वृद्धापकाळात यहोवाची सेवा करणे
सत्तरीतले अर्नस्ट नावाचे बांधव अगदी दुःखानं म्हणतात, “माझी तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. त्यामुळं यहोवाच्या सेवेत मी जास्त काही करू शकत नाही.” * या बांधवासारखा विचार तुमच्याही मनात येतो का? जर तुम्ही वयस्क असाल आणि तुमची तब्येत खालावत चालली असेल, तर उपदेशक या पुस्तकातील बाराव्या अध्यायात सांगितलेल्या गोष्टी तुमच्या बाबतीतही खऱ्या होत असल्याचं तुम्हाला जाणवेल. या अध्यायातील पहिल्या वचनात वृद्धापकाळाला “अनिष्ट दिवस” असं म्हटलं आहे. त्यामुळं, जीवनात आता काहीच उरलं नाही असं कदाचित तुम्हाला वाटेल. पण तरी, आनंदानं यहोवाची सेवा करत, एक समाधानी आणि अर्थपूर्ण जीवन जगणं तुम्हाला शक्य आहे.
आपला विश्वास टिकवून ठेवा
पण बंधू आणि भगिनींनो, अशा कठीण परिस्थितीतून जाणारे तुम्ही एकटेच आहात असा मुळीच विचार करू नका. बायबल काळातही यहोवाच्या काही वृद्ध सेवकांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. जसं की वयोवृद्ध इसहाक, याकोब आणि अहीया यांना नीट दिसत नव्हतं. (उत्प. २७:१; ४८:१०; १ राजे १४:४) दावीद राजाला वय झाल्यामुळं थंडी सहन होत नव्हती. (१ राजे १:१) अन्नाची रेलचेल असूनही बर्जिल्ल्याला अन्नाची चव कळत नव्हती आणि त्याला नीट ऐकूही येत नव्हतं. (२ शमु. १९:३२-३५) आपल्या विवाहसोबत्याला गमावल्यामुळं अब्राहाम आणि नामीदेखील आपल्या उतारवयात एकटे पडले होते.—उत्प. २३:१, २; रूथ १:३, १२.
मग यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी व आनंद टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टीनं त्यांच्यातील प्रत्येकाला मदत केली? बायबल म्हणतं की देवाच्या वचनावरील विश्वासामुळं अब्राहामाला वृद्धापकाळातही “विश्वासाने सबळ” राहण्यास मदत मिळाली. (रोम. ४:१९, २०) त्यामुळं आपल्यालाही अशाच मजबूत विश्वासाची गरज आहे. अशा प्रकारचा विश्वास आपलं वय, क्षमता आणि परिस्थितीवर अवलंबून नसतो. याकोबाच्या उदाहरणाचाच विचार करा. जरी तो अशक्त होता, त्याला कमी दिसत होतं आणि तो अंथरुणाला खिळलेला होता, तरी देवानं दिलेल्या वचनावर त्याचा पक्का भरवसा होता. (उत्प. ४८:१-४, १०; इब्री ११:२१) ईनेस ही ९३ वर्षांची बहीण स्नायूंच्या आजारानं त्रस्त आहे, तरीही ती म्हणते: “दररोज मी यहोवाकडून मिळणारी मदत अनुभवते. येणाऱ्या प्रत्येक दिवशी मी नवीन जगाबद्दल विचार करत असते, आणि त्यामुळं मला खूप दिलासा मिळतो.” खरंच किती सकारात्मक दृष्टिकोन आहे या बहिणीचा!
प्रार्थना करण्याद्वारे, रोज बायबल वाचण्याद्वारे आणि सभेला हजर राहण्याद्वारे आपण आपला विश्वास आणखी मजबूत करू शकतो. वयस्कर दानीएल संदेष्टा रोज न चुकता दिवसातून तीनदा प्रार्थना करायचा आणि देवाच्या वचनाचा अभ्यासही करायचा. (दानी. ६:१०; ९:२) हन्ना नावाच्या एका वृद्ध विधवेनंदेखील मंदिरात जायचं कधीच सोडलं नाही. (लूक २:३६, ३७) सभेला जाण्याचा आणि त्यात सहभाग घेण्याचा तुम्ही होता होईल तितका प्रयत्न करता, तेव्हा फक्त तुम्हालाच नाही तर इतरांनादेखील यामुळं प्रोत्साहन मिळतं. पूर्वीसारखी सेवा करणं तुम्हाला जमत नसेल, तरी या गोष्टीची खात्री बाळगा की यहोवा तुमची स्थिती जाणतो आणि तुमच्या प्रार्थनांकडे तो नेहमी कान देतो.—नीति. १५:८.
आपल्याला नीट पाहता यावं, नीट वाचता यावं आणि सभांना उपस्थित राहता यावं असं तुम्हाला मनापासून वाटतं हे आम्ही जाणतो. पण तुमच्यासाठी हे दिवसेंदिवस कठीण होत चाललं असेल किंवा कदाचित अशक्यही असेल. अशा वेळी तुम्ही काय कराल? तुमच्याकरता उपलब्ध असलेल्या सोयींचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा. सभेला उपस्थित राहू न शकणारे अनेक जण फोनद्वारे सभा ऐकतात. ७९ वर्षांच्या इंगा मोठ्या अक्षरांतील आवृत्तीचा वापर करून सभांची तयारी करतात. यासाठी मंडळीतील एक बांधव त्यांना मदत करतो.
कदाचित तुमच्याकडे पुष्कळ वेळ असेल जो इतरांकडे सहसा नसतो. तेव्हा ध्वनिमुद्रित बायबल वाचन, बायबल आधारित साहित्य, भाषणं आणि ध्वनिमुद्रित नाटकं ऐकण्यासाठी तुम्ही या वेळेचा चांगला वापर करू शकता. यासोबतच आपल्या बंधुभगिनींना फोन करून त्यांना “उत्तेजन” मिळेल अशा एखाद्या अनुभवाविषयी किंवा बायबलमधील एखाद्या मुद्द्याविषयी त्यांना सांगू शकता.—रोम. १:११, १२.
देवाच्या सेवेत व्यस्त राहा
वयाची ऐंशी उलटलेल्या ख्रिस्टा नावाच्या एका बहिणीनं खूप दुःखानं म्हटलं, “तुम्ही देवाच्या सेवेत पूर्वी जितकं करू शकत होता तितकं करणं आता तुम्हाला शक्य नाही ही जाणीवच फार
वाईट आहे.” मग एक वृद्ध व्यक्ती स्वतःला आनंदी कसं ठेवू शकते? ७५ वर्षांचे पीटर याचं उत्तर देताना म्हणतात, “यासाठी आपण सकारात्मक राहिलं पाहिजे. आणि आपल्याला जे जमणार नाही त्याचा विचार करण्यापेक्षा आपण जे करू शकतो ते आपण आनंदानं केलं पाहिजे.”तुम्हाला घरोघरचं प्रचार करणं आता शक्य नसेल, तर इतर कोणत्या मार्गानं प्रचार करता येईल याचा तुम्ही विचार केला आहे का? हायडी नावाची एक बहीण घरोघरच्या कार्यात आता आधीसारखी भाग घेऊ शकत नाही. पण वयाची ऐंशी उलटलेल्या या बहिणीनं कंप्युटरचा वापर करून पत्र लिहायला शिकून घेतलं. काही वृद्ध प्रचारक बागेत किंवा बसस्टॉपवर बसून बायबल आधारित चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न करतात. तर काहीजण वृद्धाश्रमात किंवा हॉस्पिटलमध्ये असताना त्यालाच आपलं “क्षेत्र” बनवतात. तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा तिथं राहणाऱ्या इतर लोकांना ते साक्ष देतात. तुम्हालाही असं करणं शक्य आहे का?
आपल्या वृद्धापकाळात दावीद राजानं अगदी आवेशानं खऱ्या उपासनेला बढावा दिला. त्यानं मंदिराच्या बांधकामासाठी पुष्कळ पैसा उभा केला व लागणारी मदत पुरवली. (१ इति. २८:११–२९:५) तुम्हीदेखील जगभरात होणाऱ्या कार्यासाठी असाच आवेश दाखवू शकता. तुमच्या मंडळीतील पायनियरांना किंवा आवेशी प्रचारकांना तुम्ही उत्तेजन देऊ शकता. शिवाय, त्यांना एखादी भेटवस्तू देऊ शकता किंवा चहा-पाण्यासाठी त्यांना घरी बोलवू शकता. तसंच, तुमच्या मंडळीतील लहान मुलांसाठी, कुटुंबांसाठी, पूर्णवेळच्या सेवकांसाठी, आजारी लोकांसाठी आणि जबाबदाऱ्या हाताळणाऱ्या बांधवांसाठी प्रार्थना करू शकता.
तुम्ही आणि तुमची सेवा यहोवाच्या नजरेत अतिशय मोलाची आहे. म्हणून तुमचा स्वर्गीय पिता तुम्हा प्रिय वृद्धजनांना कधीच त्यागणार नाही. (स्तो. ७१:९) यहोवाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तो तुमची कदर करतो. लवकरच अशी वेळ येईल, जेव्हा आपलं वय वाढत राहील पण त्याचा कोणताच परिणाम आपल्यावर होणार नाही. उलट परिपूर्ण आरोग्य आणि पूर्ण जोमानं आपण आपल्या प्रेमळ पित्याची, यहोवाची सदासर्वकाळ सेवा करत राहू.
^ परि. 2 काही नावं बदलण्यात आली आहेत.