व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ताच्या राज्य शासनाची शंभर वर्षं!

ख्रिस्ताच्या राज्य शासनाची शंभर वर्षं!

शांतीचा देव त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो.—इब्री १३:२०, २१.

गीत क्रमांक: १६, १४

१. देवाच्या राज्याबद्दल इतरांना सांगणं येशूसाठी खूप महत्त्वाचं होतं, असं का म्हणता येईल?

देवाच्या राज्याबद्दल इतरांना सांगायला येशूला अगदी मनापासून आवडायचं. पृथ्वीवर असताना तो इतर कोणत्याही विषयापेक्षा राज्याबद्दलच सर्वात जास्त बोलायचा. त्याच्या सेवाकार्यात त्यानं १०० पेक्षाही जास्त वेळा देवाच्या राज्याचा उल्लेख केला. देवाचं राज्य येशूसाठी खरंच खूप महत्त्वाचा विषय होता.—मत्तय १२:३४ वाचा.

२. मत्तय २८:१९, २० मध्ये दिलेली आज्ञा किती जणांनी ऐकली, आणि आपण असं का म्हणू शकतो?

पुनरुत्थान झाल्यानंतर येशू ५०० पेक्षा जास्त लोकांच्या एका गटाला भेटला. हे लोक पुढे जाऊन येशूचे शिष्य बनण्याची शक्यता होती. (१ करिंथ. १५:६) कदाचित त्याच वेळी येशूनं त्यांना, “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा” अशी आज्ञा दिली असावी. त्यांना दिलेलं हे काम सोपं असणार नव्हतं. * सुवार्ता घोषित करण्याचं हे काम जास्त काळापर्यंत म्हणजे अगदी “युगाच्या समाप्तीपर्यंत” चालेल असंही येशूनं त्यांना सांगितलं होतं. आज जेव्हा तुम्ही सुवार्तेचा प्रचार करता, तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण करण्यात तुमचाही हातभार असतो.—मत्त. २८:१९, २०.

३. सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी कोणत्या तीन गोष्टींची आपल्याला मदत झाली आहे?

प्रचार करण्याची आज्ञा दिल्यानंतर येशूनं म्हटलं, “मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्त. २८:२०) असं म्हणण्याद्वारे येशूनं आपल्या अनुयायांना याची खात्री दिली, की संपूर्ण पृथ्वीवर राज्याचा प्रचार करण्याकरता तो त्यांचं मार्गदर्शन करेल. शिवाय, आज यहोवादेखील आपल्यासोबत आहे. प्रचार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व ‘चांगल्या गोष्टी’ तो आपल्याला पुरवतो. (इब्री १३:२०, २१) त्यांपैकी तीन गोष्टींवर या लेखात आपण चर्चा करणार आहोत: (१) आपल्याला पुरवण्यात आलेली साधनं, (२) आपण वापरलेल्या पद्धती, आणि (३) आपल्याला देण्यात आलेलं प्रशिक्षण. आपण गेल्या १०० वर्षांत ज्या साधनांचा वापर केला त्याबद्दल आता पाहू या.

देवाच्या सेवकांना प्रचार करण्यासाठी मदत करणारी साधनं

४. प्रचारकार्य करण्यासाठी आपण वेगवेगळ्या साधनांचा वापर का केला आहे?

येशूनं राज्याच्या संदेशाची तुलना वेगवेगळ्या प्रकारच्या मातीमध्ये पेरण्यात येणाऱ्या बीजाशी केली. (मत्त. १३:१८, १९) बी पेरण्याआधी शेतकरी जमीन तयार करतो आणि त्यासाठी तो बऱ्याच वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करतो. त्याच प्रकारे आपला राजा येशू यानं आपल्याला अशी बरीच साधनं दिली आहेत ज्यांच्या साहाय्यानं आपण लोकांच्या अंतःकरणात राज्याचा संदेश पेरतो. यांपैकी काही साधनांचा वापर थोड्या काळापुरता मर्यादित होता. तर, काहींचा वापर आपण आजही करत आहोत. पण, आजपर्यंत वापरण्यात आलेल्या या सगळ्या साधनांमुळे आपल्याला प्रचारकार्याच्या आपल्या कौशल्यात आणखी सुधारणा करता आली आहे.

५. टेस्टमनी कार्ड काय होतं, आणि त्याचा वापर कसा केला जायचा?

राज्य प्रचारक १९३३ साली टेस्टमनी कार्डचा (साक्ष पत्रिका) वापर करू लागले. या कार्डच्या साहाय्यानं प्रचारकार्याची सुरवात करणं अनेकांना सोपं गेलं. हे एक लहानसं कार्ड होतं आणि त्यावर बायबलचा संदेश थोडक्यात पण सोप्या पद्धतीनं लिहिण्यात आला होता. वेळोवेळी नवीन संदेश असलेले कार्ड बनवण्यात यायचे. बंधू अर्लनमेयर यांनी वयाच्या दहाव्या वर्षी टेस्टमनी कार्डचा पहिल्यांदाच वापर केला. ते म्हणतात: “लोकांना भेटल्यावर आम्ही सहसा त्यांना म्हणायचो, ‘तुम्ही कृपया हे कार्ड वाचणार का?’ घरमालकाचं कार्ड वाचून झाल्यानंतर आम्ही त्यांना काही प्रकाशनं द्यायचो आणि तिथून निघून जायचो.”

६. टेस्टमनी कार्डमुळे प्रचारकांना कशी मदत झाली?

टेस्टमनी कार्डमुळे प्रचारकांना वेगवेगळ्या मार्गांनी मदत झाली. उदाहरणार्थ, काही प्रचारक लाजाळू होते आणि त्यांना प्रचार करण्याची इच्छा असली तरी नेमकं काय बोलायचं हे त्यांना समजायचं नाही. इतर प्रचारक धाडसी होते. त्यांना माहीत असलेली सगळी माहिती ते एकदम सांगून मोकळे व्हायचं. पण, सहसा त्यांच्यात बोलण्याचं कौशल्य नसायचं. अशा वेळी, टेस्टमनी कार्डच्या साहाय्यानं या सर्व प्रचारकांना, थोडक्यात आणि साध्या-सोप्या शब्दांत संदेश सांगणं शक्य झालं.

७. टेस्टमनी कार्डचा वापर करताना कोणत्या समस्या यायच्या?

पण, टेस्टमनी कार्डचा वापर करताना काही समस्याही यायच्या. ग्रेस इस्टेप नावाची बहीण म्हणते: “कधीकधी घरमालक आम्हाला म्हणायचे, ‘यात नेमकं काय लिहिलय ते तुम्हीच मला सांगा ना?’” तसंच, काही घरमालकांना तर कार्डवरचा संदेश वाचताही यायचा नाही. तर काहींना वाटायचं की कार्ड त्यांच्यासाठी आहे आणि ते कार्ड घेऊन, दार बंद करून टाकायचे. कधीकधी काही लोकांना आपला संदेश आवडला नाही, तर ते सरळ कार्ड फाडून टाकायचे. या सर्व समस्या असल्या तरी टेस्टमनी कार्डच्या साहाय्यानं इतरांना सुवार्ता सांगणं प्रचारकांना शक्य झालं. आणि ते राज्याचे प्रचारक म्हणूनही ओळखले जाऊ लागले.

८. पोर्टेबल फोनोग्राफचा कसा उपयोग करण्यात यायचा? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

सन १९३० नंतर आणखी एका साधनाचा, म्हणजे पोर्टेबल फोनोग्राफचा वापर करण्यास सुरवात झाली. काही साक्षीदार त्याला ‘अहरोन’ म्हणायचे. कारण ते यंत्र त्यांच्या वतीनं बोलायचं. (निर्गम ४:१४-१६ वाचा.) घरमालकानं ऐकण्याची तयारी दाखवल्यास, प्रचारक बायबलवर आधारित असलेलं एक लहानसं भाषण फोनोग्राफवर ऐकवायचे. त्यानंतर ते काही प्रकाशनं त्यांना द्यायचे. कधीकधी तर संपूर्ण कुटुंबं भाषण ऐकण्यासाठी जमा व्हायचं! १९३४ साली वॉच टॉवर संस्थेनं सहज कुठंही नेता येतील असे फोनोग्राफ बनवायला सुरवात केली. नंतर बांधवांनी त्यात ९२ भाषणं रेकॉर्ड केली.

९. फोनोग्राफमुळे कोणते चांगले परिणाम दिसून आले?

हिलेरी गॉस्लिन यांनी फोनोग्राफवर एक भाषण ऐकलं तेव्हा त्यांना ते खूप आवडलं. त्यांनी बांधवांकडून एक आठवड्यासाठी फोनोग्राफ मागून घेतला. कारण, आपल्या शेजाऱ्यांनीही ते भाषण ऐकावं अशी त्यांची इच्छा होती. याचा परिणाम असा झाला, की अनेकांच्या मनात सत्यासाठी आवड निर्माण झाली आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला. नंतर, बंधू गॉस्लिन यांच्या दोन मुली गिलियड प्रशालेला उपस्थित राहिल्या आणि मिशनरी म्हणून सेवा करू लागल्या. टेस्टमनी कार्डप्रमाणेच पोर्टेबल फोनोग्राफमुळेही अनेक प्रचारकांना सुवार्ता सांगण्यास मदत झाली. पुढे, ईश्वरशासित सेवा प्रशालेद्वारे राजा येशू त्याच्या लोकांना प्रभावी शिक्षक बनण्यासाठी प्रशिक्षण देणार होता.

लोकांपर्यंत पोचण्यासाठी शक्य असलेल्या सर्व मार्गांचा उपयोग करणं

१०, ११. लोकांपर्यंत सुवार्ता पोचवण्यासाठी बातमीपत्रांचा आणि रेडिओचा कशा प्रकारे वापर करण्यात आला, आणि ही माध्यमं प्रभावशाली का ठरली?

१० आपला राजा येशू याच्या मार्गदर्शनाखाली, जास्तीतजास्त लोकांपर्यंत सुवार्ता पोचवण्यासाठी त्याच्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग केला आहे. खासकरून जेव्हा खूप कमी राज्य प्रचारक होते, तेव्हा या पद्धतींचा जास्त फायदा झाला. (मत्तय ९:३७ वाचा.) उदाहरणार्थ, २० व्या शतकाच्या सुरवातीच्या काळात लोकांपर्यंत सुवार्ता पोचवण्यासाठी बातमीपत्रांचा उपयोग करण्यात आला. बंधू रस्सल दर आठवडी एका वृत्त संस्थेला बायबलवर आधारित एक भाषण पाठवायचे. नंतर ही संस्था त्यांचं हे भाषण कॅनडा, युरोप आणि अमेरिका इथल्या बातमीपत्रांना पाठवायची. १९१३ सालापर्यंत बंधू रस्सल यांची भाषणं २,००० बातमीपत्रांत प्रकाशित होऊ लागली. आणि ही बातमीपत्रं जवळजवळ १ कोटी ५० लाख लोकांपर्यंत पोचायची!

११ लोकांपर्यंत सुवार्ता पोचवण्यासाठी रेडिओचाही वापर करण्यात आला. बंधू रदरफर्ड यांनी १६ एप्रिल १९२२ साली रेडिओवर पहिलं भाषण दिलं. हे भाषण जवळजवळ ५०,००० लोकांनी ऐकलं. लवकरच, डब्ल्यू.बी.बी.आर हे आपलं स्वतःचं रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलं. या रेडिओ स्टेशनवरून २४ फेब्रुवारी १९२४ साली पहिला कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात आला. १ डिसेंबर १९२४ च्या वॉच टॉवरमध्ये असं सांगण्यात आलं होतं: “आम्हाला वाटतं की लोकांपर्यंत सुवार्ता पोचवण्यासाठी आजपर्यंत वापरण्यात आलेल्या सर्व माध्यमांपैकी रेडिओ हे सर्वात परिणामकारक आणि परवडणारं माध्यम ठरलं आहे.” बातमीपत्रांप्रमाणेच रेडिओच्या साहाय्यानं अगदी कमी प्रचारक असलेल्या ठिकाणीही सुवार्ता पोचवणं शक्य झालं आहे.

आज अनेक प्रचारकांना सार्वजनिक साक्षकार्य करायला आणि आपल्या jw.org या वेबसाईटबद्दल इतरांना सांगायला खूप आवडतं (परिच्छेद १२, १३ पाहा)

१२. (क) सार्वजनिक साक्षकार्याची कोणती पद्धत तुम्हाला आवडते? (ख) सार्वजनिक साक्षकार्याबद्दल वाटत असणाऱ्या भीतीवर मात करण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल?

१२ लोकांपर्यंत पोचण्यासाठी आज सार्वजनिक साक्षकार्याचाही वापर करण्यात येत आहे. बस स्थानकांवर, रेल्वे स्टेशनवर, पार्किंगच्या ठिकाणी, चौकांत आणि बाजारात भेटणाऱ्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी खूप मेहनत घेतली जात आहे. तुम्हाला सार्वजनिक साक्षकार्याची भीती वाटते का? वाटत असेल तर यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा आणि बंधू मनेरा या प्रवासी पर्यवेक्षकांचं काय म्हणणं आहे त्याकडे लक्ष द्या. ते म्हणतात: “सेवाकार्य करण्याच्या प्रत्येक नवीन पद्धतीला आम्ही यहोवाची सेवा करण्याची, त्याच्याप्रती असलेली एकनिष्ठा दाखवण्याची एक संधीच समजायचो. आमच्या एकनिष्ठेची ही आणखी एक परीक्षा आहे असं आम्ही समजायचो. यहोवा ज्या कोणत्या मार्गानं सेवा करण्याची आमच्याकडून अपेक्षा करत आहे त्या मार्गानं सेवा करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत हे आम्ही दाखवून द्यायचो.” आपण जेव्हा आपल्या भीतीवर मात करून प्रचार करण्याच्या नवीन पद्धतीचा वापर करतो, तेव्हा यहोवावरील आपला विश्वास वाढतो आणि एक चांगला प्रचारक बनण्यास आपल्याला मदत होते.—२ करिंथकर १२:९, १० वाचा.

१३. आपली वेबसाईट एक प्रभावशाली माध्यम का आहे, आणि तुम्हाला यासंबंधी कोणता चांगला अनुभव आला आहे?

१३ अनेक प्रचारकांना jw.org या आपल्या वेबसाईटबद्दल इतरांशी बोलायला खूप आवडतं. या वेबसाईटवर ७०० पेक्षा जास्त भाषांमध्ये बायबलवर आधारित प्रकाशनं वाचता येतात आणि डाऊनलोड करता येतात. दर महिन्यात १६ लाखांपेक्षा जास्त लोक आपल्या वेबसाईटला भेट देतात. पूर्वी रेडिओच्या साहाय्यानं दुर्गम भागांत राहणाऱ्या लोकांपर्यंत सुवार्ता पोचवण्यात आली आणि आज आपल्या वेबसाईटद्वारेही हेच साध्य होत आहे.

सुवार्तेच्या प्रचारकांना प्रशिक्षण देणं

१४. प्रचारकांना प्रशिक्षणाची गरज का होती, आणि त्यांना कशामुळे मदत झाली?

१४ आतापर्यंत आपण ज्या साधनांचा आणि पद्धतींचा वापर केला आहे, त्या सर्व गोष्टी खूप परिणामकारक ठरल्या आहेत. पण तरी, राज्याची सुवार्ता चांगल्या प्रकारे कशी सांगावी यासाठी त्या सुरवातीच्या प्रचारकांना प्रशिक्षण देण्याची गरज पडली. का बरं? कारण, कधीकधी घरमालक फोनोग्राफवर ऐकलेल्या गोष्टीशी सहमत नसायचा. तर, कधीकधी घरमालकाला आणखी शिकून घेण्याची इच्छा असायची. त्यामुळे, अशा परिस्थितीला योग्यपणे कसं हाताळता येईल आणि चांगले शिक्षक कसं बनता येईल हे प्रचारकाला माहीत असण्याची गरज होती. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामुळे बंधू नॉर यांना याची जाणीव झाली की क्षेत्रात चांगल्या प्रकारे बोलता यावं म्हणून प्रचारकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. म्हणून, १९४३ साली मंडळ्यांमध्ये ईश्वरशासित सेवा प्रशाला सुरू करण्यात आल्या. या प्रशालेमुळे चांगले शिक्षक बनण्यास सर्वांना मदत झाली.

१५. (क) ईश्वरशासित सेवा प्रशालेत भाग घेणाऱ्यांचे काय अनुभव आहेत? (ख) स्तोत्र ३२:८ मध्ये दिलेलं अभिवचन यहोवानं कसं पूर्ण केलं आहे?

१५ अनेक बांधवांना श्रोत्यांसमोर भाषण द्यायची सवय नव्हती. बंधू रामू यांना १९४४ साली त्यांनी दिलेलं पहिलं भाषण आजही चांगलं आठवतं. ते भाषण बायबलमधील दवेग नावाच्या व्यक्तीवर आधारित होतं. ते सांगतात: “भीतीनं माझे हात-पाय लटलट कापत होते. आणि माझे दात कडकडत होते. स्टेजवरून भाषण देण्याचा तो माझा पहिलाच अनुभव होता. पण तरी मी हार मानली नाही.” प्रशालेत भाषण देणं सोपं नसलं तरी लहान मुलंही भाषण द्यायचे. एकदा एक लहान मुलगा त्याचं पहिलं भाषण देत होता तेव्हा काय झालं हे आठवून बंधू मनेरा सांगतात. “तो इतका घाबरला होता की आपलं भाषण चालू करताच तो हुंदके देऊ लागला. पण, आपलं भाषण पूर्ण करण्याचा त्याचा निश्चय होता. त्यानं पूर्ण भाषण हुंदके देतदेत पूर्ण केलं.” कदाचित लाजाळू स्वभावामुळे किंवा आपल्याला जमणार नाही असं वाटत असल्यामुळे, तुम्ही सभेत उत्तर देण्यासाठी किंवा प्रशालेत भाग घेण्यासाठी कचरत असाल. असं असेल तर तुमच्या भीतीवर मात करण्यासाठी यहोवाकडे मदत मागा. त्यानं जसं सुरवातीच्या बांधवांना मदत केली तशी तो तुम्हालाही करेल.—स्तोत्र ३२:८ वाचा.

१६. (क) गिलियड प्रशालेचा आधी काय उद्देश होता? (ख) सन २०११ पासून गिलियड प्रशालेच्या उद्देशात कोणता बदल झाला आहे?

१६ देवाच्या संघटनेनं गिलियड प्रशालेद्वारेही इतरांना प्रशिक्षण दिलं आहे. विद्यार्थ्यांच्या सुवार्ता सांगण्याच्या इच्छेला आणखी प्रबळ करणं हा या प्रशालेचा एक उद्देश आहे. गिलियड प्रशालेची सुरवात १९४३ साली झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत ८,५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे आणि त्यांना १७० देशांमध्ये पाठवण्यात आलं आहे. २०११ पासून या गिलियड प्रशालेत फक्त खास पायनियर, प्रवासी पर्यवेक्षक, बेथेलचे सदस्य किंवा ज्यांना गिलियड प्रशालेत उपस्थित राहण्याची संधी मिळाली नाही अशा मिशनरी बंधुभगिनींना बोलावण्यात येतं.

१७. गिलियड प्रशाला परिणामकारक ठरली आहे असं का म्हणता येईल?

१७ गिलियड प्रशाला किती परिणामकारक ठरली आहे? जपानचं उदाहरण घ्या. ऑगस्ट १९४९ साली तिथं दहा पेक्षाही कमी प्रचारक होते. पण, त्याच वर्षाच्या शेवटी तिथं १३ मिशनरी पाठवण्यात आले आणि त्यांनी तिथल्या स्थानिक प्रचारकांसोबत प्रचारकार्य केलं. याचा परिणाम असा झाली की आज तिथं २,१६,००० प्रचारक आहेत आणि त्यांपैकी जवळजवळ निम्मे प्रचारक पायनियर म्हणून सेवा करतात!

१८. आपल्यासाठी आणखी कोणत्या प्रशाला तयार करण्यात आल्या आहेत?

१८ आपल्यासाठी अजूनही अनेक प्रशाला तयार करण्यात आल्या आहेत. जसं की, राज्य सेवा प्रशाला, पायनियर सेवा प्रशाला, सुवार्तिकांसाठी प्रशाला, प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नींसाठी प्रशाला, शाखा समिती सदस्यांसाठी आणि त्यांच्या पत्नींसाठी प्रशाला. या प्रशालांमुळे बांधवांना आणि बहिणींना चांगलं प्रशिक्षण मिळालं आहे आणि त्यांचा विश्वास आणखी मजबूत होण्यास मदत झाली आहे. यावरून हेच स्पष्ट होतं की येशू आजही अनेक लोकांना प्रशिक्षण देत आहे.

१९. बंधू रस्सल यांना प्रचारकार्याविषयी काय वाटत होतं, आणि आज ते कशा प्रकारे खरं ठरलं आहे?

१९ देवाचं राज्य १०० पेक्षा जास्त वर्षांपासून राज्य करत आहे. तेव्हापासून आपला राजा येशू प्रचारकार्याचं मार्गदर्शन करत आहे. सुवार्ता घोषित करण्याचं काम संपूर्ण जगभरात केलं जाईल, याची १९१६ साली बंधू रस्सल यांना जाणीव झाली. ते म्हणाले होते: “हे कार्य अगदी जलद गतीनं वाढत आहे आणि वाढतच राहील. कारण, ‘राज्याची सुवार्ता’ संपूर्ण जगभरात घोषित करण्याचं काम बाकी आहे.” (फेथ ऑन द मार्च, ए. एच. मॅकमिलन, पृष्ठ ६९) आज आपल्या काळात हे काम पूर्ण होताना आपण पाहत आहोत. आपला शांतीचा देव यहोवा आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देत आहे यासाठी आपण त्याचे किती आभार मानले पाहिजे!

^ परि. 2 या लोकांपैकी बरेच लोक नंतर ख्रिस्ती बनले असावेत. आपण असं का म्हणू शकतो? कारण प्रेषित पौलानं ‘५०० बंधू’ असं म्हणून त्यांचा उल्लेख केला. त्यानं असंही म्हटलं: “त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत.” यावरून असं दिसतं की ज्यांनी येशूची ही आज्ञा प्रत्यक्ष ऐकली, त्यांपैकी बहुतेकांना पौल आणि इतर ख्रिस्ती ओळखत होते.