व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही “शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती” करता का?

तुम्ही “शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती” करता का?

“तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर.”—मत्त. २२:३९.

गीत क्रमांक: २५, ३६

१, २. शास्त्रवचनांतून आपल्याला प्रेमाचं महत्त्व कसं कळतं?

प्रेम हा यहोवाचा प्रमुख गुण आहे. (१ योहा. ४:१६) यहोवाच्या पहिल्या निर्मितीनं म्हणजे येशूनं स्वर्गात करोडो वर्षं यहोवासोबत घालवली. त्यामुळे यहोवा किती प्रेमळ आहे हे तो पाहू शकला. (कलस्सै. १:१५) स्वर्गात व पृथ्वीवर असताना येशूनं यहोवासारखंच प्रेम दाखवलं. त्यामुळे यहोवा आणि येशू आपल्यावर नेहमी प्रेमळपणे राज्य करतील याची खात्री आपण बाळगू शकतो.

येशूला एकदा सर्वात मोठी आज्ञा कोणती, असं एका व्यक्तीनं विचारलं. तेव्हा त्यानं उत्तर दिलं: “तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर.”—मत्त. २२:३७-३९.

३. आपला ‘शेजारी’ कोणाला म्हणता येईल?

आपल्याला प्रत्येक नातेसंबंधात प्रेम दाखवणं खूप गरजेचं आहे. येशूनं म्हटलं की आपण यहोवावर आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम केलं पाहिजे. पण आपला ‘शेजारी’ कोणाला म्हणता येईल? तुमचं लग्न झालं असेल तर तुमचा विवाहसोबती तुमचा सर्वात जवळचा शेजारी आहे. तसंच, मंडळीतले आपले बंधुभगिनीही आपले शेजारी आहेत. आणि प्रचारकार्यात आपण ज्या लोकांना भेटतो त्यांनादेखील आपण आपले शेजारी म्हणू शकतो. तेव्हा या लेखात, आपण आपल्या शेजाऱ्यांना प्रेम कसं दाखवू शकतो, याविषयी पाहू या.

आपल्या विवाहसोबत्यावर प्रेम करा

४. मानवी अपरिपूर्णता असूनही विवाह यशस्वी कसा होऊ शकतो?

यहोवानं आदाम आणि हव्वेला निर्माण केलं आणि त्यांचं लग्न लावून दिलं. मानवजातीच्या इतिहासातला हा पहिलाच विवाह होता. त्यांचा विवाह आनंदी असावा आणि त्यांच्या मुलांनी संपूर्ण पृथ्वी भरून जावी अशी यहोवाची इच्छा होती. (उत्प. १:२७, २८) पण, जेव्हा आदाम-हव्वेनं यहोवाची आज्ञा मोडली तेव्हा त्यांच्या विवाहाला तडा गेला. आणि त्यांच्यामुळे पाप व मृत्यू सर्व मानवजातीत पसरला. (रोम. ५:१२) असं असलं तरी आज पती-पत्नी आपल्या विवाहाला आनंदी व यशस्वी बनवू शकतात. कारण विवाह व्यवस्थेची सुरवात करणाऱ्या यहोवानं बायबलमध्ये पती-पत्नींसाठी उत्तम मार्गदर्शन दिलं आहे.—२ तीमथ्य ३:१६, १७ वाचा.

५. विवाहात प्रेम इतकं महत्त्वाचं का आहे?

बायबल सांगतं की कोणत्याही नात्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपुलकी आणि प्रेम असणं खूप गरजेचं आहे. आणि ही गोष्ट विवाहाच्या बाबतीतही खरी आहे. खऱ्या प्रेमाची व्याख्या देताना प्रेषित पौलानं म्हटलं: “प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करत नाही; प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; ती अनीतीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते; ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही.” (१ करिंथ. १३:४-८) आपण पौलाच्या शब्दांवर मनन करून त्यांना लागू करण्याचा प्रयत्न केला तर आपला विवाह नक्की आनंदी होईल.

यशस्वी विवाहाबद्दल बायबल मार्गदर्शन देतं (परिच्छेद ६, ७ पाहा)

६, ७. (क) मस्तकपदाविषयी बायबल काय सांगतं? (ख) ख्रिस्ती पतीनं आपल्या पत्नीशी कसा व्यवहार केला पाहिजे?

कुटुंबाचा मस्तक कोण असला पाहिजे हे यहोवानं आधीच ठरवलं आहे. पौलानं म्हटलं: “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.” (१ करिंथ. ११:३) पण यहोवा पतीकडून अशी अपेक्षा करतो की त्यानं प्रेमळपणे आपल्या पत्नीसोबत व्यवहार करावा. त्यानं कधीच निर्दयीपणे तिच्याशी वागू नये. यहोवा स्वतः प्रेमळपणे आणि निःस्वार्थपणे इतरांवर आपला अधिकार चालवतो. यामुळेच येशू यहोवाच्या प्रेमळ अधिकाराचा आदर करतो. त्यानं म्हटलं: “मी पित्यावर प्रीती करतो.” (योहा. १४:३१) जरा विचार करा, यहोवा प्रेमळ नसता तर येशूनं असं म्हटलं असतं का?

हे खरं आहे की पत्नीचा मस्तक पती आहे, पण पतीनं तिचा आदर करावा असं बायबल सांगतं. (१ पेत्र ३:७) एक पती हे कसं करू शकतो? त्यानं पत्नीच्या गरजा समजून घेतल्या पाहिजेत आणि तिच्या इच्छांची कदर केली पाहिजे. बायबल म्हणतं: “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपआपल्या पत्नीवर प्रीती करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले.” (इफिस. ५:२५) येशूनं तर आपल्या शिष्यांसाठी जीवदेखील दिला. पतीनं येशूसारखं प्रेम दाखवलं तर पत्नीला त्याच्यावर प्रेम करायला आणि त्याचा आदर करायला सोपं जाईल. तसंच पती जे निर्णय घेतो ते मानण्यासही तिला सोपं जाईल.—तीत २:३-५ वाचा.

आपल्या बंधुभगिनींना प्रेम दाखवा

८. आपल्या बंधुभगिनींबद्दल आपल्या मनात कोणत्या भावना असल्या पाहिजेत?

आज जगभरात लाखो लोक यहोवाची उपासना करतात. ते सर्व आपले बंधुभगिनी आहेत. त्यांच्याप्रती आपल्या मनात कशा भावना असल्या पाहिजेत? बायबल म्हणतं: “आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलती. ६:१०; रोमकर १२:१० वाचा.) प्रेषित पेत्रानं म्हटलं की सत्याप्रती असणाऱ्या निष्ठेमुळे आपण आपल्या बंधुभगिनींप्रती प्रेम उत्पन्न केलं पाहिजे. त्यानं विश्वासू ख्रिश्चनांना सांगितलं: “मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा.”—१ पेत्र १:२२; ४:८.

९, १०. देवाच्या लोकांमध्ये एकता का आहे?

जगात आपली अशी एकमेव संघटना आहे जिथं लोक एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. तसंच, आपण यहोवावर प्रेम करतो आणि त्याच्या आज्ञा पाळतो म्हणून तो आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देतो. यहोवाचा पवित्र आत्मा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप शक्तिशाली आहे. पवित्र आत्म्यामुळे बंधुभगिनींमध्ये एकता टिकवून ठेवण्यास मदत होते.—१ योहान ४:२०, २१ वाचा.

१० ख्रिश्चनांमध्ये प्रेम असणं गरजेचं आहे याबद्दल सांगताना पौलानं म्हटलं: “करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा; पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा.” (कलस्सै. ३:१२-१४) आपण कोणत्याही संस्कृतीतून आलो असलो, तरी आपल्या बांधवांमध्ये एकता दिसून येते. याबद्दल आपण यहोवाचे किती आभार मानले पाहिजेत!

११. देवाच्या लोकांचं ओळखचिन्ह काय आहे?

११ आपल्यामध्ये खरं प्रेम आणि एकता असल्यामुळे आपण खऱ्या धर्माचं आचरण करतो हे इतरांना दिसून येतं. येशूनं म्हटलं होतं: “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहा. १३:३४, ३५) तसंच, प्रेषित योहानानं म्हटलं: “यावरुन देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की, आपण एकमेकांवर प्रीती करावी.” (१ योहा. ३:१०, ११) प्रेम आणि एकता असल्यामुळे यहोवाचे साक्षीदार येशूचं खऱ्या अर्थानं अनुकरण करतात हे दिसून येतं. आणि सबंध जगभरात राज्याची सुवार्ता सांगण्याचा बहुमान यहोवानं या लोकांना दिला आहे.—मत्त. २४:१४.

‘मोठ्या लोकसमुदायाला’ एकत्र करणं

१२, १३. मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य आज काय करत आहेत, आणि लवकरच ते काय अनुभवतील?

१२ आज जगाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले लोक मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य बनले आहेत, आणि ते देवाच्या राज्याचं समर्थन करतात. हे असे लोक आहेत जे “मोठ्या संकटातून येतात” आणि ज्यांनी येशूच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवून “आपले झगे कोकऱ्याच्या ‘रक्तात धुऊन’ शुभ्र केले आहेत.” मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य यहोवावर आणि त्याच्या पुत्रावर प्रेम करतात आणि ते रात्रंदिवस यहोवाची उपासना करतात.—प्रकटी. ७:९, १४, १५.

१३ यहोवा लवकरच ‘मोठ्या संकटात’ या दुष्ट जगाचा नाश करेल. (मत्त. २४:२१; यिर्मया २५:३२, ३३ वाचा.) पण यहोवाचं आपल्या विश्वासू सेवकांवर प्रेम असल्यामुळे तो त्यांना या संकटातून वाचवून नवीन जगात नेईल. यहोवानं २,००० वर्षांपूर्वीच अभिवचन दिलं होतं, की तो “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल; यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.” खरंच, तो काळ पाहण्यासाठी आपण किती आतुर आहोत जेव्हा दुष्टपणा, त्रास आणि मृत्यू यांचं नावही नसेल!—प्रकटी. २१:४.

१४. आज मोठ्या लोकसमुदायात किती वाढ झाली आहे?

१४ १९१४ मध्ये शेवटल्या दिवसांची सुरवात झाली तेव्हा पृथ्वीवर देवाच्या सेवकांची संख्या केवळ काही हजार होती. शेजाऱ्यांप्रती असणाऱ्या प्रेमामुळे अभिषिक्त जनांच्या या लहान गटानं पवित्र आत्म्याच्या मदतीनं लोकांना राज्याची सुवार्ता सांगितली. असं करत असताना त्यांना बरीच आव्हानं आली. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे आज कोणते परिणाम दिसून येत आहेत? पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची आशा असणाऱ्या मोठ्या लोकसमुदायाला आज एकत्र केलं जात आहे. जगभरातील १,१५,४०० पेक्षा जास्त मंडळ्यांमध्ये जवळपास ८० लाख लोक यहोवाची उपासना करत आहेत. आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. उदाहरणार्थ, २०१४ च्या सेवा वर्षादरम्यान २,७५,५०० लोकांनी बाप्तिस्मा घेतला. याचा अर्थ दर आठवडी जवळजवळ ५,३०० लोकांनी बाप्तिस्मा घेतला.

१५. आज लोकांपर्यंत सुवार्ता कशा प्रकारे पोचवली जात आहे?

१५ राज्याची सुवार्ता आज पृथ्वीच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवली जात आहे, ही खरंच एक विलक्षण गोष्ट आहे. आज आपली प्रकाशनं ७०० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. द वॉचटावर हे जगातलं सर्वात जास्त खप असलेलं मासिक आहे. या मासिकाच्या २४७ भाषांमध्ये ५ कोटी २० लाख प्रती, दर महिन्याला छापल्या जातात. आणि बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचं २५० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलं आहे. आजपर्यंत या पुस्तकाच्या २० कोटी पेक्षा जास्त प्रती छापण्यात आल्या आहेत.

१६. संघटनेत होणारी वाढ काय दाखवून देते?

१६ आज आपल्या संघटनेत होणारी वाढ हेच दाखवून देते की आपला यहोवावर पूर्ण विश्वास आहे आणि बायबल हे देवाचं वचन आहे असं आपण मानतो. (१ थेस्सलनी. २:१३) आज सैतान आपला विरोध आणि छळ करत असला, तरी यहोवाकडून मिळणाऱ्या आशीर्वादांमुळे आपण आनंदी आहोत.—२ करिंथ. ४:४.

नेहमी एकमेकांप्रती प्रेम दाखवा

१७, १८. जे लोक यहोवाची उपासना करत नाहीत त्यांच्याबद्दल आपण कशी वृत्ती बाळगली पाहिजे?

१७ आज लोक वेगवेगळ्या प्रकारे आपल्या सुवार्तेला प्रतिसाद देतात. काही लोक आपला संदेश ऐकतात, तर काही विरोध करतात. मग त्यांच्याशी आपण कसं वागावं, अशी यहोवाची इच्छा आहे? लोकांची प्रतिक्रिया कशीही असली, तरी आपण बायबलमध्ये दिलेला सल्ला पाळतो. बायबल म्हणतं: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्ही समजावे.” (कलस्सै. ४:६) शेजाऱ्यांवर प्रेम असल्यामुळेच आपण विरोध करणाऱ्यांना नेहमी “सौम्यतेने व भीडस्तपणाने” म्हणजेच आदराने उत्तर देतो.—१ पेत्र ३:१५.

१८ प्रचारकार्यात लोक आपल्यावर चिडले आणि त्यांनी आपला विरोध केला, तरीसुद्धा आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करून त्यांना प्रेम दाखवलं पाहिजे. बायबल म्हणतं की येशूची “निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही.” याऐवजी येशूनं नेहमी यहोवावर भरवसा ठेवला. (१ पेत्र २:२३) त्यामुळे आपण प्रत्येक प्रसंगी नम्रता दाखवतो आणि बायबलमधील या सल्ल्याचं पालन करतो: “वाइटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका; तर उलट आशीर्वाद द्या.”—१ पेत्र ३:८, ९.

१९. आपण आपल्या वैऱ्यांशी कसा व्यवहार केला पाहिजे?

१९ येशूनं दिलेल्या एका महत्त्वाच्या तत्त्वाचं पालन करण्यासाठी, नम्रतेचा गुण आपल्याला मदत करेल. येशूनं म्हटलं होतं: “‘आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर,’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.” (मत्त. ५:४३-४५) आपले शत्रू आपल्याशी वाईट वागले तरी, देवाचे सेवक या नात्यानं आपण नेहमी त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे.

२०. संपूर्ण पृथ्वीवर यहोवा आणि शेजाऱ्यांवर प्रेम करणारे लोक राहतील, अशी खात्री आपण का बाळगू शकतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

२० आपण यहोवावर आणि आपल्या शेजाऱ्यांवर नेहमी प्रेम केलं पाहिजे. लोक आपला विरोध करत असले, तरी त्यांना गरज पडते तेव्हा आपण त्यांना मदत करतो. प्रेषित पौलानं म्हटलं: “एकमेकांवर प्रीती करणे याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका; कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. कारण व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खून करू नको, लोभ धरू नको, या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्यांचे काही वाईट करत नाही म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय.” (रोम. १३:८-१०) सैतानाच्या या दुष्ट, हिंसेनं भरलेल्या जगात देवाचे लोक आपल्या शेजाऱ्यांवर मनापासून प्रेम करतात. (१ योहा. ५:१९) सैतान, त्याचे दुरात्मे आणि या दुष्ट जगाचा जेव्हा यहोवा नाश करेल, तेव्हा संपूर्ण पृथ्वी प्रेमळ लोकांनी भरून जाईल. पृथ्वीवरील सर्व लोक जेव्हा यहोवावर आणि आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करतील, तेव्हा तो काळ किती आनंदाचा असेल!