व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनाचं सोपं आणि समजेल असं भाषांतर

देवाच्या वचनाचं सोपं आणि समजेल असं भाषांतर

“देवाचे वचन सजीव . . . आहे.”—इब्री ४:१२.

गीत क्रमांक: ३७, ४३

१. (क) देवानं आदामाला कोणतं काम दिलं होतं? (ख) देवाच्या लोकांनी भाषेच्या देणगीचा वापर कशा प्रकारे केला आहे?

भाषा ही यहोवानं मानवांना दिलेली एक देणगीच आहे. एदेन बागेत देवानं आदामाला प्राण्यांना नाव देण्याचं काम दिलं. आदामानं प्राण्यांना अर्थभरीत नावं दिली. (उत्प. २:१९, २०) तेव्हापासून, देवाच्या लोकांनी भाषेच्या देणगीचा वापर यहोवाची स्तुती करण्यासाठी आणि इतरांना त्याच्याबद्दल सांगण्यासाठी केला. तसंच, जास्तीतजास्त लोकांना यहोवाबद्दल शिकता यावं म्हणून अलीकडच्या काळात भाषेच्या देणगीचा वापर करून बायबलचं वेगवेगळ्या भाषेत भाषांतर करण्यात आलं आहे.

२. (क) न्यू वर्ल्ड बायबल ट्रान्सलेशन कमिटीचे सदस्य भाषांतरासाठी कोणत्या तत्त्वांचं पालन करतात? (ख) या लेखात आपण कशाबद्दल चर्चा करणार आहोत?

आज बायबलची हजारो भाषांतरं उपलब्ध आहेत. यातील काही, इतर भाषांतरांच्या तुलनेत जास्त अचूक आहेत. बायबलचं अचूकपणे भाषांतर करण्यासाठी न्यू वर्ल्ड बायबल ट्रान्सलेशन कमिटी तीन मुख्य तत्त्वांचं पालन करते. ही तत्त्वं म्हणजे: (१) मूळ लिखाणात ज्या ज्या ठिकाणी देवाचं नाव आढळतं त्या त्या ठिकाणी त्याचा वापर करण्याद्वारे देवाच्या नावाचा आदर करणं. (मत्तय ६:९ वाचा.) (२) शक्य असेल त्या ठिकाणी शब्दशः भाषांतर करणं, पण जेव्हा शक्य नसेल तेव्हा त्याच्या अर्थाचं भाषांतर करणं. (३) वाचायला आणि समजायला सोपी असेल अशा भाषेचा वापर करणं. * (नहेम्या ८:८, १२ वाचा.) न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनचं १३० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतर करतानाही भाषांतरकारांनी या तीन तत्त्वांचं पालन केलं आहे. तेव्हा, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या २०१३ मधील सुधारित आवृत्तीत या तत्त्वांचा कशा प्रकारे वापर करण्यात आला आहे आणि इतर भाषेतही या बायबलचं भाषांतर करताना ही तत्त्वं कशा प्रकारे लागू केली जातात ते या लेखात आपण पाहू या.

देवाच्या नावाचा आदर करणारं बायबल भाषांतर

३, ४. (क) कोणकोणत्या हस्तलिखितांत टेट्राग्रॅमेटॉन पाहायला मिळतं? (ख) अनेक बायबल भाषांतरांमध्ये देवाचं नाव का सापडत नाही?

देवाचं नाव चार इब्री अक्षरांचा वापर करून लिहिण्यात आलं आहे. याला टेट्राग्रॅमेटॉन असं म्हटलं जातं. मृत समुद्राजवळ सापडलेल्या गुंडाळ्यांसारख्या अनेक जुन्या इब्री हस्तलिखितांत हे नाव पाहायला मिळतं. शिवाय, ग्रीक सेप्टुअजिंटच्या काही प्रतींमध्येही ते आपल्याला पाहायला मिळतं. या प्रती ख्रिस्त येण्याच्या जवळजवळ २०० वर्षांआधीपासून ते ख्रिस्ताच्या १०० वर्षांनंतरच्या काळादरम्यान तयार करण्यात आल्या होत्या. या जुन्या हस्तलिखितांमध्ये देवाचं नाव इतक्या जास्त वेळा आढळतं हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं.

यावरून स्पष्ट होतं की देवाचं नाव बायबलमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. पण तरी, अशी बरीच भाषांतरं आहेत ज्यांत देवाच्या नावाचा वापर करण्यात आलेला नाही. उदाहरणार्थ, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द ख्रिश्चन ग्रीक स्क्रिप्चर्स प्रकाशित करण्यात आलं त्याच्या दोन वर्षांनंतर अमेरिकन स्टँडर्ड व्हर्शनची सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. अमेरिकन स्टँडर्ड व्हर्शनच्या १९०१ च्या आवृत्तीत देवाचं नाव वापरण्यात आलं होतं. पण १९५२ च्या सुधारित आवृत्तीत ते काढून टाकण्यात आलं. असं का करण्यात आलं होतं? त्याच्या भाषांतरकारांची अशी समज होती की देवाच्या नावाचा वापर करणं “पूर्णपणे चुकीचं” आहे. इतर अनेक इंग्रजी आणि वेगवेगळ्या भाषेतील भाषांतरांतदेखील हेच करण्यात आलं आहे.

५. बायबलमध्ये देवाच्या नावाचा वापर करणं का महत्त्वाचं आहे?

देवाच्या नावाचा वापर करणं खरंच एक गंभीर विषय आहे का? हो नक्कीच आहे. बायबलचा लेखक यहोवा आहे आणि लोकांना त्याचं नाव कळावं अशी त्याची इच्छा आहे. एक चांगला भाषांतरकार लेखकाची इच्छा काय आहे ते ओळखतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. बायबलमध्ये अशी बरीच वचनं दिली आहेत ज्यांत देवाचं नाव किती महत्त्वाचं आहे आणि आपण त्याचा आदर का केला पाहिजे ते सांगितलं आहे. (निर्ग. ३:१५; स्तो. ८३:१८; १४८:१३; यश. ४२:८; ४३:१०; योहा. १७:६, २६; प्रे. कृत्ये १५:१४) तसंच, देवानं जुन्या हस्तलिखितांत आपल्या नावाचा हजारो वेळा वापर करण्याची बायबल लेखकांना प्रेरणा दिली. (यहेज्केल ३८:२३ वाचा.) तर मग जेव्हा एखादा भाषांतरकार देवाच्या नावाचा वापर टाळतो, तेव्हा तो यहोवाचा अनादर करत असतो.

६. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या सुधारित आवृत्तीत देवाचं नाव आणखी सहा वेळा का वापरण्यात आलं आहे?

देवाच्या नावाचा वापर करण्यासाठी आधार देणारे पुष्कळ पुरावे आज आपल्या काळात आहेत. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या २०१३ मधील सुधारित आवृत्तीत देवाचं नाव ७,२१६ वेळा वापरण्यात आलं आहे. मागच्या आवृत्तीच्या तुलनेत ही संख्या आणखी सहानं वाढली आहे. कारण अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या मृत समुद्राजवळील गुंडळ्यांमध्ये आणखी पाच ठिकाणी हे नाव असल्याचं दिसून आलं आहे. * हे नाव १ शमुवेल २:२५; ६:३; १०:२६; २३:१४, १६ या वचनांत सापडतं. तसंच, बायबलच्या जुन्या भरवशालायक हस्तलिखितांच्या आणखी अभ्यासामुळे शास्ते १९:१८ या वचनातही देवाचं नाव वापरण्यात आलं आहे.

७, ८. यहोवा या नावाचा काय अर्थ होतो?

देवाच्या नावाचा अर्थ चांगल्या प्रकारे समजून घेणं हे किती महत्त्वाचं आहे, हे खरे ख्रिश्चन ओळखतात. यहोवा या नावाचा अर्थ “तो व्हायला लावतो” असा होतो. * आपल्या प्रकाशनांत निर्गम ३:१४ (NW) या वचनाचा आधार घेऊन देवाच्या नावाचा अर्थ सांगण्यात आला होता. या वचनात म्हटलं आहे “मला जे व्हायचं आहे ते मी होईन.” १९८४ च्या सुधारित आवृत्तीत असं स्पष्ट करण्यात आलं होतं की यहोवा आपली अभिवचनं पूर्ण करण्यासाठी जे बनण्याची गरज पडते ते तो स्वतः बनतो. * पण, २०१३ च्या सुधारित आवृत्तीत असं स्पष्ट करण्यात आलं की “यहोवाच्या नावाचा अर्थ आधी सांगतिल्याप्रमाणे असला तरी, तो तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. त्याच्या नावाचा असाही अर्थ होतो, की तो त्याच्या सेवकांना त्याचे उद्देश पूर्ण करण्यासाठी जे काही व्हावं लागतं ते व्हायला लावतो.”

यहोवा त्याच्या निर्मितीलाही त्याच्या इच्छेनुसार व्हायला लावतो याची बरीच उदाहरणं देता येतील. जसं की, त्यानं नोहाला तारू बांधण्याच्या कामासाठी सक्षम केलं. बसालेलला एक उत्तम कारागीर बनवलं तर गिदोनाला एक शूर योद्धा बनवलं. तसंच, पौलाला एक मिशनरी बनण्यास लावलं. या सर्व गोष्टींवरून देवाच्या नावाचा अर्थ त्याच्या लोकांकरता किती महत्त्वाचा आहे ते समजतं. म्हणूनच न्यू वर्ल्ड बायबल ट्रान्सलेशन कमिटीनं देवाच्या नावाचा आपल्या भाषांतरात वापर केला आहे.

९. कोणत्या कारणामुळे न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनचं इतर भाषांमध्ये भाषांतर करण्यात येत आहे?

बायबलची अशी कितीतरी भाषांतरं आहेत, ज्यांत देवाच्या व्यक्तिगत नावाचा वापर केलेला नाही. याउलट त्या ठिकाणी “प्रभू” यासारख्या पदव्यांचा किंवा स्थानिक देवतांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. आणि या एका मुख्य कारणामुळेसुद्धा नियमन मंडळाला असं वाटतं, की सर्व भाषेतील लोकांजवळ एक असं बायबल असलं पाहिजे ज्यात देवाच्या व्यक्तिगत नावाचा वापर करण्यात आला आहे. (मलाखी ३:१६ वाचा.) आतापर्यंत, १३० पेक्षा जास्त भाषांमध्ये न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनची आवृत्ती तयार करण्यात आली आहे आणि त्यात देवाच्या नावाचा वापर करण्यात आला आहे.

एक सुस्पष्ट आणि अचूक भाषांतर

१०, ११. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनचं इतर भाषांमध्ये भाषांतर करताना कोणत्या अडचणी आल्या?

१० इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनचं इतर भाषांमध्ये भाषांतर करताना काही अडचणी आल्या. उदाहरणार्थ, या इंग्रजी आवृत्तीत उपदेशक ९:१० या वचनात आणि इतर ठिकाणी “शिओल” या इब्री शब्दाचा वापर करण्यात आला आहे. इतर इंग्रजी बायबलमध्येही हाच शब्द वापरण्यात आल्यामुळे तो लोकांच्या चांगल्या परिचयाचा होता. पण, इतर अनेक भाषांमध्ये हा शब्द वापरणं शक्य नव्हतं. कारण, हा इब्री शब्द त्या भाषेतील वाचकांच्या परिचयाचा नव्हता. त्यांच्या शब्दकोशांतही तो नव्हता आणि काहींना तर असंही वाटलं की हा शब्द एखाद्या ठिकाणाचं नाव असावं. या कारणांमुळे, भाषांतरकारांना “शिओल” या इब्री शब्दासाठी आणि “हेडीस” या ग्रीक शब्दासाठी “कबर” हा शब्द वापरण्याची अनुमती देण्यात आली. हे या मूळ शब्दाचं अचूक भाषांतर असून ते वचनाला आणखी स्पष्ट करणारं होतं.

११ “जीव” किंवा “प्राण” यांसाठी काही भाषांमध्ये वापरण्यात येणारे शब्द सहसा मृत्यूनंतर शरीराला सोडून जाणाऱ्या आत्म्याच्या संदर्भात वापरले जातात. त्यामुळे “जीव” किंवा “प्राण” यासाठी असणाऱ्या मूळ इब्री आणि ग्रीक शब्दांचं या भाषांमध्ये भाषांतर करणं अवघड होतं. त्यामुळे गैरसमज टाळण्यासाठी, भाषांतर करताना संदर्भ लक्षात घेऊन योग्य ते शब्द निवडण्याची अनुमती भाषांतरकारांना देण्यात आली. शिवाय, या शब्दाचे वेगवेगळे अर्थ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स—विथ रेफरन्सेस या बायबल आवृत्तीच्या परिशिष्टात आधीच देण्यात आले होते. तसंच, बायबल वाचायला आणि समजून घ्यायला सोपं जावं म्हणून अशा इब्री व ग्रीक शब्दांविषयची जास्त माहिती सुधारित आवृत्तीच्या तळटिपेत देण्यात आली आहे.

१२. इंग्रजीतील सुधारित आवृत्तीत कोणते काही बदल करण्यात आले? (या अंकातील “न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनची २०१३ सालची सुधारित आवृत्ती” हा लेखदेखील पाहा.)

१२ भाषांतरकारांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे इतर बायबल वचनांच्या बाबतीतही कसा गैरसमज होऊ शकतो हे समजण्यास मदत झाली. त्यामुळे सप्टेंबर २००७ मध्ये नियमन मंडळानं इंग्रजी बायबलमध्ये काही सुधारणा करण्याची अनुमती दिली. ही सुधारित आवृत्ती तयार करताना भाषांतरकारांनी विचारलेल्या हजारो प्रश्नांचं कमिटीनं परीक्षण केलं. जुन्या शैलीतल्या काही वाक्यांमध्ये सध्याच्या भाषेनुसार काही बदल करण्यात आले. यामुळे भाषांतर वाचायला आणि समजायला सोपं तर झालंच पण, त्याची अचूकताही तशीच टिकून राहिली. शिवाय, इतर भाषांमध्येही अलिकडेच केलेल्या भाषांतरांमुळे, सुधारित आवृत्ती तयार करताना मदत झाली.—नीति. २७:१७.

अनेकांनी मनापासून कदर व्यक्त केली

१३. २०१३ च्या आवृत्तीबद्दल अनेकांना कसं वाटतं?

१३ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या सुधारित आवृत्तीबद्दल अनेकांची प्रतिक्रिया काय होती? न्यूयॉर्क इथल्या ब्रुकलिनमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयात बंधुभगिनींनी हजारो पत्र पाठवून आपली कदर व्यक्त केली आहे. अनेकांना एका बहिणीनं जे म्हटलं, त्यासारखंच वाटतं. ती म्हणते: “बायबल जणू मौल्यवान रत्नांनी भरलेल्या एका पेटीसारखं आहे. या सुधारित आवृत्तीतून जेव्हा मी यहोवाचं वचन वाचते, तेव्हा जणू या रत्नांच्या पैलूंचं, त्यांच्या निखळ स्वरूपाचं, त्यांच्या रंगाचं आणि त्यांच्या सुंदरतेचं मी जणू परीक्षणच करत आहे असं मला वाटतं. यातील भाषा अगदी सोपी असल्यामुळे मला यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखण्यास मदत झाली आहे. तो मला जवळ घेऊन आपलं सांत्वनदायक वचन ऐकवणाऱ्या प्रेमळ पित्यासारखा वाटतो.”

१४, १५. दुसऱ्या भाषेत असलेल्या न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनबद्दल अनेकांना कसं वाटतं?

१४ इतर भाषा बोलणाऱ्या लोकांनीही त्यांच्या भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनबद्दल आभार मानले आहेत. बल्गेरियामधील सोफिया इथं राहणाऱ्या एका वयोवृद्ध व्यक्तीनं त्यांच्या भाषेतील आवृत्तीबद्दल असं म्हटलं: “मी कित्येक वर्षांपासून बायबल वाचत आलो आहे, पण अंतःकरणाला भिडणारं आणि समजण्यास इतकं सोपं असणारं भाषांतर मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं.” यासोबतच अल्बेनियातील एका बहिणीनंसुद्धा असं म्हटलं: “अल्बेनियन भाषेत देवाची वचनं ऐकायला किती सुंदर वाटतात! स्वतःच्या भाषेत यहोवाला बोलताना ऐकणं खरंच एक विशेषाधिकार आहे!”

१५ अनेक देशांमध्ये बायबलची प्रत मिळवणं खूप कठीण आहे आणि ते विकत घेणंही परवडण्यासारखं नाही. त्यामुळे अशा ठिकाणी स्वतःजवळ बायबल असणं हा एक आशीर्वादच आहे! रवांडा इथल्या एका अहवालात असं सांगण्यात आलं: “गेल्या कित्येक वर्षांपासून बांधव बऱ्याच लोकांसोबत बायबल अभ्यास करत होते. पण, त्यांना प्रगती करता आली नाही कारण त्यांच्याजवळ स्वतःचं बायबल नव्हतं. शिवाय, तिथल्या स्थानिक चर्चमध्ये दिलं जाणारं बायबल विकत घेणं त्यांना परवडणारं नव्हतं. तसंच, काही विशिष्ट वचनं स्पष्टपणे समजत नसल्यामुळेही त्यांची प्रगती खुंटली होती.” पण, तिथल्या स्थानिक भाषेत न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन उपलब्ध झालं तेव्हा ही परिस्थिती बदलली. चार तरुण मुलं असलेल्या रवांडातील एका कुटुंबानं असं म्हटलं: “या बायबलसाठी आम्ही यहोवासोबतच विश्वासू आणि बुद्धिमान दासाचेही खूप आभार मानतो. आम्ही खूप गरीब आहोत आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी बायबल विकत घेणं आम्हाला शक्य नाही. पण आता आमच्या सर्वांकडे स्वतःचं बायबल आहे! आणि यहोवाप्रती आपली कदर व्यक्त करण्यासाठी आम्ही संपूर्ण कुटुंब मिळून दररोज बायबलचं वाचन करतो.”

१६, १७. (क) यहोवाची आपल्या लोकांसाठी काय इच्छा आहे? (ख) आपण काय निर्धार केला पाहिजे?

१६ लवकरच न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनची सुधारित आवृत्ती इतर अनेक भाषांमध्येही तयार करण्यात येणार आहे. सैतान हे काम थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. पण यहोवाची अशी इच्छा आहे की लोकांना त्याचं वचन स्पष्ट आणि समजेल अशा भाषेत ऐकायला मिळावं. (यशया ३०:२१ वाचा.) शिवाय लवकरच एक अशी वेळ येईल जेव्हा, “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.”—यश. ११:९.

१७ तेव्हा यहोवानं दिलेल्या सर्व देणग्यांचा, खासकरून त्याचं नाव असलेल्या बायबलचा वापर करण्याचा आपण निर्धार करू या. त्याला आपल्या वचनातून तुमच्याशी दररोज बोलू द्या. आणि तो तुमच्या सर्व प्रार्थना अगदी लक्ष देऊन ऐकतो याची खात्री बाळगा. अशा प्रकारे त्याच्याशी संवाद साधल्यामुळे तुम्हाला त्याला अगदी जवळून ओळखता येईल आणि त्याच्याप्रती असलेलं तुमचं प्रेमही वाढत जाईल.—योहा. १७:३.

“स्वतःच्या भाषेत यहोवाला बोलताना ऐकणं खरंच एक विशेषाधिकार आहे!”

^ परि. 2 न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या सुधारित आवृत्तीतील परिशिष्ट ‘A१’ आणि टेहळणी बुरूज (इंग्रजी) १ मे २००८ मधील पृष्ठे १८-२२ पाहा.

^ परि. 6 मृत समुद्राजवळ सापडलेल्या गुंडाळ्या इब्री मॅसोरेटिक लिखाणांच्या तुलनेत १,००० वर्षांपेक्षाही जास्त जुन्या आहेत.

^ परि. 7 काही संदर्भग्रंथात हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे पण तरी सर्वच तज्ज्ञ या स्पष्टीकरणाशी सहमत नाहीत.

^ परि. 7 न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—विथ रेफरन्सेस, यातील पृष्ठ १५६१ वरील परिशिष्ट ‘१A’ पाहा.