व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा एक प्रेमळ देव

यहोवा एक प्रेमळ देव

“देव प्रीती आहे.”—१ योहा. ४:८, १६.

गीत क्रमांक: १८, ५१

१. यहोवाचा प्रमुख गुण कोणता आहे, आणि हे माहीत असल्यामुळे आपल्याला यहोवाबद्दल कसं वाटतं?

बायबल आपल्याला सांगतं, की “देव प्रीती आहे.” (१ योहा. ४:८) पण याचा नेमका काय अर्थ होतो? प्रेम हा यहोवाच्या इतर सुरेख गुणांसारखाच केवळ एक गुण नाही, तर तो यहोवाचा प्रमुख गुण आहे. त्यामुळे, देवामध्ये प्रेमाचा गुण आहे असं बायबल म्हणत नाही, तर देव स्वतः प्रीती आहे असं ते म्हणतं. यहोवा जे काही करतो ते प्रेमापोटी करतो. प्रेमानं प्रवृत्त होऊन यहोवानं विश्वाची आणि त्यात राहणाऱ्या सर्व गोष्टींची सृष्टी केली, यासाठी आपण त्याचे किती आभार मानले पाहिजे!

२. यहोवाच्या प्रेमामुळे आपल्याला कोणत्या गोष्टीची खात्री मिळते? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

यहोवाचं मानवांवर खूप प्रेम आहे आणि त्यामुळेच त्याचा मानवजातीसाठी जो उद्देश आहे तो नक्की पूर्ण होईल याची खात्री आपल्याला मिळते. त्याचा उद्देश जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्याची आज्ञा मानणारे खऱ्या अर्थानं आनंदी होतील. उदाहरणार्थ, यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळेच त्यानं, “एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे.” (प्रे. कृत्ये १७:३१) येशू ख्रिस्ताद्वारे यहोवा हा न्याय नक्की करेल याची खात्री आपल्याला आहे. जे लोक देवाची आज्ञा मानतात त्यांच्यासाठी उज्ज्वल भविष्य आहे आणि त्यांना मिळणारे आशीर्वाद अनंतकाळ राहतील.

इतिहासानं काय दाखवून दिलं आहे

३. देवाचं मानवांवर प्रेम नसतं तर आपलं भविष्य कसं असतं?

प्रेम जर देवाचा प्रमुख गुण नसता, तर मानवजातीचं भविष्य कसं असतं? मानव एकमेकांवर राज्य करत राहिले असते, आणि या जगाचा दुष्ट व निष्ठुर देव, सैतान याच्या प्रभावाखाली लोक नेहमी राहिले असते. (२ करिंथ. ४:४; १ योहा. ५:१९; प्रकटीकरण १२:९, १२ वाचा.) यहोवाचं आपल्यावर प्रेम नसतं, तर आपलं भविष्य नक्कीच अगदी भयंकर असतं.

४. यहोवानं सैतानाला त्याचा दावा सिद्ध करण्यासाठी वेळ का दिला?

सैतानानं यहोवाविरुद्ध बंड केलं तेव्हा त्यानं आदाम-हव्वेलाही यहोवाची आज्ञा मोडण्यास प्रवृत्त केलं. यहोवाच्या राज्य करण्याच्या अधिकारावर त्यानं प्रश्न उपस्थित केला. त्यानं हादेखील दावा केला की तो यहोवापेक्षा चांगल्या प्रकारे राज्य करू शकतो. (उत्प. ३:१-५) यहोवानं ही परिस्थिती खूप विचारपूर्वक हाताळली आणि सैतानाला त्याचा दावा सिद्ध करण्यासाठी थोडा वेळ दिला. पण त्याचे काय परिणाम झाले हे आज आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात. सैतान किंवा मानव, हे कधीच मानवजातीवर चांगल्या रीतीनं राज्य करू शकत नाहीत, हेच इतिहासानं दाखवून दिलं आहे.

५. इतिहासावरून काय सिद्ध झालं आहे?

आज जगाची परिस्थिती खालावत चालली आहे. गेल्या १०० वर्षांत जवळपास १० कोटी लोकांना युद्धांत आपला जीव गमवावा लागला आहे. बायबल शेवटल्या दिवसांविषयी असं म्हणतं: “दुष्ट व भोंदू माणसे ही . . . दुष्टपणात अधिक सरसावतील.” (२ तीम. ३:१, १३) बायबल असंदेखील म्हणतं: “हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्म. १०:२३) इतिहास पाहिला तर हे शब्द अगदी खरे असल्याचं दिसून येतं. खरंतर, यहोवानं मानवांना एकमेकांवर राज्य करण्याच्या क्षमतेसह बनवलंच नव्हतं आणि तसा अधिकारही त्यानं त्यांना दिला नव्हता. उलट मानवांना नेहमीच त्याच्या मार्गदर्शनाची गरज पडेल अशा प्रकारे यहोवानं त्यांना बनवलं होतं.

६. यहोवानं दुष्टाईला का राहू दिलं आहे?

काही काळासाठी यहोवानं पृथ्वीवर दुष्टाईला राहू दिलं आहे. यावरून यहोवाचं राज्यच यशस्वीपणे शासन करू शकतं हे स्पष्ट झालं आहे. भविष्यात यहोवा सर्व प्रकारच्या दुष्टाईचा समूळ नाश करेल. त्यानंतर जर कोणी यहोवाच्या प्रेमळपणे राज्य करण्याच्या अधिकाराला आव्हान दिलं, तर यहोवा त्याचा लगेच नाश करेल. त्याला आपला दावा सिद्ध करण्यासाठी वेळ देणार नाही. अशा बंडखोराचा लगेच नाश करून तो दुष्टाईला पुन्हा कधीच अनुमती देणार नाही. आणि त्याचं असं करणं चुकीचं नसेल, कारण मानवजातीच्या इतिहासावरून हेच सिद्ध झालं आहे की असे सर्व दावे खोटे आहेत.

यहोवानं आपलं प्रेम कसं दाखवलं?

७, ८. यहोवानं मानवांप्रती आपलं प्रेम कसं दाखवलं आहे?

यहोवानं बऱ्याच मार्गांनी मानवांवर असलेलं आपलं अपार प्रेम दाखवलं आहे. आपलं विश्व किती सुंदर आणि भव्य आहे याचा विचार करा. विश्वात करोडो आकाशगंगा आहेत आणि प्रत्येक आकाशगंगेत करोडो तारे आणि ग्रह आहेत. आपल्या आकाशगंगेत अनेक तारे आहेत, आणि सूर्य हा त्यांपैकी एक तारा आहे. पण जर सूर्य नसता तर पृथ्वीवर जीवन शक्य नसतं. या सर्व गोष्टींवरून आपला निर्माणकर्ता यहोवा किती शक्तिशाली, बुद्धिमान आणि प्रेमळ आहे हे दिसून येतं. बायबल सांगतं: “सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.”—रोम. १:२०.

जीवसृष्टीसाठी अनुकूल परिस्थिती असेल अशा प्रकारे यहोवानं पृथ्वीची रचना केली आहे. शिवाय, पृथ्वीवर त्यानं जे काही निर्माण केलं त्यामुळे मानवांना आणि इतर प्राण्यांना फायदाच झाला आहे. बायबल सांगतं की यहोवानं मानवांना राहण्यासाठी एक सुंदर बाग बनवली होती. तसंच त्यानं मानवांना परिपूर्ण बुद्धी आणि शरीर दिलं होतं, ज्यामुळे ते अनंतकाळ जगू शकले असते. (प्रकटीकरण ४:११ वाचा.) यासोबतच तो “सर्व प्राण्यांना अन्न देतो . . . कारण त्याची दया सनातन आहे.”—स्तो. १३६:२५.

९. यहोवा प्रेमळ देव असला तरी त्याला कोणत्या गोष्टीचा तिरस्कार आहे?

यहोवा देवाचा प्रमुख गुण प्रेम आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की तो वाईट गोष्टींना खपवून घेतो. त्याला वाईट गोष्टींची घृणा आहे. उदाहरणार्थ, स्तोत्र ५:४-६ या वचनांत असं सांगितलं आहे: “तू दुष्टाईची आवड धरणारा देव नाहीस, . . . सर्व कुकर्म करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे.” यहोवा “खुनी व कपटी” लोकांचा तिरस्कार करतो.

दुष्टाईचा अंत जवळ आहे

१०, ११. (क) दुष्ट लोकांचं काय केलं जाईल? (ख) यहोवा आपल्या विश्वासू सेवकांना कोणते आशीर्वाद देईल?

१० यहोवा प्रेमळ देव आहे आणि त्याला दुष्टाईचा वीट आहे. त्यामुळे योग्य वेळ आल्यावर तो दुष्टाईचा समूळ नाश करेल. बायबल आपल्याला असं अभिवचन देतं, की “दुष्कर्म करणाऱ्यांचा उच्छेद होईल; पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल.” यहोवाचे सर्व शत्रू अगदी “धुरासारखे नाहीसे होऊन जातील.”—स्तो. ३७:९, १०, २०.

११ बायबल आपल्याला असंदेखील सांगतं: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.” (स्तो. ३७:२९) यहोवाची आज्ञा मानणारे “उदंड शांतीसुखाचा उपभोग घेतील.” (स्तो. ३७:११) असं का म्हणता येईल? कारण यहोवा आपल्या विश्वासू सेवकांसाठी जे काही करतो ते नेहमी सर्वोत्तम असतं. बायबल आपल्याला सांगतं: “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल; यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटी. २१:४) यहोवा दाखवत असलेल्या प्रेमाची जे लोक कदर बाळगतात त्यांच्यासाठी त्यानं किती सुंदर भविष्य राखून ठेवलं आहे!

१२. “सात्विक” व्यक्ती कोणाला म्हणता येईल?

१२ बायबल म्हणतं: “सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील. पातकी तर पूर्णपणे नष्ट होतील; दुर्जनांचा वंश छाटला जाईल.” (स्तो. ३७:३७, ३८) “सात्विक” व्यक्तीला यहोवाची आणि त्याच्या पुत्राची ओळख असते आणि ती यहोवाची आज्ञा पाळत असते. (योहान १७:३ वाचा.) तिला पक्का विश्वास असतो, की “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहा. २:१७) जगाचा अंत जवळ असल्यामुळे, यहोवावर विसंबून राहणं आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार चालणं आज आपल्यासाठी खूप गरजेचं आहे.—स्तो. ३७:३४.

देवाच्या प्रेमाचं सर्वोत्तम उदाहरण

१३. यहोवाच्या प्रेमाचं सर्वोत्तम उदाहरण कोणतं आहे?

१३ आपण अपरिपूर्ण असलो तरी देवाची आज्ञा पाळू शकतो. तसंच, यहोवासोबत एक जवळचं नातंही जोडू शकतो. खरंतर येशूच्या खंडणी बलिदानामुळेच हे शक्य झालं. यहोवानं ही तरतूद मानवांना पाप आणि मृत्यूच्या दास्यातून सोडवण्यासाठी केली आणि याद्वारे त्यानं मानवांसाठी असलेल्या प्रेमाचं सर्वोत्तम उदाहरण मांडलं. (रोमकर ५:१२; ६:२३ वाचा.) येशू त्याच्या निर्मितीपासून यहोवाला विश्वासू होता. त्यामुळे जेव्हा यहोवानं त्याला पृथ्वीवर पाठवलं, तेव्हा त्याला पूर्ण खात्री होती की येशू तिथंही त्याला विश्वासू राहील. पण जेव्हा लोक येशूसोबत निर्दयीपणे वागले तेव्हा एक प्रेमळ पिता या नात्यानं यहोवाला खूप दुःख झालं. वाईट वागणूक मिळूनसुद्धा येशूनं मात्र यहोवाच्या राज्य करण्याच्या अधिकाराला पाठिंबा दिला. याद्वारे त्यानं दाखवून दिलं की अगदी कठीण परिस्थितीतही परिपूर्ण मानव यहोवाला विश्वासू राहू शकतात.

मानवांवर प्रेम असल्यामुळे यहोवानं येशूला पाठवलं (परिच्छेद १३ पाहा)

१४, १५. येशूच्या खंडणी बलिदानामुळे मानवजातीला कोणता फायदा झाला आहे?

१४ येशूला अनेक कठीण परीक्षांचा सामना करावा लागला, पण तो नेहमी यहोवाला विश्वासू राहिला आणि यहोवाच्या राज्य करण्याच्या अधिकाराला त्यानं नेहमी पाठिंबा दिला. देवाच्या नवीन जगात अनंतकाळ जगण्याची आशा आपल्याला येशूच्या बलिदानामुळेच मिळाली. यासाठी आपण खरंच किती कृतज्ञ असलं पाहिजे! यहोवा आणि येशू यांनी खंडणी बलिदानाद्वारे मानवांप्रती जे प्रेम दाखवलं, त्याविषयी पौल म्हणतो: “आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल; परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” (रोम. ५:६-८) याबद्दल प्रेषित योहानानंही लिहिलं: “देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे, यासाठी की, त्याच्याद्वारे आपणांस जीवन प्राप्त व्हावे, यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रगट झाली. प्रीती म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हावर प्रीती केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले.”—१ योहा. ४:९, १०.

१५ येशूनं म्हटलं: “देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहा. ३:१६) स्वतःच्या पुत्राला मरण सोसताना पाहणं यहोवासाठी मुळीच सोपं नव्हतं, पण तरीसुद्धा त्यानं खंडणीची योजना केली. यावरून यहोवाचं मानवांवर किती प्रेम आहे हे दिसून येतं. आणि हे प्रेम कधीच संपणार नाही. पौलानं लिहिलं: “माझी खात्री आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही.”—रोम. ८:३८, ३९.

देवाचं राज्य आज शासन करत आहे

१६. देवाचं राज्य काय आहे आणि यहोवानं कोणाला राजा म्हणून नेमलं आहे?

१६ देवाचं सरकार अर्थात मसीही राज्य हेदेखील यहोवाच्या प्रेमाचा पुरावा आहे. असं आपण का म्हणू शकतो? कारण यहोवानं एका अशा व्यक्तीला राजा म्हणून निवडलं आहे जिचं मानवांवर खूप प्रेम आहे आणि जी राज्य करण्यास पात्र आहे. (नीति. ८:३१) यहोवानं ख्रिस्तासोबत राज्य करण्यासाठी १,४४,००० जणांना पृथ्वीवरून निवडलं आहे. या सर्वांना मानव म्हणून जगणं काय असतं याची जाणीव असल्यामुळे ते मानवांवर प्रेमळपणे राज्य करू शकतील. (प्रकटी. १४:१) येशूच्या शिकवणीचा मुख्य विषय देवाचं राज्य हा होता. आणि त्यानं आपल्या शिष्यांना त्याविषयी प्रार्थना करायलादेखील शिकवलं. त्यानं म्हटलं: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्त. ६:९, १०) अशा प्रकारच्या प्रार्थना पूर्ण होतील आणि देवाचं राज्य मानवजातीवर आशीर्वादांचा वर्षाव करेल, त्या दिवसाची आपण किती आतुरतेनं वाट पाहत आहोत!

१७. मानवांच्या आणि येशूच्या राज्यात काय फरक आहे?

१७ मानवांच्या आणि येशूच्या राज्य करण्याच्या पद्धतीत जमीन अस्मानचा फरक आहे. मानवांच्या राज्यामुळे लाखो लोकांचा युद्धात बळी गेला आहे. याउलट, आपला राजा येशू याचं मानवांवर खूप प्रेम आहे आणि तो देवाच्या सुंदर गुणांचं, खासकरून प्रेमाचं अनुकरण करतो. (प्रकटी. ७:१०, १६, १७) येशूनं म्हटलं: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल; कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्त. ११:२८-३०) या अभिवचनातून येशूचं आपल्यावर किती प्रेम आहे हे दिसून येतं.

१८. (क) १९१४ पासून कशाची सुरवात झाली आहे? (ख) पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

१८ बायबल आपल्याला सांगतं की १९१४ साली देवाच्या राज्यानं राज्य करायला सुरुवात केली. तेव्हापासून येशूसोबत राज्य करणाऱ्या शेष जणांना आणि ‘मोठ्या लोकसमुदायातील’ लोकांना एकत्र करण्याचं काम सुरू झालं आहे. हा मोठा लोकसमुदाय येणाऱ्या मोठ्या संकटातून पार होऊन देवाच्या राज्यात प्रवेश करेल. (प्रकटी. ७:९, १३, १४) आज या मोठ्या लोकसमुदायात किती लोक आहेत? यहोवा त्यांच्याकडून काय अपेक्षा करतो? पुढच्या लेखात आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळतील.