जीवन कथा
देवासोबत आणि आईसोबत शांतीचं नातं
“आपल्या पूर्वजांची उपासना करायला तुला काय अडचण आहे? अगं त्यांच्यामुळेच तर तू आज या जगात आहेस. त्यांची काहीच किंमत नाही का तुला? पिढ्या न् पिढ्या चालत आलेल्या आपल्या या संस्कृतीला तू अशी कशी सोडू शकतेस? तुला म्हणायचं काय आहे, आम्ही काय मूर्ख आहोत त्यांची उपासना करायला?” हे सगळं बोलल्यानंतर आईला रडू कोसळलं.
याच्या काही महिन्यांआधी, यहोवाच्या साक्षीदारांनी माझ्या आईला बायबल अभ्यास करण्यासाठी विचारलं होतं. तिला काही अभ्यास करण्याची इच्छा नव्हती. म्हणून एकदम नकार देण्यापेक्षा तिनं साक्षीदारांना माझ्यासोबत अभ्यास करायला सांगितलं. आणि आत्ता मात्र त्याच गोष्टीमुळे ती माझ्यावर रुसली होती. तिचं हे वागणं मला पटण्यासारखं नव्हतं. मी कधीच तिला कोणत्या गोष्टीसाठी आजपर्यंत नाही म्हटलं नव्हतं. पण आता मला यहोवाला खूश करायचं होतं आणि त्यामुळे तिच्या इच्छेप्रमाणे वागणं मला शक्य नव्हतं. ही गोष्ट माझ्यासाठी सोपी नव्हती, पण त्यासाठी लागणारी शक्ती मला यहोवानं दिली.
यहोवाची ओळख
जपानमधल्या इतर लोकांप्रमाणेच आम्हीही बौद्ध होतो. पण दोन महिन्यांपासून यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करताना मला याची खात्री पटली की बायबलच खरं आहे. आपला एक स्वर्गीय पितादेखील आहे हे समजल्यावर, त्याच्याविषयी आणखी जाणून घ्यायची माझी इच्छा होती. मी जे काही शिकत होते त्याबद्दल बोलायला सुरवातीला आम्हा दोघींना खूप आवडायचं. लवकरच मी रविवारच्या सभांनाही जाऊ लागले. बायबलविषयी आणखी स्पष्ट समजल्यावर, इथून पुढं मी कोणत्याही बौद्ध रितीरिवाजांमध्ये भाग घेणार नाही असं मी आईला सांगितलं आणि त्याबरोबर आईचं वागणंच बदललं. ती म्हणाली, “कुटुंबातलं एक जण पूर्वजांची उपासना करत नाही, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे.” आणि म्हणून बायबल अभ्यास आणि सभेला जाणं बंद कर, असं तिनं मला बजावून सांगितलं. आई असं काहीतरी म्हणेल असं मला कधीच वाटलं नव्हतं! तिचं वागणं पार बदललं होतं.
माझ्या बाबांनीही आईला साथ दिली. मी आईबाबांच्या आज्ञेत राहावं अशी यहोवा माझ्याकडून अपेक्षा करतो, हे मी इफिसकरांस पत्राच्या ६ व्या अध्यायात शिकले होते. मला माझ्या कुटुंबात चाललेला हा गोंधळ शांत करायचा होता. म्हणून विचार केला, की आता जर मी त्यांचं ऐकलं तर कदाचित ते पुढे माझंही ऐकायला तयार होतील. शिवाय मला शाळेच्या परीक्षेसाठीही तयारी करायची होती. मग विचार केला, की तीन महिन्यांसाठी ते म्हणतात तसं करायला काय हरकत आहे. पण मी यहोवाला असं वचनही दिलं, की त्यानंतर मात्र मी पुन्हा सभेला जायला सुरू करेन.
पण माझा हा निर्णय दोन गोष्टींमुळे चुकीचा ठरला. एक तर मला असं वाटलं होतं, की या तीन महिन्यांनंतरही यहोवाची सेवा करण्याची माझी इच्छा तशीच कायम राहील. पण अगदी कमी वेळातच यहोवासोबतचं माझं नातं कमजोर झाल्याचं मला जाणवलं. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आईबाबांनी, मी यहोवाची
उपासना सोडून द्यावी म्हणून आणखी जास्त प्रमाणात प्रयत्न करायला सुरवात केली.मदत आणि विरोध
इकडे राज्य सभागृहात, माझी अशा कित्येक साक्षीदारांशी ओळख झाली ज्यांना त्यांच्या कुटुंबातून विरोध सहन करावा लागत होता. यहोवा मलादेखील शक्ती देईल असा दिलासा त्यांनी मला दिला. (मत्त. १०:३४-३७) त्यांनी मला समजावून सांगितलं की जर मी अशा परिस्थितीत यहोवाला विश्वासू राहिले, तर पुढे माझ्या कुटुंबालाही यहोवाबद्दल शिकून घ्यायची संधी मिळेल. मी यहोवाला कळकळीची प्रार्थना करू लागले, कारण याबाबतीत मला यहोवावर विसंबून राहायचं होतं.
माझ्या कुटुंबानं मला वेगवेगळ्या मार्गानं विरोध करण्यास सुरवात केली. बायबल अभ्यास बंद करावा म्हणून आई मला अक्षरशः विनंती करू लागली आणि तेच योग्य आहे हे पटवण्याचा प्रयत्न करू लागली. बऱ्याच वेळा मी शांत राहायचं निवडलं. पण जेव्हा मी बोलायचे तेव्हा आमच्यात खूप वादविवाद व्हायचा, कारण आम्ही दोघी आपलं म्हणणंच खरं आहे हे दाखवायचा प्रयत्न करायचो. आता मला समजतंय की त्या वेळी मी जर आईच्या भावना आणि तिचा विश्वास लक्षात घेऊन तिच्या सोबत थोडं आदरानं वागले असते तर परिस्थिती इतकी बिघडली नसती. मला घराबाहेर जाता येऊ नये म्हणून माझ्या पालकांनी मुद्दाम माझी घरची कामंदेखील वाढवली होती. कधीकधी तर ते मला घरातच घ्यायचे नाहीत किंवा मग मला खाण्यासाठी काही जेवणही ठेवायचे नाहीत.
माझं मन वळवण्यासाठी आईनं इतरांचीही मदत घ्यायला सुरवात केली. तिनं माझ्या शिक्षकाला गाठलं. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सर्वच धर्म खरंतर काही कामाचे नाहीत हे मला पटवून सांगण्यासाठी तिनं मला तिच्या मॅनेजरकडेही नेलं. या साऱ्या प्रयत्नात आईला मदत मिळावी म्हणून ती नातेवाइकांना माझ्याविषयी फोनवर रडून सांगू लागली. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटायचं. पण सभांना गेल्यावर, तिथल्या वडिलांनी मला समजावून सांगितलं की जेव्हा माझी आई असं इतरांना माझ्याबद्दल सांगते, तेव्हा एका अर्थानं ती त्यांना साक्ष द्यायचंच काम करत असते.
मला चांगली नोकरी मिळावी म्हणून मी युनिव्हर्सिटीत उच्च शिक्षण घ्यावं अशी माझ्या पालकांची इच्छा होती. पण अशा वातावरणात एकमेकांशी शांतपणे या विषयावर बोलणं शक्य नव्हतं. यावर उपाय म्हणून, मी त्यांना बरीच पत्रं लिहिली आणि माझी ध्येयं काय आहेत हे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण याचा माझ्या बाबांना खूप राग आला. ते म्हणाले: “जर तुला नोकरी मिळेल असं वाटतंय तर उद्यापर्यंत ताबडतोब नोकरी शोध, नाहीतर तू घर सोडलेलंच बरं.” आता काय करायचं ते मला कळत नव्हतं. मी मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली. याच्या दुसऱ्या दिवशीच, साक्षकार्यात असताना माझ्यासोबत असणाऱ्या दोन बहिणींनी मला त्यांच्या मुलींना शिकवण्यासाठी विचारलं. पण, बाबांना ते आवडलं नाही त्यामुळे त्यांनी माझ्याशी बोलायचं बंद केलं आणि माझ्याकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं. आईनं तर मला एकदा चक्क असं म्हटलं की मी यहोवाची साक्षीदार बनण्याऐवजी एक गुन्हेगार जरी बनले असते तरी चाललं असतं.
माझी विचारसरणी सुधारण्यासाठी आणि काय करायचं ते ठरवण्यासाठी यहोवानं मला मदत केली
मी माझ्या पालकांचा इतका प्रतिकार करावा अशी खरंच यहोवाची इच्छा होती का, याबद्दल कधीकधी मला आश्चर्य वाटायचं. म्हणून मी यहोवाला प्रार्थना करायचे आणि बायबलमध्ये त्याच्या प्रेमळपणाबद्दल जे काही लिहिलं आहे, त्यावर मनन करायचे. यामुळे मला आणखी सकारात्मक राहण्यास आणि माझ्याबद्दल असणाऱ्या काळजीमुळेच माझे पालक माझा विरोध करत आहेत, हे समजून घेण्यास मदत झाली. माझी विचारसरणी सुधारण्यासाठी आणि काय करायचं ते ठरवण्यासाठी यहोवानं मला मदत केली. शिवाय साक्षकार्यात मी जितका सहभाग घ्यायचे, तितका जास्त मला त्यात आनंद मिळत होता. आणि तेव्हाच कुठंतरी पायनियर बनण्याची इच्छा माझ्या मनात रुजली.
पायनियर म्हणून सेवा
मला पायनियर बनण्याची इच्छा आहे, हे जेव्हा मंडळीतल्या काही बहिणींना कळलं, तेव्हा माझे आईबाबा शांत होईपर्यंत थांबून राहण्याचा सल्ला त्यांनी मला दिला. याबद्दल योग्य निर्णय घेता यावा म्हणून मी बुद्धीसाठी यहोवाकडे प्रार्थना केली, थोडं संशोधन केलं आणि मला पायनियर का बनायचं आहे यावर बराच विचार केला. शिवाय काही अनुभवी बंधुभगिनींशी मी यावर चर्चादेखील केली. आणि मग यहोवाला खूश करण्याचा निर्णय मी घेतला. पायनियर म्हणून सेवा करण्यासाठी मी आणखी थोडा काळ जरी थांबून राहिले तरी माझे आईबाबा माझा विरोधच करत राहतील, आणि त्यामुळे थांबण्यात काहीच अर्थ नाही, हे मला समजलं होतं.
माझ्या शिक्षणाच्या शेवटल्या वर्षी मी पायनियर म्हणून काम करण्यास सुरवात केली. काही काळ पायनियर म्हणून सेवा केल्यानंतर, गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करावी असं मला वाटू लागलं. पण मी घर सोडून जाऊ नये असं आईबाबांना वाटायचं. त्यामुळे माझं वय २० होईपर्यंत मी थांबून राहायचं ठरवलं. त्यानंतर मी शाखा कार्यालयाला, जपानच्या दक्षिण भागात, जिथं आमचे नातेवाईक आहेत, अशा ठिकाणी माझी नेमणूक करण्याविषयी विचारलं. म्हणजे माझ्या आईबाबांना चिंता करण्याचं काही कारण उरणार नाही.
तिथं असताना, माझे कित्येक बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा घेताना मी पाहू शकले, याचा मला खूप आनंद होतो. सेवाकार्यात आणखी जास्त करता यावं म्हणून मी इंग्रजी शिकण्यास सुरवात केली. त्यानंतर माझ्या मंडळीतील दोन खास पायनियरांचा आवेश बघून आणि इतरांना ते ज्या प्रकारे मदत करायचे ते पाहून मलाही खास पायनियर बनावंसं वाटू लागलं. याच काळादरम्यान आई दोन वेळा अतिशय गंभीर रीत्या आजारी पडली. पण या दोन्ही वेळेला मी तिच्या मदतीसाठी घरी गेले. यामुळे तिला खूप आश्चर्य वाटलं आणि ती माझ्याशी थोडं चांगलं वागू लागली.
आशीर्वादांचा वर्षाव
मी ज्या खास पायनियरांबद्दल बोलले होते, त्यांपैकी एकानं म्हणजे आत्सुशी यानं सात वर्षांनंतर मला एक पत्र पाठवलं. त्याला माझ्याशी लग्न करण्याची इच्छा होती आणि मला त्याच्याबद्दल काय वाटतंय हे त्याला जाणून घ्यायचं होतं. आत्सुशीबद्दल मी कधीच तसा विचार केला नव्हता आणि माझ्याबद्दलही त्याच्या मनात अशा काही भावना असतील असं मला वाटलं नव्हतं. याच्या एक महिन्यानंतर, त्याला आणखी जाणून घेण्याची माझी इच्छा असल्याचं मी त्याला कळवलं. आम्हाला पूर्णवेळच्या सेवेतच कायम राहायचं होतं आणि कोणत्याही प्रकारची नेमणूक स्वीकारायला आम्ही तयार होतो. आम्हा दोघांची ध्येयं सारखीच असल्याचं आम्हाला जाणवलं. साहजिकच आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाला माझे आईबाबा आणि इतर नातेवाईकही आले होते याचं मला खूप समाधान वाटतं.
आम्ही पायनियर म्हणून काम करत असतानाच, आत्सुशी
यांना पर्यायी विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. नंतर आम्हाला खास पायनियर म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि मग विभागीय कार्याची जबाबदारी आमच्यावर सोपवण्यात आली. आमच्या विभागातील सर्व मंडळ्यांना पहिल्यांदाच भेट दिल्यानंतर शाखा कार्यालयातून आम्हाला फोन आला. त्यांनी आम्हाला नेपाळमध्ये जाऊन हेच कार्य करण्याविषयी विचारलं.इतक्या दूर जाऊन राहण्याविषयी माझे आईबाबा काय म्हणतील याविषयी मला चिंता लागून होती. मी जेव्हा त्यांना फोन केला, तेव्हा बाबा म्हणाले, “अरे वा! तू एका चांगल्या ठिकाणी चालली आहेस!” याच्या एक आठवड्याआधी, त्यांच्या एका मित्रानं त्यांना नेपाळची माहिती देणारं एक पुस्तक दिलं होतं. आणि त्या ठिकाणी एकदा जाऊन यावं असा त्यांचाही विचार चालला होता.
नेपाळचे लोक खूप मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. त्यामुळे तिथं आम्ही अगदी खूश होतो. यानंतर, आमच्या विभागात बांग्लादेशाचाही समावेश करण्यात आला. नेपाळपासून हा देश जवळ असला तरी नेपाळपेक्षा तो खूपच वेगळा होता. सेवाकार्यात आम्हाला खूप वेगवेगळी माणसं भेटायची. पाच वर्षांनंतर आम्हाला पुन्हा जपानमध्ये बोलवण्यात आलं. सध्या इथंच आम्ही विभागीय कार्याचा आनंद घेत आहोत.
जपान, नेपाळ आणि बांग्लादेशात काम करत असताना मला यहोवाविषयी बरंच काही शिकायला मिळालं. इथल्या लोकांची संस्कृती, त्यांच्या सवयी आणि त्यांचे रितीरिवाज एकमेकांपासून फारच वेगळे आहेत. शिवाय प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्वही वेगवेगळं. पण तरीदेखील यहोवा त्यांच्यातील प्रत्येकाची कशी काळजी घेतो, त्यांना कसं स्वीकारतो आणि त्यांना मदत करून आशीर्वादित कसं करतो हे मला पाहता आलं.
यहोवाचे आभार मानण्यासाठी आज माझ्याजवळ पुष्कळ कारणं आहेत. त्याची ओळख करून घेण्याची आणि त्याची सेवा करण्याची संधी त्यानं मला दिली. यासोबतच त्यानं मला एक चांगला ख्रिस्ती पतीदेखील दिला. यहोवानं मला योग्य निर्णय घेण्यासाठी आणि त्याच्यासोबत व माझ्या कुटुंबासोबत चांगलं नातं विकसित करण्यासाठी मदत केली आहे. माझी आणि माझ्या आईची पुन्हा चांगली मैत्री झाली आहे. याबद्दल मी यहोवाचे खरंच खूप आभार मानते. देवाशी आणि आईशी असणाऱ्या माझ्या शांतीपूर्ण नात्याबद्दल मी खूप आनंदी आहे.