जीवन कथा
यहोवाच्या आशीर्वादांमुळे माझं जीवन खरंच खूप समृद्ध झालं आहे!
कॅनडातील सॅसकॉचवॉन इथल्या वकाव नावाच्या शहरात १९२७ साली माझा जन्म झाला. आम्ही सात भावंडं होतो. चार भाऊ आणि तीन बहिणी. त्यामुळे चारचौघांत राहणं काय असतं ते मला लहानपणीच समजलं.
१९३० च्या दशकात आलेल्या महामंदीचा परिणाम आमच्या कुटुंबालाही भोगावा लागला. आर्थिक टंचाई असली तरी खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र आम्हाला कधीच कमी भासली नाही. आमच्याकडे काही कोंबड्या आणि एक गाय होती. त्यामुळे अंडी, दूध, तूप, लोणी घरात नेहमीच असायचं. घरातील प्रत्येकाचाच प्राण्यांची निगा राखण्यात आणि घरची वेगवेगळी कामं करण्यात हातभार असायचा.
त्या काळच्या सुंदर आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत. पप्पा जेव्हा बाजारात घरची उत्पादनं विकायला जायचे तेव्हा परत येताना ते ताज्या सफरचंदांची पेटी घेऊन यायचे. खोलीत पसरणारा सफरचंदांचा तो गोड वास मला आजही आठवतो. दररोज मिळणारे रसरशीत सफरचंदं आमच्यासाठी एक मोठी मेजवाणीच होती!
सत्याशी ओळख
मी सहा वर्षांची होते तेव्हाच माझ्या कुटुंबाला सत्य मिळालं. पण, कसं? झालं असं की माझ्या भावांपैकी सर्वात मोठ्याचा जन्म झाल्यानंतर काही काळातच त्याचा मृत्यू झाला. दुःखानं खचून गेलेले माझे मम्मी-पप्पा तिथल्या एका पाळकाकडे गेले आणि त्यांनी विचारलं, “आमचा जॉनी आता कुठं असेल?” पाळकानं त्यांना सांगितलं की बाळाचा बाप्तिस्मा न झाल्यामुळे तो स्वर्गातही नाही आणि नरकातही नाही. तर तो अशा एका ठिकाणी आहे जिथं बाप्तिस्मा न झालेले चांगल्या लोकांचा आणि लहान मुलांचा आत्मा असतो. पाळकानं असंही सांगितलं की जर मम्मी-पप्पांनी त्याला ठरावीक पैसे दिले तर जॉनीनं त्या ठिकाणातून स्वर्गात जावं म्हणून तो त्याच्यासाठी प्रार्थना करेल. हे ऐकून माझ्या मम्मी-पप्पांना कसं वाटलं असेल याचा विचार करा. ते इतके निराश झाले की पुन्हा कधीच त्या पाळकाशी बोलले नाहीत. पण, जॉनीचं नेमकं काय झालं असेल हा प्रश्न पुन्हापुन्हा त्यांच्या मनात येत होता.
एकदा माझ्या मम्मीला यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेली मृत कोठे आहेत? ही इंग्रजी पुस्तिका मिळाली. तिनं ती अगदी आतुरतेनं वाचून काढली. पप्पा घरी आल्यानंतर आनंदाच्या भरात ती त्यांना म्हणाली, “आपला जॉनी कुठं आहे माहीत आहे? तो आता झोपलेल्या अवस्थेत आहे आणि एके दिवशी तो नक्की उठेल.” त्याच दिवशी संध्याकाळी पप्पांनीही ती पुस्तिका वाचून काढली. मृत लोक झोपलेल्या अवस्थेत आहेत आणि भविष्यात ते पुन्हा उठतील ही बायबलची शिकवण समजल्यावर माझ्या मम्मी-पप्पांना खूप सांत्वन मिळालं.—उप. ९:५, १०; प्रे. कृत्ये २४:१५.
मम्मी-पप्पांना मिळालेल्या सत्यामुळे आमचं जीवन पार बदलून गेलं. आता आमचं जीवन आनंदी होतं आणि आम्हाला खरं सांत्वनही मिळालं होतं. मम्मी-पप्पांनी साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू केला. आणि, वकाव इथल्या छोट्याशा मंडळीत ते जाऊ लागले. त्या मंडळीतील बहुतेक जण युक्रेनियन पार्श्वभूमीचे होते. पुढे, लवकरच त्यांनी प्रचारकार्यात सहभाग घ्यायला सुरवात केली.
काही काळातच आम्ही ब्रिटिश कोलंबिया इथं राहायला गेलो. तिथल्या मंडळीतील बांधवांनी मनापासून आमचं स्वागत केलं. आम्ही
सर्व कुटुंब मिळून रविवारच्या टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी करायचो. तो खूपच आनंदाचा काळ होता. यहोवावरील आणि सत्यावरील आमचं सगळ्यांचं प्रेम वाढत चाललं होतं आणि आमच्या जीवनाला खरा अर्थ मिळाला होता. तसंच, यहोवा आम्हाला कसा आशीर्वादित करत आहे हेही मी पाहू शकले.इतरांना आपल्या विश्वासाबद्दल सांगणं आम्हा मुलांसाठी काही सोपं नव्हतं. पण, एका गोष्टीमुळे आम्हाला खूप मदत झाली. मी आणि माझी धाकटी बहीण इवा सहसा महिन्याच्या सादरतेची तयारी करायचो आणि सेवा सभेत त्याचं प्रात्यक्षिक दाखवायचो. यामुळे, आम्ही लाजाळू असलो तरी इतरांना बायबलबद्दल कसं सांगायचं हे शिकून घेण्याची खूप चांगली संधी आम्हाला मिळाली. प्रचार करण्याचं जे प्रशिक्षण आम्हाला मिळालं ते खरंच खूप फायद्याचं ठरलं.
आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या घरी पूर्णवेळेचे सेवक राहण्यासाठी यायचे. आणि आमच्यासाठी ही गोष्ट खूप खास होती. उदाहरणार्थ, जेव्हा आमचे विभागीय पर्यवेक्षक जॅक नेथन आमच्या मंडळीला भेट द्यायला यायचे तेव्हा ते आमच्याकडे राहायचे. * ते आम्हाला अनेक अनुभव सांगायचे. यामुळे आम्हाला खूप आनंद व्हायचा. तसंच, जेव्हा ते आमची मनापासून प्रशंसा करायचे, तेव्हा आणखी विश्वासूपणे यहोवाची सेवा करण्याचं उत्तेजन आम्हाला मिळायचं.
तेव्हा मी मनातल्या मनात असा विचार करायचे, की “मोठं झाल्यावर मलाही ब्रदर नेथनसारखं व्हायचंय.” त्यांच्या या उदाहरणामुळेच पुढे जाऊन मी पूर्णवेळेच्या सेवेची निवड करेन, याची त्या वेळी मला जराही कल्पना नव्हती. पण, १५ वर्षांची असतानाच मी यहोवाची सेवा करण्याचा निश्चय केला. १९४२ साली मी आणि इवानं बाप्तिस्मा घेतला.
विश्वासाची परीक्षा
दुसऱ्या महायुद्धादरम्यान सगळीकडेच देशभक्तीच्या भावनेला ऊत आला होता. स्कॉट नावाच्या एका आडमुठ्या शिक्षिकेनं माझ्या दोन बहिणींना आणि एका भावाला शाळेतून काढून टाकलं. कारण, त्यांनी झेंडावंदन करण्यास नकार दिला होता. पण, ती तेवढ्यावरच थांबली नाही, तर तिनं माझ्या वर्गशिक्षिकेला भेटून मलाही शाळेतून काढून टाकण्यास गळ घातली. पण, माझी शिक्षिका तिला म्हणाली, “आपण एका स्वतंत्र देशात राहत आहोत. त्यामुळे, देशभक्तीपर कार्यक्रमांत भाग घ्यायचा की नाही हे ठरवण्याचा हक्क आपल्यातील प्रत्येकाला आहे.” पण, मिस स्कॉटनं तिच्यावर खूपच दबाव आणला. पण तरीही माझ्या शिक्षिकेनं तिला ठामपणे म्हटलं, “हा माझा निर्णय आहे. काय करायचं ते मी ठरवेन.”
मिस स्कॉट म्हणाली, “नाही! काय करायचे हे तू ठरवू शकत नाहीस. जर तू मेलिटाला शाळेतून काढलं नाहीस तर मी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तुझी तक्रार करेन.” नाइलाजानं माझ्या शिक्षिकेनं माझ्या मम्मी-पप्पांना बोलावून घेतलं आणि समजावून सांगितलं, की ती जे काही करत आहे ते चुकीचं आहे. पण नोकरी टिकवण्यासाठी मला शाळेतून काढण्याशिवाय तिच्याजवळ काहीच पर्याय नाही. असो, पण पुढे आम्ही पुस्तकं घेऊन घरातच अभ्यास करू लागलो. त्यानंतर लवकरच आम्ही ३२ किलोमीटर लांब असलेल्या एका ठिकाणी राहायला गेलो. तिथं आम्हाला एका दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळाला.
युद्धाच्या त्या काळादरम्यान आपल्या प्रकाशनांवर बंदी होती. त्यामुळे बायबलच्या सहाय्यानं आम्ही घरोघरचं साक्षकार्य करायचो. याचा खरंतर चांगला परिणाम झाला. राज्याची सुवार्ता थेट शास्त्रवचनांतून सांगण्यात आम्ही तरबेज झालो. यामुळे आम्ही बायबलशी चांगल्या प्रकारे परिचित झालो आणि आध्यात्मिक रीत्या प्रगतीही करू शकलो. शिवाय यहोवाचा पाठिंबाही आम्हाला अनुभवायला मिळाला.
पूर्णवेळेच्या सेवेची सुरवात
इवा आणि माझं शालेय शिक्षण पूर्ण झाल्याझाल्या आम्ही पायनियरिंग करण्यास सुरवात केली. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी जिथं खाद्यपदार्थ विकले जातात अशा एका दुकानात मी काम करू लागले. काही काळानंतर, मी सहा महिन्यांचा हेअर ड्रेसिंगचा कोर्स केला. खरंतर त्यात मला आधीपासूनच आवड होती. मग मी एका हेअर सलूनमध्ये आठवड्यातून दोन दिवस काम करू लागले. तसंच, महिन्यातून दोनदा
मी इतरांनाही ते शिकवायचे. यामुळे, पूर्णवेळेच्या सेवेत मला मदत झाली.१९५५ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि जर्मनीतल्या न्युरेमबर्गमध्ये होणाऱ्या “विजयी राज्य” या संमेलनांना मला उपस्थित राहायचं होतं. न्यूयॉर्कला जाण्याआधी मी जागतिक मुख्यालयाचे ब्रदर नेथन नॉर यांना भेटले. ते आणि त्यांची पत्नी कॅनडातील वॅनकूवर इथं एका अधिवेशनाला आले होते. त्यादरम्यान मला सिस्टर नॉरचे केस कापण्यासाठी सांगण्यात आलं. सिस्टरचा हेअरकट ब्रदर नॉर यांना खूप आवडला आणि म्हणून त्यांनी मला भेटायचं ठरवलं. आम्ही भेटलो आणि छान गप्पा मारल्या. बोलत असताना मी त्यांना सांगितलं की जर्मनीला जाण्याआधी मी न्यूयॉर्कला जाण्याच्या विचारात आहे. हे समजल्यावर त्यांनी मला ब्रुकलिन बेथेलमध्ये नऊ दिवस काम करण्याचं आमंत्रण दिलं.
पण, या गोष्टीनं माझं जीवन बदलून टाकलं. न्यूयॉर्कमध्ये असताना मी थियोडोर (टेड) जॅरझ या तरुण बांधवाला भेटले. त्यानंतर थोड्या काळातच त्यांनी मला विचारलं, “तू पायनियर आहेस काय?” हे ऐकून मला आश्चर्यच वाटलं. मी लगेच त्यांना म्हणाले, “नाही.” लवॉन या माझ्या मैत्रीणीनं आमचं बोलणं ऐकलं आणि ती मध्येच म्हणाली, “हो ती पायनियर आहे.” गोंधळात पडलेले टेड तिला म्हणाले, “ती पायनियर आहे की नाही हे कोणाला चांगलं माहीत आहे, तुला की तिला?” पण, मी स्पष्ट केलं की इथं येण्याआधी मी पायनियरिंग करत होते आणि घरी परत गेल्यावर मी पुन्हा पायनियरिंग सुरू करणार आहे.
एका आध्यात्मिक व्यक्तीशी लग्न
टेड यांचा जन्म १९२५ साली अमेरिकेच्या केन्टकी इथं झाला. त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी यहोवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेतला. कुटुंबातला एकही सदस्य सत्यात नसताना त्यांनी बाप्तिस्म्याच्या दोन वर्षांनंतरच पायनियरिंग करायला सुरवात केली. पुढे त्यांनी जवळजवळ ६७ वर्षं पूर्णवेळेची सेवा केली.
१९४६ च्या जुलै महिन्यात वयाच्या २० व्या वर्षी, वॉचटॉवर बायबल स्कूल ऑफ गिलियडच्या सातव्या वर्गातून टेड पदवीधर झाले. त्यानंतर ओहायोच्या क्लीवलँड इथं त्यांनी प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा केली. त्यानंतर जवळजवळ चार वर्षांनी त्यांना ऑस्ट्रेलियातील शाखा कार्यालयात शाखा सेवक म्हणून नेमण्यात आलं.
टेड जर्मनीतल्या न्युरेमबर्गमध्ये अधिवेशनाला आले होते. तेव्हा एकमेकांसोबत आम्हाला काही वेळ घालवता आला. आणि तेव्हाच आमच्या प्रेमाला अंकुर फुटला. यहोवाची पूर्ण मनानं सेवा करण्यावरच त्यांची ध्येयं केंद्रित होती. हीच गोष्ट मला खरंतर खूप आवडली होती. ते अतिशय कष्टाळू होते आणि आपल्या जबाबदारीला अतिशय गंभीरतेनं घ्यायचे. पण, तितकाच प्रेमळ आणि मैत्रिपूर्ण असा त्यांचा स्वभाव होता. ते स्वतःपेक्षा दुसऱ्यांच्या हिताचा जास्त विचार करायचे. त्या अधिवेशनानंतर टेड पुन्हा ऑस्ट्रेलियाला गेले आणि मी वॅनकूवरला परतले. पण, पुढेही आम्ही पत्राद्वारे एकमेकांशी बोलत राहिलो.
ऑस्ट्रेलियात जवळजवळ पाच वर्षं राहिल्यानंतर टेड अमेरिकेत परत आले आणि नंतर ते वॅनकूवरमध्ये येऊन पायनियरिंग करू लागले. माझ्या कुटुंबातील सर्वांना ते खूप आवडायचे. माझा मोठा भाऊ मायकल याला माझी खूप काळजी होती. म्हणून, एखाद्या तरुण बांधवानं माझ्यात आवड दाखवली की त्याला हुरहुर लागायची. पण, टेडच्या बाबतीत असं नव्हतं. मायकलचं आणि त्यांचं छान जमलं. मायकल मला म्हणाला, “मेलिटा हे बघ, तो खूप चांगला मुलगा आहे. तुला शोधूनही असा मुलगा सापडणार नाही. त्याच्याशी चांगलं वाग. आणि तुझ्या आयुष्यात तो कायम राहील याची पूर्ण खात्री करून घे.”
तसं मलाही टेड खूप आवडू लागले होते. १० डिसेंबर १९५६ साली आम्ही लग्न केलं. लग्नानंतर आम्ही सोबत मिळून आधी वॅनकूवरमध्ये आणि मग कॅलिफोर्नियात पायनियरिंग केली. त्यानंतर आम्हाला मिसूरी आणि आर्केन्झस इथं विभागीय कामात नेमण्यात आलं. जवळजवळ १८ वर्षांपर्यंत आम्ही अमेरिकेच्या एका मोठ्या क्षेत्रात प्रवासी कार्य केलं. त्यामुळे दर आठवडी आमचं राहण्याचं ठिकाण बदलत राहायचं. हे खरं आहे की सततच्या प्रवासाचा आम्हाला खूप त्रास व्हायचा. पण, सेवाकार्यात आम्हाला जे चांगले अनुभव यायचे आणि बांधवांसोबत आम्हाला जो चांगला वेळ घालवता यायचा त्यापुढे हा त्रास काहीच नव्हता.
टेडनी यहोवासोबतच्या त्यांच्या नात्याला कधीच क्षुल्लक समजलं नाही. आणि या गोष्टीमुळेच मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतो. विश्वातल्या सर्वात महान व्यक्तीची सेवा करण्याचा बहुमान त्यांच्यासाठी फार मोलाचा होता. सोबत मिळून बायबल वाचणं आणि अभ्यास करणं आम्हाला खूप आवडायचं. रात्री झोपण्याआधी आम्ही बेडजवळ गुडघे
टेकायचो आणि टेड प्रार्थना करायचे. त्यानंतर आम्ही आमची वैयक्तिक प्रार्थना करायचो. जेव्हा टेड एखाद्या गंभीर गोष्टीमुळे चिंतित असायचे तेव्हा नेहमी रात्री उठून गुडघे टेकायचे आणि बराच वेळ प्रार्थना करत राहायचे. प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीसाठी यहोवाला प्रार्थना करण्याच्या त्यांच्या सवयीचं मला खूप कौतुक वाटायचं.आमच्या लग्नाच्या काही वर्षांनंतर टेडनी मला सांगितलं की ते स्मारकविधीच्या बोधचिन्हांचं सेवन करणार आहेत. ते मला म्हणाले, “मी यहोवाच्या इच्छेप्रमाणेच करत आहे की नाही याची खात्री करण्याकरता मी वारंवार यहोवाला कळकळून प्रार्थना केली आहे.” स्वर्गीय जीवनासाठी देवाच्या पवित्र आत्म्यानं त्यांना अभिषिक्त केलं आहे हे समजल्यावर खरंतर मला खूप जास्त आश्चर्य वाटलं नाही. उलट, ख्रिस्ताच्या बांधवांपैकी एकाला मदत करण्याच्या या संधीला मी बहुमान समजू लागले.—मत्त. २५:३५-४०.
पवित्र सेवेचं एक नवीन पर्व
१९७४ साली टेडला यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचा सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं. हे ऐकून आम्हा दोघांना खूप आश्चर्य वाटलं. त्यानंतर, काही काळानं आम्हाला ब्रुकलिन बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी बोलावण्यात आलं. तिथं टेड हे नियमन मंडळाचे सदस्य म्हणून काम करायचे आणि मी साफसफाईचं किंवा हेअर ड्रेसरचं काम करायचे.
टेडवर वेगवेगळ्या शाखा कार्यालयांना भेटी देण्याची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. सोव्हिएत संघाच्या सत्तेखाली असलेल्या पूर्व युरोपमधील देशांमध्ये प्रचार कार्याला बंदी होती. अशा देशांमधील प्रचारकार्याबद्दल त्यांना खासकरून जास्त काळजी वाटायची. एकदा आम्हाला विश्रांतीची खूप गरज होती आणि म्हणून आम्ही स्वीडनमध्ये सुट्टीवर होतो. तिथं असताना टेड म्हणाले: “मेलिटा, पोलंडमध्ये आपल्या प्रचारकार्यावर बंदी आहे आणि तिथल्या बांधवांना मदत करण्याची मला मनापासून इच्छा आहे.” त्यामुळे, आम्ही पोलंडला जाण्याचं ठरवलं आणि विझा मिळवून पोलंडला गेलो. तिथं टेड आपल्या कामाची देखरेख करणाऱ्या काही बांधवांना भेटले आणि आपलं बोलणं कुणी ऐकू नये म्हणून ते लांब एकांतात बोलायला गेले. बांधवांनी त्यानंतर सलग चार दिवस अतिशय गंभीरपणे सभा घेतल्या. पण, आपल्या आध्यात्मिक कुटुंबाला मदत केल्याबद्दल टेडला जे समाधान मिळालं ते पाहून मला खूप आनंद झाला.
त्यानंतर, आम्ही १९७७ सालाच्या नोव्हेंबर महिन्यात पुन्हा पोलंडला गेलो. या वेळी एफ. डब्ल्यू. फ्रान्झ, डॅनिएल सिडलिक आणि टेड यांनी पहिल्यांदाच तिथं नियमन मंडळाचे सदस्य म्हणून औपचारिक रीत्या भेट दिली. आपल्या कामावर अजूनही बंदी होती. पण तरी, नियमन मंडळाच्या या तीन सदस्यांना तिथल्या वेगवेगळ्या शहरांतील पर्यवेक्षकांसोबत, पायनियरांसोबत आणि अनेक वर्षांपासून सत्यात असलेल्यांसोबत बोलण्याची संधी मिळाली.
त्याच्या पुढच्या वर्षी मिल्टन हेन्शेलसोबत टेड पुन्हा पोलंडला गेले. या वेळी ते अशा काही अधिकाऱ्यांना भेटले ज्यांचा आता साक्षीदारांना आणि त्यांच्या कामाला म्हणावा तितका विरोध नव्हता. १९८२ साली पोलिश सरकारनं आपल्या बांधवांना एका दिवसाची संमेलनं आयोजित करण्याची परवानगी दिली. आणि त्याच्या पुढच्याच वर्षी मोठमोठी अधिवेशनं भरवण्यात आली. त्यांपैकी बहुतेक भाड्यानं घेतलेल्या सभागृहांत आयोजित करण्यात आली होती. इतकंच नव्हे, तर १९८५ साली बंदी असतानाही मोठ्या स्टेडियमवर चार अधिवेशनं भरवण्याची परवानगी आम्हाला मिळाली. त्यानंतर, आणखी मोठी अधिवेशनं भरवण्याच्या विचारात असतानाच १९८९ च्या मे महिन्यात पोलंड
सरकारनं यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला कायदेशीर मान्यता दिली. या गोष्टी टेडच्या जीवनातील काही अविस्मरणीय गोष्टींपैकी एक होत्या.आरोग्याच्या समस्यांना तोंड देणं
२००७ साली आम्ही शाखा कार्यालयाच्या समर्पणासाठी दक्षिण आफ्रिकेला जात होतो. इंग्लंडमध्ये टेडना ब्लड प्रेशरचा त्रास होऊ लागला आणि डॉक्टरांनी आम्हाला आमची ट्रिप पुढे ढकलायला सांगितली. टेडना बरं वाटू लागल्यावर आम्ही परत अमेरिकेला परतलो. पण, काही आठवड्यांनी त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि त्यांची उजवी बाजू निकामी झाली.
पण, त्यांच्या बोलण्याच्या क्षमतेवर काही परिणाम झाला नव्हता, याचं आम्हाला समाधान होतं. त्यांची तब्येत सुधारण्यास खूप वेळ लागला. सुरवातीला ऑफीसमध्ये जाणं त्यांना जमत नव्हतं. काम करणं कठीण जात असलं तरी ते त्यांची रोजची कामं करण्याचा प्रयत्न करायचे. इतकंच नव्हे, तर प्रत्येक आठवडी होणाऱ्या नियमन मंडळाच्या सभेतही ते घरातूनच फोनद्वारे सहभाग घ्यायचे.
बेथेलमध्ये टेडना जो चांगला उपचार मिळाला त्याची ते खूप कदर करतात. हळूहळू ते चालू-फिरू लागले. त्यांच्या काही ईश्वरशासित जबाबदाऱ्याही पार पाडणं त्यांना शक्य झालं आणि ते नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचे.
तीन वर्षांनंतर त्यांना आणखी एक झटका आला आणि बुधवार, ९ जून २०१० साली त्यांचा मृत्यू झाला. एक ना एक दिवस टेडचं पृथ्वीवरील जीवन संपेल याची जाणीव मला होतीच. पण, त्यांना गमावण्याचं दुःख किती जास्त आहे ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. त्यांची कमी मला अजूनही खूप जाणवते. असं असलं तरी, टेडची मदत करण्यासाठी मला जे काही करता आलं त्यासाठी मी नेहमी यहोवाचे आभार मानते. आम्ही दोघांनी मिळून ५३ वर्षं पूर्णवेळेच्या सेवेचा आनंद घेतला. यहोवाच्या आणखी जवळ जाण्यासाठी टेडनी मला खूप मदत केली. यासाठीही मी यहोवाचे आभार मानते. टेडना जी काही नवीन जबाबदारी मिळाली असेल त्यातही त्यांना खूप आनंद आणि समाधान मिळत असेल याची मला पूर्ण खात्री आहे.
नवीन आव्हानांचा सामना करणं
टेडसोबत यहोवाच्या सेवेत घालवलेल्या त्या आनंदी काळानंतर जीवनात आलेल्या बदलांशी जुळवून घेणं आता थोडं कठीण झालं आहे. बेथेल आणि राज्य सभागृहाला भेट देण्यासाठी येणाऱ्या नवीन लोकांना भेटायला, टेडना आणि मला खूप आवडायचं. पण, आता टेड माझ्यासोबत नाहीत शिवाय माझी तब्येतही पूर्वीसारखी नसल्यामुळे इतरांना भेटणं आता कमी झालं आहे. पण, आताही बेथेलमधल्या आणि मंडळीतल्या बांधवांना भेटणं मला खूप आवडतं. बेथेलमधलं जीवन तसं सोपं नाही. पण, देवाची अशा प्रकारे सेवा केल्यामुळे खरा आनंद मिळतो. तसंच, प्रचारकार्याबद्दलचं माझं प्रेम आजही पर्वीइतकंच आहे. आता मी खूप थकून जाते आणि जास्त वेळ चालू शकत नाही. पण तरी, रस्त्यावरील साक्षकार्यात आणि बायबल अभ्यास चालवण्यात मला समाधान मिळतं.
जगात चाललेल्या सगळ्या वाईट गोष्टी पाहिल्यावर, मला या गोष्टीत खूप समाधान आहे की मी एका चांगल्या विवाह सोबत्यासोबत यहोवाच्या सेवेत माझं आयुष्य घालवलं. यहोवाच्या आशीर्वादांमुळे माझं जीवन खरंच खूप समृद्ध झालं आहे!—नीति. १०:२२.
^ परि. 13 जॅक नेथन यांची जीवन कथा टेहळणी बुरूज १ सप्टेंबर १९९० (इंग्रजी) यातील पृष्ठे १०-१४ मध्ये प्रकाशित करण्यात आली होती.