व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा इतरांच्या भल्यासाठी वापर करा

आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा इतरांच्या भल्यासाठी वापर करा

हे परमेश्वरा, माझ्या तोंडचे शब्द तुला मान्य असोत.—स्तो. १९:१४.

गीत क्रमांक: २१, ३५

१, २. बायबलमध्ये आपल्या बोलण्याच्या क्षमतेची तुलना आगीशी का करण्यात आली आहे?

१८७१ साली अमेरिकेच्या विसकॉन्सिन या जंगलात आग लागली. आणि पाहता पाहता काही क्षणातच या आगीनं भयंकर रूप धारण केलं. या आगीमुळे जवळजवळ दोन अब्ज झाडं पूर्णपणे जळून खाक झाली. यात १,२०० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. अमेरिकेत आगीमुळे झालेल्या दुर्घटनेतील ही सर्वात मोठी दुर्घटना होती. जंगलात लागलेली ही प्रचंड आग ट्रेनमधून निघालेल्या एका लहानशा ठिणगीमुळे लागली असावी असं म्हटलं जातं. यावरून आपल्याला याकोब ३:५ मधील शब्दांची आठवण होते: “लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते!” पण, याकोबानं असं का म्हटलं असावं?

कारण तो पुढे म्हणतो: “जीभ ही आग आहे.” (याको. ३:६) “जीभ” आपल्या बोलण्याच्या क्षमतेला सूचित करते. आणि अगदी आगीप्रमाणेच, आपण जे बोलतो त्यामुळे फार मोठं नुकसानही होऊ शकतं. बायबल असंही म्हणतं की आपलं बोलणं एखाद्याला जीवन मिळवण्यास मदत करू शकतं किंवा एखाद्याच्या मृत्यूलादेखील कारण ठरू शकतं. (नीति. १८:२१) पण, आपल्या बोलण्याचा काहीतरी दुष्परिणाम होईल म्हणून आपण बोलणंच टाळतो का? नक्कीच नाही. आगीमुळे आपलं नुकसान होऊ शकतं म्हणून आपण तिचा वापर करायचं सोडून देत नाही. उलट, आपण तिचा काळजीपूर्वक वापर करतो. उदाहरणार्थ, जेवण तयार करण्यासाठी, शेकोटीसाठी किंवा उजेड मिळावा म्हणून आपण आगीचा वापर करतो. त्याच प्रकारे, आपण जर आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा काळजीपूर्वक वापर केला, तर त्यामुळे यहोवाचा आदर होईल आणि इतरांचाही फायदा होईल.—स्तो. १९:१४.

३. या लेखात आपण कोणत्या तीन गोष्टींवर चर्चा करणार आहोत?

यहोवानं आपल्याला शब्दांचा वापर करून किंवा हावभाव करून आपल्या मनातील भावना आणि विचार व्यक्त करण्याची क्षमता दिली आहे. आणि या क्षमतेचा वापर आपण इतरांना उत्तेजन देण्यासाठी करू शकतो. (याकोब ३:९, १० वाचा.) यासाठी आपल्याला तीन गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे: आपण केव्हा बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे आणि कसं बोललं पाहिजे.

बोलण्याची योग्य वेळ

४. आपण केव्हा शांत राहिलं पाहिजे?

आपण बोललं पाहिजे हे खरं आहे. पण, असेही काही प्रसंग असतात जेव्हा शांत राहणं योग्य असतं. बायबलदेखील म्हणतं: “मौन धरण्याचा समय” असतो. (उप. ३:७) उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असते तेव्हा शांत राहण्याद्वारे आपण त्या व्यक्तीला आदर दाखवत असतो. (ईयो. ६:२४) तसंच, एखाद्याच्या खाजगी गोष्टींविषयीही इतरांसोबत बोलायचं आपण टाळतो. (नीति. २०:१९) शिवाय, जेव्हा एखाद्याच्या बोलण्याचा आपल्याला राग येतो, तेव्हा शांत राहून काहीही न बोलण्याद्वारे आपण शहाणपणा दाखवत असतो.—स्तो. ४:४.

५. यहोवानं दिलेल्या भेटवस्तूबद्दल आपण कशी कदर दाखवू शकतो?

पण, बायबल असंही म्हणतं की “बोलण्याचा समय असतो.” (उप. ३:७) समजा तुमच्या मित्रानं तुम्हाला एखादी सुंदर भेटवस्तू दिली असेल तर तुम्ही काय करता? निश्‍चितच तुम्ही ती तुमच्या नजरेआड कुठंतरी ठेवून देत नाही तर तिचा चांगल्या प्रकारे वापर करून त्याप्रती असणारी आपली कदर दाखवता. त्याचप्रमाणे यहोवानं आपल्याला दिलेल्या भेटवस्तूचा म्हणजे आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा चांगल्या प्रकारे वापर करून आपण तिच्याप्रती असलेली कदर दाखवत असतो. इतरांना उत्तेजन मिळेल असं बोलण्याद्वारे, आपल्या भावना व्यक्त करण्याद्वारे, आपल्याला कशाची गरज आहे ते सांगण्याद्वारे आणि यहोवाची स्तुती करण्याद्वारे आपण आपली कदर व्यक्त करत असतो.—स्तो. ५१:१५.

६. बोलण्याची योग्य वेळ निवडणं महत्त्वाचं का आहे?

बोलण्यासाठी आपण योग्य वेळ निवडणं किती महत्त्वाचं आहे, याबद्दल नीतिसूत्रे २५:११ असं म्हणतं, “रुपेरी करंड्यांत सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.” विचार करा सोन्याची फळं किती सुंदर दिसतील. आणि तीच फळं जर एका चांदीच्या भांड्यात ठेवली, तर त्यांचं सौंदर्य आणखी जास्त वाढणार नाही का? त्याचप्रमाणे, इतरांना सांगता येण्यासारखी चांगली गोष्ट आपल्याजवळ असेल. पण, त्यासाठी आपण जर योग्य वेळ निवडली तर त्या व्यक्तीला त्याचा आणखी जास्त फायदा होईल. आपण हे कसं करू शकतो?

७, ८. जपानमधील बांधवांनी येशूच्या उदाहरणाचं अनुकरण कसं केलं?

आपलं बोलणं कदाचित योग्य असेल. पण, त्यासाठी आपण जर चुकीची वेळ निवडली तर आपल्या बोलण्याचा काहीच फायदा होणार नाही. (नीतिसूत्रे १५:२३ वाचा.) उदाहरणार्थ, मार्च २०११ रोजी एका मोठ्या भूकंपामुळे आणि त्सुनामीमुळे पूर्व जपानच्या अनेक शहरांची मोठी नासधूस झाली. त्यात १५,००० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. तसंच, अनेक यहोवाच्या साक्षीदारांनीही आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना आणि आपल्या मित्रांना गमवलं. असं असलं तरी, बायबलचा वापर करून त्यांच्यासारख्याच स्थितीत असलेल्या लोकांना त्यांना मदत करायची होती. पण, त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली की तिथले बहुतेक लोक बौद्ध आहेत आणि त्यांना बायबलविषयी खूप कमी माहिती आहे. त्यामुळे, पुनरुत्थानाविषयी सांगण्याऐवजी त्यांनी चांगल्या लोकांसोबत अशा भयंकर गोष्टी का घडतात याविषयी बोलून त्यांचं सांत्वन केलं.

या बांधवांनी खरंतर येशूच्या उदाहरणाचं अनुकरण केलं. केव्हा शांत राहिलं पाहिजे हे येशूला माहीत होतं. पण, त्यासोबत केव्हा बोललं पाहिजे हेदेखील त्याला माहीत होतं. (योहा. १८:३३-३७; १९:८-११) म्हणूनच आपल्या शिष्यांना काही ठरावीक गोष्टी शिकवण्यासाठी त्यानं योग्य वेळ निवडली. (योहा. १६:१२) जपानमधल्या बांधवांनीही, पुनरुत्थानाविषयी लोकांसोबत बोलण्याची योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहिली. त्सुनामी आल्याच्या अडीच वर्षांनंतर त्यांनी मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? ही पत्रिका लोकांना वाटली. बऱ्याच जणांनी ही पत्रिका घेतली आणि त्यातील माहितीमुळे त्यांना सांत्वन मिळालं. आपणही आपल्या क्षेत्रातील लोकांच्या संस्कृतीचा आणि त्यांच्या धार्मिक विश्वासांचा विचार करून, बोलण्याची योग्य वेळ कोणती आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

९. असे आणखी कोणते प्रसंग आहेत जेव्हा आपण योग्य वेळ पाहून बोललं पाहिजे?

असे आणखी इतर प्रसंगही आहेत, जेव्हा आपण योग्य वेळ पाहून बोललं पाहिजे. उदाहरणार्थ, जेव्हा कोणीतरी आपल्याला असं काहीतरी बोलतं, ज्यामुळे आपल्याला राग येतो. अशा वेळी विचार न करता पटकन काहीतरी बोलून मोकळं होण्याऐवजी, आपण थोडं थांबून स्वतःला असं विचारलं पाहिजे: ‘त्याला मुद्दामच तसं बोलायचं होतं का? त्यानं जे म्हटलं त्याबद्दल मला खरंच त्याच्याशी बोललं पाहिजे का?’ बऱ्याच वेळा काही न बोलणंच जास्त चांगलं असतं. पण त्याच्याशी बोललंच पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर पहिल्यांदा आपलं मन शांत होईपर्यंत थांबून राहा. (नीतिसूत्रे १५:२८ वाचा.) आणखी एक प्रसंग म्हणजे, जेव्हा सत्यात नसलेल्या नातेवाइकांना आपल्या विश्वासाबद्दल बोलण्याची वेळ येते, तेव्हा. अशा वेळी आपण धीर धरला पाहिजे. आपण काय बोलणार आहोत त्याचा आधी विचार करून आपण योग्य वेळ निवडली पाहिजे. असं केल्यामुळे कदाचित ते आपलं ऐकून घेण्यास तयार होतील.

काय बोलावं

१०. (क) आपण विचारपूर्वकपणे बोलणं का महत्त्वाचं आहे? (ख) बोलताना आपण कोणती गोष्ट टाळली पाहिजे?

१० आपण जे बोलतो त्यामुळे एखाद्याला बरं वाटू शकतं किंवा आपल्या बोलण्यानं तो दुखावू शकतो. (नीतिसूत्रे १२:१८ वाचा.) आज सैतानाच्या या जगात, लोक अशा वाईट शब्दांचा वापर करतात जे ‘तीरासारखे’ किंवा ‘तलवारीसारखे’ बोचतात. आपल्याला दुखवण्याचाच त्यांचा उद्देश असतो. (स्तो. ६४:३) आजकाल टिव्ही आणि चित्रपटांमध्ये सर्रासपणे जे दाखवलं जातं, त्यामुळे अशा प्रकारे खोचकपणे बोलण्याची सवय त्यांना लागते. पण ख्रिस्ती या नात्यानं आपण मात्र एखाद्याच्या मनाला लागेल असं बोलणं टाळलं पाहिजे. मग ते अगदी गंमतीच्या सुरात असलं तरी. विनोदबुद्धीनं बोलणं चुकीचं नाही, त्यामुळे आपलं बोलणं आणखी मनोरंजक बनतं. पण म्हणून एखाद्याला अपमानास्पद वाटेल अशा प्रकारे इतरांपुढे त्याची टिंगल करण्याचं आपण टाळलं पाहिजे. कोणाचीही “निंदा” न करण्याविषयी बायबल आपल्याला अगदी स्पष्टपणे ताकीद देतं. बायबल म्हणतं, “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की, तेणेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे.”—इफिस. ४:२९, ३१.

११. योग्य शब्दांची निवड करण्यास आपल्याला कशामुळे मदत होईल?

११ येशूनं एकदा म्हटलं, की “अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.” (मत्त. १२:३४) याचा अर्थ आपण जे काही बोलतो त्यावरून आपल्या मनात काय आहे ते दिसून येतं. तेव्हा, जर लोकांप्रती आपल्या मनात प्रेम असेल आणि आपल्याला त्यांची मनापासून काळजी वाटत असेल, तर आपण योग्य शब्दांची निवड करण्यास प्रवृत्त होऊ. त्यामुळे, आपण जे काही बोलू ते नेहमी सकारात्मक आणि उत्तेजन देणारं असेल.

१२. योग्य शब्दांची निवड करण्यासाठी आपल्याला आणखी कशामुळे मदत होईल?

१२ बोलताना योग्य शब्दांची निवड करणं हे नेहमीच सोपं नसतं. शलमोन राजा खूप बुद्धिमान होता. पण तरी योग्य आणि मनाला स्पर्श करतील अशा शब्दांची निवड करण्यासाठी त्याला भरपूर “विचार व शोध” करावा लागला. (उप. १२:९, १०) मग आपल्यालाही योग्य शब्दांची निवड करण्यासाठी कशामुळे मदत होऊ शकते? एक मार्ग म्हणजे, बायबलमध्ये आणि आपल्या प्रकाशनांमध्ये कशा प्रकारचे शब्द वापरले आहेत यांचं परीक्षण करणं. एखादा वाक्यांश किंवा काही शब्द समजत नसतील, तर त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. तसंच, इतरांना मदत होईल अशा प्रकारे बोलता यावं म्हणून येशूच्या उदाहरणाचं परीक्षण करा. काय बोलावं हे त्याला अचूक माहीत होतं. कारण “शिणलेल्यांस बोलून धीर कसा द्यावा” हे स्वतः यहोवानं त्याला शिकवलं होतं. (यश. ५०:४) तसंच, आपल्या शब्दांचा इतरांवर काय परिणाम होऊ शकतो याचाही विचार आपण केला पाहिजे. (याको. १:१९) आपण स्वतःला विचारू शकतो: ‘जर मी असं बोललो तर मला काय म्हणायचं आहे ते त्या व्यक्तीला समजेल का? यामुळे तिला कसं वाटेल?’

१३. आपलं बोलणं समजण्यासाठी सोपं असणं गरजेचं का आहे?

१३ इस्राएलमध्ये कर्णा वाजवून लोकांना संकेत दिला जायचा. कर्ण्याच्या एका विशिष्ट आवाजामुळे लोकांना एकत्र येण्याचा संकेत मिळायचा. तर त्याच्या दुसऱ्या प्रकारच्या आवाजावरून सैनिकांना हल्ला करण्याची सूचना मिळायची. पण, विचार करा हा आवाज जर स्पष्ट नसता तर सैनिकांचं काय झालं असतं? ते गोंधळात पडले नसते का? बायबलमध्ये कर्ण्याच्या स्पष्ट आवाजाची तुलना, समजायला सोप्या असणाऱ्या शब्दांशी करण्यात आली आहे. पण, आपण जर स्पष्टपणे बोललो नाही तर लोकांचा गोंधळ होईल किंवा ते आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतील. म्हणून आपलं बोलणं नेहमी स्पष्ट असलं पाहिजे. पण असं असलं, तरी आपलं बोलणं कधीही उद्धट किंवा अनादर करणारं असू नये.—१ करिंथकर १४:८, ९ वाचा.

१४. लोकांना सहज समजेल अशा प्रकारे येशूनं शिकवलं असं का म्हणता येईल?

१४ येशूनंही समजायला सोप्या असणाऱ्या शब्दांची निवड केली. याचं एक उदाहरण आपल्याला मत्तय ५ ते ७ या अध्यायांमध्ये पाहायला मिळतं. या ठिकाणी त्यानं जे भाषण दिलं त्यात लोकांवर छाप पाडण्याच्या हेतूनं अवघड किंवा गरज नसलेल्या शब्दांचा वापर त्यानं केला नाही. तसंच, लोकांना वाईट वाटेल अशा गोष्टींबद्दलही तो बोलला नाही. येशूनं अगदी गहन अर्थ असणाऱ्या गोष्टी शिकवल्या. पण, अगदी सोप्या शब्दांत त्यानं त्या मांडल्या. उदाहरणार्थ, खाण्यापिण्याच्या गोष्टींविषयी चिंता करत बसू नये असं येशूला त्याच्या शिष्यांना शिकवायचं होतं. यासाठी यहोवा पक्ष्यांना कसं अन्न पुरवतो याचं उदाहरण देऊन त्यानं विचारलं: “तुम्ही त्यांपेक्षा श्रेष्ठ आहा की नाही?” (मत्त. ६:२६) अशा प्रकारे सोप्या शब्दांचा वापर करून येशूनं त्यांना एक महत्त्वाची गोष्ट समजून घेण्यास मदत केली. शिवाय यामुळे त्यांना उत्तेजनही मिळालं.

कसं बोलावं

१५. आपण दयाळूपणे का बोललं पाहिजे?

१५ आपण इतरांशी काय बोलतो हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच आपण कसं बोलतो हेदेखील खूप महत्त्वाचं आहे. लोकांना येशूचं बोलणं ऐकायला आवडायचं कारण तो नेहमी प्रेमळपणे आणि दयाळूपणे बोलायचा. (लूक ४:२२) आपण जर इतरांशी दयाळूपणे बोललो तर ते आपलं ऐकून घ्यायला तयार असतील. (नीति. २५:१५) आपण जर इतरांचा आदर करून त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याशी दयाळूपणे बोलणं आपल्याला शक्य होईल. येशूनंही तेच केलं. उदाहरणार्थ, जेव्हा लोकांचा मोठा लोकसमुदाय आपलं ऐकण्यासाठी धडपडत आहे हे त्यानं पाहिलं, तेव्हा त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी आणि त्यांना शिकवण्यासाठी तो प्रवृत्त झाला. (मार्क ६:३४) काही वेळा लोकांनी येशूचा अपमानही केला. पण त्या वेळीही येशू त्यांच्याशी कठोरपणे वागला नाही.—१ पेत्र २:२३.

१६, १७. (क) आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत आणि आपल्या मित्रांसोबत बोलताना आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) एका आईनं कठोरपणे बोलण्याचं टाळल्यामुळे कोणते चांगले परिणाम घडून आले?

१६ दयाळूपणे आणि विचार करून बोलणं आपल्याला खासकरून तेव्हा कठीण जातं, जेव्हा आपण आपल्या मित्रांशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोलत असतो. आपण विचार करू की मी त्यांना जवळून ओळखतो तर मग मी काहीही बोललं तरी ते खपवून घेतील. पण, हे लक्षात घ्या की येशू आपल्या मित्रांशी बोलताना कधीही कठोरतेनं बोलला नाही. उदाहरणार्थ जेव्हा त्याचे मित्र, ‘आपल्यापैकी मोठा कोण’ या विषयावर वादविवाद करत होते, तेव्हा त्यानं अगदी दयाळूपणे त्यांना समजावलं. एका लहान मुलाचं उदाहरण देऊन त्यांची विचारसरणी सुधारण्याचा प्रयत्न त्यानं केला. (मार्क ९:३३-३७) मंडळीचे वडीलसुद्धा इतरांना सल्ला देताना येशूच्या उदाहरणाचं पालन करून त्यांच्याशी दयाळूपणे बोलतात.—गलती. ६:१.

१७ एखाद्याच्या बोलण्याचं जेव्हा आपल्याला वाईट वाटतं, तेव्हादेखील त्याच्याशी दयाळूपणे बोलल्यामुळे चांगला परिणाम होऊ शकतो. (नीति. १५:१) उदाहरणार्थ, एका बहिणीचा तरुण मुलगा एकीकडे यहोवाची सेवा करत असल्याचं दाखवत होता. पण दुसरीकडे तो एक वाईट जीवन जगत होता. मंडळीतील एका बहिणीला या बहिणीची दया आली आणि ती म्हणाली: “हे खूप वाईट झालं! तू आपल्या मुलाला सत्यात वाढवण्यात कमी पडलीस.” तिचं बोलणं ऐकल्यावर या मुलाच्या आईनं क्षणभर विचार केला आणि म्हणाली: “सध्या जे चाललंय ते चुकीचं आहे ते मान्य आहे. पण, त्याचं प्रशिक्षण अजून संपलेलं नाही. त्यामुळे, आपण हर्मगिदोन झाल्यानंतर यावर बोलू या का? त्या वेळेस आपल्याला याविषयी खात्रीनं बोलता येईल. हो ना?” या बहिणीनं असं सौम्यपणे उत्तर दिल्यामुळे त्या दोघींची मैत्री तशीच कायम राहिली. शिवाय, आपली आई जे बोलली ते त्या मुलानंही ऐकलं आणि त्याला जाणवलं की आपण आताही आपल्या जीवनात बदल करू शकतो असं आपल्या आईला वाटतं. त्यामुळे, त्यानं स्वतःमध्ये बदल केले, आपली वाईट संगत सोडली, बाप्तिस्मा घेतला आणि नंतर तो बेथेलमध्ये सेवा करू लागला. म्हणूनच, आपण आपल्या बांधवांसोबत, आपल्या कुटुंबातल्या सदस्यांसोबत किंवा अनोळखी लोकांसोबत बोलतो, तेव्हा प्रत्येक प्रसंगी आपलं बोलणं “कृपायुक्त, मिठाने रुचकर” असं असलं पाहिजे.—कलस्सै. ४:६.

१८. आपण बोलण्याच्या बाबतीत येशूच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?

१८ आपल्या मनातील भावना आणि विचार व्यक्त करण्याची यहोवानं दिलेली क्षमता, खरंच खूप सुंदर देणगी आहे. आपण जर येशूच्या उदाहरणाचं अनुकरण केलं, तर आपण नेहमी बोलण्याची योग्य वेळ निवडू, विचारपूर्वक शब्दांची निवड करू आणि दयाळूपणे व सौम्यतेनं बोलण्याचा प्रयत्न करू. तेव्हा, आपण सर्व जण आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा इतरांना उत्तेजन देण्यासाठी आणि यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी वापर करू या.