व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्याचं लोकांवर प्रेम होतं

त्याचं लोकांवर प्रेम होतं

“माझं खासकरून मानवजातीवर खूप प्रेम होतं.”—नीति. ८:३१, NW.

१, २. येशूनं मानवांप्रती असलेलं त्याचं गाढ प्रेम कसं दाखवलं आहे?

यहोवाचा ज्येष्ठ पुत्र येशू यहोवाच्या विलक्षण बुद्धीचं सर्वोत्तम उदाहरण आहे. तो स्वर्गात यहोवासोबत एक “कुशल कारागीर” म्हणून काम करत होता. कल्पना करा, जेव्हा यहोवानं “आकाश स्थापले” असेल आणि पृथ्वीचा पाया घातला असेल, तेव्हा येशूला किती आनंद व समाधान मिळालं असेल. पण, आपल्या पित्यानं निर्माण केलेल्या सर्व सृष्टीत येशूचं खासकरून ‘मानवजातीवर खूप प्रेम होतं.’ (नीति. ८:२२-३१) सुरवातीपासूनच येशू मानवांवर खूप प्रेम करायचा.

नंतर, येशू आनंदानं स्वर्ग सोडून पृथ्वीवर मानव या नात्यानं यायला तयार झाला. यावरून यहोवाप्रती असलेलं त्याचं प्रेम आणि एकनिष्ठा दिसून आली. तसंच, मानवांप्रती असलेलं त्याचं गाढ प्रेमही यावरून दिसून आलं. कारण या प्रेमाखातरच तो “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण” करायला पृथ्वीवर आला होता. (मत्त. २०:२८; फिलिप्पै. २:५-८) पृथ्वीवर असताना यहोवानं त्याला चमत्कार करण्याची शक्ती दिली. या चमत्कारांवरून येशूचं मानवांवर किती प्रेम आहे हे दिसून येतं. तसंच येशू भविष्यात काय करणार आहे हेदेखील आपल्याला कळतं.

३. आपण या लेखात कशावर चर्चा करणार आहोत?

पृथ्वीवर असताना येशूनं “देवाच्या राज्याची सुवार्ता” देखील सांगितली. (लूक ४:४३) हे राज्यच यहोवाच्या नावावरचा कलंक मिटवेल आणि मानवांच्या समस्यांना कायमचं काढून टाकेल, हे येशूला माहीत होतं. या राज्याविषयी सांगताना येशूनं अनेक चमत्कारदेखील केले. या चमत्कारांवरून येशूला लोकांबद्दल किती काळजी होती हे दिसून येतं. याबद्दल जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे? कारण येशूनं जे चमत्कार केले त्यांमुळे आपल्याला भविष्यासाठी आशा मिळते आणि अभिवचनांवर आपला भरवसा आणखी दृढ होतो. आता आपण येशूच्या चार चमत्कारांवर चर्चा करू या.

“माझी इच्छा आहे, शुद्ध हो”

४. येशू एका कुष्ठरोग्याला भेटला तेव्हा काय घडलं?

आपल्या सेवाकार्यादरम्यान येशू गालील प्रांतात गेला होता. तिथल्या एका शहरात कुष्ठरोग या भयानक आजारानं ग्रस्त असलेला एक मनुष्य त्याला भेटला. (मार्क १:३९, ४०) तो इतका आजारी होता की लूक वैद्यानं त्याचं वर्णन “कुष्ठरोगाने भरलेला” असं केलं. (लूक ५:१२) बायबल सांगतं की त्या मनुष्यानं जेव्हा येशूला पाहिलं, तेव्हा तो “गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, ‘आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा.’” येशूमध्ये बरं करण्याची शक्ती आहे हे त्याला माहीत होतं. पण येशूची खरंच तशी इच्छा आहे का, हे त्या कुष्ठरोग्याला पाहायचं होतं. आपण असं का म्हणू शकतो? कारण त्या मनुष्याचा नक्कीच त्या काळच्या परूश्यांशी संपर्क आला असेल. हे परुशी कुष्ठरोग्यांना खूप खालच्या नजरेनं पाहायचे. येशूही त्यांच्यासारखाच होता का? कुष्ठरोगानं विद्रूप झालेल्या या मनुष्याशी तो कसा वागला? तुम्ही जर येशूच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं?

५. कुष्ठरोग्याला येशूनं का बरं केलं?

खरंतर नियमशास्त्रानुसार त्या माणसानं येशूजवळ येताना “अशुद्ध, अशुद्ध,” असं ओरडण्याची गरज होती. पण त्यानं असं केलं नाही. (लेवी. १३:४३-४६) मग येशूला याचा राग आला का? मुळीच नाही. याऐवजी येशूला त्या माणसाची दया आली आणि त्याला मदत करण्याची त्याला इच्छा झाली. येशू त्या प्रसंगी काय विचार करत होता हे तर आपल्याला माहीत नाही, पण येशूच्या भावना आपण नक्कीच समजू शकतो. त्याला त्या माणसाची खूप दया आली आणि त्यानं त्याला बरं केलं. त्या माणसाला सर्व जण अशुद्ध समजायचे आणि त्यामुळे कोणी त्याच्या जवळही येत नव्हतं, पण याच्या अगदी उलट येशूनं त्या माणसाला स्पर्श केला. आणि पूर्ण खात्रीनं व प्रेमळपणे येशूनं म्हटलं, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” आणि त्याचा रोग लगेच बरा झाला! (लूक ५:१३) यहोवानंच येशूला चमत्कार करण्याची शक्ती दिली होती. यावरून यहोवाचं लोकांवर किती प्रेम आहे हे दिसून येतं.—लूक ५:१७.

६. येशूनं जे चमत्कार केले त्यात कोणती गोष्ट विशेष आहे, आणि त्यावरून आपल्याला काय समजतं?

यहोवाच्या शक्तीमुळे येशू बरेच अद्भुत चमत्कार करू शकला. त्यानं फक्त कुष्ठरोग्यांनाच नाही, तर इतर आजार असलेल्यांनाही बरं केलं. बायबल सांगतं की येशूनं मुक्यांना, अपंगांना, पायानं अधू असलेल्यांना आणि आंधळ्यांनाही बरं केलं, आणि हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले. (मत्त. १५:३१) आजारी व्यक्तींना बरं करताना निरोगी व्यक्तींच्या शरीरातील अवयव वापरण्याची येशूला कधीच गरज पडली नाही. उलट, बिघडलेले अवयव पुन्हा व्यवस्थित करण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. आणि त्याच्या चमत्कारामुळे लोक लगेचच बरे व्हायचे. काही वेळा तर लांब असलेल्या लोकांनाही त्यानं बरं केलं. (योहा. ४:४६-५४) या उदाहरणांवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? हेच की आपला राजा येशू ख्रिस्त याच्याकडे सर्व आजारांचा समूळ नाश करण्याची शक्ती तर आहेच, पण त्यासोबतच त्याच्या मनात तसं करण्याची इच्छादेखील आहे. येशू लोकांशी कसा वागला याविषयी शिकल्यामुळे आपल्याला खात्री मिळते, की नवीन जगात “दुबळा व दरिद्री यांच्यावर तो दया करेल.” (स्तो. ७२:१३) येशू सर्वांचं दुखणं बरं करेल कारण तसं करण्याची त्याला मनापासून इच्छा आहे.

ऊठ, आपली चटई घे आणि चालू लाग

७, ८. बेथेस्दा इथं येशू आजारी माणसाला भेटला त्याआधी काय घडलं?

त्या कुष्ठरोग्याला बरं केल्याच्या काही महिन्यांनंतर येशू गालीलातून यहुदीयात गेला. तिथंही तो देवाच्या राज्याची सुवार्ता सर्वांना सांगत होता. येशूचं ऐकण्यासाठी तिथं हजारो लोक आले असतील आणि लोकांप्रती असलेलं त्याचं प्रेम पाहून ते नक्कीच प्रभावीत झाले असतील. गरीब आणि दुःखीकष्टी लोकांना सांत्वन देण्याची येशूची मनापासून इच्छा होती. शिवाय, एका चांगल्या भविष्याच्या आशेबद्दलही त्याला त्यांना सांगायचं होतं.—यश. ६१:१, २; लूक ४:१८-२१.

वल्हांडण सण साजरा करण्यासाठी निसान महिन्यात येशू जेरूसलेमला गेला. या खास सणासाठी बरेच लोक शहरात आले होते त्यामुळे शहरात खूप गर्दी होती. जेरूसलेममधील मंदिराच्या उत्तरेकडे बेथेस्दा नावाचं तळं होतं. तिथं येशू एका अशा माणसाला भेटला ज्याला चालता येत नव्हतं.

९, १०. (क) लोक बेथेस्दा इथं का जायचे? (ख) येशूनं तळ्याजवळ कोणता चमत्कार केला आणि त्यातून आपण काय शिकतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

आजारी लोक सहसा बेथेस्दा इथं जायचे. कारण त्या तळ्यातील पाणी हलू लागल्यावर त्यात उतरणाऱ्या व्यक्तीचा आजार लगेच बरा होतो, असं लोक मानायचे. हताश, निराश झालेले अनेक लोक बरं होण्याच्या आशेनं तिथं जायचे. त्यामुळे तिथं किती गोंधळ होत असेल याचा विचार करा. पण, येशू तर परिपूर्ण होता, त्याला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता. तर मग येशू या ठिकाणी का गेला? लोकांवर असलेल्या प्रेमामुळे. आणि तिथंच त्याला तो माणूस भेटला ज्याला चालता येत नव्हतं. त्याला हा आजार येशूच्या जन्माआधीपासूनच होता.—योहान ५:५-९ वाचा.

१० येशूनं त्या माणसाला विचारलं, ‘तुला परत चालता यावं असं तुला वाटतं का?’ तेव्हा त्या माणसानं खूप दुःखानं येशूला उत्तर दिलं, ‘मला बरं तर व्हायचंय पण तळ्यात घेऊन जाण्यासाठी माझ्यासोबत कोणीच नाही.’ हे ऐकल्यानंतर येशूनं त्याला एक अशक्य गोष्ट करायला सांगितली. येशूनं त्याला त्याची चटई उचलून चालायला सांगितलं. त्या माणसानं आपली चटई उचलली आणि तो चालू लागला! येशू नवीन जगात जे अद्भुत चमत्कार करेल त्याचं हे किती सुदंर उदाहरण! या चमत्कारातून येशूचं इतरांप्रती असलेलं गाढ प्रेमदेखील दिसून येतं. गरजू लोकांना त्यानं स्वतः शोधलं. येशूच्या उदाहरणावरून आपणही बरंच काही शिकू शकतो. आज जगात होणाऱ्या वाईट गोष्टींमुळे अनेक लोक निराश झाले आहेत. अशांना शोधून त्यांना सांत्वन देण्यास आपण येशूच्या उदाहरणामुळे प्रेरित होतो.

माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?

११. आजारी लोकांशी येशू प्रेमळपणे वागला हे मार्क ५:२५-३४ या वचनांतून कसं दिसून येतं?

११ मार्क ५:२५-३४ वाचा. १२ वर्षांपासून एका स्त्रीला रक्तस्रावाचा गंभीर आजार होता. या आजारामुळे तिचं जगणं कठीण झालं होतं. ती देवाची उपासनादेखील पूर्णपणे करू शकत नव्हती. तिनं बरेच औषधोपचार केले होते आणि आजारातून सुटका मिळवण्यासाठी सगळे पैसेही खर्च केले होते. पण तिला कुठंही यश मिळालं नाही. उलट तिचा आजार आणखीनच वाढला. एके दिवशी त्या स्त्रीनं वेगळ्या प्रकारचा उपाय करण्याचं ठरवलं. ती गर्दीतून आत शिरली आणि तिनं येशूच्या कपड्यांना स्पर्श केला. (लेवी. १५:१९, २५) येशूला जाणवलं की त्याच्यातून शक्ती निघाली आहे, त्यामुळे त्यानं विचारलं, ‘माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?’ तेव्हा ती स्त्री “भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली, व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला.” यहोवानं या स्त्रीला बरं केलं आहे हे येशूला माहीत होतं. त्यामुळे प्रेमळपणे तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.”

येशूला आपली काळजी आहे आणि तो आपल्या समस्या जाणतो, हे त्यानं केलेल्या चमत्कारांतून दिसून येतं (परिच्छेद ११, १२ पाहा)

१२. (क) तुम्ही येशूविषयी आतापर्यंत जे शिकलात, त्यावरून त्याच्या गुणांबद्दल तुम्हाला काय वाटतं? (ख) येशूनं आपल्यासाठी कोणतं चांगलं उदाहरण मांडलं आहे?

१२ येशू लोकांसोबत, खासकरून आजारी लोकांसोबत किती प्रेमळपणे वागला हे पाहून आपलं मन भरून येतं. पण सैतान मात्र याच्या अगदी उलट कार्य करतो. आपल्यावर कोणी प्रेम करत नाही, देवाच्या नजरेत आपलं काहीच मोल नाही असं विचार करण्यास तो आपल्याला भाग पाडतो. पण, येशूच्या चमत्कारांवरून आपल्याला कळतं की त्याला आपली खूप काळजी आहे आणि तो आपल्या समस्या जाणतो. आपल्याला असा प्रेमळ राजा व महायाजक मिळाला आहे यासाठी आपण यहोवाचे किती आभारी आहोत! (इब्री ४:१५) बऱ्याच काळापासून आजारी असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं कदाचित आपल्याला कठीण वाटेल. खासकरून, जेव्हा आपण स्वतः अशा आजारपणाचा सामना केलेला नसतो तेव्हा. पण, येशूचा विचार करा. तो तर कधीच आजारी पडला नाही. तरीसुद्धा त्याला आजारी लोकांबद्दल कळकळ होती आणि त्यानं त्यांच्या भावना समजून घेतल्या. त्याच्या या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे.—१ पेत्र ३:८.

“येशू रडला”

१३. लाजराच्या पुनरुत्थानातून आपण येशूविषयी काय शिकतो?

१३ इतरांचं दुःख पाहून येशूलाही दुःख झालं. उदाहरणार्थ, येशूचा मित्र लाजर याचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांना व मित्रांना रडताना पाहून, येशूलाही खूप वाईट वाटलं आणि तो “विव्हळ झाला.” (योहान ११:३३-३६ वाचा.) येशू लाजराचं पुनरुत्थान करण्यासाठीच तिथं आला होता, तरीसुद्धा तो रडला. इतरांसमोर आपल्या भावना व्यक्त करायला येशूला जराही संकोच वाटला नाही. येशूचं लाजरावर व त्याच्या कुटुंबीयांवर इतकं प्रेम होतं, की त्यानं लाजराला पुन्हा जिवंत केलं.—योहा. ११:४३, ४४.

१४, १५. (क) मानवजातीच्या समस्या काढून टाकण्याची यहोवाची इच्छा आहे, हे कशावरून दिसतं? (ख) कबरेसाठी जो मूळ ग्रीक शब्द वापरला आहे त्यावरून आपण काय शिकतो?

१४ येशू यहोवाचं प्रतिरूप आहे असं बायबल म्हणतं. (इब्री १:३) त्यामुळे येशूनं जे चमत्कार केले त्यावरून आजारपण, दुःख आणि मृत्यू या गोष्टींना कायमचं काढून टाकण्याची यहोवाचीही इच्छा आहे हे सिद्ध होतं. लवकरच यहोवा आणि येशू बऱ्याच मृत लोकांना पुन्हा जिवंत करतील. येशूनं म्हटलं, “कबरेतील सर्व माणसे . . . पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.”—योहा. ५:२८, २९.

१५ “कबर” असं भाषांतरीत केलेला मूळ ग्रीक शब्द एखाद्या मृत व्यक्तीची ‘आठवण ठेवणे’ याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे येशूनं “कबर” या शब्दाचा उपयोग केला, तेव्हा यहोवा मृत लोकांची आठवण ठेवतो असं तो सुचवत होता. आपला सर्वशक्तिमान देव यहोवा, आपल्या मृत प्रिय जणांच्या सर्व गोष्टी, जसं की त्यांचे गुण, त्यांचं व्यक्तीमत्व आठवणीत ठेवू शकतो. (यश. ४०:२६) यहोवामध्ये या गोष्टी आठवणीत ठेवण्याची केवळ क्षमताच नाही, तर इच्छादेखील आहे. यहोवा नवीन जगात काय करणार आहे हे बायबलमध्ये दिलेल्या पुनरुत्थानाच्या उदाहरणांवरून दिसून येतं.

येशूच्या चमत्कारांवरून आपण काय शिकतो?

१६. देवाच्या विश्वासू सेवकांना कोणती संधी असेल?

१६ आपण शेवटपर्यंत यहोवाला विश्वासू राहिलो तर आपल्याला एक मोठा चमत्कार स्वतः अनुभवायला मिळेल. तो म्हणजे, मोठ्या संकटातून सुखरूप नवीन जगात जाण्याचा. हर्मगिदोनानंतरही आपल्याला अनेक चमत्कार पाहायला मिळतील. त्या वेळी प्रत्येकालाच चांगलं आरोग्य मिळेल. (यश. ३३:२४; ३५:५, ६; प्रकटी. २१:४) आज आपल्याला चष्मा, काठ्या, कुबड्या, व्हिलचेअर आणि श्रवण यंत्राचा वापर करावा लागतो. पण कल्पना करा नवीन जगात यांपैकी कशाचीही गरज नसणार. हर्मगिदोनानंतर आपल्यासाठी भरपूर काम असेल. त्यामुळे यहोवा आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य देईल. देवाच्या राज्यात लोकांना या पृथ्वीचं रूपांतर एका सुंदर नंदनवनात करण्याची जबाबदारी सोपवली जाईल.—स्तो. ११५:१६.

१७, १८. (क) येशूनं केलेल्या चमत्कारांतून काय दिसून येतं? (ख) नवीन जगात जाण्यासाठी जे गरजेचं आहे ते करण्यासाठी आपण तयार का असलं पाहिजे?

१७ येशूनं आजारी लोकांना ज्या प्रकारे बरं केलं त्याबद्दल जेव्हा ‘मोठ्या लोकसमुदायातील’ लोक वाचतात, तेव्हा त्यांना खूप सांत्वन मिळतं. (प्रकटी. ७:९) तसंच, भविष्यात आपल्याला कोणताही आजार नसणार, या आशेवरही आपला विश्वास आणखी मजबूत होतो. येशूचं मानवांवर किती गाढ प्रेम आहे हेदेखील आपल्याला या चमत्कारांवरून कळतं. (योहा. १०:११; १५:१२, १३) येशूनं मनापासून जे प्रेम दाखवलं त्यावरून खरंतर यहोवाचं आपल्या प्रत्येकावर किती प्रेम आहे, हे आपल्याला दिसून येतं.—योहा. ५:१९.

१८ आज जगात सर्वांनाच दुःख, समस्या आणि मृत्यूचा सामना करावा लागतो. (रोम. ८:२२) यामुळेच आपल्याला देवाच्या राज्याची खूप गरज आहे. त्या राज्यात देवानं अभिवचन दिल्यानुसार कोणीही आजारी नसेल. मलाखी ४:२ (मराठी कॉमन लँग्वेज) या वचनात आपण वाचतो की “पुष्ट वासरे गोठ्यातून बागडत बाहेर पडावीत” तसं आपण आनंदित असू. कारण अपरिपूर्णता काढून टाकली जाईल आणि आपलं आरोग्य चांगलं असेल. तेव्हा, अशा नवीन जगात जाण्याकरता जे काही करण्याची गरज आहे ते आपण करत राहू. यासाठी यहोवावरील आपलं प्रेम आणि त्याच्या अभिवचनांवरील आपला विश्वास आपल्याला प्रेरणा देत राहो. येशूनं जे चमत्कार केले ते खरंतर भविष्यात कायमस्वरूपी मिळणाऱ्या आशीर्वादांची केवळ एक झलक होती. यावर मनन केल्यानं आपला विश्वास नक्कीच मजबूत होतो!