व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्क्रांतीवादाचा बायबलशी मेळ बसतो का?

उत्क्रांतीवादाचा बायबलशी मेळ बसतो का?

उत्क्रांतीवादाचा बायबलशी मेळ बसतो का?

प्राण्यांपासून मनुष्याला बनवण्याकरता देवाने उत्क्रांतीचा वापर केला असण्याची शक्यता आहे का? सूक्ष्म जिवाणूंचा विकास होऊन मत्स्य अस्तित्वात यावेत, आणि मग सरपटणारे जीव व त्यानंतर सस्तन प्राणी असे करत करत कपींपासून मानव उत्पन्‍न व्हावेत, असे देवानेच घडवून आणले असावे का? काही वैज्ञानिक आणि धर्मपुढारी उत्क्रांतीवाद आणि बायबल या दोन्ही गोष्टी आपण मानतो असे सांगतात. त्यांचे म्हणणे आहे की बायबलमधील उत्पत्ति या पुस्तकात जे सांगितले आहे, ती केवळ एक दृष्टान्तरूप कथा आहे. कदाचित तुम्हीही कधी विचार केला असेल, की ‘मनुष्य प्राण्यांपासून आला आहे या सिद्धान्ताचा बायबलशी मेळ बसतो का?’

आपली उत्पत्ती कशी झाली हे समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण त्याशिवाय, आपण कोण आहोत, आपले भविष्य काय असेल आणि आपण जीवनात कशाप्रकारे आचरण करावे हे आपण समजून घेऊ शकणार नाही. मानवाच्या उत्पत्तीविषयी जाणून घेतले तरच आपल्याला हे समजेल की देवाने जगात दुःख का राहू दिले आहे आणि मनुष्याच्या भविष्यासंबंधी त्याचा काय उद्देश आहे. देव आपला निर्माणकर्ता आहे याविषयी जोपर्यंत आपल्या मनात खात्री नसेल तोपर्यंत आपण त्याच्यासोबत चांगला नातेसंबंध जोडू शकणार नाही. म्हणूनच बायबल मानवाच्या उत्पत्तीविषयी, त्याच्या सध्याच्या परिस्थितीविषयी आणि त्याच्या भविष्याविषयी काय सांगते याचे आता आपण परीक्षण करू या. त्यानंतर आपण पाहू की उत्क्रांतीच्या सिद्धान्ताचा बायबलशी मेळ बसतो की नाही?

एकच मनुष्य होता तेव्हा

एकेकाळी एकच मनुष्य अस्तित्वात होता आणि त्याच्यापासून सर्व उत्पन्‍न झाले हे उत्क्रांतीवाद्यांना मान्य नाही. त्यांचे म्हणणे आहे की प्राण्यांच्या कळपांचा विकास होत गेला व त्यांच्यापासून मानवप्रजा उत्पन्‍न झाली. पण बायबलमध्ये फार वेगळे वर्णन आढळते. बायबल सांगते की आपण सर्वजण आदाम या एकाच मनुष्यापासून उत्पन्‍न झालो. बायबलमधील अहवाल आदामाचे वर्णन इतिहासात होऊन गेलेल्या एका वास्तविक व्यक्‍तीच्या रूपात करते. या अहवालात त्याच्या पत्नीचे व त्याच्या मुलांपैकी काहींची नावे देण्यात आली आहेत. तसेच त्याने काय केले, तो काय बोलला, तो कोठे राहात होता आणि त्याचा मृत्यू केव्हा झाला हे देखील त्यात सांगितलेले आहे. येशूने या अहवालाकडे, निव्वळ अशिक्षित लोकांकरता सांगितलेली कथा या दृष्टीने पाहिले नाही. उच्च शिक्षित धर्मपुढाऱ्‍यांना उद्देशून बोलताना त्याने म्हटले: “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्‍नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली?” (मत्तय १९:३-५) यानंतर येशूने उत्पत्ति २:२४ येथे आदाम व हव्वेच्या संदर्भात लिहिलेले शब्द उद्धृत केले.

बायबलचा एक लेखक आणि अतिशय अभ्यासू इतिहासकार असणारा लूक याने आदामाचा उल्लेख केला आणि तो येशूइतकाच वास्तविक होता हे दाखवले. लूकने येशूची थेट आदामापर्यंतची वंशावळ हुडकून काढली. (लूक ३:२३-३८) तसेच प्रेषित पौलाने एकदा सुविख्यात ग्रीक महाविद्यालयांत शिक्षण पावलेल्या तत्त्वज्ञान्यांपुढे केलेल्या भाषणात असे म्हटले: “देवाने जग व त्यांतले अवघे निर्माण केले . . . त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले.” (प्रेषितांची कृत्ये १७:२४-२६) यावरून स्पष्ट आहे की आपण “एकापासून” म्हणजेच एका मनुष्यापासून उत्पन्‍न झालो असेच बायबल शिकवते. मनुष्याच्या सुरुवातीच्या स्थितीविषयी बायबल जे सांगते त्याचा उत्क्रांतीवादाशी मेळ बसतो का?

मनुष्य परिपूर्णता गमावून बसला

बायबलनुसार यहोवाने पहिल्या मनुष्याला परिपूर्ण असे निर्माण केले होते. देवाने निर्माण केलेली कोणतीही गोष्ट अपरिपूर्ण असूच शकत नाही. निर्मितीच्या वृत्तान्तात असे म्हटले आहे: “देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला . . . आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.” (उत्पत्ति १:२७, ३१) आदाम परिपूर्ण होता याचा काय अर्थ होतो?

परिपूर्ण मनुष्य या नात्याने त्याला इच्छास्वातंत्र्य होते आणि तो देवाच्या गुणांचे पूर्णपणे अनुकरण करण्यास समर्थ होता. बायबल म्हणते: “देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्‍न केला आहे; पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे.” (उपदेशक ७:२९) आदामाने देवाचा विरोध करण्याचा मार्ग निवडला. देवाविरुद्ध विद्रोह केल्यामुळे आदाम स्वतःची परिपूर्णता तर गमावून बसलाच पण तो आपल्या संततीलाही ती देऊ शकला नाही. मानवाने अशाप्रकारे आपली परिपूर्णता गमावल्यामुळेच कधीकधी आपण चांगले करू इच्छितो तरी आपल्या हातून वाईट गोष्टी घडतात. प्रेषित पौलाने लिहिले: “जे मी इच्छितो ते करितो असे नाही, तर जे मला द्वेष्य वाटते तेच करितो.”—रोमकर ७:१५.

बायबलनुसार परिपूर्ण मनुष्य या पृथ्वीवर पूर्ण आरोग्यात सर्वकाळ जगू शकला असता. आदामाला देवाने जे सांगितले होते त्यावरून अगदी स्पष्ट आहे की जर त्या पहिल्या मनुष्याने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले नसते तर तो कधीच मेला नसता. (उत्पत्ति २:१६, १७; ३:२२, २३) जर मनुष्यात सुरुवातीपासूनच आजारी पडण्याची किंवा देवाच्या विरोधात जाण्याची प्रवृत्ती असती तर यहोवाने मनुष्याला निर्माण केल्यानंतर सर्वकाही “फार चांगले” आहे असे म्हटले नसते. आपण पाहतो की मानवी शरीराची अतिशय आश्‍चर्यकारक रितीने रचना करण्यात आली असूनही, मानवाने परिपूर्णता गमावल्यामुळेच, त्याचे शरीर व्यंग व आजारांना बळी पडते. म्हणूनच, उत्क्रांतीवादाच्या सिद्धान्ताचा बायबलशी मेळ बसत नाही. कारण या सिद्धान्तानुसार आधुनिक मनुष्य हा सतत प्रगती करत असलेला प्राणी आहे; पण बायबलनुसार मात्र आधुनिक मनुष्य हा एका परिपूर्ण मनुष्याचा निकृष्ट होत जाणारा वंशज आहे.

देवानेच उत्क्रांतीची प्रक्रिया घडवून आणली आणि त्याद्वारे मनुष्याला उत्पन्‍न केले ही कल्पना बायबलमध्ये देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाविषयी जे सांगितले आहे त्यासोबतही जुळत नाही. जर देवानेच उत्क्रांतीची प्रक्रिया घडवून आणली असेल तर याचा अर्थ असा होतो की मानवाच्या सध्याच्या रोगट व दुःखदायक अवस्थेपर्यंत देवानेच त्याला आणून पोचवले आहे. पण बायबल तर देवाबद्दल असे सांगते: “तो दुर्ग आहे; त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्‍वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीति नाही; हे बिघडले आहेत, हे त्याचे पुत्र नव्हत, हा त्यांचा दोष आहे.” (अनुवाद ३२:४, ५) त्याअर्थी, मानवाची सध्याची दुःखदायक परिस्थिती ही देवाने उत्क्रांतीची प्रकिया घडवून आणल्यामुळे नाही. तर एका मनुष्याने देवाविरुद्ध विद्रोह करण्याद्वारे आपली व आपल्या संततीचीही परिपूर्णता गमावल्यामुळे हे घडून आले आहे. आतापर्यंत आपण आदामाविषयी पाहिले. आता आपण येशूविषयी पाहू या. बायबल येशूविषयी जे सांगते त्यासोबत उत्क्रांतीच्या सिद्धान्ताचा मेळ बसतो का?

तुम्ही एकाच वेळी उत्क्रांतीवाद व ख्रिस्ती धर्मही मानू शकता का?

“ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला.” तुम्हाला कदाचित माहीत असेल, की ही ख्रिस्ती धर्माची एक मूलभूत शिकवण आहे. (१ करिंथकर १५:३; १ पेत्र ३:१८) उत्क्रांतीवादाची या विधानाशी सांगड का घालता येत नाही, हे समजून घेण्यासाठी आपण प्रथम हे समजून घेतले पाहिजे की बायबल आपल्याला पापी का म्हणते आणि पापाचा आपल्यावर काय परिणाम झाला आहे.

आपण सर्व पापी आहोत, याचा अर्थ असा होतो की आपण देवाच्या अद्‌भुत गुणांचे, उदाहरणार्थ, त्याच्या प्रीतीचे व न्यायाचे पूर्णपणे अनुकरण करू शकत नाही. म्हणूनच बायबल म्हणते: “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३) बायबल असे शिकवते की पाप हेच मृत्यूचे मूळ कारण आहे. १ करिंथकर १५:५६ सांगते की ‘मरणाची नांगी पाप आहे.’ वारशाने मिळालेला हा पापी स्वभावच रोगराईलाही कारणीभूत आहे. येशूने एकदा एका पक्षघाती मनुष्याला म्हटले, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” तेव्हा तो मनुष्य बरा झाला. अशारितीने येशूने दाखवले की रोगांचा संबंध आपल्या पापपूर्ण अवस्थेशी आहे.—मत्तय ९:२-७.

येशूच्या मृत्यूमुळे आपल्याला कोणती मदत मिळाली? आदाम व येशू ख्रिस्त यांच्यातला फरक दाखवून बायबल सांगते की: “जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील.” (१ करिंथकर १५:२२) येशूने आपले जीवन अर्पण करण्याद्वारे आदामाकडून वारशाने आपल्याला जे पाप मिळाले आहे त्याची किंमत दिली. त्यामुळे, जे कोणी येशूवर विश्‍वास ठेवतील आणि त्याच्या आज्ञांचे पालन करतील त्यांना आदामाने जे गमावले ते प्राप्त होईल, म्हणजेच सार्वकालिक जीवन.—योहान ३:१६; रोमकर ६:२३.

तर उत्क्रांतीवादाची ख्रिस्ती धर्माशी का सांगड घालता येत नाही हे तुमच्या लक्षात आले का? “आदामामध्ये सर्व मरतात” याबद्दल जर आपल्याला शंका असेल तर मग “ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील” अशी आशा आपण कोणत्या आधारावर बाळगू शकतो?

उत्क्रांतीवाद लोकांना का भावतो?

उत्क्रांतीवादासारख्या शिकवणी का लोकप्रिय होतात याचे कारण बायबलमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ते सांगते: “ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवितील. आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल.” (२ तीमथ्य ४:३, ४) उत्क्रांतीवादाचा सिद्धान्त सहसा विज्ञानाच्या भाषेत सादर केला जात असला तरी, मुळात तो एक धार्मिक सिद्धान्त आहे. जीवनाविषयी कोणता दृष्टिकोन बाळगावा व देवाप्रती कशी मनोवृत्ती बाळगावी हे तो लोकांना शिकवतो. या सिद्धान्ताशी संबंधित असलेल्या धारणा मनुष्याच्या स्वार्थी व स्वैराचारी प्रवृत्तीला भावतात. उत्क्रांतीवादाचा सिद्धान्त मानणारे बरेचजण म्हणतात की आम्ही देवालाही मानतो. पण ते आपल्याच मनाप्रमाणे अशा एका देवाची कल्पना करतात की जो निर्माणकर्ता नाही, जो मानवाच्या कारभारांत दखल देत नाही आणि जो लोकांचा न्यायही करणार नाही. साहजिकच हे मत लोकांना अगदी सोयीस्कर वाटते.

उत्क्रांतीवादाचे प्रसारक सहसा वस्तुस्थितीच्या आधारावर नव्हे तर “स्वेच्छाचाराने” प्रवृत्त होऊन या सिद्धान्ताचे समर्थन करतात. वैज्ञानिक वर्तुळात, जेथे उत्क्रांतीवादालाच बहुतेकजण खरे मानतात, तेथे आपल्याला इतरांची मान्यता मिळावी हा स्वार्थी उद्देश त्यामागे असू शकतो. जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक मायकल बीही, ज्यांनी सजीव पेशींमधल्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांचा अभ्यास करण्यासाठी आपले सबंध आयुष्य वेचले आहे ते स्पष्टपणे सांगतात की जे पेशींची उत्क्रांती झाली असे शिकवतात त्यांच्याजवळ खरे तर असे म्हणण्याचा कोणताही आधार नाही. अणूरेणूंच्या या सूक्ष्म स्तरावर उत्क्रांती घडू शकते का? त्यांनी लिहिले: “रैणवीय उत्क्रांतीला खरे मानण्याकरता कोणताही वैज्ञानिक आधार नाही. विज्ञानविषयक साहित्यात, म्हणजेच या विषयावरील सुप्रसिद्ध नियतकालिके किंवा पुस्तके यांत कोणत्याही खऱ्‍या, गुंतागुंतीच्या जीवरासायनिक यंत्रणेत रैणवीय स्तरावर उत्क्रांती कशाप्रकारे घडून आली किंवा कशाप्रकारे घडू शकते याचेही कोठेच स्पष्टीकरण केलेले आढळत नाही. . . . डार्व्हिनने रैणवीय उत्क्रांतीविषयी केलेला दावा थोतांड आहे.”

जर उत्क्रांतीवादाचे समर्थन करणाऱ्‍यांजवळ आधार किंवा पुरावे नाहीत तर मग ते आपल्या मतांचा इतक्या आत्मविश्‍वासाने कसा काय प्रसार करतात? बीही याचा खुलासा करतात: “बहुतेक लोकांना आणि बहुतेक सुप्रसिद्ध व मानलेल्या शास्त्रज्ञांनाही निसर्गाच्या पलीकडे आणखी काही असू शकते ही कल्पनाच नकोशी वाटते.”

ख्रिस्ती धर्मजगतातील पाळकांपैकी काहीजण उत्क्रांतीवादाच्या सिद्धान्ताचे समर्थन करतात कारण आपण बुद्धिजीवी आहोत असे ते लोकांना दाखवू इच्छितात. ते प्रेषित पौलाने रोम येथील ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रांत वर्णन केलेल्या लोकांसारखे आहेत. पौलाने लिहिले: “देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते . . . सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्‍य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की त्यांना कसलीहि सबब राहू नये. देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शुन्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले.” (रोमकर १:१९-२२) खोट्या शिक्षकांकडून तुमची फसवणूक होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता?

निर्माणकर्त्यावर पुराव्याच्या आधारावर विश्‍वास ठेवणे

विश्‍वास काय आहे याची व्याख्या करताना बायबल पुराव्याच्या महत्त्वावर भर देते. ते म्हणते: “विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्‍या गोष्टींबद्दलचा खात्रीलायक पुरावा आहे.” (इब्री लोकांस ११:१, NW) आपण निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाची खात्री पटवून देणाऱ्‍या पुराव्याच्या आधारावर देवावर विश्‍वास ठेवला पाहिजे. तोच खरा विश्‍वास आहे. हा पुरावा कोठे सापडेल हे बायबल आपल्याला सांगते.

बायबलचा एक लेखक दावीद याने देवाच्या प्रेरणेने असे लिहिले: “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो.” (स्तोत्र १३९:१४) आपल्या स्वतःच्या शरीराच्या व इतर सजीव वस्तूंच्या अद्‌भुत रचनेविषयी मनन करताना आपण निर्माणकर्त्याच्या बुद्धीने अक्षरशः विस्मित होतो. आपल्या शरीराचे कार्य चालवणाऱ्‍या व परस्परांशी सहकार्य करणाऱ्‍या हजारो यंत्रणांची अगदी अचूकरित्या रचना करण्यात आली आहे. तसेच सबंध विश्‍वात आपल्याला अशीच अचूकता व सुव्यवस्था पाहायला मिळते. दाविदाने लिहिले: “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते.”—स्तोत्र १९:१.

बायबलमध्येही निर्माणकर्त्याबद्दल भरपूर पुरावा आढळतो. बायबलमधील ६६ पुस्तकांचा आपसांतील मेळ, त्यातील उच्च नैतिक दर्जे आणि त्यातील भविष्यवाण्यांची न चुकता होणारी पूर्णता या सर्व गोष्टींचे परीक्षण केल्यावर निर्माणकर्ता देवच त्याचा लेखक आहे याची खात्री बाळगण्याकरता तुम्हाला भरपूर पुरावा सापडेल. बायबलच्या शिकवणी समजून घेतल्यानेही तुम्हाला याची खात्री पटेल की बायबल हे खरोखरच निर्माणकर्त्याचे प्रेरित वचन आहे. उदाहरणार्थ, दुःखाचे कारण, देवाचे राज्य, मानवजातीचे भविष्य, जीवनात आनंदी होण्याचा मार्ग यांसारख्या बायबलमधील शिकवणी समजून घेतल्यावर तुम्हाला देवाच्या बुद्धीची प्रचिती येईल. तुम्हालाही कदाचित पौलासारखे असे म्हणावेसे वाटेल: “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत!”—रोमकर ११:३३.

पुराव्याचे परीक्षण करताना जसजसा तुमचा विश्‍वास वाढेल तसतशी तुम्हाला खात्री पटेल की बायबलचे वाचन करताना आपण खरे तर निर्माणकर्त्याची वाणी ऐकत असतो. तो आपल्याला सांगतो: “मीच पृथ्वी केली व तीवर मनुष्ये उत्पन्‍न केली; मी म्हणजे माझ्या हातांनी आकाश पसरिले; मी आकाशसेनेस आज्ञा दिली.” (यशया ४५:१२) यहोवाच सर्व वस्तूंचा निर्माणकर्ता आहे याची खात्री करून घेतल्याबद्दल तुम्हाला कधीच पस्तावा होणार नाही! (w०८ १/१)

[१४ पानांवरील संक्षिप्त आशय]

प्रेषित पौलाने ग्रीक विद्वानांना सांगितले: ‘देवाने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण केली’

[१५ पानांवरील संक्षिप्त आशय]

उत्क्रांतीच्या सिद्धान्तानुसार आधुनिक मनुष्य हा सतत प्रगती करत असलेला प्राणी आहे; पण बायबलनुसार मात्र आधुनिक मनुष्य हा एका परिपूर्ण मनुष्याचा निकृष्ट होत जाणारा वंशज आहे

[१६ पानांवरील संक्षिप्त आशय]

“रैणवीय उत्क्रांतीला खरे मानण्याकरता कोणताही वैज्ञानिक आधार नाही”

[१७ पानांवरील संक्षिप्त आशय]

सजीव वस्तूंच्या अद्‌भुत रचनेविषयी मनन करताना आपण निर्माणकर्त्याच्या बुद्धीने अक्षरशः विस्मित होतो