व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या तरुण मुलांना शिकवा

यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या तरुण मुलांना शिकवा

“येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला.”—लूक २:५२.

गीत क्रमांक: ४१, ११

१, २. (क) काही पालकांना त्यांच्या तरुणांबद्दल कोणती काळजी वाटते? (ख) मुलं किशोरावस्थेचा चांगल्या प्रकारे उपयोग कसा करू शकतात?

मुलं यहोवाला आपलं जीवन समर्पण करून बाप्तिस्मा घेतात, तेव्हा तो आईवडिलांच्या जीवनातला खूप आनंदाचा क्षण असतो. बर्निस नावाची बहीण सांगते की तिच्या चारही मुलांनी १४ वर्षांचं होण्याआधीच बाप्तिस्मा घेतला. ती म्हणते: “आमच्यासाठी ते खूप आनंदाचे क्षण होते. आमच्या मुलांना यहोवाची सेवा करायची आहे हे पाहून आम्हाला खूप समाधान वाटलं. पण आम्हाला हेदेखील माहीत होतं की तरुण असल्यामुळे आमच्या मुलांना बऱ्याच आव्हानांचाही सामना करावा लागणार होता.” तुमची मुलं तरुण असतील किंवा मग किशोरावस्थेच्या उंबरठ्यावर असतील तर तुम्हालादेखील या बहिणीसारखीच काळजी वाटत असेल.

मुलांच्या मानसिकतेवर अभ्यास करणाऱ्या एका तज्ज्ञाचं असं म्हणणं आहे, की किशोरावस्थेचा काळ हा पालकांसाठी आणि तरुणांसाठीही कठीण असू शकतो. पण या काळातून जात असताना, मुलं विचित्र वागत आहेत किंवा त्यांचा बालिशपणा अजून गेलेला नाही, असा विचार पालकांनी करू नये. ते म्हणतात की या वयात, तरुण मुलं आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून बऱ्याच गोष्टी करतात, त्यांना भावनिक गोष्टी कळू लागतात आणि त्यांना मित्रांसोबत वेळ घालवायलाही आवडतं. यामुळे तरुण असतानाच तुमची मुलं यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडू शकतात. येशूनंही तरुण असतानाच यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडला होता. (लूक २:५२ वाचा.) तरुण मुलं प्रचारकार्यात आपली कौशल्ये वाढवू शकतात आणि यहोवाची सेवा करण्यासाठी चांगला पाया घालू शकतात. शिवाय, या वयातच यहोवाला जीवन समर्पित करून त्याची आज्ञा पाळण्याचा निर्णयही ते स्वतः घेऊ शकतात. पण मग, पालक या नात्यानं यहोवाची सेवा करण्यासाठी तुम्ही तुमच्या तरुण मुलांना कशी मदत करू शकता? येशूनं प्रेम, नम्रता आणि समजबुद्धी दाखवून ज्या प्रकारे आपल्या शिष्यांना शिकवलं त्यातून तुम्ही बरंच काही शिकू शकता.

आपल्या तरुण मुलांवर प्रेम करा

३. येशू आपला मित्र आहे याची प्रेषितांना खात्री का होती?

येशू आपल्या शिष्यांचा फक्त धनीच नव्हता, तर त्यांचा चांगला मित्रदेखील होता. (योहान १५:१५ वाचा.) बायबलच्या काळात एक धनी कधीच आपल्या सेवकाला आपले विचार किंवा आपल्या भावना सांगत नव्हता. पण येशूनं आपल्या प्रेषितांना कधीच दास समजलं नाही. त्याचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं आणि तो त्यांच्यासोबत वेळदेखील घालवायचा. येशू आपल्या भावना, आपले विचार शिष्यांना सांगायचा. आणि जेव्हा शिष्य त्यांचे विचार किंवा मनातल्या गोष्टी त्याला सांगायचे, तेव्हा तो त्यांचं लक्षपूर्वक ऐकायचा. (मार्क ६:३०-३२) एकमेकांशी बोलल्यामुळे येशू आणि त्याच्या प्रेषितांमध्ये घनिष्ठ मैत्री झाली. शिवाय भविष्यात त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवण्यात येणार होती, ती पूर्ण करण्यासाठीही यामुळे त्यांना मदत झाली.

४. पालकांनो तुम्ही आपल्या तरुण मुलांचे मित्र कसे बनू शकता?

हे खरं आहे की आईवडील या नात्यानं तुमचा मुलांवर अधिकार आहे. पण तुम्ही त्यांचे मित्रदेखील होऊ शकता. मित्र एकमेकांसोबत वेळ घालवतात. कदाचित तुम्ही तुमच्या कामातून किंवा इतर गोष्टींतून वेळ काढून, तो वेळ मुलांसोबत घालवू शकता. असं करण्याचा तुम्ही गंभीरतेनं विचार केला पाहिजे आणि याबद्दल प्रार्थनादेखील केली पाहिजे. मित्रांच्या आवडीनिवडी सारख्या असतात. म्हणून तुमच्या तरुण मुलांना काय आवडतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना कोणत्या प्रकारची गाणी आवडतात, त्यांना कोणते खेळ किंवा चित्रपट आवडतात हे माहीत करून घ्या. आणि मग तुम्हीदेखील त्यांच्यासोबत त्या गोष्टी करा. इटलीमध्ये राहणारी इलारिया म्हणते: “मी जी गाणी ऐकायचे ती माझे आईबाबापण ऐकू लागले. माझे बाबा माझे सगळ्यात जवळचे मित्र बनले. आणि कोणत्याही गोष्टीवर त्यांच्यासोबत बोलण्यासाठी मला कधीच संकोच वाटला नाही.” मुलांचे मित्र बनण्याद्वारे आणि त्यांना यहोवाचे मित्र बनण्यासाठी मदत करण्याद्वारे, तुम्ही पालक या नात्यानं तुमचा अधिकार गमावत आहात असा विचार कधीच करू नका. (स्तो. २५:१४) उलट, मुलांचे मित्र बनण्याद्वारे त्यांना जाणवेल की तुमचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही त्यांचा आदर करता. यामुळे ते कोणत्याही गोष्टीबद्दल अगदी मनमोकळेपणे तुमच्याशी बोलतील.

५. यहोवाच्या सेवेत आनंद मिळवण्यासाठी शिष्यांना काय करण्याची गरज होती?

येशूला माहीत होतं की जर त्याच्या शिष्यांनी आवेशानं यहोवाची सेवा केली आणि ते सुवार्ता सांगण्यात व्यस्त राहिले, तर ते खऱ्या अर्थानं आनंदी होतील. त्यामुळे त्यानं शिष्यांना प्रचारकार्यात स्वतःला झोकून द्यायला सांगितलं. तसंच, या कार्यात तो स्वतः त्यांना मदत करेल असंदेखील त्यानं सांगितलं.—मत्त. २८:१९, २०.

६, ७. मुलांना यहोवाची सेवा नियमितपणे करण्याचं शिकवण्याद्वारे तुम्ही त्यांच्यावर प्रेम असल्याचं कसं दाखवता?

तुमच्या मुलांचा यहोवासोबत जवळचा नातेसंबंध असावा असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. पण यासाठी तुम्ही त्यांना शिकवलं पाहिजे आणि त्यांना शिस्त लावली पाहिजे अशी यहोवाची इच्छा आहे. आणि त्यानं तुम्हाला तसं करण्याचा अधिकारही दिला आहे. (इफिस. ६:४) यामुळे मुलांना नियमितपणे प्रशिक्षण मिळत आहे की नाही, याकडे लक्ष द्या. जरा विचार करा: शालेय शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि मुलांनी नवनवीन गोष्टी शिकायला पाहिजे हे तुम्हाला माहीत असल्यामुळे तुम्ही त्यांना शाळाकॉलेजात पाठवता. पण यहोवाकडून मिळणाऱ्या शिक्षणामुळे मुलांचं जीवन वाचू शकतं. तर मग मुलं सभा, संमेलन आणि कौटुंबिक उपासना चुकवत तर नाहीत ना, याची खात्री तुम्ही करू नये का? तेव्हा, मुलांना यहोवाबद्दल शिकण्यास मदत करा. आणि त्यांना या गोष्टीची जाणीव करून द्या की यहोवाकडून शिकल्यामुळे ते सुज्ञ बनतील. (नीति. २४:१४) तसंच, मुलांना नियमितपणे प्रचारकार्यात जाण्यासाठी उत्तेजन द्या. इतरांना यहोवाबद्दल सांगण्यात जो आनंद मिळतो तो अनुभवण्यास त्यांना मदत करा. असं करण्याद्वारे तुम्ही येशूचं अनुकरण करत असता.

वैयक्तिक अभ्यास, सभा, आणि प्रचारकार्य यांविषयी नियमितपणा असल्यामुळे तरुणांना कशी मदत होते? दक्षिण आफ्रिकामध्ये राहणारी एरिन म्हणते: “लहान असताना बायबल अभ्यास करायला, सभेला, प्रचारकार्याला जायला आम्ही खूप कंटाळा करायचो. कधीकधी तर आम्ही कौटुंबिक उपासना थांबवण्यासाठी मुद्दाम काहीतरी खोड काढायचो. पण आईबाबांनी आमचे प्लॅन्स कधीच पूर्ण होऊ दिले नाही.” तिच्या आईबाबांनी त्या वेळी जे केलं त्यासाठी ती त्यांचे आभार मानते. कारण यामुळे तिला जाणीव झाली की आध्यात्मिक गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. म्हणून आज जर कधी तिची सभा चुकली किंवा प्रचारकार्यात जाणं तिला जमलं नाही तर तिला अस्वस्थ वाटतं, आणि ती लगेच नियमितपणे सभेला व प्रचाराला जाण्याचा प्रयत्न करते.

नम्र असा

८. (क) येशू नम्र होता हे कशावरून दिसून आलं? (ख) येशूनं नम्रता दाखवल्यामुळे त्याच्या शिष्यांना कशी मदत झाली?

येशू परिपूर्ण होता, पण त्यानं नम्रपणे आपल्या मर्यादा कबूल केल्या आणि तो यहोवावर पूर्णपणे विसंबून राहिला. (योहान ५:१९ वाचा.) येशूनं नम्रता दाखवल्यामुळे शिष्यांचा त्याच्याप्रती आदर कमी झाला का? मुळीच नाही. उलट, तो यहोवावर पूर्णपणे विसंबून राहिल्यामुळे त्याच्या शिष्यांचा त्याच्यावर भरवसा आणखी वाढला. नंतर, त्यांनीही येशूसारखी नम्रता दाखवली.—प्रे. कृत्ये ३:१२, १३, १६.

९. पालक जेव्हा आपली चूक कबूल करून माफी मागतात तेव्हा मुलांवर याचा काय परिणाम होतो?

येशूसारखे आपण परिपूर्ण नाही. आपल्या हातून बऱ्याच चुका होतात. म्हणून नम्र असा. तुम्हाला सगळ्याच गोष्टी जमणार नाहीत याची जाणीव बाळगा, आणि तुमच्याकडून चूक झाली तर ती कबूल करा. (१ योहा. १:८) असं केल्यामुळे तुमची तरुण मुलंही स्वतःच्या चुका कबूल करायला शिकतील. आणि तुमच्याबद्दल त्यांचा आदर आणखी वाढेल. सहसा आपण कोणाचा जास्त आदर करतो? अशा व्यक्तीचा जी आपली चूक कधीच कबूल करत नाही, की अशा व्यक्तीचा जी नम्रपणे आपली चूक कबूल करते? रोजमेरी नावाच्या बहिणीला तीन मुलं आहेत. ती आणि तिचे पती त्यांच्या हातून झालेली चूक नेहमी कबूल करायचे. ती म्हणते: “आम्ही आमची चूक कबूल केल्यामुळे मुलांना खूप मदत झाली. त्यांना एखादी समस्या आली की ते मनमोकळेपणे आमच्याशी येऊन बोलायचे. त्यांच्या समस्यांचं सर्वात चांगलं उत्तर कुठं मिळू शकतं हे आम्ही त्यांना शिकवलं. ते जेव्हा जेव्हा आमच्याकडे मदतीसाठी यायचे तेव्हा तेव्हा आम्ही आपल्या प्रकाशनांतून त्यांना मदत केली आणि त्यांच्यासोबत प्रार्थनादेखील केली.”

१०. शिष्यांना आज्ञा देतानादेखील येशूनं नम्रता कशी दाखवली?

१० आपल्या शिष्यांना आज्ञा देण्याचा अधिकार येशूला होता. पण नम्र असल्यामुळे आपल्या शिष्यांनी एखादी गोष्ट का केली पाहिजे त्यामागचं कारणदेखील तो त्यांना सांगायचा. उदाहरणार्थ, ‘तुम्ही पहिल्याने राज्य आणि देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा,’ फक्त इतकंच त्यानं सांगितलं नाही. तर त्यानं हेदेखील म्हटलं की, “त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” तसंच, जेव्हा येशूनं त्यांना सांगितलं की इतरांचे दोष काढू नका, तेव्हा त्यानं हेदेखील सांगितलं: “ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील.”—मत्त. ६:३१–७:२.

११. एखादा नियम किंवा निर्णय घेण्यामागचं कारण सांगितल्यामुळे मुलांना कशी मदत होईल?

११ तुम्ही तरुण मुलांसाठी एखादा निर्णय घेता किंवा नियम बनवता, तेव्हा योग्य वेळ पाहून त्यामागचं कारण त्यांना सांगा. यामुळे त्यांना तो नियम पाळणं सोपं जाईल. चार मुलांचं संगोपन केलेल्या बॅरी नावाच्या एका बांधवानं म्हटलं: “एखाद्या गोष्टीमागचं कारण सांगितल्यामुळे तरुण मुलांचा तुमच्यावर विश्वास वाढतो.” असं केल्यामुळे तरुणांना दिसून येईल की तुमच्याकडे अधिकार आहे म्हणून तुम्ही नियम बनवला नाही, तर तसं करण्यामागे चांगली कारणंही आहेत. तसंच, हे लक्षात ठेवा की मुलं आता लहान राहिलेली नाहीत. तरुण वयात त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात, आणि ते प्रत्येक गोष्टीवर विचार करण्याचं शिकत असतात. (रोम. १२:१) बॅरी सांगतात: “तरुणांनी जीवनात भावनेच्या आधारावर नाही, तर ठोस कारणांच्या आधारावर योग्य निर्णय घेण्याचं शिकलं पाहिजे.” (स्तो. ११९:३४) त्यामुळे नम्रता दाखवा आणि आपल्या तरुण मुलांना तुम्ही घेतलेल्या निर्णयामागचं कारण सांगा. असं केल्यामुळे ते स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकतील. तसंच, त्यांना हेदेखील कळेल की तुम्ही त्यांचा आदर करता आणि ती आता मोठी झाली आहेत याची जाणीव तुम्हाला आहे.

समजबुद्धी दाखवा

१२. येशूनं समजबुद्धी दाखवून पेत्राला मदत कशी केली?

१२ येशूमध्ये समजबुद्धी होती आणि त्याच्या शिष्यांना कोणत्या बाबतीत मदतीची गरज आहे हे तो ओळखू शकत होता. उदाहरणार्थ, येशूनं जेव्हा आपल्या शिष्यांना सांगितलं की त्याला जिवे मारण्यात येईल, तेव्हा पेत्र म्हटला की ‘प्रभू तू स्वतःवर दया कर’. येशूला माहीत होतं की पेत्राचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. पण या प्रसंगी त्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे हे येशूनं ओळखलं. मग येशूनं पेत्राला आणि इतर शिष्यांना मदत कशी केली? आधी त्यानं पेत्राची चूक सुधारली. नंतर, जे लोक कठीण प्रसंगांत यहोवाच्या इच्छेनुसार वागत नाहीत त्यांचं काय होणार, हे येशूनं त्यांना सांगितलं. त्यानं हेदेखील सांगितलं की जे लोक निःस्वार्थ वृत्ती दाखवतील त्यांना यहोवा आशीर्वाद देईल. (मत्त. १६:२१-२७) यामुळे पेत्र आपला चुकीचा दृष्टिकोन सुधारू शकला.—१ पेत्र २:२०, २१.

१३, १४. (क) तुमच्या मुलांना विश्वास वाढवण्याची गरज आहे हे कशावरून दिसून येऊ शकतं? (ख) तुमच्या मुलाला किंवा मुलीला कोणत्या प्रकारच्या मदतीची गरज आहे हे तुम्ही कसं जाणून घेऊ शकता?

१३ तुमच्या तरुण मुलाला किंवा मुलीला कोणत्या प्रकारच्या मदतीची गरज आहे ते समजून घेण्यासाठी, यहोवाकडे समजबुद्धी मागा. (स्तो. ३२:८) कदाचित तुम्हाला जाणवेल की तुमचा मुलगा खूप उदास राहतो किंवा मग बांधवांबद्दल नकारात्मक बोलतो. तुम्हाला कदाचित वाटेल की त्याच्या मनात काहीतरी आहे पण तो तुम्हाला सांगत नाही. अशा वेळी असा विचार करू नका की तो सांगत नाही म्हणजे तो लपून काहीतरी चुकीचं काम करत आहे. * दुसरीकडे पाहता, असाही विचार करू नका की परिस्थिती आपोआपच सुधारेल. उलट, त्याचा विश्वास मजबूत करण्यासाठी तुम्हाला त्याला मदत करावी लागेल.

मंडळीत चांगले मित्र बनवण्यासाठी तुमच्या तरुण मुलांना मदत करा (परिच्छेद १४ पाहा)

१४ मुलाला कशी मदत करता येईल हे जाणून घेण्यासाठी प्रेमळपणे त्याला प्रश्न विचारा. प्रश्न विचारणं हे जणू विहिरीतून पाणी काढण्यासारखं आहे. तुम्ही जर भरभर रस्सी खेचली तर तुम्हाला जास्त पाणी काढता येणार नाही. त्याच प्रकारे, तुम्ही जर अधीर होऊन मुलांना प्रश्न विचारले आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना बोलायला लावलं, तर त्यांच्या मनात नेमकं काय आहे ते तुम्हाला जाणून घेता येणार नाही. (नीतिसूत्रे २०:५ वाचा.) इलारिया म्हणते की तरुण असताना तिला माहीत होतं की शाळेतील मित्रमैत्रिणींसोबत जास्त वेळ घालवणं चुकीचं आहे. पण तरीसुद्धा तिला त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवायची इच्छा होती. यामुळे ती चिंतित होती आणि हे तिच्या आईवडिलांच्या लक्षात आलं. ती सांगते: “एका संध्याकाळी ते मला म्हणाले की मी काही दिवसांपासून चिंतित दिसते आणि त्यांनी मला त्याचं कारण विचारलं. हे ऐकून मला रडूच आलं, मी त्यांना मला काय वाटतंय ते सांगितलं आणि मदत मागितली. त्यांनी मला मिठी मारली, आणि ते मला समजू शकतात असं सांगितलं. ते मला नक्की मदत करतील असंही ते बोलले.” तिच्या आईवडिलांनी मंडळीत चांगले मित्र बनवण्यासाठी इलारियाला मदत केली.

१५. येशू इतरांमधले चांगले गुण पाहायचा हे आणखी कशावरून दिसून येतं?

१५ येशूनं आपल्या शिष्यांचे चांगले गुण पाहण्याच्या बाबतीतही समजबुद्धी दाखवली. उदाहरणार्थ, जेव्हा नथनेलानं ऐकलं की येशू नासरेथचा आहे, तेव्हा तो म्हणाला: “नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय?” (योहा. १:४६) आपण तिथं असतो तर कदाचित असा विचार केला असता, की नथनेल नकारात्मक बोलत आहे किंवा तो भेदभाव करत आहे, किंवा मग त्याचा विश्वास कमजोर आहे. पण येशूनं असा विचार केला नाही. त्याऐवजी येशूनं समजबुद्धी दाखवली. त्याला माहीत होतं की नथनेल प्रामाणिक आहे. त्यामुळेच येशूनं म्हटलं: “पाहा हा खराखुरा इस्राएली आहे; याच्याठायी कपट नाही!” (योहा. १:४७) येशू लोकांची मनं ओळखू शकत होता आणि या क्षमतेचा वापर त्यानं इतरांमधले चांगले गुण पाहण्यासाठी केला.

१६. तुमच्या तरुण मुलांना तुम्ही प्रगती करण्यास उत्तेजन कसं देऊ शकता?

१६ येशूसारखं लोकांच्या मनात काय आहे हे आपण ओळखू शकत नाही, पण आपण समजबुद्धी दाखवू शकतो. तुमच्या तरुण मुलांचे चांगले गुण पाहण्यास यहोवा तुम्हाला मदत करू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षेनुसार वागली नाहीत तर निराश होऊ नका. ती काही कामाची नाहीत किंवा नेहमी चुकीचं वागतात असं मुळीच म्हणू नका. इतकंच काय तर असा विचारही मनात येऊ देऊ नका. याऐवजी त्यांच्यात चांगले गुण आहेत हे तुम्ही ओळखता आणि त्यांना चांगलं ते करण्याची इच्छा आहे याची तुम्हाला खात्री आहे, असं त्यांना सांगा. सुधारणा करण्यासाठी मुलं जे काही प्रयत्न करत आहेत ते पाहा आणि त्यांची प्रशंसा करा. शक्य असल्यास त्यांना आणखी जबाबदाऱ्या द्या. असं केल्यामुळे तुम्ही त्यांना चांगले गुण विकसित करण्यास मदत करत असाल. येशूनं आपल्या शिष्यांसोबत हेच केलं. नथनेलाला (त्याला बर्थलमयही म्हणतात) भेटल्याच्या दीड वर्षांनंतर येशूनं त्याच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली. येशूनं त्याला प्रेषित म्हणून निवडलं आणि नथनेलानंही दिलेली कामगिरी विश्वासूपणे पूर्ण केली. (लूक ६:१३, १४; प्रे. कृत्ये १:१३, १४) त्यामुळे मुलांची प्रशंसा करा आणि त्यांना उत्तेजन द्या. मुलं जे काही करतात त्यात नेहमी काही ना काही कमी असते, असं तुमच्या वागण्याबोलण्यातून दाखवू नका. तर, त्यांना याची जाणीव करून द्या की ती तुमचं व यहोवाचं मन आनंदित करू शकतात आणि आपल्या क्षमतांचा उपयोग करून यहोवाची सेवा करू शकतात.

मुलांना शिकवल्यामुळे भविष्यात तुम्हाला आशीर्वाद मिळतील

१७, १८. तरुण मुलांना तुम्ही प्रशिक्षण देत राहिला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो?

१७ तुम्हाला कदाचित प्रेषित पौलासारखं वाटू शकतं. त्यानं बऱ्याच लोकांना यहोवाबद्दल शिकायला मदत केली होती आणि तो त्यांना आपली मुलं समजायचा. त्यांच्यावर त्याचं खूप प्रेम होतं आणि त्यांच्याबद्दल त्याला खूप काळजी होती. त्यामुळे जेव्हा त्याला जाणवलं की यांपैकी काही लोक यहोवाला सोडण्याच्या मार्गावर आहेत, तेव्हा तो खूप दुःखी झाला. (१ करिंथ. ४:१५; २ करिंथ. २:४) तीन मुलांचं संगोपन करणारे विक्टर नावाचे बांधव म्हणतात: “मुलं तरुण असताना त्यांना सांभाळणं आमच्यासाठी सोपं नव्हतं. आव्हानं तर बरीच आलीत, पण आम्ही घेत असलेल्या मेहनतीचे आम्हाला चांगले परिणाम मिळाले. यहोवाच्या मदतीमुळे आमचं आमच्या मुलांसोबत अगदी मैत्रीचं नातं झालं.”

१८ आईवडिलांनो, मुलांवर प्रेम असल्यामुळेच त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेता. तेव्हा, हार मानू नका, त्यांना शिकवत राहा. तुमची मुलं पुढे जाऊन यहोवाला आपलं जीवन समर्पित करतील आणि विश्वासूपणे यहोवाची सेवा करत असतील, तेव्हा ते पाहून तुम्हाला किती आनंद होईल याची कल्पना करा!—३ योहा. ४.

^ परि. 13 यंग पिपल आस्क—आनसर्स दॅट वर्क खंड १, पृष्ठ ३१७ आणि खंड २, पृष्ठे १३६-१४१ आणि टेहळणी बुरूज १ जुलै २०१२ पृष्ठे २२-२५ यातील माहिती वाचल्यामुळे पालकांना फायदा होऊ शकतो.