अतुलनीय पिता
देवाच्या जवळ या
अतुलनीय पिता
“पिता.” दोनच अक्षरी शब्द. पण मनात प्रेमळ भावना उचंबळून येतात. आपल्या मुलांवर खरोखर प्रेम करणारा पिता त्यांना बहरायला अर्थात जीवनात यशस्वी होण्यास मदत करतो. म्हणूच बायबल यहोवा देवाला ‘पिता’ असे संबोधते. (मत्तय ६:९) यहोवा देव कशाप्रकारचा पिता आहे? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याकरता आपण यहोवाने येशूच्या बाप्तिस्म्याप्रसंगी वापरलेल्या शब्दांचे परीक्षण करून पाहूया. कारण, पिता आपल्या मुलांबरोबर ज्याप्रकारे बोलतो त्यावरून आपल्याला, पित्याचे व्यक्तिमत्त्व कसे आहे हे कळते.
सा.यु. २९ च्या ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास, येशू बाप्तिस्मा घेण्यासाठी यार्देन नदीजवळ गेला. तेथे काय घडले त्याविषयी बायबल असे वर्णन देते: “बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पाहा, आकाश उघडले तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला, आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.’” (मत्तय ३:१६, १७) * खुद्द यहोवाच्या या कोमल शब्दांवरून आपल्याला, तो कशाप्रकारचा पिता आहे याविषयी बरेचसे कळते. या शब्दांतून यहोवाने आपल्या पुत्राला कोणत्या तीन गोष्टी व्यक्त केल्या ते पाहा.
पहिली गोष्ट, “हा माझा पुत्र” असे म्हणण्याद्वारे यहोवा वास्तविकतेत असे म्हणत होता, की, ‘तुझा पिता असण्याचा मला अभिमान वाटतो.’ मुले आईवडिलांची मान्यता आणि त्यांचे लक्ष मिळवण्यास हपापलेले असतात. एक समंजस पिता आपल्या मुलांची ही भूक शमवतो. मुलांना सतत ही खात्री करून द्यावी लागते, की त्यांनाही कुटुंबातील एक सदस्य म्हणून मौल्यवान समजले जाते. येशूला आपल्या पित्याकडून अशी मान्यता मिळाली. तो आता प्रौढ झाला होता, तरीपण त्याच्या पित्याने त्याला ही मान्यता दिली. हे ऐकून येशूला कसे वाटले असेल याची कल्पना करा!
दुसरी गोष्ट. आपल्या पुत्राला “प्रिय” असे संबोधून यहोवाने उघडपणे येशूवर आपले किती प्रेम आहे हे व्यक्त केले. दुसऱ्या शब्दांत, यहोवा पिता त्याला, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे,’ असे म्हणत होता. एक चांगला पिता आपल्या मुलांना, तो त्यांच्यावर खूप प्रेम करतो, हे सांगतो. प्रेमळ शब्दांसोबत मुलांना ममता दाखवल्याने मुले बहरतात. यहोवाने येशूवर त्याचे प्रेम आहे हे व्यक्त केलेले पाहून येशूला किती गदगदून आले असेल, नाही का?
तिसरी गोष्ट. “तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे,” असे म्हणून यहोवाने आपल्या पुत्राविषयीची संतुष्टी व्यक्त केली. यहोवा जणू काय असे म्हणत होता: ‘मुला, तू जे काही केलेस त्याबद्दल मी खूष आहे.’ आपली मुले जेव्हा चांगल्या गोष्टी बोलतात किंवा करतात तेव्हा एक प्रेमळ पिता, तो त्यांच्यावर खूष आहे हे व्यक्त करण्यासाठी संधी शोधतो. पालक जेव्हा आपल्या मुलांबद्दल अशी संतुष्टी व्यक्त करतात तेव्हा मुलांना बळ आणि धैर्य मिळते. आपला पिता आपल्याविषयी संतुष्ट आहे हे ऐकून येशूला किती प्रोत्साहन मिळाले असेल!
होय, यहोवा एक अतुलनीय पिता आहे. आपल्याला देखील असा पिता असावा असे तुम्हाला आतुरतेने वाटते का? मग, तुम्ही यहोवाबरोबर अशी जवळीक साधू शकता, ही गोष्ट ऐकून तुम्हाला सांत्वन मिळू शकेल. तुम्ही जर विश्वासाने त्याच्याविषयी शिकून घेतले आणि प्रामाणिकपणे त्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलात तर तो निश्चित तुम्हाला उत्तर देईल. बायबल असे म्हणते: “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हांजवळ येईल.” (याकोब ४:८) अशा सर्वोत्तम पित्याबरोबर अर्थात यहोवा देवाबरोबर एक घनिष्ट नातेसंबंध जोडल्याने तुम्हाला जी सुरक्षिततेची भावना लाभेल ती इतर कशाने मिळेल का? (w०८ १/१)
[तळटीप]
^ परि. 5 लूकच्या शुभवर्तमानातील समांतर अहवालानुसार यहोवाने “तू” या व्यक्तिगत सर्वनामाचा उपयोग केला. त्याने म्हटले: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”—लूक ३:२२.