जीवन कथा
“द्वीपसमूह हर्ष करो”
२२ मे, २००० सालचा तो दिवस माझ्या आठवणीत कायमचा कोरला गेलाय. जगभरातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या इतर बांधवांसोबत मीही ब्रुकलिन इथल्या नियमन मंडळाच्या कॉन्फरन्स रूममध्ये थांबलो होतो. लेखन समितीचे सदस्य तिथं येण्याची आम्ही सर्व जण वाट पाहत होतो. भाषांतर करताना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्यांवर उपाय सुचवण्यासाठी आम्हाला सांगण्यात आलं होतं. आणि आम्हाला सुचलेले काही उपाय आम्ही तिथं सादर करणार होतो. त्यामुळे आम्ही थोडं चिंतित होतो. पण, थोड्याच वेळात सुरू होणारी ती सभा इतकी महत्त्वाची का होती? याविषयी सांगण्याआधी, चला मी तुम्हाला थोडं माझ्याबद्दल सांगतो.
१९५५ साली, ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्झलँड राज्यात माझा जन्म झाला. त्यानंतर लगेचच माझी आई एस्टेल हिनं यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यासाला सुरवात केली. याच्या एक वर्षानंतर तिचा बाप्तिस्मा झाला. माझे वडील रॉन यांनी मात्र १३ वर्षांनंतर सत्य स्वीकारलं. आणि माझा बाप्तिस्मा १९६८ साली, क्वीन्झलँडच्या एका दुर्गम खेड्यात झाला.
अगदी लहानपणापासूनच मला वाचनाची भारी हौस होती आणि भाषा हा माझा अगदी आवडीचा विषय होता. जेव्हा जेव्हा मी माझ्या आई-वडिलांसोबत फिरायला निघायचो तेव्हा तेव्हा मी मात्र कारच्या मागच्या सीटवर जाऊन पुस्तक वाचत बसायचो. कारमधून दिसणारी छानछान दृश्यं पाहण्याऐवजी, माझी अशी तऱ्हा पाहून माझ्या पालकांना नक्कीच राग येत असावा. पण माझ्या या छंदामुळेच शाळेत मी चांगल्या मार्कानं पास व्हायचो. एवढंच नव्हे तर टास्मानिया बेटावरच्या ग्लेनॉर्की शहरात असलेल्या हायस्कूलमध्ये मी पुष्कळ पुरस्कारही मिळवले.
पण त्या काळातच, मला एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेणं भाग पडलं. स्कॉलरशिप स्वीकारून उच्च शिक्षणासाठी युनिव्हर्सिटीत जायचं की नाही, हे मला ठरवायचं होतं. पुस्तकं आणि अभ्यासावर माझं नेहमीच प्रेम होतं. पण अशा कोणत्याही गोष्टींपेक्षा यहोवावर जास्त प्रेम करण्यास माझ्या आईनं मला शिकवलं. यासाठी मी खरंच तिचा खूप आभारी आहे. (१ करिंथ. ३:१८, १९) तेव्हा झालं असं, की मूलभूत शिक्षण झाल्या-झाल्या मी पायनियरिंग करण्याचा निर्णय घेतला. यासाठी माझ्या आई-वडिलांचीही काही हरकत नव्हती. आणि १९७१ च्या जानेवारी महिन्यात मी तसं केलंही. त्या वेळी मी फक्त १५ वर्षांचा होतो.
त्यानंतर पुढं आठ वर्षं, मला टास्मानियामध्ये पायनियर म्हणून काम करण्याचा बहुमान मिळाला. त्यादरम्यानच मी टास्मानियामधील जेनी अॅलकॉक नावाच्या एका सुंदर मुलीशी लग्न केलं. स्मीटन आणि क्वीन्झटाऊन या दुर्गम गावांमध्ये आम्ही चार वर्षं सोबत मिळून खास पायनियर या नात्यानं सेवा केली.
एक मजल पॅसिफिकच्या बेटांकडे
१९७८ मध्ये एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मी माझ्या पत्नीसोबत पापुआ न्यू गिनी इथल्या पोर्ट मॉरेस्बीला गेलो. त्या अधिवेशनात हिरी मोटू भाषेत भाषण देणारे मिशनरी बांधव माझ्या खास लक्षात राहिले आहेत. ते काय म्हणत होते हे मला समजत नव्हतं. पण त्यांना पाहून, मीही मिशनरी व्हावं, नवीन भाषा शिकावी आणि बांधवांना त्यांच्या भाषेत प्रोत्साहन द्यावं असं मला वाटू लागलं. आणि त्याच वेळी भाषेबद्दल असणारं माझं प्रेम यहोवाच्या सेवेत कसं वापरता येईल याची जाणीव मला झाली.
आश्चर्य म्हणजे, ऑस्ट्रेलियामध्ये परतल्यावर मिशनरी म्हणून सेवा करण्यास आम्हाला आमंत्रित करण्यात आलं. १९७९ साली, जानेवारी महिन्यात तुवालूच्या फुनाफूटी बेटावर आम्ही पोचलो. त्या वेळी अख्ख्या तुवालूमध्ये फक्त तीनच बाप्तिस्मा झालेले प्रचारक होते.
साहजिकच, तुवालूअन भाषा शिकणं काही सोपी गोष्ट नव्हती. शिवाय त्या भाषेत उपलब्ध असलेलं एकमेव पुस्तक म्हणजे ‘नवा करार’. त्या भाषेत ना कोणता शब्दकोश, ना भाषा शिकण्याकरता कोणता क्लास होता. म्हणून शेवटी, दररोज कमीत कमी १० ते २० शब्द शिकण्याचा निर्णय आम्ही घेतला. पण आपण शिकत असलेल्या शब्दांचा खरा अर्थ आपल्याला समजत नसल्याची जाणीव आम्हाला लवकरच झाली. दुरात्मिक गोष्टी वाईट आहेत असं सांगण्याऐवजी आम्ही लोकांना चक्क तराजू आणि चालण्याच्या काठ्या वापरू नका असं सांगायचो! पण, आता पुष्कळ बायबल अभ्यास असल्यामुळे, त्यांची भाषा शिकून घेण्याशिवाय आमच्याजवळ दुसरा पर्यायच उरला नव्हता. खूप वर्षांनंतर त्यांच्यापैकीच एका बायबल विद्यार्थीनीनं म्हटलं: “तुम्हाला आता आमची भाषा बोलता येते हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो. खरं सांगायचं तर सुरवातीला तुमचं बोलणं समजून घेणं आमच्यासाठी मोठं कोडंच होतं!”
पण एका गोष्टीमुळे मात्र आम्हाला लवकरात लवकर तुवालूअन भाषा शिकून घेणं शक्य झालं. भाड्यानं घेता येईल अशी एकही खोली न मिळाल्यामुळे आम्हाला खेड्याच्या मुख्य भागात राहणाऱ्या एका साक्षीदार कुटुंबासोबत राहावं लागलं. त्यामुळे इतर ठिकाणीच नव्हे तर घरातही तुवालूअन भाषेत बोलणं आम्हाला भाग होतं. पुढं काही वर्षं इंग्लिश भाषेशी आमचा काहीच संबंध उरला नाही. त्यामुळे तुवालूअन भाषाच आमची मुख्य भाषा बनली होती.
तिथं पोचल्यावर, पुष्कळ लोकांनी सत्याविषयी आवड दाखवण्यास सुरवात केली. पण त्यांच्यासोबत नेमकं कशातून १ करिंथ. १४:९) त्यामुळे संख्येनं १५,००० पेक्षा कमी तुवालूअन भाषा बोलणाऱ्या लोकांना, त्यांच्या स्वतःच्या भाषेत कधी साहित्य मिळेल का, याविषयी मला नेहमी शंका वाटायची. पण यहोवानं दोन गोष्टी शाबीत करून आम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिलं: (१) “दूरच्या द्वीपात” राहणाऱ्या लोकांनीही त्याच्याबद्दल शिकावं, अशी त्याची इच्छा आहे, आणि (२) लोकांच्या नजरेत “नम्र व गरीब” असणाऱ्या या लोकांनी त्याच्या नावात आश्रय घ्यावा असंही त्याला वाटतं.—यिर्म. ३१:१०; सफ. ३:१२.
अभ्यास करावा, हेच आम्हाला कळत नव्हतं. कारण त्यांच्या भाषेत कोणतंही प्रकाशन उपलब्ध नव्हतं. मग व्यक्तिगत अभ्यास करणं त्यांना कसं शक्य होणार होतं? शिवाय जेव्हा ते सभेला येण्यास सुरवात करतील तेव्हा ते कोणती गीतं गातील? तयारी करण्यास काहीच साहित्य नसेल, तर ते भाषण तरी कसं देतील आणि सभांची तयारी तरी कशी करतील? किंवा बाप्तिस्म्यासाठी प्रगतीसुद्धा कशी करतील? या भोळ्या भाबड्या लोकांना, यहोवाबद्दल शिकवण्यासाठी खरंच त्यांच्या स्वतःच्या भाषेत असणाऱ्या साहित्याची खूप गरज होती. (सत्य शिकवण्यासाठी भाषांतराचं काम
१९८० साली शाखा कार्यालयानं आम्हाला तुवालूअन भाषेत साहित्याचं भाषांतर करण्यासाठी नेमलं. या भाषेची म्हणावी तितकी समज नसतानाही आम्ही भाषांतराला सुरवात केली. (१ करिंथ. १:२८, २९) सगळ्यात आधी, शासनाकडून एक जुनं मशीन घेऊन, सभांसाठी साहित्य छापण्यास आम्ही सुरवात केली. नंतर सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते या पुस्तकाचंही आम्ही भाषांतर केलं आणि याच लहान मशीनवर ते छापलं. तेव्हाच्या शाईचा तो उग्र वास आणि वीजपुरवठा नसल्यामुळे त्या रखरखत्या उन्हात हातानंच साहित्य छापणं किती अवघड काम होतं याची आठवण मला आजही होते.
तुवालूअन भाषेत भाषांतर करणं आमच्यासाठी साधीसुधी गोष्ट नव्हती. कारण शब्दांचा अर्थ पाहण्यासाठी आमच्याजवळ ना डिक्शनरी होती, ना संशोधन करण्यासाठी तुवालूअन भाषेतली पुस्तकं. पण कधीकधी हवी असणारी मदत आम्हाला दुसऱ्या मार्गानं मिळायची. उदाहरणार्थ, एके दिवशी सकाळी आम्ही चुकून विरोध करणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी गेलो. शिक्षक म्हणून काम केलेल्या त्या वयस्कर माणसानं, पुन्हा घरी न फिरकण्याची ताकीद आम्हाला दिली आणि म्हटलं: “मला फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तुमच्या भाषांतरात तुम्ही बहुतेक वेळा कर्मणी प्रयोग असलेल्या वाक्यांचाच वापर करता. तुवालूअन भाषेत अशा प्रकारची वाक्यं अगदी क्वचितच वापरली जातात.” हे ऐकल्यावर
मी इतरांनाही याविषयी विचारून खात्री करून घेतली आणि भाषांतरात सुधारणा करण्यासाठी काही बदलही केलेत. सत्याला विरोध करणाऱ्या पण आपली प्रकाशनं वाचणाऱ्या या व्यक्तीचा वापर करून यहोवानं कशा प्रकारे आम्हाला मदत केली, हे पाहून मला खरंच खूप आश्चर्य वाटलं!तुवालूअन भाषेत लोकांना सादर करण्यात आलेलं पहिलं प्रकाशन होतं स्मारकविधीची आमंत्रण पत्रिका. त्यानंतर राज्य वार्ता क्र. ३० या पत्रिकेचंही आम्ही प्रकाशन केलं. विशेष म्हणजे इंग्लिशसोबतच ही पत्रिका प्रकाशित करण्यात आली. लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत काहीतरी देता आलं याचा आम्हाला खूप आनंद झाला. त्यानंतर थोड्याच काळात, आमच्याजवळ तुवालूअन भाषेत काही माहितीपत्रकं, इतकंच नव्हे तर काही पुस्तकंदेखील होती. १९८३ साली ऑस्ट्रेलियातील शाखा कार्यालयानंही तुवालूअन भाषेत टेहळणी बुरूज नियतकालिक छापण्यास सुरवात केली. २४ पानांचं हे नियतकालिक दर तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित होऊ लागलं. पण तुवालू लोकांना ही पुस्तकं आणि मासिकं आवडली का? हो, या लोकांना मुळातच वाचायची आवड असल्यानं त्यांनीही ती आनंदानं स्वीकारली. ज्या ज्या वेळी एखादं नवीन साहित्य प्रकाशित व्हायचं, त्या त्या वेळी राष्ट्रीय रेडिओ स्टेशनवर त्याची घोषणा केली जायची. आणि कधीकधी तर ती त्या दिवसाची खास बातमी असायची! *
भाषांतराचं काम आम्ही कसं करायचो? पहिल्यांदा आम्ही सगळं काही कागदावर उतरवायचो. त्यानंतर तयार झालेलं भाषांतर ऑस्ट्रेलियातील शाखा कार्यालयाला पाठवण्याइतपत व्यवस्थित होईपर्यंत आम्ही ते पुन्हा पुन्हा टाईप करायचो. मग शाखा कार्यालयात असणाऱ्या दोन बहिणी एकच उतारा वेगवेगळं बसून कंप्युटरवर तो टाईप करायच्या. मग त्या दोघींनी टाईप केलेल्या त्या उताऱ्यांची एकमेकांसोबत तुलना केली जायची. त्यामुळे त्यातील चुका दिसून यायच्या आणि मग त्या चुका सुधारणं शक्य व्हायचं. यानंतर शाखा कार्यालयात साहित्याचं संकलन केलं जायचं, म्हणजे उताऱ्यांसोबत चित्रांना एकत्र करून त्यांची मांडणी केली जायची. अशा प्रकारे तयार झालेलं साहित्य एअरमेलद्वारे (हवाई टपाल सेवा) आम्हाला परत पाठवलं जायचं. मग आम्ही ते पुन्हा तपासून छपाईसाठी शाखा कार्यालयाला परत पाठवायचो.
पण भाषांतराच्या कामात आता किती सुधारणा झाल्या आहेत! आता भाषांतर करताना मजकूर कंप्युटरवरच टाईप केला जातो आणि तिथंच हवे ते फेरबद्दल केले जातात. त्यानंतर भाषांतर करणाऱ्या गटासोबत असणारी एखादी व्यक्ती मग त्या साहित्याचं संकलन करते. आणि मग भाषांतर गट छपाईसाठी त्या सर्व फाईल्स इंटरनेटच्या माध्यमानं शाखा कार्यालयाला पाठवतात. आता कुणालाही भाषांतर केलेला मजकूर पोस्टानं पाठवण्याकरता शेवटच्या मिनिटापर्यंत धडपडत पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज पडत नाही!
इतर जबाबदाऱ्या
जसजशी वर्षं सरत गेली तसतसं जेनी आणि मला पॅसिफिकच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या. १९८५ साली तुवालूमधून आम्हाला सामोआ शाखा कार्यालयात पाठवण्यात आलं. तिथं तुवालूअन भाषेतील भाषांतरासोबतच सामोअन, टाँगन आणि टॉकेलुअन भाषेत होणाऱ्या भाषांतराच्या कामातही आमची मदत झाली. * त्यानंतर १९९६ साली आम्हाला फिजी शाखा कार्यालयात नेमण्यात आलं. तिथंही फिजीयन, किरीबाटी, नारूअन, रोटूमन आणि तुवालूअन भाषेतील भाषांतराच्या कामात आम्हाला मदत करता आली.
भाषांतराचं काम अवघड आणि तितकंच थकवून टाकणारं असलं तरी भाषांतर करणाऱ्यांना मात्र त्यांचं काम खूप प्रिय असतं, ही गोष्ट मला नेहमीच विशेष वाटते. लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत सुवार्ता ऐकायला मिळावी असं यहोवाला वाटतं. आणि प्रकटी. १४:६) उदाहरणार्थ, टाँगन भाषेत पहिल्यांदाच टेहळणी बुरूज मासिकाच्या भाषांतराचा प्रयत्न चालला होता, तेव्हा यासाठी कुणाला प्रशिक्षण देता येईल याविषयी मी टाँगा इथल्या सर्व वडिलांना विचारलं. तेव्हा त्यांच्यापैकी एकानं, मेकॅनिक म्हणून चांगली नोकरी असतानाही, दुसऱ्याच दिवशी नोकरी सोडून लगेचच भाषांतराचं काम करण्याची तयारी दाखवली. आपल्या कुटुंबाचा सांभाळ कसा करता येईल याची जराही कल्पना नसताना, त्या बांधवानं दाखवलेला दृढ विश्वास पाहून मला खूप प्रोत्साहन मिळालं. पण यहोवानं त्याची व त्याच्या कुटुंबाची काळजी घेतली. पुढं बरीच वर्षं त्यानं भाषांतराचं काम केलं.
अशीच भावना भाषांतर करणाऱ्या या विश्वासू बंधुभगिनींचीदेखील असते. (जी भाषा खूप कमी लोक बोलतात त्यांनाही त्यांच्या स्वतःच्या भाषेत साहित्य मिळावं, अशी नियमन मंडळाची इच्छा आहे. आणि अगदी अशाच भावना या भाषांतर करणाऱ्या बांधवांच्यादेखील असतात. उदाहरणार्थ, तुवालूअन भाषेत साहित्य भाषांतरित करण्यासाठी इतका खटाटोप करण्याची काय गरज आहे, असा प्रश्न उपस्थित झाला. यावर नियमन मंडळाकडून आलेल्या उत्तरामुळे मी खूप भारावून गेलो. त्यांनी म्हटलं होतं: “तुवालूअन भाषेत भाषांतर करण्याचं काम थांबवावं लागेल असं कोणतंही कारण आम्हाला दिसत नाही. इतर भाषागटांच्या तुलनेत तुवालूअन भाषेचं क्षेत्र अगदी लहान असलं तरी या लोकांपर्यंत त्यांच्या स्वतःच्या भाषेत सुवार्ता पोचवणं गरजेच आहे असं आम्हाला वाटतं.”
२००३ साली फिजीमधल्या भाषांतर विभागातून आमची बदली न्यूयॉर्क इथल्या पॅटरसनमधील भाषांतर सेवा विभागात (ट्रान्सलेशन सर्व्हिसेस) करण्यात आली. आणि जणू माझं स्वप्नच साकार झालं! तिथं आम्ही अशा एका गटासोबत काम करू लागलो जो गट इतर नवीन भाषेत आपली साहित्यं भाषांतर करण्याकरता मदत पुरवतो. जवळपास दोन वर्षं आम्ही याच भाषांतर सेवा विभागात होतो जिथं वेगवेगळ्या देशांतील भाषांतर गटांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवण्यात आली.
काही महत्त्वाचे निर्णय
आता सुरवातीला मी ज्या कॉन्फरन्स हॉलमधल्या सभेचा उल्लेख केला होता, तिथं येऊ या. २००० साल उजाडेपर्यंत नियमन मंडळाला याची जाणीव झाली होती की जगभरातील भाषांतर गटांना त्यांचं काम आणखी चांगल्या प्रकारे करता यावं म्हणून मदतीची गरज आहे. कारण बऱ्याच जणांना भाषांतराविषयी कोणतंही प्रशिक्षण देण्यात आलेलं नव्हतं. त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये लेखन समितीसोबत झालेल्या सभेनंतर, जगभरातील सर्व भाषांतरकारांना प्रशिक्षण दिलंच पाहिजे असा निर्णय नियमन मंडळानं घेतला. यामध्ये इंग्रजी भाषा कशी समजून घ्यायची, भाषांतर करताना येणाऱ्या अडचणींवर मात कशी करायची आणि सोबत मिळून एकजुटीनं काम कसं करायचं याविषयी शिकवण्यात येणार होतं.
भाषांतरकारांना मिळालेल्या या प्रशिक्षणाचा काय परिणाम झाला? या प्रशिक्षणामुळे भाषांतराचा दर्जा नक्कीच वाढला आहे. तसंच, पूर्वी कधी नव्हतं इतक्या भाषांमध्ये साहित्याचं भाषांतर करणं शक्य झालं आहे. १९७९ मध्ये जेव्हा आम्हाला मिशनरी म्हणून नेमण्यात आलं, तेव्हा टेहळणी बुरूज मासिक केवळ ८२ भाषांमध्ये उपलब्ध होतं. आणि इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशनानंतर काही महिन्यांनी इतर बऱ्याच भाषेतील आवृत्त्यांचं प्रकाशन व्हायचं. पण तेच मासिक आज २४० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे. शिवाय त्यातील बहुतेक मासिकं इंग्रजी भाषेसोबतच प्रकाशित होत आहेत. आज ७०० हून जास्त भाषांमध्ये लोकांना अशी साहित्य उपलब्ध आहेत, ज्यांमुळे बायबलमधील सत्य शिकून घेणं त्यांना शक्य झालं आहे. काही वर्षांआधी हे निव्वळ अशक्य वाटत होतं.
२००४ साली, नियमन मंडळानं असा निर्णय घेतला, की
न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनचं आणखी जास्त भाषांमध्ये भाषांतर करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे होईल तितकं लवकर केलं पाहिजे. त्यांच्या या निर्णयामुळेच आज कित्येक लोकांना स्वतःच्या भाषेत न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनचं वाचन करणं शक्य झालं आहे. खरंतर २०१४ पर्यंत, पूर्ण बायबल किंवा त्याच्या काही भागांचं १२८ भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलं होतं. यात दक्षिण पॅसिफिकमधील बऱ्याच भाषांचाही समावेश होतो.२०११ साली तुवालूमध्ये झालेलं अधिवेशन मी कधीच विसरू शकत नाही. त्या वेळी कित्येक महिने सगळ्या देशात जबरदस्त दुष्काळ पडला होता. बांधवांना आपलं अधिवेशन रद्द होतंय की काय असं वाटत होतं. पण आश्चर्य म्हणजे, ज्या दिवशी संध्याकाळी आम्ही तिथं पोचलो त्याच दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला. याचा परिणाम म्हणजे आमचं अधिवेशन रद्द व्हायचं राहिलं! आणि माहीत आहे, त्या वेळी माझ्यासाठी सर्वात मोठा बहुमान काय होता? तुवालूअन भाषेत न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द ख्रिश्चन ग्रीक स्क्रिपचर्सचं प्रकाशन करणं! तुवालूअन भाषा बोलणाऱ्या बांधवांची संख्या फार कमी असली, तरी यहोवानं त्यांनादेखील एक सुंदर भेट त्या वेळी दिली होती. अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार वादळी पाऊस झाला. त्यामुळे पावसाच्या प्रचंड पाण्यासोबत, मोठ्या प्रमाणात सत्याचं पाणीदेखील त्यांना प्यायला मिळालं होतं.
पण त्या आनंदात माझी प्रिय पत्नी जेनी मात्र माझ्यासोबत नव्हती. कॅन्सरशी दहा वर्षं झुंज दिल्यावर २००९ मध्ये तिचा मृत्यू झाला आणि ३५ वर्षांची आमची साथ सुटली. तिचं पुनरुत्थान होईल तेव्हा, तुवालूअन भाषेत प्रकाशित झालेल्या बायबलविषयी ऐकून ती नक्कीच खूप खूश होईल.
पण यहोवानं मात्र मला आणखी एका सुंदर पत्नीची सोबत देऊन आशीर्वादित केलं. तिचं नाव लॉरेनी सिकीवो. फिजीमधील शाखा कार्यालयात असताना तिनं जेनीसोबत काम केलं होतं. त्या वेळी लॉरेनीसुद्धा भाषांतराचं काम करत होती. त्यामुळे यहोवाला विश्वासू असणारी आणि माझ्याइतकंच भाषेबद्दल प्रेम असणारी एक पत्नी मला पुन्हा एकदा मिळाली!
या सर्व काळादरम्यान आपला प्रेमळ पिता यहोवा, सर्व भाषेच्या लोकांची, अगदी ठरावीक भाषा बोलणाऱ्या कमीत कमी लोकांचीही, आध्यात्मिक गरज ओळखून ती कशी पूर्ण करतो हे मी पाहिलं आहे. (स्तो. ४९:१-३) लोक जेव्हा पहिल्यांदाच त्यांच्या स्वतःच्या भाषेत असणारी आपली प्रकाशनं पाहतात किंवा त्यांच्या मातृभाषेत जेव्हा ते यहोवाच्या स्तुतीसाठी राज्यगीतं गातात, तेव्हा त्यांना काय आनंद होतो हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. अशा वेळी मला यहोवानं दाखवलेल्या प्रेमाची आठवण होते. (प्रे. कृत्ये २:८, ११) साऊलो टिसी नावाच्या तुवालूमधील एका वृद्ध बांधवाचे शब्द मला आजही अगदी स्पष्टपणे आठवतात. पहिल्यांदाच स्वतःच्या भाषेत राज्यगीत गायल्यानंतर ते म्हणाले होते: “तुवालूअन भाषेत ही राज्यगीतं इंग्रजी भाषेपेक्षाही जास्त चांगली वाटतात. तुम्ही हे नियमन मंडळाला जरूर सांगा, बरं का!”
२००५ सालच्या सप्टेंबर महिन्यात, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचा एक सदस्य म्हणून मला नेमण्यात आलं. जेव्हा मला हा बहुमान मिळाला तेव्हा तर मला आश्चर्याचा धक्काच बसला! आता भाषांतराचं काम करत राहणं मला शक्य नसलं, तरी जगभरात चाललेल्या भाषांतराच्या कामाला मदत करण्याची संधी अजूनही यहोवानं मला दिली आहे. याबद्दल मी त्याचे मनापासून आभार मानतो. यहोवा आपल्या सर्व लोकांच्या, मग ते पॅसिफिक महासागराच्या अगदी मधोमध असणाऱ्या एकाकी बेटांवर जरी असले, तरी त्यांच्या गरजा पुरवतो हे पाहून मला खरंच खूप आनंद होतो! आणि स्तोत्रकर्त्यानं तर म्हटलंच आहे, “परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी उल्लास करो; द्वीपसमूह हर्ष करो.”—स्तो. ९७:१.
^ परि. 18 आपल्या साहित्याविषयी लोकांची प्रतिक्रिया कशी होती हे पाहण्यासाठी, टेहळणी बुरूज १५ डिसेंबर २०००, पृष्ठ ३२; १ ऑगस्ट १९८८, पृष्ठ २२ (इंग्रजी); आणि अवेक! २२ डिसेंबर २०००, पृष्ठ ९ पाहा.
^ परि. 22 सामोआमधील भाषांतराच्या कामाविषयी अधिक माहिती, २००९ ईयरबुकमध्ये, पृष्ठ १२०-१२१ व पृष्ठ १२३-१२४ मध्ये पाहा.