व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचं असीम प्रेम विसरू नका

यहोवाचं असीम प्रेम विसरू नका

“मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करेन.”—स्तो. ७७:१२.

गीत क्रमांक: १८, २९

१, २. (क) यहोवाचं आपल्या लोकांवर प्रेम आहे असं तुम्ही खात्रीनं का म्हणू शकता? (ख) यहोवानं मानवांना कोणती क्षमता दिली आहे?

यहोवाचं आपल्या लोकांवर प्रेम आहे, असं तुम्ही खात्रीनं का म्हणू शकता? या प्रश्‍नावर विचार करण्याआधी, पुढील तीन उदाहरणांचा विचार करा. टेलीन नावाच्या एका बहिणीला बरीच वर्षं काही बंधुभगिनी प्रेमळपणे उत्तेजन देत होते. तू स्वतःकडून जास्त गोष्टींची अपेक्षा करत जाऊ नकोस, असा सल्ला त्यांनी तिला दिला. ती म्हणते, “यहोवाचं माझ्यावर प्रेम होतं म्हणूनच तर त्यानं या बंधुभगिनींद्वारे मला असा वारंवार सल्ला दिला.” ब्रिजेट नावाच्या बहिणीलाही तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, दोन मुलांचा एकट्यानंच सांभाळ करावा लागला. ती म्हणते: “सैतानाच्या या जगात मुलांना वाढवणं आणि तेही एकट्यानंच, खरंच खूप कठीण गोष्ट आहे. पण या सबंध काळात यहोवा नेहमी मला मार्गदर्शन देत राहिला. दुःखात, मन घट्ट करून मुलांना सांभाळताना, त्यानं मात्र या समस्यांना माझ्या सहनशक्तीपलीकडे कधीच जाऊ दिलं नाही. त्यामुळे यहोवाचं माझ्यावर खरंच प्रेम आहे याची मला खात्री पटली आहे.” (१ करिंथ. १०:१३) सॅन्ड्रा नावाच्या बहिणीला अशा एका आजाराला तोंड द्यावं लागलं आहे, ज्यावर कोणताच इलाज नाही. एकदा अधिवेशनामध्ये एका बहिणीनं तिची खूप आपुलकीनं विचारपूस केली. तिचा पती म्हणतो, “त्या बहिणीची आणि आमची ओळख नव्हती. पण तिनं दाखवलेल्या आपुलकीनं आम्हाला खूप-खूप बरं वाटलं! आपले भाऊ-बहीण साधी विचारपूस करण्याद्वारे का असेना, पण अशी काळजी दाखवतात तेव्हा यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसून येतं.”

आपल्याला नेहमी प्रेमाची गरज असते आणि इतरांवर प्रेम व्यक्त करण्याची भावनादेखील आपल्यात जन्मतःच आहे. यहोवानं अशा क्षमतेनंच आपल्याला बनवलं आहे. पण आजारपण, आर्थिक अडचणी यांसारख्या गोष्टींमुळे किंवा सेवाकार्यात म्हणावं तितकं यश मिळत नसल्यामुळे आपण अगदी सहजपणे निराश होऊ शकतो. मग अशा वेळी यहोवा आपल्यावर प्रेम करत नाही असं आपल्याला वाटू लागतं. पण असा विचार आपल्या मनात येतो तेव्हा आपण नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की यहोवा आपल्याला मौल्यवान समजतो आणि तो नेहमी आपला उजवा हात धरून आपल्याला मदत करण्यास तयार असतो. जर आपण त्याला विश्वासू राहिलो तर तो आपल्याला कधीच विसरणार नाही.—यश. ४१:१३; ४९:१५.

३. यहोवाचं आपल्यावर खरंच प्रेम आहे अशी खात्री बाळगण्यास आपल्याला कोणती गोष्ट मदत करेल?

आत्ताच ज्या भाऊ-बहिणींचा उल्लेख करण्यात आला, त्या सर्वांना या गोष्टीची खात्री होती की त्यांच्या कठीण काळात यहोवा त्यांच्यासोबत होता. आज आपणही अशीच खात्री बाळगू शकतो. (स्तो. ११८:६, ७) या लेखात आपण यहोवाकडून मिळालेल्या अशा चार गोष्टींवर चर्चा करू या ज्यांमुळे त्याचं प्रेम दिसून येतं. या चार गोष्टी म्हणजे: (१) त्याची निर्मिती, (२) त्याचं वचन बायबल, (३) प्रार्थना, आणि (४) त्यानं पुरवलेली खंडणीची तरतूद. यहोवानं दिलेल्या अशा चांगल्या गोष्टींवर मनन केल्यामुळे त्याच्या प्रेमाची खात्री बाळगण्यास आणि त्यांबद्दल कृतज्ञ असण्यास आपल्याला मदत होईल.—स्तोत्र ७७:११, १२ वाचा.

यहोवानं निर्माण केलेल्या गोष्टींवर विचार करा

४. यहोवाच्या निर्मितीतून आपण काय शिकू शकतो?

यहोवानं निर्माण केलेल्या गोष्टींचं परीक्षण करताना त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे याची जाणीव आपल्याला होते. (रोम. १:२०) विचार करा, केवळ जिवंत राहण्यासाठीच नव्हे तर जीवनाचा आनंद लुटता यावा या हेतूनंही यहोवानं पृथ्वीची रचना केली आहे. जीवनाचा आनंद लुटता येईल अशी हरएक गोष्ट त्यानं आपल्याला दिली आहे. जगण्यासाठी अन्न अत्यावश्यक असलं तरी यहोवानं एकापेक्षा एक उत्कृष्ट गोष्टी आपल्याला खाण्यासाठी दिल्या आहेत ज्यामुळे खाण्यापिण्यातही आपल्याला खूप आनंद मिळतो. (उप. ९:७) कॅथरिन नावाच्या बहिणीलाही निसर्गातल्या सुदंर गोष्टींचं परीक्षण करायला खूप आवडतं. खासकरून कॅनडात वसंतऋतू सुरू झाल्यावर ती फार खूश असते. ती म्हणते: “वसंतऋतू सुरू झाल्यावर बहरलेला निसर्ग पाहून मन अगदी हरपून जातं. त्या वेळी बहरणारी फुलं, स्थलांतर करून परतणारे पक्षी, आणि पक्षांसाठी ठेवलेले दाणे टिपण्यासाठी वाट काढत येणारा इवलासा हमिंगबर्ड जेव्हा मी माझ्या किचनच्या खिडकीतून पाहते तेव्हा त्यात मन कधी हरवून जातं कळतच नाही. यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्याशिवाय, मनाला सुखावणाऱ्या इतक्या सुंदर गोष्टी त्यानं आपल्याला दिल्याच नसत्या.” आपल्या स्वर्गीय पित्यालाही त्याच्या निर्मितीचा खूप आनंद होतो आणि आपणही त्याच्या निर्मितीचा आनंद लुटावा अशी त्याची इच्छा आहे.—प्रे. कृत्ये १४:१६, १७.

५. मानवाला ज्या प्रकारे निर्माण करण्यात आलं आहे, त्यावरून यहोवाचं प्रेम कसं दिसून येतं?

अर्थपूर्ण काम करून त्यात आनंद अनुभवण्याच्या क्षमतेसह यहोवानं आपल्याला बनवलं आहे. (उप. २:२४) संपूर्ण पृथ्वीला व्यापून तिची मशागत करण्याची, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि इतर प्राण्यांची देखभाल करण्याची, त्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी त्यानं मानवाला दिली आहे. (उत्प. १:२६-२८) यासोबतच त्याचं अनुकरण करता येईल अशा सुंदर गुणांसह त्यानं आपल्याला बनवलं आहे.—इफिस. ५:१.

देवाच्या वचनाची कदर करा

६. देवाच्या वचनाची आपण मनापासून कदर का केली पाहिजे?

यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम असल्यामुळेच त्यानं आपल्याला त्याचं वचन, बायबल दिलं आहे. बायबल आपल्याला यहोवाबद्दल आणि मानवजातीबद्दल त्याला काय वाटतं याविषयी सांगतं. उदाहरणार्थ, जेव्हा इस्राएली लोकांनी वारंवार यहोवाच्या आज्ञा मोडल्या तेव्हा यहोवाला त्यांच्याबद्दल कसं वाटलं याबद्दल बायबल आपल्याला सांगतं. स्तोत्र ७८:३८ मध्ये त्याच्याविषयी असं म्हटलं आहे: “तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधाची क्षमा करत असतो, तो नाश करत नाही, तो आपला कोप वारंवार आवरतो, आपला सगळा संताप भडकू देत नाही.” या वचनावर मनन केल्यानं यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे आणि त्याला आपली किती काळजी आहे हे समजून घेण्यास आपल्याला मदत होईल. खरंच, यहोवाला आपल्याविषयी खूप काळजी आहे याची आपण नक्कीच खात्री बाळगू शकतो.—१ पेत्र ५:६, ७ वाचा.

७. आपण बायबलला मौल्यवान का समजलं पाहिजे?

बायबल आपल्याकरता अतिशय मौल्यवान असलं पाहिजे. कारण यहोवा त्याच्या वचनाद्वारेच आपल्याशी बोलतो. जेव्हा पालक आणि मुलं एकमेकांशी मनमोकळेपणानं बोलतात, तेव्हा त्यांच्यातील प्रेम आणि विश्वास आणखी वाढतो. यहोवादेखील आपल्यासाठी एका प्रेमळ पित्यासारखाच आहे. त्याला प्रत्यक्ष पाहणं किंवा ऐकणं जरी आपल्याला शक्य नसलं, तरी बायबलद्वारे तो आपल्याशी बोलतो. म्हणून आपण नेहमी त्याचं ऐकत राहिलं पाहिजे. (यश. ३०:२०, २१) बायबल वाचण्याद्वारे आपण आपला मार्गदर्शक आणि संरक्षक यहोवा याला आणखी जवळून ओळखू शकतो आणि त्यामुळे त्याच्यावरचा आपला विश्वासही आणखी वाढतो.—स्तोत्र १९:७-११; नीतिसूत्रे १:३३ वाचा.

येहूनं यहोशाफाट राजाची कानउघडणी केली असली, तरी यहोवानं त्याच्या “चांगल्या गोष्टी” पाहिल्या (परिच्छेद ८, ९ पाहा)

८, ९. आपल्याला कोणती गोष्ट समजावी असं यहोवाला वाटतं? बायबलमधील उदाहरण देऊन स्पष्ट करा.

यहोवाचं आपल्यावर मनापासून प्रेम आहे, ही गोष्ट आपल्याला समजावी असं त्याला वाटतं. तो आपल्यात असणाऱ्या कमतरता नव्हे तर चांगल्या गोष्टींना पाहतो. (२ इति. १६:९) उदाहरणार्थ, यहूदाचा राजा यहोशाफाट याच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टींना यहोवानं कसं पाहिलं याचा विचार करा. इस्राएलचा राजा अहाब, रामोथ-गिलादमधील अरामाच्या सैन्याविरुद्ध लढाई करणार होता. यात त्याला साथ देण्याचा चुकीचा निर्णय यहोशाफाट राजानं घेतला. या लढाईत अहाब राजा नक्की जिंकेल असं ४०० खोट्या संदेष्ट्यांनी त्याला सांगितलं. पण या लढाईत त्यांचा पराभव होईल असं यहोवाचा संदेष्टा मीखाया यानं यहोशाफाट आणि अहाब यांना सांगितलं आणि तसंच झालं. या लढाईत अहाब राजाचा मृत्यू झाला आणि यहोशाफाट राजा कसाबसा त्यातून वाचला. या लढाईनंतर, यहोवानं येहूचा वापर करून यहोशाफाट राजानं केलेल्या चुकीबद्दल त्याची कानउघडणी केली. पण “तुझ्या ठायी काही चांगल्या गोष्टी दिसून आल्या आहेत” असंदेखील येहूनं त्याला सांगितलं.—२ इति. १८:४, ५, १८-२२, ३३, ३४; १९:१-३.

याच्या काही वर्षांआधी, यहोशाफाटानं आपले सर्व सरदार, लेवी आणि याजकांना यहूदाच्या सर्व नगरांमध्ये जाऊन यहोवाच्या आज्ञा शिकवण्याचा हुकूम दिला होता. याचा परिणाम इतका चांगला झाला, की आसपासच्या राज्यातील लोकांनाही यहोवाची ओळख झाली. (२ इति. १७:३-१०) नंतर जेव्हा यहोशाफाट राजानं चुकीचा निर्णय घेतला तेव्हा, त्यानं केलेल्या चांगल्या गोष्टींची आठवण यहोवानं केली. आपणही कधीकधी चुकतो. पण हे उदाहरण आपल्याला किती दिलासा देणारं आहे! यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्याकडून होईल तितकं करण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपण केलेल्या चांगल्या गोष्टी तो कधीच विसरणार नाही, याची पक्की खात्री आपण बाळगू शकतो.

प्रार्थना करण्याच्या विशेषाधिकाराची कदर करा

१०, ११. (क) प्रार्थना यहोवाकडून मिळालेली एक खास भेट आहे असं का म्हणता येईल? (ख) देव कोणत्या मार्गांनी आपल्या प्रार्थनांचं उत्तर देतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१० एक प्रेमळ पिता आपल्या मुलांचं ऐकण्याकरता नेहमी तयार असतो. आपल्या मुलांची त्याला मनापासून काळजी वाटत असल्यामुळे त्यांना काय म्हणायचं आहे हे जाणून घेण्यास तो उत्सुक असतो. आपला प्रेमळ पिता यहोवाही असाच आहे. आपण त्याला प्रार्थना करतो तेव्हा आपलं ऐकण्यासाठी तो नेहमी तयार असतो. तर मग अशा प्रेमळ पित्याशी केव्हाही बोलता येणं, हा एक विशेषाधिकारच नाही का?

११ आपण यहोवाला कधीही प्रार्थना करू शकतो. तो जणू आपल्या मित्रासारखाच आहे. आपल्या प्रार्थना ऐकण्यासाठी तो नेहमी तयार असतो. आधी उल्लेख केलेली टेलीन म्हणते: “तुम्ही त्याला सगळं काही अगदी मनमोकळेपणानं सांगू शकता.” जेव्हा खोल अंतःकरणातील आपले विचार आपण यहोवाला सांगतो, तेव्हा तो कदाचित ठरावीक वचनांचा, आपल्या साहित्यांमधील एखाद्या लेखाचा किंवा आपल्या बंधुभगिनींचा वापर करून आपल्याला प्रोत्साहन देतो. यहोवा मनापासून केलेल्या आपल्या मागण्या ऐकतो. इतर कोणीही आपल्याला समजो न समजो पण यहोवा मात्र आपल्याला समजू शकतो. आपल्या प्रार्थनांचं तो ज्या प्रकारे उत्तर देतो, त्यावरूनच त्याचं आपल्यावर किती असीम प्रेम आहे हे दिसून येतं.

१२. बायबलमधील प्रार्थनांवर मनन करणं का महत्त्वाचं आहे? उदाहरण द्या.

१२ बायबलमध्ये असणाऱ्या प्रार्थनांमधून आपण बरंच काही शिकू शकतो. कधीकधी कौटुंबिक उपासनेदरम्यानही अशा प्रार्थनांवर विचार करणं फायद्याचं ठरू शकतं. गतकाळात देवाच्या सेवकांनी मनापासून केलेल्या हृदयस्पर्शी प्रार्थनांवर मनन केल्यास आपल्याही प्रार्थनांचा दर्जा आणखी वाढेल. उदाहरणार्थ, माशाच्या पोटात असताना योनानं केलेल्या कळकळीच्या प्रार्थनेचा विचार करा. (योना १:१७–२:१०) तसंच मंदिराचं समर्पण करताना शलमोन राजानं प्रामाणिक अंतःकरणानं केलेल्या प्रार्थनेचाही विचार करता येईल. (१ राजे ८:२२-५३) शिवाय प्रभूच्या प्रार्थनेवरही तुम्हाला मनन करता येईल. (मत्त. ६:९-१३) पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज न चुकता “आपली मागणी देवाला कळवा” म्हणजे “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार” सुरक्षित ठेवेल. असं करत राहिल्यानं देवाच्या असीम प्रेमाबद्दल असलेली आपली कदर आणखी वाढत जाईल.—फिलिप्पै. ४:६, ७.

खंडणीबद्दल तुम्हाला कदर असल्याचं दाखवा

१३. खंडणी बलिदानामुळे काय शक्य झालं आहे?

१३ आपल्याला ‘जीवन प्राप्त व्हावं’ म्हणून यहोवानं आपल्यासाठी खंडणीची तरतूद केली आहे. (१ योहा. ४:९) देवाच्या प्रेमाचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे. याबद्दल सांगताना पौलानं लिहिलं, “ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल; परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” (रोम. ५:६-८) खंडणीची तरतूद खरंच देवाच्या प्रेमाचं सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. त्यामुळेच मानवजातीला देवासोबत अगदी जवळचा नातेसंबंध जोडणं शक्य झालं आहे.

१४, १५. खंडणीच्या तरतुदीचा अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी आणि ज्यांना पृथ्वीवर जगण्याची आशा आहे, त्यांच्यासाठी काय अर्थ होतो?

१४ ख्रिश्चनांच्या एका लहान गटाला, देवाच्या अप्रतिम प्रेमाचा एका खास मार्गानं अनुभव घेता आला. (योहा. १:१२, १३; ३:५-७) देवानं या लहान गटाला पवित्र आत्म्यानं अभिषिक्त केलं आहे. त्यामुळे ते देवाची मुलं बनली आहेत. (रोम. ८:१५, १६) त्यांच्यापैकी काही जण अजूनही पृथ्वीवर आहेत. तरी ते “ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले” आहेत असं त्यांच्याबद्दल पौलानं का म्हटलं? (इफिस. २:६) कारण यहोवानं त्यांना स्वर्गातील अमर जीवनाची आशा दिली आहे.—इफिस. १:१३, १४; कलस्सै. १:५.

१५ शिवाय पृथ्वीवर जगण्याची आशा असणारे जेव्हा खंडणीच्या तरतुदीवर विश्वास ठेवतात, तेव्हा देवासोबत मैत्री करणं त्यांना शक्य होतं. त्यांनाही देवाची दत्तक मुलं होण्याची आणि या पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगण्याची आशा आहे. यहोवाला मानवजातीबद्दल किती प्रेम आहे हे खंडणीच्या तरतुदीतून दिसून येतं. (योहा. ३:१६) आपण जर यहोवाची विश्वासूपणे सेवा करत राहिलो तर नवीन जगात कल्पनाही करता येणार नाही असं सुंदर जीवन तो आपल्याला देईल, हे जाणून आपल्याला किती आनंद होतो! म्हणून देवानं दाखवलेल्या प्रेमाच्या सर्वात मोठ्या पुराव्याची म्हणजे खंडणीच्या तरतुदीची आपल्याला कदर असल्याचं दाखवू या.

यहोवावरील तुमचं प्रेम प्रदर्शित करा

१६. देवाच्या प्रेमावर मनन केल्यामुळे आपण काय करण्यास प्रवृत्त होतो?

१६ यहोवा ज्या अनेक मार्गांनी त्याचं प्रेम व्यक्त करतो, त्या सर्वच मार्गांना समजून घेणं आपल्याला कधीच शक्य होणार नाही. म्हणूनच दावीद राजानं म्हटलं, “हे देवा, मला तुझे संकल्प किती मोलवान वाटतात! त्यांची संख्या किती मोठी आहे? ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील.” (स्तो. १३९:१७, १८) यहोवाचं प्रेम ज्या मार्गांनी व्यक्त होतं, त्यांवर मनन केल्यानं आपणही त्याच्यावर प्रेम करण्यास व जे सर्वोत्तम आहे ते त्याला देण्यास प्रवृत्त होतो.

१७, १८. यहोवावरील आपलं प्रेम दाखवण्याचे कोणते काही मार्ग आहेत?

१७ यहोवावर आपलंही प्रेम असल्याचं आपण बऱ्याच मार्गांनी दाखवू शकतो. उदाहरणार्थ, इतरांना राज्याची सुवार्ता आवेशानं सांगण्याद्वारे आपण यहोवावर आपलं प्रेम असल्याचं दाखवू शकतो. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) आपल्या विश्वासाची परीक्षा होते, तेव्हादेखील विश्वासूपणे त्यांना तोंड देण्याद्वारे आपण देवाला आपलं प्रेम व्यक्त करू शकतो. (स्तो. ८४:११; याको. १:२-५ वाचा.) आपल्यावर येणाऱ्या परीक्षा जरी फार कठीण असल्या तरी यहोवा त्या पाहील आणि त्यातून तो आपल्याला सोडवील अशी खात्री आपण बाळगू शकतो. कारण, यहोवासाठी आपण खूप मौल्यवान आहोत.—स्तो. ५६:८.

१८ यहोवावरील आपल्या प्रेमामुळेच आपण त्याच्या सुंदर निर्मितीवर खोलवर विचार करण्यास प्रवृत्त होतो. बायबलचा चांगला अभ्यास करण्याद्वारे आपण यहोवावर आणि त्याच्या वचनावर आपलं प्रेम असल्याचं दाखवतो. यहोवावर असणाऱ्या आपल्या प्रेमामुळे आणि त्याच्यासोबतचं आपलं नातं आणखी मजबूत करण्याच्या इच्छेमुळेच आपण त्याला नियमित रीत्या प्रार्थना करतो. शिवाय, खंडणी बलिदानाच्या मौल्यवान देणगीवर जेव्हा आपण मनन करतो तेव्हाही त्याच्यावरील आपलं प्रेम आणखी वाढतं. (१ योहा. २:१, २) हे असे काही मार्ग आहेत ज्यांद्वारे यहोवाच्या असीम प्रेमाची आपल्याला कदर असल्याचं आपण दाखवू शकतो.