफुलांची काळजी घेतो तर “तो विशेषकरून तुम्हाला पोषाख घालणार नाही काय? यास्तव . . . काय पांघरावे, असे म्हणत चिंता करत बसू नका.” त्यानंतर येशूनं पुन्हा म्हटलं, “उद्याची चिंता करू नका.” (मत्त. ६:३०-३४) आपल्याला भविष्यात ज्या गोष्टी लागतील त्यांबद्दल चिंता करण्याची गरज नाही. त्याऐवजी आपल्या रोजच्या गरजा भागत आहेत यात आपण समाधानी असलं पाहिजे. आपण आपल्या गरजांसाठी प्रार्थना करू शकतो. जसं की राहण्यासाठी एक घर, कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी नोकरी आणि उपचार पद्धतींविषयी योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन. पण या गोष्टींपेक्षाही महत्त्वाची अशी एक गोष्ट आहे जिच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे.

८. ‘रोजची भाकर’ या शब्दांवरून आपल्याला कशाची आठवण झाली पाहिजे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

येशूनं ‘रोजची भाकर’ याविषयी जे म्हटलं त्यावरून आपल्याला आध्यात्मिक अन्नाच्या गरजेचीदेखील आठवण झाली पाहिजे. कारण आणखी एका प्रसंगी त्यानं म्हटलं होतं: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.” (मत्त. ४:४) तेव्हा, यहोवासोबतच आपलं नातं नेहमी मजबूत राहावं म्हणून त्यानं आपल्याला शिकवत राहावं आणि आपल्या गरजा पुरवत राहाव्यात अशी प्रार्थना आपण केली पाहिजे.

“आमची ऋणे आम्हास सोड”

९. आपण पाप करतो तेव्हा आपण यहोवाचे कर्जदार कसे बनतो?

येशूनं म्हटलं: “आमची ऋणे आम्हास सोड.” आणखी एका प्रसंगी त्यानं म्हटलं: “आमच्या पापांची क्षमा कर.” (मत्त. ६:१२; लूक ११:४) आपलं पाप एका कर्जासारखं असल्यामुळे येशूनं ऋण हा शब्द इथं वापरला आहे. १९५१ सालच्या एका टेहळणी बुरूजमध्ये सांगितलं होतं, की यहोवा आपला निर्माणकर्ता असल्यामुळे आपण त्याच्यावर प्रेम करावं आणि त्याच्या अधीन राहावं अशी तो अगदी योग्यपणे आपल्याकडून अपेक्षा करू शकतो. याअर्थी आपण त्याला देणं लागतो. पण आपण जेव्हा पाप करतो तेव्हा आपण प्रेम आणि अधीनता दाखवण्यात चुकतो आणि त्याअर्थी यहोवाचे कर्जदार बनतो. त्यामुळे तो आपल्यासोबतचा नातेसंबंध तोडू शकतो. म्हणून आपण पाप करतो तेव्हा यहोवावर आपलं प्रेम नाही असा याचा अर्थ होतो.—१ योहा. ५:३.

१०. यहोवा आपले पाप कशामुळे क्षमा करू शकतो, आणि आपल्याला याबद्दल कसं वाटलं पाहिजे?

१० आपल्या पापांची क्षमा मिळण्यासाठी यहोवानं खंडणीची व्यवस्था केली यासाठी आपण त्याचे किती आभारी आहोत! आपल्याला दररोज यहोवाच्या क्षमेची गरज पडते. येशूनं २,००० वर्षांपूर्वी जरी बलिदान दिलं असलं, तरी आजही आपल्याला त्याच्या खंडणीचा फायदा होतो. या अमूल्य देणगीसाठी आपण नेहमी यहोवाचे आभार मानले पाहिजेत. पाप आणि मृत्यू यांतून सुटका मिळवण्यासाठी लागणारी किंमत देणं आपल्यापैकी कोणालाही शक्य नाही. (स्तोत्र ४९:७-९; १ पेत्र १:१८, १९ वाचा.) प्रार्थनेत येशूनं ‘माझ्या’ नव्हे तर “आमच्या पापांची क्षमा कर” असं म्हटलं. या शब्दांवरून हेच कळतं की आपल्या सर्वांनाच खंडणीची गरज आहे. यात आपले बंधुभगिनीही समाविष्ट आहेत. आपण आपल्या बंधुभगिनींचा व यहोवासोबतच्या त्यांच्या नातेसंबंधाचादेखील विचार करावा अशी यहोवाची इच्छा आहे. यात जे आपलं मन दुखावतात त्यांना लगेच माफ करणंदेखील समाविष्ट आहे. सहसा या चुका मोठ्या नसतात. पण आपण आपल्या बांधवांना क्षमा करतो तेव्हा आपलं त्यांच्याप्रती असलेलं प्रेम दिसून येतं. त्यासोबतच, यहोवा आपल्याला क्षमा करतो या गोष्टीची आपल्याला कदर आहे हेदेखील आपण दाखवून देतो.—कलस्सै. ३:१३.

तुम्ही इतरांना माफ केलं, तरच यहोवा तुम्हाला माफ करेल (परिच्छेद ११ पाहा)

११. इतरांना माफ करणं इतकं महत्त्वाचं का आहे?

११ आपण अपरिपूर्ण असल्यामुळे कधीकधी इतरांना क्षमा करणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. (लेवी. १९:१८) समजा एखाद्या बांधवानं आपलं मन दुखावलं आणि त्याबद्दल आपण मंडळीत इतरांना सांगत बसलो, तर यामुळे मंडळीची शांती व एकता धोक्यात येईल. आणि असं करण्याद्वारे आपण दाखवू की खंडणीच्या तरतुदीची आपल्याला कदर नाही. (मत्त. १८:३५) आपण जर इतरांना माफ केलं नाही तर यहोवादेखील आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे, खंडणीच्या तरतुदीचा आपल्याला फायदा व्हावा म्हणून इतरांना माफ करणं महत्त्वाचं आहे. (मत्तय ६:१४, १५ वाचा.) तसंच, यहोवानं आपल्याला माफ करावं अशी जर आपली इच्छा असेल, तर त्याला न आवडणारी कोणतीही गोष्ट करण्याचं आपण नेहमी टाळलं पाहिजे.—१ योहा. ३:४, ६.

“आम्हास परीक्षेत आणू नको”

१२, १३. (क) येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर काय घडलं? (ख) आपण सैतानाच्या प्रलोभनांना बळी पडतो तेव्हा इतरांना दोष देणं योग्य का नाही? (ग) शेवटपर्यंत विश्वासू राहण्याद्वारे येशूनं काय दाखवून दिलं?

१२ प्रभूच्या प्रार्थनेतील “आम्हास परीक्षेत आणू नको” ही विनंती आपल्याला येशूच्या बाप्तिस्म्यानंतर जे घडलं त्याची आठवण करून देते. “सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी” म्हणून देवाच्या आत्म्यानं येशूला अरण्यात नेलं. (मत्त. ४:१; ६:१३) यहोवानं असं का घडू दिलं? आदाम आणि हव्वेनं यहोवाच्या अधिकाराला नाकारल्यामुळे जो वादविषय निर्माण झाला होता तो मिटवण्याकरता यहोवानं येशूला पृथ्वीवर पाठवलं होतं. आदाम आणि हव्वेच्या बंडामुळे बरेच प्रश्न उद्भवले ज्यांचं उत्तर मिळण्याकरता वेळ जाणं गरजेचं होतं. जसं की, मानवांच्या निर्मितीत काही खोट होती का? सैतानानं परीक्षा आणल्यास एक परिपूर्ण व्यक्ती विश्वासू राहू शकते का? आणि मानवांना देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे का? (उत्प. ३:४, ५) भविष्यात जेव्हा या प्रश्नांची उत्तरं मिळतील, तेव्हा हे सिद्ध होईल की यहोवाची राज्य करण्याची पद्धतच योग्य आहे.

१३ यहोवा पवित्र असल्यामुळे तो कधीच वाईट गोष्टींनी कुणाची परीक्षा घेत नाही. खरंतर सैतानच लोकांची परीक्षा घेतो. (मत्त. ४:३) सैतान वेगवेगळ्या पाशांमध्ये आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतो. पण त्यांचा प्रतिकार करायचा की नाही, हे मात्र आपल्या हातात आहे. (याकोब १:१३-१५ वाचा.) सैतानानं येशूची परीक्षा घेतली तेव्हा येशूनं लगेच देवाच्या वचनाचा संदर्भ देऊन सैतानाला झिडकारलं. येशू यहोवाला विश्वासू राहिला. पण, सैतानानं तेवढ्यावरच हार मानली नाही. बायबल सांगतं की तो योग्य “संधी मिळेपर्यंत” येशूला सोडून गेला. (लूक ४:१३) सैतानानं येशूवर बऱ्याच परीक्षा आणल्या पण येशू नेहमी यहोवाला विश्वासू राहिला. परिपूर्ण व्यक्ती अतिशय कठीण परिस्थितीतही यहोवाला विश्वासू राहू शकते हे येशूनं दाखवून दिलं. आज सैतान आपल्यावर परीक्षा आणून आपल्याला विश्वासातून पाडण्याचा प्रयत्न करतो.

१४. सैतानाचे पाश टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१४ यहोवाच्या राज्य करण्याच्या अधिकाराबद्दल जे प्रश्न उद्भवले होते त्यांची उत्तरं अजूनही पूर्णपणे मिळालेली नाहीत. त्यामुळे ही उत्तरं मिळेपर्यंत यहोवानं सैतानाला आपल्यावर परीक्षा आणण्याची अनुमती दिली आहे. पण यहोवा स्वतः आपल्यावर परीक्षा आणत नाही. खरंतर आपण यहोवाला विश्वासू राहू शकतो याची त्याला पूर्ण खात्री आहे. आणि तो आपल्याला मदत करायलाही तयार आहे. पण योग्य ते करण्यासाठी तो कधीच आपल्याला भाग पाडत नाही. आपल्या इच्छास्वातंत्र्याची तो कदर करतो. त्यामुळे त्याला विश्वासू राहायचं की नाही ही निवड तो आपल्याला करू देतो. आपल्याला जर सैतानाच्या पाशांना बळी पडायचं नसेल तर आपण पुढील दोन गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली म्हणजे यहोवासोबतचं आपलं नातं मजबूत केलं पाहिजे. आणि दुसरी, आपण सतत त्याला मदतीसाठी प्रार्थना केली पाहिजे. सैतानाचे पाश टाळण्यासाठी आपण जेव्हा यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा तो त्याचं उत्तर कसं देतो?

यहोवाच्या जवळ राहा आणि प्रचारातील आवेश टिकवून ठेवा (परिच्छेद १५ पाहा)

१५, १६. (क) सैतानाचे कोणते काही पाश आहेत ज्यांचा आपण प्रतिकार केला पाहिजे? (ख) आपण एखादं पाप करतो तेव्हा त्यासाठी कोण जबाबदार असतं?

१५ यहोवा त्याचा शक्तिशाली पवित्र आत्मा आपल्याला देतो. यामुळे आपल्याला सैतानाचे पाश टाळणं शक्य होतं. सैतान आपल्यावर कोणकोणत्या प्रकारचे हल्ले करतो, याबद्दल यहोवा बायबलद्वारे आणि सभांद्वारे आपल्याला सांगतो. उदाहरणार्थ, आपण आपला बहुतेक वेळ, पैसा आणि शक्ती अनावश्यक गोष्टी मिळवण्यात घालवू नये अशी ताकीद तो आपल्याला देतो. युरोपमधील एका समृद्ध शहरात राहणाऱ्या एसपेन आणि याने या जोडप्याचं उदाहरण घ्या. प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी त्यांनी बरीच वर्षं पायनियर म्हणून सेवा केली. पण, नंतर जेव्हा त्यांना मूल झालं तेव्हा त्यांना पायनियरिंग सोडावी लागली. आता त्यांना दोन मुलं आहेत. एसपेन म्हणतात, “आध्यात्मिक कार्यांत पूर्वीइतका वेळ देणं आता आम्हाला जमत नाही. त्यामुळे आम्ही सैतानाच्या पाशांत पडू नये आणि प्रचार कार्यातील आमचा आवेश टिकून राहावा, तसंच आम्ही आध्यात्मिक प्रगती करत राहावी अशी प्रार्थना आम्ही यहोवाला करतो.”

१६ पोर्नोग्राफी किंवा अश्‍लील मनोरंजन हा सैतानाचा आणखी एक पाश आहे ज्यापासून आपण सावध असलं पाहिजे. आपण जर या पाशाला बळी पडलो तर त्यासाठी आपण सैतानाला दोष देऊ शकत नाही. असं का? कारण कोणतीही चुकीची गोष्ट करण्यासाठी सैतान आणि त्याचं जग आपल्याला कधीच भाग पाडू शकत नाही. काही लोक चुकीच्या इच्छांना मनात घोळू देतात म्हणून ते या पाशात अडकतात. पण आपल्या बऱ्याच बंधुभगिनींनी याबाबतीत सैतानाचा प्रतिकार केला आहे आणि आपणही करू शकतो.—१ करिंथ. १०:१२, १३.

“आम्हास वाइटापासून सोडव”

१७. (क) यहोवानं आपल्याला वाइटापासून सोडवावं अशी आपली इच्छा असल्याचं आपण कसं दाखवू शकतो? (ख) लवकरच आपल्याला कशातून सुटका मिळेल?

१७ यहोवानं आपल्याला “वाइटापासून” सोडवावं अशी आपली इच्छा आहे हे आपण कसं दाखवू शकतो? जगाचा भाग न बनण्याद्वारे आणि “जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती” न करण्याद्वारे आपण हे दाखवू शकतो. (योहा. १५:१९; १ योहा. २:१५-१७) यहोवा सैतानाचा व त्याच्या दुष्ट जगाचा नाश करेल तेव्हा आपल्याला सैतानापासून सुटका मिळेल. पण तोपर्यंत आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की सैतान त्याचा काळ थोडा आहे “हे ओळखून अतिशय संतप्त” झाला आहे. म्हणून आपल्याला यहोवाची सेवा करण्यापासून थांबवण्यासाठी होता होईल तितका प्रयत्न तो करतो. यामुळे सैतानापासून आपला बचाव करावा अशी आपण सतत यहोवाला प्रार्थना केली पाहिजे.—प्रकटी. १२:१२, १७.

१८. आपल्याला देवाच्या राज्यात जायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे?

१८ सैतान नसलेल्या जगात तुम्हाला राहायला आवडेल का? असल्यास देवाच्या राज्यासाठी प्रार्थना करत राहा. तसंच देवाचं नाव पवित्र केलं जावं आणि पृथ्वीवर त्याच्या इच्छेनुसार व्हावं अशी प्रार्थना करा. आपल्या गरजांसाठी नेहमी यहोवावर विसंबून राहा. आणि त्याला विश्वासू राहण्यासाठी लागणारी मदत तो पुरवेल हा भरवसा बाळगा. तेव्हा, येशूनं शिकवलेल्या प्रार्थनेनुसार जीवन जगण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहा.