संवाद साधणारा देव—यहोवा
“आता ऐक; मी बोलतो!”—ईयो. ४२:४.
१-३. (क) देवाचे विचार आणि भाषा मानवांपेक्षा श्रेष्ठ आहे हे कशावरून दिसून येतं? (ख) या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?
यहोवानं बुद्धिमान प्राण्यांना म्हणजे देवदूतांना आणि नंतर मानवांना बनवलं. कारण आपल्यासोबत इतरांनाही जीवन जगण्याची आणि आनंद अनुभवण्याची संधी मिळावी अशी त्याची इच्छा होती. (स्तो. ३६:९; १ तीम. १:११) यहोवा देवानं पहिल्यांदा एका आत्मिक व्यक्तीला बनवलं. प्रेषित योहानानं त्याचा “शब्द” असा उल्लेख केला. (योहा. १:१; प्रकटी. ३:१४) सर्वात आधी आपले विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी यहोवानं या व्यक्तीसोबत म्हणजे येशूसोबत संवाद साधला. (योहा. १:१४, १७; कलस्सै. १:१५) देवदूतही संवाद साधतात आणि त्यांचीसुद्धा एक वेगळी भाषा आहे, असं प्रेषित पौलानं म्हटलं.—१ करिंथ. १३:१.
२ यहोवाला, त्यानं निर्माण केलेल्या करोडो आत्मिक प्राण्यांविषयी आणि मानवांविषयी खडा न् खडा माहिती आहे. लाखो लोक यहोवाला प्रार्थना करत असतात आणि या सर्वांच्या प्रार्थना तो एकाच वेळी ऐकू शकतो. शिवाय, ते वेगवेगळ्या भाषेत प्रार्थना करत असले, तरी तो त्या समजू शकतो. इतकंच नव्हे, तर याच वेळी तो देवदूतांशीही बोलत असतो आणि त्यांना मार्गदर्शन देत असतो. यावरून, निश्चितच यहोवाचे विचार आणि त्याची भाषा मानवांपेक्षा कैक पटीनं श्रेष्ठ आहे हे स्पष्ट होतं. (यशया ५५:८, ९ वाचा.) असं असलं, तरी मानवांसोबत बोलताना मात्र तो आपला संदेश अगदी सोप्या भाषेत सांगतो.
३ मानवांसोबत स्पष्टपणे संवाद साधण्याकरता यहोवानं काय काय केलं, हे
या लेखात सांगण्यात आलं आहे. तसंच, परिस्थितीनुसार तो आपल्या संवाद साधण्याच्या पद्धतीत कसा फेरबदल करतो याविषयीही आपण पाहणार आहोत.देव मानवांशी संवाद साधतो
४. (क) मोशे, शमुवेल आणि दावीद यांच्याशी यहोवा कोणत्या भाषेत बोलला? (ख) बायबलमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात?
४ पहिला मानव आदाम याच्याशी एदेन बागेत बोलताना यहोवानं कदाचित इब्री भाषेचं अगदी सुरवातीचं रूप वापरलं असावं. नंतर यहोवानं मोशे, शमुवेल आणि दावीद यांना आपले विचार कळवले. त्यांनी देवाचे विचार इब्री भाषेत त्यांच्या स्वतःच्या शब्दांत आणि शैलीत लिहून ठेवले. अशा प्रकारे काही वेळा त्यांनी यहोवाचे शब्द जसेच्या तसे लिहिले, पण यासोबतच देव त्याच्या लोकांसोबत कसा वागला याची सविस्तर माहिती त्यांनी आपल्या शब्दांत लिहून ठेवली. उदाहरणार्थ, लोकांचा देवाप्रती असलेला विश्वास आणि प्रेम, त्यांच्या चुका आणि ते देवाशी अविश्वासूपणे कसे वागले याविषयीचा इतिहास त्यांनी लिहून ठेवला. ही सगळी माहिती आपल्या फायद्याकरताच लिहिण्यात आली होती.—रोम. १५:४.
५. यहोवानं मानवांसोबत बोलताना फक्त इब्री भाषेचाच वापर केला होता का? स्पष्ट करा.
५ यहोवानं मानवांसोबत फक्त इब्री भाषेतच संवाद साधला का? नाही. इस्राएली लोक बाबेलच्या गुलामीतून बाहेर आले तेव्हा अरामी भाषा त्यांच्या दररोजच्या वापरातली भाषा बनली होती. कदाचित, त्यामुळेच दानीएल, यिर्मया आणि एज्रा यांनी बायबलचे काही भाग अरामी भाषेत लिहिले असावेत. *
६. इब्री शास्त्रवचनांचं ग्रीक भाषेत भाषांतर का करण्यात आलं?
६ नंतर अॅलेक्झँडर यानं जगाच्या पुष्कळशा भागावर ताबा मिळवला. त्यामुळे, किनी ग्रीक ही रोजच्या वापरातली ग्रीक भाषा अनेक देशांत मुख्य भाषा बनली होती. अनेक यहुदी लोक ग्रीक भाषा वापरू लागल्यामुळे नंतर इब्री शास्त्रवचनांचं ग्रीक भाषेत भाषांतर करण्यात आलं. या भाषांतराला सेप्टुअजिंट म्हणून ओळखलं जातं. हे बायबलचं सर्वात पहिलं आणि अगदी महत्त्वाचं भाषांतर होतं. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की सेप्टुअजिंटचं भाषांतर ७२ लोकांनी पूर्ण केलं होतं. * काहींनी इब्री शास्त्रवचनांचं शब्दशः भाषांतर केलं तर काहींनी वेगळी पद्धत वापरली. असं असलं, तरी ग्रीक बोलणारे यहुदी लोक आणि ख्रिश्चन लोक सेप्टुअजिंटला देवाचाच शब्द मानत होते.
७. आपल्या शिष्यांना शिकवताना येशूनं कोणती भाषा वापरली?
७ येशू पृथ्वीवर होता तेव्हा कदाचित तोही इब्री भाषा बोलत असावा. (योहा. १९:२०; २०:१६; प्रे. कृत्ये २६:१४) शिवाय, त्या वेळी बोलल्या जाणाऱ्या अरामी भाषेतील काही वाक्प्रचारदेखील येशूने वापरले असावेत. यासोबतच, सभास्थानात दर आठवडी मोशे आणि इतर संदेष्ट्यांनी लिहिलेली जुन्या इब्री भाषेतील पुस्तकंदेखील वाचली जायची. ही भाषादेखील येशूला माहीत होती. (लूक ४:१७-१९; २४:४४, ४५; प्रे. कृत्ये १५:२१) येशूला ग्रीक आणि लॅटिन भाषा येत होती की नाही, याबद्दल बायबल काहीच सांगत नाही. पण या भाषादेखील त्या काळात बोलल्या जात होत्या.
८, ९. अनेक ख्रिस्ती लोक ग्रीक भाषा का बोलू शकत होते, आणि यहोवाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं?
८ येशूचे सुरवातीचे अनुयायी इब्री भाषा बोलायचे. पण, येशूच्या मृत्यूनंतर त्याचे शिष्य इतर भाषाही बोलू लागले. (प्रेषितांची कृत्ये ६:१ वाचा. *) सुवार्तेचा जसजसा प्रसार होत गेला तसतसे अनेक ख्रिस्ती लोक इब्री ऐवजी ग्रीक भाषा जास्त वापरू लागले. ग्रीक त्या वेळची दररोजच्या वापरातली भाषा बनली होती. त्यामुळे, मत्तय, मार्क, लूक आणि योहान या पुस्तकांचं ग्रीक भाषेत वितरण करण्यात आलं. * तसंच, प्रेषित पौलानं लिहिलेली पत्रं आणि इतर पुस्तकंही ग्रीक भाषेतच होती.
९ लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनं लिहिणाऱ्या लेखकांनी इब्री शास्त्रवचनांचा संदर्भ घेताना, बऱ्याच वेळा सेप्टुअजिंटचा वापर केला. कधीकधी, हे संदर्भ मूळ इब्री शास्त्रवचनांत जे लिहिलं होतं त्यापेक्षा थोडे वेगळे होते. त्यामुळे, अपरिपूर्ण मानवी भाषांतरकारांनी केलेलं हे काम आज आपल्या बायबलचा एक भाग बनलं आहे. यावरून स्पष्ट होतं की यहोवा विशिष्ट भाषेला किंवा संस्कृतीला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ मानत नाही.—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५ वाचा.
१०. यहोवानं मानवांशी ज्या प्रकारे संवाद साधला त्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?
१० आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्यावरून हे स्पष्ट होतं, की परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार यहोवा मानवांशी संवाद साधण्याच्या पद्धतीत फेरबदल करतो. त्याच्याबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल जाणून घेण्यासाठी आपण एक विशिष्ट भाषा शिकावी अशी अपेक्षा तो करत नाही. (जखऱ्या ८:२३; प्रकटीकरण ७:९, १० वाचा.) आपण हेदेखील पाहिलं की यहोवानं बायबल लेखकांना त्याचे विचार लिहिण्याची प्रेरणा दिली. पण, त्यानं या लेखकांना आपल्या स्वतःच्या शब्दांत त्याचे विचार लिहिण्याची सूटदेखील दिली.
देव त्याच्या वचनाला सुरक्षित ठेवतो
११. मानव वेगवेगळ्या भाषांचा वापर करत असले, तरी त्यांच्याशी संवाद साधणं यहोवासाठी कठीण का नाही?
११ मानव आज अनेक वेगवेगळ्या भाषांचा वापर करत आहे. पण, म्हणून त्यांच्याशी संवाद साधणं यहोवासाठी कठीण नाही. हे आपण कशावरून म्हणू शकतो? मूळ भाषेत येशूनं म्हटलेले केवळ काही शब्दच आज आपल्याला माहीत आहेत. (मत्त. २७:४६; मार्क ५:४१; ७:३४; १४:३६) पण, येशूचा संदेश मात्र पहिल्यांदा ग्रीक आणि काळाच्या ओघात इतर भाषेतही योग्यपणे पोचवला जाईल याची तरतूद यहोवानं केली. नंतर, यहुदी आणि ख्रिस्ती लोकांनी बायबलच्या गुंडाळींचं पुन्हा पुन्हा लिखाण केलं. त्यामुळे देवाचं वचन तसंच सुरक्षित राहिलं. नंतर या प्रतींचं अनेक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलं. उदाहरणार्थ, ख्रिस्ताच्या जवळजवळ ४०० वर्षांनंतर हयात असणाऱ्या जॉन क्रीसोस्टोम यानं म्हटलं, की त्याच्या काळापर्यंत येशूनं शिकवलेल्या संदेशाचं भाषांतर सिरियातील, इजिप्तमधील, भारतातील, पर्शियातील, इथियोपियातील लोकांच्या आणि इतर अनेकांच्या भाषेत भाषांतरित करण्यात आलं होतं.
१२. बायबलचा कशा प्रकारे विरोध करण्यात आला?
१२ बायबलचा आणि त्याच्या भाषांतराचं वितरण करणाऱ्यांचा खूप विरोध करण्यात आला आहे, हे इतिहासावरून दिसून येतं. येशूच्या जन्माच्या २ तीमथ्य २:९ वाचा.
जवळजवळ ३०० वर्षांनंतर रोमी सम्राट डायक्लेशन यानं बायबलच्या सर्व प्रतींचा नाश करण्याचा हुकूम दिला. त्याच्या जवळजवळ १,२०० वर्षांनंतर विल्यम टिंडेल यांनी बायबलचं इंग्रजी भाषेत भाषांतर करण्यास सुरवात केली. त्यांनी एकदा असं म्हटलं की जर देवानं त्यांना भरपूर आयुष्य दिलं तर पाळकापेक्षा एका शेतकऱ्याच्या मुलाला बायबल चांगलं समजेल असं भाषांतर ते करतील. पण, विरोधामुळे बायबलचं भाषांतर आणि छपाई करण्यासाठी त्यांना इंग्लंड सोडून युरोपला जावं लागलं. पाळकांनी बायबलच्या सापडतील त्या प्रती जाळून टाकण्याचा प्रयत्न केला असला, तरी टिंडेल यांनी भाषांतरित केलेल्या बायबलच्या प्रती अनेकांपर्यंत पोचल्या होत्या. शेवटी, टिंडेल यांना गळा दाबून खांबावर जाळण्यात आलं. पाळकांनी कितीही विरोध केला असला तरी त्यांचं भाषांतर मात्र सुरक्षित राहिलं. नंतर, त्याचा उपयोग किंग जेम्स वर्शन या बायबल भाषांतरासाठी करण्यात आला.—१३. बायबलच्या जुन्या हस्तलिखितांच्या अभ्यासावरून काय दिसून आलं?
१३ हे खरं आहे की बायबलच्या काही जुन्या प्रतींमध्येसुद्धा काही छोट्यामोठ्या चुका आणि तफावती आहेत. बायबल तज्ज्ञांनी बायबलच्या हस्तलिखित प्रतींचा, त्याच्या काही भागांचा आणि जुन्या भाषांतरांचा अगदी काळजीपूर्वक अभ्यास केला. त्यांची तुलना केल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की फक्त काही वचनांमध्येच थोडाफार फरक आहे आणि तोही अगदी क्षुल्लक स्वरूपाचा. पण, बायबलचा मूळ संदेश मात्र बदललेला नाही. अशा प्रकारच्या अभ्यासामूळे बायबलच्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना याची खात्री पटते की आज आपल्याकडे जे बायबल आहे ते यहोवाचंच प्रेरित वचन आहे.—यश. ४०:८. *
१४. आज बायबल किती प्रमाणात उपलब्ध आहे?
१४ बायबलचा तीव्र विरोध होऊनही ते आज २,८०० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आलं आहे. आज जगात दुसरं कुठलंही पुस्तक इतक्या भाषांमध्ये उपलब्ध नाही. हे खरं आहे की अनेकांचा देवावर विश्वास नाही, तरी देवाचं वचन बायबल हे आजपर्यंतचं सर्वात जास्त वितरित होणारं पुस्तक आहे. काही बायबल भाषांतरं वाचण्यासाठी सोपी नसली किंवा ती अचूक रीत्या भाषांतरित केलेली नसली, तरी जवळजवळ सगळ्याच बायबलमध्ये सार्वकालिक जीवनाचा आशादायी संदेश वाचायला मिळतो.
बायबलच्या नवीन भाषांतराची गरज
१५. (क) १९१९ नंतर बायबल आधारित प्रकाशनांमध्ये कोणता बदल झाला? (ख) आपली प्रकाशनं आधी इंग्रजी भाषेत का लिहिली जातात?
१५ बायबल विद्यार्थ्यांच्या एका लहान गटाला १९१९ साली ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ म्हणून नेमण्यात आलं. त्या वेळी देवाच्या लोकांसोबत संवाद साधण्यासाठी हा विश्वासू दास बहुतेक वेळा इंग्रजी भाषेचा वापर करायचा. (मत्त. २४:४५) पण आज बायबल आधारित प्रकाशनं ७०० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध करून दिली जातात. पूर्वी ज्या प्रकारे ग्रीक भाषेचा जास्त वापर व्हायचा, त्याच प्रकारे आज इंग्रजी भाषा जास्त वापरली जाते. व्यापार क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात इंग्रजी भाषेचाच जास्त वापर होतो. त्यामुळे, आपली प्रकाशनं आधी इंग्रजी भाषेत लिहिली जातात आणि नंतर इतर भाषांमध्ये त्यांचं भाषांतर केलं जातं.
१६, १७. (क) देवाच्या लोकांना कशाची गरज होती? (ख) ती गरज कशी पूर्ण करण्यात आली? (ग) बंधू नॉर यांची काय इच्छा होती?
१६ आपली सगळीच प्रकाशनं बायबलवर आधारित आहेत. १६११ साली भाषांतरित करण्यात आलेलं किंग जेम्स व्हर्शन या बायबल भाषांतराचा सुरवातीला वापर केला जायचा. पण, त्यातली भाषा खूप जुनी आणि समजण्यास कठीण होती. शिवाय, त्यात देवाच्या नावाचा वापरदेखील खूप कमी वेळा करण्यात आला होता. याउलट, जुन्या हस्तलिखितांमध्ये हेच नाव हजारो वेळा आढळतं. शिवाय, या भाषांतरात काही चुकादेखील होत्या आणि जुन्या हस्तलिखितांत नसलेल्या वचनांचाही त्यात समावेश करण्यात आला होता. इतर इंग्रजी भाषांतरांमध्येही अशा प्रकारच्याच चुका होत्या.
१७ अचूक आणि समजण्यास सोपं असणाऱ्या बायबल भाषांतराची देवाच्या लोकांना गरज होती हे स्पष्टच आहे. आणि यासाठी ‘न्यू वर्ल्ड बायबल ट्रान्सलेशन कमिटी’ स्थापित करण्यात आली. या कमिटीमधील बांधवांनी १९५० ते १९६० दरम्यान बायबलचे वेगवेगळे भाग प्रकाशित केले. पहिले सहा खंड २ ऑगस्ट १९५० साली झालेल्या अधिवेशनात प्रकाशित करण्यात आले. त्या अधिवेशनात बंधू नॉर यांनी म्हटलं की देवाच्या लोकांना एका अचूक आणि समजण्यास सोपं असणाऱ्या आधुनिक बायबल भाषांतराची गरज होती. कारण, यामुळे लोकांना सत्य आणखी स्पष्टपणे समजण्यास मदत होणार होती. ख्रिस्ताच्या शिष्यांचं मूळ लिखाण वाचण्यास आणि समजण्यास जितकं सोपं होतं, तितक्याच सोप्या भाषेतल्या भाषांतराची गरज होती. हाच उद्देश ठेवून न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन तयार करण्यात आलं. लाखो लोकांना यहोवाची ओळख होण्यास मदत मिळावी हीच बंधू नॉर यांची इच्छा होती.
१८. बायबल भाषांतरासाठी कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली?
१८ बंधू नॉर यांनी जी इच्छा व्यक्त केली होती ती १९६३ साली पूर्ण झाली. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द ख्रिश्चन ग्रीक स्क्रिप्चर्स हे डच, फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज आणि स्पॅनिश भाषेत उपलब्ध करण्यात आलं. १९८९ साली यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळानं बायबल भाषांतरकारांना मदत व्हावी म्हणून मुख्यालयात एक नवीन विभागच तयार केला. नंतर, २००५ साली अशी परवानगी देण्यात आली की टेहळणी बुरूज ज्या ज्या भाषांमध्ये उपलब्ध आहे, त्या त्या भाषांमध्ये बायबल भाषांतरित केलं जाऊ शकतं. याचा परिणाम म्हणजे आज १३० पेक्षा जास्त भाषांमध्ये न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन हे संपूर्ण बायबल किंवा त्याचे काही भाग उपलब्ध आहेत.
१९. सन २०१३ मध्ये कोणती महत्त्वाची गोष्ट घडली, आणि पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?
१९ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती तेव्हाची इंग्रजी भाषा आणि आज आपल्या काळातील इंग्रजी भाषा यात खूप फरक पडला आहे. त्यामुळे, यात आधुनिक भाषेनुसार काही फेरबदल करण्याची गरज पडली. ५ आणि ६ ऑक्टोबर २०१३ रोजी वॉच टॉवर बायबल अॅन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्वेनियाची १२९ वी वार्षिक सभा घेण्यात आली. यासाठी ३१ देशांतील १४,१३,६७६ श्रोते एकतर थेटपणे किंवा इतर माध्यमांच्या साहाय्यानं उपस्थित होते. या सभेत नियमन मंडळाच्या एका सदस्यानं इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली. उपस्थितांना जेव्हा या नवीन भाषांतराची प्रत मिळाली तेव्हा ते अक्षरशः भारावून गेले आणि कित्येकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. वक्त्यानं जेव्हा या सुधारित आवृत्तीतील काही वचनं वाचली, तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की बायबलची ही आवृत्ती वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी खूप सोपी आहे. पुढच्या लेखात आपण या आवृत्तीबद्दल आणखी जाणून घेऊ या. तसंच, ते इतर भाषांमध्ये कसं भाषांतरित केलं जात आहे, याविषयीही पाहू या.
^ परि. 5 एज्रा ४:८; ७:१२; यिर्मया १०:११; आणि दानीएल २:४ ही वचनं मुळात अरामी भाषेत लिहिण्यात आली होती.
^ परि. 6 सेप्टुअजिंटचा अर्थ “सत्तर” असा होतो. हे भाषांतर ख्रिस्ताच्या ३०० वर्षांआधी सुरू होऊन, १५० वर्षांनंतर पूर्ण झालं असावं असा अंदाज आहे. या भाषांतराला आजही खूप महत्त्व आहे. कारण, यामुळे तज्ज्ञांना काही इब्री शब्द किंवा संपूर्ण वचन समजून घेण्यास मदत होते.
^ परि. 8 प्रेषितांची कृत्ये ६:१ (सुबोध भाषांतर): “त्या दिवसांत विश्वासणाऱ्यांची संख्या जसजशी वेगाने वाढू लागली, तसतशी त्यांच्यामध्ये असमाधानाची कुरकूर ऐकू येऊ लागली. जे यहूदी लोक फक्त ग्रीकच भाषा बोलू शकत, त्यांनी अशी तक्रार केली की त्यांच्या विधवांना इब्री भाषा बोलणाऱ्या विधवांइतके अन्न दररोजच्या वाटपात दिले जात नाही.”
^ परि. 8 काहींचं म्हणणं आहे की मत्तयानं त्याचं पुस्तक इब्री भाषेत लिहिलं असावं आणि नंतर कदाचित स्वतःच त्याचं ग्रीक भाषेत भाषांतर केलं असावं.
^ परि. 13 सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक यातील पृष्ठे ७-९ वरील “हे पुस्तक टिकले कसे?” आणि न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या सुधारित आवृत्तीतील परिशिष्ट ‘A३’ पाहा.