व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आध्यात्मिक गोष्टींवर मनन करा

आध्यात्मिक गोष्टींवर मनन करा

“तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू या गोष्टींचा अभ्यास ठेव; यात गढून जा.”—१ तीम. ४:१५.

गीत क्रमांक: २२, ५२

१, २. कोणती गोष्ट मानवांना प्राण्यांपेक्षा वेगळं करते?

मानवी मेंदू खूप विशेष आहे. त्याची तुलना इतर कोणत्याही प्राण्याच्या मेंदूशी करता येणार नाही. उदाहरणार्थ, मानवामध्ये भाषा शिकून घेण्याची क्षमता आहे. आणि भाषेमुळे आपल्याला वाचन करणं, लिहिणं, बोलणं आणि आपण जे ऐकतो ते समजून घेणं शक्य होतं. इतकंच नाही, तर यामुळे यहोवाला प्रार्थना करणं आणि त्याला स्तुतिगीत गाणंही आपल्याला शक्य होतं. या क्षमतेमुळे आपण इतर प्राण्यांपेक्षा खूप वेगळे आहोत. आपल्या मेंदूला या सर्व आश्चर्यकारक गोष्टी करणं कसं शक्य आहे, हे वैज्ञानिक आजही पूर्णपणे समजू शकले नाहीत.

भाषेचा वापर करण्याची क्षमता यहोवाकडून आपल्याला मिळालेली एक अमूल्य भेट आहे. (स्तो. १३९:१४; प्रकटी. ४:११) पण, यासोबतच त्यानं आपल्याला आणखी एक गोष्ट दिली आहे ज्यामुळे आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरतो. देवानं मानवाला त्याच्या ‘प्रतिरूपाच’ बनवलं आहे. त्यामुळे, आपल्यात इच्छास्वातंत्र्य, म्हणजे निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. या इच्छास्वातंत्र्यामुळे, भाषेचा वापर करून यहोवाची सेवा आणि स्तुती करण्याची निवड आपण करू शकतो.—उत्प. १:२७.

३. यहोवानं आपल्याला कोणती गोष्ट दिली आहे ज्यामुळे आपण सुज्ञ बनतो?

यहोवानं आपल्याला बायबल दिलं आहे. आणि त्याची उपासना कशी करायची हे आपल्याला बायबलमुळे समजतं. संपूर्ण बायबल किंवा त्याचे काही भाग २,८०० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. बायबल काय म्हणतं यावर जेव्हा आपण मनन करतो, तेव्हा आपल्याला देवाची विचारसरणी समजून घेणं शक्य होतं. (स्तो. ४०:५; ९२:५; १३९:१७) यामुळे आपण सुज्ञ बनतो आणि सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या मार्गावर चालत राहणं आपल्याला शक्य होतं.—२ तीमथ्य ३:१४-१७ वाचा.

४. मनन करण्याचा काय अर्थ होतो, आणि आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

मनन करणं म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून, त्याविषयी काळजीपूर्वक आणि खोलवर विचार करणं. (स्तो. ७७:१२; नीति. २४:१, २) आपण यहोवा आणि येशूविषयी शिकलेल्या गोष्टींवर जेव्हा मनन करतो तेव्हा आपल्याला सर्वात जास्त फायदा होतो. (योहा. १७:३) या लेखात आपण पुढील प्रश्नांवर चर्चा करणार आहोत: कशा प्रकारे वाचन केल्यामुळे आपल्याला मनन करणं सोपं जाईल? आपण कोणत्या गोष्टींवर मनन करू शकतो? आणि नियमितपणे मनन करण्याचा आनंद घेण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

आभ्यासातून फायदा होत आहे याची खात्री करा

५, ६. वाचलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी कशामुळे मदत होते?

काही गोष्टी करताना आपल्याला विचार करावा लागत नाही, त्या आपोआपच होत असतात. जसं की, श्वास घेणं, चालणं किंवा सायकल चालवणं. पण, कधीकधी ही गोष्ट आपल्या वाचनाच्या बाबतीतही होते. आपण विचार न करता नुसतंच वाचत असतो. किंवा कदाचित, वाचता-वाचता आपण इतर गोष्टींचा विचार करायला लागतो. पण, आपल्याकरता लक्ष देऊन वाचणं आणि त्याचा काय अर्थ होतो यावर विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. मग यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? एखादा परिच्छेद किंवा उपशीर्षक वाचून झाल्यावर थोडं थांबा आणि वाचलेल्या गोष्टींवर मनन करा. त्यातून तुम्ही काय शिकलात याचा विचार करा आणि तुम्हाला ते नक्की समजलं आहे का याची खात्री करा.

वैज्ञानिकांना असं दिसून आलं आहे की जेव्हा आपण हलक्या आवाजात वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जातं. आपल्या निर्माणकर्त्याला ही गोष्ट माहीत आहे. आणि म्हणून त्यानं यहोशवाला नियमशास्त्राच्या ग्रंथावर “मनन कर” असं म्हटलं. या ठिकाणी “मनन” यासाठी असलेल्या इब्री शब्दाचा अर्थ “हलक्या आवाजात वाचणं” असाही होतो. (यहोशवा १:८ वाचा.) स्वतःला ऐकू येईल अशा प्रकारे बायबल वाचल्यामुळे लक्ष एकाग्र करायला आणि वाचलेल्या गोष्टी लक्षात ठेवायला आपल्याला मदत होते.

७. बायबलवर मनन करणं सगळ्यात चांगलं केव्हा असतं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

लक्ष देऊन अभ्यास करणं आणि त्यावर मनन करणं इतकं सोपं नाही. त्यासाठी खूप मेहनत घेण्याची गरज पडते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही थकलेले नसता, अशा वेळी मनन करणं योग्य असेल. तसंच, तुमचं लक्ष विचलित होणार नाही असं शांत ठिकाण तुम्ही निवडू शकता. स्तोत्रकर्ता दावीद रात्री झोपण्याआधी मनन करायचा. (स्तो. ६३:६) येशू एक परिपूर्ण व्यक्ती होता, तरीसुद्धा त्यानं मनन आणि प्रार्थना करण्यासाठी शांत ठिकाण निवडलं.—लूक ६:१२.

मनन करण्यासाठी आणखी काही चांगल्या गोष्टी

८. (क) आपण कोणत्या गोष्टींवर मनन करू शकतो? (ख) आपण यहोवाबद्दल इतरांशी बोलतो तेव्हा त्याला कसं वाटतं?

बायबलसोबत इतरही अशा काही गोष्टी आहेत ज्यांवर तुम्ही मनन करू शकता. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही यहोवाच्या अद्‌भुत निर्मितीतील एखादी गोष्ट बघता तेव्हा थोडं थांबा आणि स्वतःला विचारा, ‘यावरून यहोवाबद्दल मला काय शिकायला मिळतं?’ असं केल्यामुळे तुम्ही यहोवाचे आभार मानण्यास नक्कीच प्रवृत्त व्हाल. आणि तुम्हाला तुमच्या भावना इतरांनाही व्यक्त कराव्याशा वाटतील. (स्तो. १०४:२४; प्रे. कृत्ये १४:१७) आपण जेव्हा मनन करतो, प्रार्थना करतो आणि यहोवाबद्दल इतरांना सांगतो तेव्हा यहोवा त्या गोष्टींकडे लक्ष देतो आणि त्याला याचा आनंद होतो. बायबल आपल्याला अशी खात्री देते की “परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याजसमोर लिहिण्यात आली.”—मला. ३:१६.

बायबल विद्यार्थ्याला कशी मदत करता येईल याविषयी तुम्ही मनन करता का? (परिच्छेद ९ पाहा)

९. (क) पौलानं तीमथ्याला कोणत्या गोष्टीवर मनन करण्यास सांगितलं? (ख) सेवाकार्याची तयारी करताना आपण कोणकोणत्या गोष्टींवर मनन करू शकतो?

आपल्या बोलण्याचा, वागण्याचा आणि शिकवण्याच्या पद्धतीचा इतरांवर कशा प्रकारे चांगला परिणाम होऊ शकतो, यावर मनन करण्यासाठी प्रेषित पौलानं तीमथ्याला सांगितलं. (१ तीमथ्य ४:१२-१६ वाचा.) आपणदेखील तेच करू शकतो. उदाहरणार्थ, बायबल अभ्यास घेण्याआधी तुम्ही थोडा वेळ काढून त्याविषयी मनन करू शकता. आपल्या विद्यार्थ्याला लक्षात घेऊन त्याला प्रगती करण्यासाठी मदत करतील, अशा प्रश्नांचा किंवा उदाहरणांचा विचार करा. अशा प्रकारे बायबल अभ्यासाची तयारी केल्यास तुमचा स्वतःचा विश्वास वाढेल आणि तुम्हाला एक चांगला आणि आवेशी शिक्षक बनण्यासही मदत होईल. प्रचारकार्याला जाण्याआधी मनन केल्यानंही तुम्हाला फायदा होईल. (एज्रा ७:१० वाचा.) सेवाकार्यात तुम्हाला आणखी आवेशानं सहभाग घेता यावा म्हणून तुम्ही प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील एखादा अध्याय वाचू शकता. तसंच, क्षेत्रात तुम्ही त्या दिवशी ज्या वचनांचा वापर करणार आहात किंवा जी प्रकाशनं सादर करणार आहात त्यांवरही तुम्ही मनन करू शकता. (२ तीम. १:६) शिवाय, क्षेत्रातील लोकांबद्दल आणि त्यांना आवडतील अशा विषयांबद्दलही तुम्ही विचार करू शकता. अशा प्रकारे तयारी केल्यानं साक्ष देताना बायबलचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्यास तुम्हाला मदत होईल.—१ करिंथ. २:४.

१०. आपण कोणत्या चांगल्या गोष्टींवर मनन करू शकतो?

१० तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टींवर मनन करता येईल? सभेतील जाहीर भाषणादरम्यान, संमेलनांत आणि अधिवेशनांत तुम्हाला टिपणी घेण्याची सवय असेल, तर वेळ काढून त्याची पुन्हा उजळणी करा. असं करताना स्वतःला विचारा, ‘यातून मला बायबलविषयी आणि देवाच्या संघटनेविषयी काय शिकायला मिळालं होतं?’ तसंच, प्रत्येक टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिकांतील माहितीवरही तुम्ही मनन करू शकता. शिवाय, अधिवेशनांत प्रकाशित होणाऱ्या नवीन प्रकाशनांवरही तुम्हाला मनन करता येईल. दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ईयरबुकमधील (वार्षिक पुस्तक) अनुभव वाचल्यानंतर थोडं थांबा आणि त्या गोष्टी तुमच्या भावनांना स्पर्श करतील अशा प्रकारे त्यावर विचार करा. तुम्ही जेव्हा एखादं प्रकाशन वाचता तेव्हा कदाचित तुम्ही त्यांतील मुख्य मुद्द्यांखाली रेघ मारू शकता किंवा मार्जिनमध्ये काही नोंदीही करू शकता. असं केल्यामुळे पुनर्भेटीची, मेंढपाळ भेटीची किंवा भाषणाची तयारी करताना तुम्हाला मदत होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचलेल्या गोष्टींवर थोडं थांबून मनन केल्यामुळे तुम्ही शिकलेल्या गोष्टींना अंतःकरणात उतरू देता. शिवाय, चांगल्या गोष्टी शिकायला मिळत आहेत त्याबद्दल यहोवाचे आभार मानण्यासही तुम्ही प्रवृत्त होता.

दररोज देवाच्या वचनावर मनन करा

११. कशावर मनन करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, आणि असं केल्यामुळे तुम्हाला कोणता फायदा होईल?

११ बायबल हे सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यावर आपण मनन केलं पाहिजे. पण, समजा तुमच्याकडून बायबल काढून घेण्यात आलं तर तुम्ही काय कराल? अशा वेळी तुमच्या लक्षात असलेल्या गोष्टींवर, जसं की तुमची आवडती शास्त्रवचनं किंवा राज्यगीतं, यांवर तुम्ही मनन करू शकता. हे करण्यापासून तुम्हाला कुणीच रोखू शकणार नाही. (प्रे. कृत्ये १६:२५) शिवाय, देवाचा आत्मा तुम्हाला शिकलेल्या गोष्टींची पुन्हा आठवण करून देण्यास मदत करेल. यामुळे विश्वासात स्थिर राहण्यास तुम्हाला मदत होईल.—योहा. १४:२६.

१२. नियमित बायबल वाचनाच्या आराखड्यासाठी काय करता येईल?

१२ तुम्ही नियमित बायबल वाचनाचा आराखडा कसा बनवू शकता? ईश्वरशासित सेवा प्रशालेत आठवड्याच्या बायबल वाचनाचा भाग असतो. आठवड्यातील काही दिवस तुम्ही या भागांचं वाचन करून त्यावर मनन करू शकता. आणि इतर दिवशी तुम्ही मत्तय, मार्क, लूक, योहान या शुभवर्तमानाच्या पुस्तकांचं वाचन करून येशूनं काय शिकवलं आणि त्यानं कोणती कार्यं केलीत यावर मनन करू शकता. (रोम. १०:१७; इब्री १२:२; १ पेत्र २:२१) तसंच, येशूच्या जीवनातील घटनांची क्रमवार माहिती देणाऱ्या प्रकाशनांचंही तुम्ही वाचन करू शकता. यामुळे, शुभवर्तमानाच्या पुस्तकांत तुम्ही जे वाचता ते आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यास तुम्हाला मदत होईल.—योहा. १४:६.

मनन करणं महत्त्वाचं का आहे?

१३, १४. यहोवा आणि येशूवर मनन करत राहणं महत्त्वाचं का आहे, आणि यामुळे आपल्याला काय करण्याची प्रेरणा मिळते?

१३ यहोवा आणि येशूवर मनन केल्यामुळे एका व्यक्तीला प्रौढ ख्रिस्ती बनण्यास आणि विश्वासात आणखी मजबूत होण्यास मदत होते. (इब्री ५:१४; ६:१) जी व्यक्ती देवाबद्दलच्या गोष्टींवर मनन करण्याचं महत्त्व ओळखत नाही, ती व्यक्ती यहोवासोबतचा आपला नातेसंबंध हळूहळू गमावू शकते. इतकंच नव्हे तर शेवटी देवाला नाकारण्याइतपत तिचा कल जाऊ शकतो. (इब्री २:१; ३:१२) म्हणून येशूनं अशी ताकीद दिली की देवाचं वचन जर एक व्यक्ती “सालस व चांगल्या अंतःकरणात” स्वीकारत नाही, तर वचनाला “धरून” राहणं तिला शक्य होणार नाही. उलट, “संसाराच्या चिंता, धन व विषयसुख” यांमुळे ती सहजच वचनापासून दूर जाईल.—लूक ८:१४, १५.

१४ तर मग आपण नेहमी बायबलवर मनन करत राहू या आणि यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखण्याचा प्रयत्न करत राहू या. यामुळे त्याच्या गुणांचं आणि व्यक्तिमत्त्वाचं आणखी चांगल्या प्रकारे अनुकरण करण्याची आपल्याला प्रेरणा मिळेल. (२ करिंथ. ३:१८) शिवाय, आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल असंच शिकत राहिल्यामुळे सदासर्वकाळ त्याचं अनुकरण करणं आपल्याला शक्य होईल. यापेक्षा मोठा सन्मान आणखी कोणता असू शकतो!—उप. ३:११.

१५, १६. (क) यहोवा आणि येशूवर मनन केल्यानं तुम्हाला व्यक्तिगत रीत्या कसा फायदा झाला आहे? (ख) मनन करणं कधीकधी कठीण का जाऊ शकतं, पण आपण काय करत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे?

१५ यहोवा आणि येशूवर मनन करत राहिल्यानं तुम्हाला सत्याविषयी आवेशी राहण्यास मदत होईल. या आवेशामुळे तुमच्या बांधवांना आणि क्षेत्रात तुम्ही ज्या लोकांना भेटता त्यांनाही प्रोत्साहन मिळेल. यहोवानं येशूच्या खंडणी बलिदानाची तरतूद करून तुमच्यासाठी जे केलं त्यावर मनन केल्यामुळे, देवासोबतच्या नातेसंबंधाची कदर करत राहण्यास तुम्हाला मदत होईल. (रोम. ३:२४; याको. ४:८) दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या मार्क नावाच्या बांधवाच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. त्यांना आपल्या विश्वासामुळे तीन वर्षं तुरुंगात टाकण्यात आलं होतं. ते म्हणतात: “मनन करण्याची तुलना एका रोमांचक प्रवासाशी करता येईल. आध्यात्मिक गोष्टींवर आपण जितकं जास्त मनन करू तितक्याच नवनवीन गोष्टी आपल्याला यहोवाबद्दल शिकायला मिळतील. कधीकधी जेव्हा मी निराश होतो किंवा भविष्याबद्दलची चिंता मला खात राहते, तेव्हा मी बायबलमधील एखादा अहवाल वाचतो आणि त्यावर मनन करतो. यामुळे माझं मन शांत होतं.”

१६ आजचं जीवन विचलित करणाऱ्या इतक्या गोष्टींनी भरलेलं आहे, की बायबलवर मनन करण्यासाठी वेळ काढणं खूप कठीण झालं आहे. आफ्रिकेत राहणारे पॅट्रिक नावाचे बांधव असं म्हणतात: “माझं मन एका पत्रपेटीप्रमाणे आहे. त्यात ना-ना प्रकारची माहिती येऊन पडलेली असते. काही कामाची तर काही बिनकामाची. त्यामुळे दररोज कोणती माहिती ठेवायची आणि कोणती काढून टाकायची हे मला तपासून पाहावं लागतं. माझ्या मनातील गोष्टींचं मी अशा प्रकारे परीक्षण करतो, तेव्हा मला नेहमी काही अस्वस्थ करणारे विचार सापडतात. तेव्हा साफ मनानं मनन करता यावं म्हणून आधी मला या गोष्टींबद्दल यहोवाला प्रार्थनेत सांगावं लागतं. हे खरं आहे की असं करण्यासाठी थोडा वेळ जातो. पण, आध्यात्मिक गोष्टींवर मनन करण्यापूर्वी असं केल्यामुळे मला यहोवाच्या आणखी जवळ आल्यासारखं वाटतं. शिवाय, यामुळे सत्य आणखी चांगल्या प्रकारे शिकून घेण्यासाठी माझ्या मनाचे दरवाजे खुले होतात.” (स्तो. ९४:१९) आपण दररोज बायबलचं वाचन करून त्यावर मनन केलं तर आपल्याला अनेक मार्गांनी फायदे होतात.—प्रे. कृत्ये १७:११.

तुम्ही वेळ कसा काढता?

१७. मनन करण्यासाठी तुम्ही कसा वेळ काढता?

१७ काही जण वाचन, मनन आणि प्रार्थना करण्यासाठी सकाळी लवकर उठतात. तर काही दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत वेळ काढतात. कदाचित, तुमच्यासाठी संध्याकाळची किंवा रात्री झोपण्याआधीची वेळ सर्वात चांगली असेल. काहींना सकाळी आणि पुन्हा रात्री बायबल वाचायला आवडतं. (यहो. १:८) महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण “वेळेचा सदुपयोग” केला पाहिजे. म्हणजेच, अनावश्यक गोष्टींना बाजूला सारून देवाच्या वचनावर दररोज मनन करण्यासाठी वेळ काढला पाहिजे.—इफिस. ५:१५, १६.

१८. जे देवाच्या वचनावर दररोज मनन करतात आणि शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करतात त्यांना बायबल कोणतं अभिवचन देतं?

१८ जे देवाच्या वचनावर मनन करतात आणि शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करण्यासाठी मेहनत घेतात, त्या सर्वांना आशीर्वादित करण्याचं अभिवचन यहोवानं दिलं आहे. (स्तोत्र १:१-३ वाचा.) येशूनं म्हटलं: “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य.” (लूक ११:२८) पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यहोवाच्या वचनावर दररोज मनन केल्यानं त्याच्या नावाचा सन्मान होईल, अशा प्रकारे जगण्यास आपल्याला मदत होते. आपण असं केलं तर यहोवा आज आपल्याला आनंदी राहण्यासाठी मदत करेल आणि नवीन जगात सार्वकालिक जीवनाचं बक्षीसही देईल.—याको. १:२५; प्रकटी. १:३.