व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनची २०१३ सालची सुधारित आवृत्ती

न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनची २०१३ सालची सुधारित आवृत्ती

गेल्या अनेक वर्षांत न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स या बायबल भाषांतरात बऱ्याच वेळा सुधारणा करण्यात आल्या. पण खासकरून २०१३ सालच्या आवृत्तीत फार मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या. उदाहरणार्थ, आधीच्या तुलनेत या आवृत्तीत शब्दांची संख्या जवळजवळ १० टक्क्यांनी कमी झाली आहे. यासोबतच काही मुख्य बायबल संज्ञांमध्ये बदल करण्यात आला आहे. तर काही अध्यायांची काव्यरूपात मांडणी करण्यात आली आहे. शिवाय या आवृत्तीत सामान्य आकाराच्या बायबलमध्येही स्पष्टीकरणासाठी दिलेल्या तळटीपांचा समावेश करण्यात आला आहे. २०१३ सालच्या या आवृत्तीत करण्यात आलेल्या सर्वच सुधारणांची या लेखात चर्चा करणं शक्य नाही. पण त्यात करण्यात आलेल्या काही मुख्य सुधारणांबद्दल आता आपण जाणून घेऊ या.

बायबलच्या कोणत्या काही संज्ञा बदलण्यात आल्या आहेत? आधीच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, “शिओल,” “हेडीस,” या शब्दांच्या आणि “जीव” किंवा “प्राण” यासाठी असणाऱ्या “सोल” या इंग्रजी शब्दाच्या भाषांतरात या आवृत्तीत सुधारणा करण्यात आली आहे. पण यासोबतच, इतरही काही बायबल संज्ञा आहेत ज्यांत बदल करण्यात आला आहे.

उदाहरणार्थ, येशूला ज्या प्रकारे मारण्यात आलं त्याबद्दल सांगताना, आधी “सुळावर देण्यास” अशा अर्थाचा इंग्रजी शब्द वापरण्यात यायचा. पण हा शब्द शिक्षा देण्याच्या आणखी एका पद्धतीलादेखील सूचित करत असल्यामुळे, गैरसमज होऊ नये म्हणून “वधस्तंभावरील मृत्युदंड” किंवा “खांबावर खिळणे” अशा अर्थाचा इंग्रजी शब्द वापरण्यात आला आहे. (मत्त. २०:१९; २७:३१) तसंच “कामातुरपणा” अशा अर्थाच्या शब्दाऐवजी “निर्लज्ज वर्तन” असा अर्थ असणारा शब्द वापरण्यात आला आहे. यामुळे मूळ ग्रीक भाषेतील शब्दातून व्यक्त होणारी उद्धट आणि बेफिकीर वृत्तीदेखील दिसून येते. यासोबतच आधी “धीर” यासाठी जो शब्द वापरण्यात यायचा त्यामुळे काही जणांचा असा गैरसमज व्हायचा, की या ठिकाणी एक व्यक्ती जास्त काळापासून सहन करत असल्याबद्दल सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या आवृत्तीत हा शब्दही बदलण्यात आला आहे. तसंच “रंगेलपणा” अशा अर्थाच्या शब्दाऐवजी, सध्याच्या वापरात असलेली एक अर्थपूर्ण इंग्रजी संज्ञा वापरण्यात आली आहे. (गलती. ५:१९-२२) तसंच “प्रेमदया” असा अर्थ देणाऱ्या शब्दाऐवजी या आवृत्तीत “विश्वासूपणाशी” संबंधित असणारा “एकनिष्ठ प्रेम” अशा अर्थाचा अचूक शब्द वापरण्यात आला आहे.—स्तो. ३६:५; ८९:१.

आधीच्या आवृत्तीत काही बायबल संज्ञांचं भाषांतर प्रत्येक ठिकाणी एकाच प्रकारे करण्यात आलं होतं. पण या आवृत्तीत मात्र त्यांचं भाषांतर करताना संदर्भानुसार वेगवेगळे शब्द वापरण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, ‘ओहलाम’ या इब्री शब्दासाठी पूर्वी प्रत्येक ठिकाणी “सर्वकाळ” या अर्थाची संज्ञा वापरली जायची. पण नवीन आवृत्तीत या संज्ञेचं भाषांतर संदर्भानुसार करण्यात आलं आहे. हा एकच शब्द वेगवेगळ्या अर्थानं कसा वापरण्यात आला आहे ते स्तोत्र ९०:२ आणि मीखा ५:२ या वचनांची तुलना केल्यावर पाहायला मिळतं.

“बीज” या अर्थाचा इब्री आणि ग्रीक शब्द ‘शेतात पेरण्याचे बी’ किंवा ‘संतती’ या दोन्ही अर्थानं वापरला जाऊ शकतो. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या आधीच्या आवृत्तीत सर्व ठिकाणी, अगदी उत्पत्ति ३:१५ मध्येसुद्धा “बीज” हाच शब्द वापरण्यात आला होता. पण इंग्रजी भाषेत संततीसाठी “बीज” हा शब्द सध्या कोणीच वापरत नाही. म्हणून आताच्या सुधारित आवृत्तीत उत्पत्ति ३:१५ आणि त्याच्याशी संबंधित इतर वचनांमध्ये “संतती” या अर्थाचा योग्य शब्द वापरण्यात आला आहे. (उत्प. २२:१७, १८; प्रकटी. १२:१७) याशिवाय इतर ठिकाणीही संदर्भानुसार अर्थ लक्षात घेऊन योग्य शब्दांचा वापर करण्यात आला आहे.—उत्प. १:११; स्तो. २२:३०; यश. ५७:३.

बऱ्याच ठिकाणी पूर्वी केलेलं शब्दशः भाषांतर का बदलण्यात आलं आहे? २०१३ च्या सुधारित आवृत्तीतील परिशिष्ट ‘A१’ मध्ये सांगण्यात आलं आहे, की “जेव्हा एखाद्या शब्दाच्या किंवा वाक्यांशाच्या, शब्दशः भाषांतरामुळे मूळ अर्थ बदलतो किंवा अस्पष्ट होतो, तेव्हा त्याचं शब्दशः भाषांतर करण्याऐवजी योग्य अर्थ स्पष्ट करणाऱ्या शब्दांचा वापर करणं गरजेचं असतं. अशा पद्धतीनं तयार केलेल्या बायबल भाषांतरालाच एक चांगलं भाषांतर म्हणता येईल.” त्यामुळे या आवृत्तीत मूळ भाषेतील एखाद्या वाक्प्रचाराचं शब्दशः भाषांतर समजण्यासारखं असेल, तर ते तसंच ठेवण्यात आलं आहे नाहीतर अर्थ स्पष्ट करण्यासाठी त्यात बदल करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, प्रकटीकरण २:२३ या वचनात मूळ भाषेतील वाक्यांशाचं शब्दशः भाषांतर केलं तर, “मी मूत्रपिंडांची व अंतःकरणाची पारख करणारा आहे” असं होईल. यहोवा “अंतःकरणाची पारख करणारा आहे” हे बहुतेक भाषांमध्ये समजण्यासारखं आहे. पण, “मूत्रपिंडांची पारख करणारा” हा वाक्यांश वाचकांना काहीसा विचित्र वाटेल. त्यामुळे सुधारित आवृत्तीत शब्दशः भाषांतर न करता, “मनातील विचारांची व अंतःकरणाची पारख करणारा” असं भाषांतर करून मूळ भाषेच्या वाक्यांशाचा योग्य अर्थ स्पष्ट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, अनुवाद ३२:१४ या वचनातील वाक्प्रचाराचं शब्दशः भाषांतरही फारच विचित्र वाटलं असतं. त्यामुळे शब्दशः भाषांतर न करता “सर्वात उत्तम प्रतीचा गहू” असा अर्थपूर्ण वाक्यांश तिथं वापरण्यात आला आहे. याशिवाय, “बेसुनत ओठांचा” हा मूळ भाषेतील वाक्यांश बहुतेक भाषांमध्ये समजण्यासारखा नसल्यामुळे त्या ठिकाणी “जड जिभेचा” असा वाक्यांश वापरण्यात आला आहे.—निर्ग. ६:१२.

“इस्राएलांचे पुत्र” आणि “अनाथ मुलगे” या वाक्यांशांचं सुधारित आवृत्तीत “इस्राएल लोक” आणि “अनाथ मुलं” असं भाषांतर का करण्यात आलं आहे? इब्री भाषेत सहसा पुरुषांबद्दल बोलताना पुल्लिंगी तर स्त्रियांबद्दल बोलताना स्त्रीलिंगी शब्दांचा वापर केला जातो. पण, कधीकधी पुल्लिंगी शब्द वापरलेला असला तरी त्यात स्त्री-पुरुष दोघांचाही समावेश होतो. उदाहरणार्थ, काही वचनांचा संदर्भ लक्षात घेतल्यास आपल्याला कळतं, की “इस्राएलांचे पुत्र” असं म्हणताना त्यात केवळ पुरुषांचाच नाही तर स्त्रियांचाही समावेश होतो. त्यामुळे, आता या वाक्यांशाचं “इस्राएल लोक” असं योग्यपणे भाषांतर करण्यात आलं आहे.—निर्ग. १:७; ३५:२९; २ राजे ८:१२.

त्याच प्रकारे, उत्पत्ति ३:१६ यात वापरलेल्या “पुत्र” या अर्थाच्या पुल्लिंगी इब्री शब्दाचं न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये “मुलं” असं भाषांतर करण्यात आलं होतं. पण, निर्गम २२:२४ या वचनात याच शब्दाचं भाषांतर करताना “तुमची मुलं [इब्री, “पुत्र”] अनाथ होतील” असं म्हणण्यात आलं आहे. इतर ठिकाणीही, मूळ भाषेत जिथं “अनाथ मुलगा” असं म्हणण्यात आलं होतं, तिथं आता “अनाथ मूल” किंवा फक्त “अनाथ” असं म्हटलं आहे. (अनु. १०:१८; ईयो. ६:२७) ग्रीक सेप्टुअजिंट या भाषांतरातही अशाच प्रकारे भाषांतर केलेलं आढळतं. वरील कारणामुळेच, उपदेशक १२:१ या वचनात “तू तरुण पुरुष होतास तेव्हाचे दिवस” या वाक्यांशाऐवजी “तुझ्या तारुण्याचे दिवस” असं सुधारित आवृत्तीत म्हणण्यात आलं आहे.

बऱ्याच इब्री क्रियापदांचं भाषांतर आता साध्या पद्धतीनं का करण्यात आलं आहे? इब्री भाषेत क्रियापदांचे दोन मुख्य प्रकार आहेत. क्रियापदाचा एक प्रकार अपूर्ण (चालू असलेल्या) क्रियेला, तर दुसरा प्रकार हा पूर्ण झालेल्या क्रियेला सूचित करतो. इब्री भाषेत जिथं जिथं अपूर्ण क्रियेला सूचित करणारं क्रियापद वापरलं होतं, तिथं तिथं पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये ती क्रिया अजून सुरू आहे किंवा वारंवार घडत आहे हे दाखवण्यासाठी या क्रियापदासोबत काही जास्तीचे शब्द जोडले होते. * तसंच, पूर्ण झालेल्या क्रियेला सूचित करणाऱ्या क्रियापदांवर जोर देण्यासाठीही सहसा “निश्‍चित,” “अवश्य” आणि “खरोखर” या अर्थाचे शब्द वापरले जायचे.

पण, २०१३ सालच्या सुधारित आवृत्तीत, क्रियापदाचा अर्थ स्पष्ट होत असेल तर जास्तीचे शब्द टाळण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, देवाने “प्रकाश होवो” असं वारंवार म्हटलं होतं यावर जोर देण्याची गरज नव्हती. त्यामुळे प्रकाश होवो असं देव बोलला, यातील “बोलला” या क्रियापदाचं भाषांतर करताना सुधारित आवृत्तीत ती क्रिया अपूर्ण किंवा चालू आहे हे सूचित करण्यात आलेलं नाही. (उत्प. १:३) याउलट, उत्पत्ति ३:९ यात यहोवानं आदामाला हाक मारली असं सांगण्यात आलं आहे. या ठिकाणी यहोवानं त्याला वारंवार हाक मारली होती. त्यामुळे सुधारित आवृत्तीत या ठिकाणी कोणताही बदल न करता, ही क्रिया चालू असल्याचं सूचित करण्यात आलं आहे. एकंदरीत, या नव्या आवृत्तीत क्रियापदांचं साध्या पद्धतीनं भाषांतर करण्यात आलं आहे. म्हणजे, इब्री क्रियापदाचा प्रकार पूर्ण आहे की अपूर्ण हे दाखवण्याऐवजी क्रियेवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे झालेला आणखी एक फायदा असा, की थोडक्यात विचार मांडण्याची इब्री भाषेची शैली भाषांतरातही काही प्रमाणात व्यक्त झाली आहे.

मूळ लेखात होती त्यानुसार या आवृत्तीतील बऱ्याच अध्यायांची मांडणी आता काव्य रूपात करण्यात आली आहे

आता बरेच अध्याय काव्य रूपात का मांडण्यात आले आहेत? बायबलचे बरेच भाग मूळ भाषेत काव्य रूपातच लिहिण्यात आले होते. आधुनिक भाषांमध्ये, लेखात आणि कवितेत मुख्य फरक हा असतो की कवितेत शब्दांचं यमक जुळवलेलं असतं, पण ही गोष्ट लेखाच्या बाबतीत नसते. पण इब्री भाषेतील काव्यात्मक लेखन, हे खासकरून त्यात असलेल्या दोन समानार्थी किंवा विरुद्धार्थी विधानांवरून ओळखता येतं. इब्री भाषेतील कवितेतली लय ही यमकांमुळे नाही तर विचारांच्या क्रमवार मांडणीमुळे साधलेली असते.

ईयोब आणि स्तोत्रसंहिता या पुस्तकांतील वचनं बायबल काळात गीतांच्या रूपात गायली किंवा म्हटली जायची. ही गोष्ट वाचकाला समजावी म्हणून न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये या पुस्तकांतील वचनांची मांडणी एका खालोखाल एक अशी करण्यात आली होती. अशा मांडणीमुळे कवितेतील समान किंवा विरुद्ध अर्थाची विधानं ठळकपणे समजायची आणि ती आठवणीत ठेवायलाही सोपी जायची. पण २०१३ च्या सुधारित आवृत्तीत या पुस्तकांसोबत नीतिसूत्रे, गीतरत्न, आणि संदेष्ट्यांच्या पुस्तकांतील बऱ्याच अध्यायांची मांडणीही अशा प्रकारे काव्य रूपात करण्यात आली आहे. त्यामुळे हे भाग मूळ भाषेत कवितेच्या रूपात लिहिण्यात आले होते हे समजण्यास तर मदत होतेच पण त्यासोबत, अशा मांडणीमुळे समान आणि विरुद्ध अर्थांची विधानं जास्त ठळकपणे दिसून येतात. याचं एक उदाहरण म्हणजे यशया २४:२. या वचनातील प्रत्येक ओळीत विरुद्धार्थी शब्द वापरण्यात आले आहेत आणि यहोवाच्या न्यायदंडातून कोणालाच सुटका मिळणार नाही या विचारावर जोर देण्यासाठी प्रत्येक ओळ आधीच्या ओळीला पूरक अशी लिहिण्यात आली आहे. अशा विशिष्ट मांडणीमुळे हे उतारे कवितेच्या रूपात आहेत हे ओळखता येत असल्यानं, बायबलचा लेखक एकच विचार उगाचच पुन्हापुन्हा मांडत आहे असं वाचकाला वाटत नाही. उलट, देवाचा संदेश जास्त जोरदारपणे व्यक्त करण्यासाठी त्यानं तो कवितेच्या रूपात मांडला आहे हे त्याच्या लक्षात येतं.

इब्री भाषेत लेख आणि कविता यांच्यातला फरक तितक्या सहजपणे दिसून येत नाही. त्यामुळे, बायबलच्या वेगवेगळ्या भाषांतरांत वेगवेगळी पुस्तकं आणि अध्याय काव्य रूपात मांडलेले आढळतात. काही उतारे कवितेच्या रूपात नसले तरीही त्यात काव्यात्मक शब्द, आलंकारिक भाषा, आणि समानार्थी विधानं वापरून मुद्दा स्पष्ट केलेला असतो. त्यामुळे, कोणते भाग कवितेच्या रूपात मांडले जावेत हे सहसा भाषांतरकार ठरवतात.

सुधारित आवृत्तीचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पुस्तकातील माहितीची रूपरेषा त्या-त्या पुस्तकाच्या सुरवातीला देण्यात आली आहे. या वैशिष्ट्यामुळे गीतरत्न या कवितेतले वारंवार बदलणारे संवाद नेमके कोणाचे आहेत, हे समजण्यास मदत होते.

मूळ भाषेतील हस्तलिखितांच्या अभ्यासाचा सुधारित आवृत्तीच्या भाषांतरावर कसा प्रभाव पडला? न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन हे मुळात इब्री भाषेतील मॅसोरेटिक हस्तलिखितांवर आणि वेस्टकॉट आणि हॉर्ट यांच्या मूळ ग्रीक लिखाणावर आधारित होतं. मागच्या अनेक वर्षांपासून बायबलच्या प्राचीन हस्तलिखितांचा अभ्यास सुरूच आहे आणि या अभ्यासामुळे बायबलची काही वचनं मुळात कशा प्रकारे मांडण्यात आली होती हे जास्त स्पष्ट झालं आहे. मृत समुद्राजवळ सापडलेल्या गुंडाळ्यांमुळे, मूळ भाषेत बायबलचे काही भाग कसे मांडले होते याचा अभ्यास करणं शक्य झालं. तसंच, ग्रीक भाषेच्याही आणखी बऱ्याच हस्तलिखितांचा अभ्यास करण्यात आला आहे. आता या हस्तलिखितांच्या आधारावर मिळणारे पुरावे इलेक्ट्रॉनिक रूपात उपलब्ध असल्यामुळे कंप्युटरच्या साहाय्यानं त्यांचं परीक्षण आणि तुलना करणं शक्य झालं आहे. त्यामुळे, वचनांच्या कोणत्या लिखाणाला सर्वात जास्त पुराव्यांचा आधार आहे हे ठरवणं सोपं झालं आहे. न्यू वर्ल्ड बायबल ट्रान्सलेशन कमिटीनं काही वचनांचा आणखी सखोल अभ्यास करण्यासाठी या सर्व आधुनिक सोयींचा फायदा उठवला आहे आणि त्यामुळे त्यांनी सुधारित आवृत्तीत काही बदल करण्याचं ठरवलं.

उदाहरणार्थ, २ शमुवेल १३:२१ यात ग्रीक सेप्टुअजिंटमध्ये या अर्थाचे शब्द वापरण्यात आले आहेत: “पण तो अम्नोनास बरेवाईट काही बोलला नाही कारण तो त्याचा ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्याचे त्याच्यावर प्रेम होते.” न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये हे शब्द घालण्यात आले नव्हते कारण मॅसोरेटिक हस्तलिखितांत ते नव्हते. पण मृत समुद्राजवळ सापडलेल्या गुंडाळ्यांमध्ये हे शब्द आढळत असल्यामुळे, २०१३ च्या सुधारित आवृत्तीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. अशाच कारणांमुळे पहिले शमुवेल या पुस्तकात आणखी पाच ठिकाणी देवाचं नाव घालण्यात आलं आहे. ग्रीक हस्तलिखितांच्या अभ्यासामुळे मत्तय २१:२९-३१ या वचनातील विचारांच्या मांडणीचा क्रम बदलण्यात आला आहे. अशा रीतीनं फक्त एकाच मूळ ग्रीक लिखाणावर अवलंबून न राहता उपलब्ध हस्तलिखितांमधील पुराव्यांच्या आधारावर काही विशिष्ट बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुधारित आवृत्तीत करण्यात आलेले केवळ काही बदल आपण या लेखात विचारात घेतले. हे बदल केल्यामुळे न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ही मानवांशी संवाद साधणाऱ्या देवाकडून असलेली एक देणगीच आहे असं मानणाऱ्या कित्येक वाचकांना आता बायबलचं आणखी चांगल्या प्रकारे वाचन करणं आणि अर्थ समजून घेणं शक्य झालं आहे.

^ परि. 10 न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स—विथ रेफरेन्सेस, परिशिष्ट ‘३C’ पाहा.