व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुणपणच्या वाईट अनुभवांमुळे आलेल्या निराशेतून सुटका

तरुणपणच्या वाईट अनुभवांमुळे आलेल्या निराशेतून सुटका

तरुणपणच्या वाईट अनुभवांमुळे आलेल्या निराशेतून सुटका

एयूसेब्यो मॉर्सियो यांच्याद्वारे कथित

१९९३ सालच्या सप्टेंबर महिन्यात मी, उच्च-सुरक्षा तुरुंगात गेलो. कारण सांगतो. एका कैद्याच्या बाप्तिस्म्यासाठी. माझी धाकटी बहीण मॉरिवी हिच्या बाप्तिस्म्यासाठी. मी बाप्तिस्म्याचा विधी पार पाडत होतो तेव्हा काही कैदी आणि तुरुंग अधिकारी आदराने सर्व काही पाहत उभे होते. पण मी आणि ती येथे कसे आलो, ते सांगण्याआधी मी तुम्हाला आमच्या बालपणाविषयी थोडंसं सांगतो.

सन १९५४ सालच्या मे ५ रोजी माझा जन्म स्पेनमध्ये झाला. मी आठ मुलांमध्ये सर्वात मोठा मुलगा. मॉरिवीचा तिसरा नंबर. आमच्या आजीनं आम्हाला भक्‍तिमान कॅथलिक म्हणून लहानाचं मोठं केलं. तिच्याबरोबर असतानाच्या माझ्या लहानपणच्या गोड आठवणी आहेत. मलाही तेव्हा खूप भक्‍तीमान असल्यासारखं वाटायचं. पण माझ्या आईवडिलांच्या घरातलं वातावरण याच्या अगदी उलट होतं. बाबा, आईला आणि आम्हा मुलांना सारखं मारायचे. आमच्या घरात सतत भीतीचं वातावरण असायचं. आईला किती त्रास सहन करावा लागतोय हे पाहून मला खूप वाईट वाटायचं.

शाळेतलं वातावरणही वाईट होतं. आमचे एक शिक्षक जे पाळक होते ते, आम्ही चुकीचं उत्तर दिलं की आमचं डोकं भिंतीवर आपटायचे. दुसरा एक पाळक, मुलांचा गृहपाठ करवून घेताना त्यांचे लैंगिक शोषण करायचा. शिवाय, कॅथलिक शिकवणींतील नरकाग्नीसारख्या शिकवणींमुळे मी अतिशय गोंधळून गेलो होतो व भयभीत व्हायचो. यामुळे देवावरचा माझा भरवसा उडून गेला.

अर्थहीन जीवनशैलीत अडकणे

देव आपल्याकडून काय अपेक्षा करतो याबाबतीत योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे मी डिस्को क्लब्स्‌मध्ये अनैतिक व हिंसक लोकांबरोबर वेळ घालवू लागलो. तिथं बहुतेकदा भांडणं व्हायची. सुऱ्‍या, साखळ्या, काचांचे तुकडे, स्टूल यांचा शस्त्र म्हणून उपयोग केला जायचा. मी कधी या भांडणात पडायचो नाही, पण एकदा मला कुणीतरी इतकं जोरात मारलं की मी बेशुद्ध पडलो.

मला याही वातावरणाचा कंटाळा आला. मी शांत वातावरण असलेले डिस्को क्लब्स्‌ शोधू लागलो. तिथंही अंमली पदार्थांचे सेवन सर्रासपणे चालायचे. अंमली पदार्थ घेतल्यावर सुख आणि मनःशांती मिळण्याऐवजी मला भास होऊ लागले, चिंता वाढू लागली.

मी स्वतः या जीवनशैलीनं संतुष्ट नव्हतो तरीपण, माझ्या एका धाकट्या भावाला, होसे लुईसला आणि मीगल नावाच्या माझ्या एका जवळच्या मित्राला या जीवनशैलीत ओढलं. स्पेनमध्ये त्या काळच्या इतर अनेक तरुणांसोबत आम्हीही एका दुष्टचक्रात अडकलो होतो. अंमली पदार्थ विकत घेण्याकरता पैसे मिळावेत म्हणून मी कोणत्याही थराला जात असे. मी माझा सर्व स्वाभिमान गमावला होता.

यहोवा माझ्या मदतीला धावून येतो

याच काळात, मी माझ्या मित्रांबरोबर अनेकदा देव अस्तित्वात आहे का, जीवनाचा अर्थ काय आहे, याविषयांवर बोललो होतो. माझ्या भावना समजतील अशा व्यक्‍तीला शोधत मी देवाचा शोध सुरू केला. माझ्यासोबत फ्रॅन्सिस्को नावाचा एक गृहस्थ काम करायचा. तो इतरांपेक्षा वेगळा आहे हे मी पाहायचो. तो आनंदी दिसायचा. शिवाय तो इमानदार व दयाळू होता. त्यामुळे मी त्याला माझ्या भावना बोलून दाखवायचं ठरवलं. फ्रॅन्सिस्को यहोवाचा एक साक्षीदार होता. त्यानं मला, अंमली पदार्थांविषयीचा लेख असलेलं एक टेहळणी बुरूज मासिक दिलं.

हा लेख वाचल्यावर मी देवाला मदतीसाठी प्रार्थना केली. मी म्हटलं: “प्रभू, तू अस्तित्वात आहेस हे मला माहीत आहे. मला तुला जाणून घ्यायचं आहे आणि तुझी इच्छा पूर्ण करायची आहे. मला कृपा करून मदत कर!” फ्रॅन्सिस्को आणि इतर साक्षीदारांनी बायबलचा उपयोग करून मला प्रोत्साहन दिलं आणि ते मला बायबल आधारित प्रकाशनं देत राहिले. मी देवाला जी मदत मागितली होती ती या लोकांकरवी मिळत असल्याचं मला जाणवलं. लवकरच मी शिकत असलेल्या गोष्टी माझ्या मित्रांना आणि होसे लुईसला सांगू लागलो.

एकदा मी माझ्या मित्रांबरोबर एका गाण्याच्या मैफलीसाठी गेलो होतो. पण कार्यक्रम संपल्यानंतर मी त्यांना सोडून एकटाच चालू लागलो. मी त्यांच्याकडे असं पाहिलं जणू मी त्यांच्याबरोबर नव्हतोच. तेव्हाच मला जाणवलं, की अंमली पदार्थांच्या नशेखाली असताना आपलं आचरण किती हिणकस झालं होतं. अगदी त्याच क्षणी मी ती जीवनशैली सोडून देऊन यहोवाचा साक्षीदार बनण्याचं ठरवलं.

मी फ्रॅन्सिस्कोकडे बायबलची एक प्रत मागितली. त्यानं बायबलबरोबर मला सत्य जे चिरकालिक जीवनाकडे निरवते * हे पुस्तकही दिलं. देवाने सर्व अश्रू पुसून टाकण्याचं व मृत्यूही काढून टाकण्याचं वचन दिलं आहे याविषयी जेव्हा मी वाचलं तेव्हा माझी खात्री पटली की मला सत्य सापडलं आहे. आणि हे सत्य मानवजातीला बंधमुक्‍त करू शकतं. (योहान ८:३२; प्रकटीकरण २१:४) नंतर मी यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात होणाऱ्‍या एका सभेला उपस्थित राहिलो. तिथल्या लोकांमधील मैत्रीपूर्ण भावना व जिव्हाळा पाहून मी खूप प्रभावित झालो.

राज्य सभागृहातील अनुभव सांगण्याची मला खूप उत्सुकता होती. मी लगबगीने होसे लुईस आणि माझ्या इतर मित्रांना गोळा केलं आणि त्यांना सर्व सांगितलं. काही दिवसांनंतर आम्ही सर्व एका सभेला गेलो. आमच्या समोरच्या रांगेत एक मुलगी बसली होती. तिनं आमच्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलं. आम्हाला सर्वांना पाहून तिला खूप आश्‍चर्य वाटलं होतं, कारण आम्हा सर्वांचे हिप्पी लोकांसारखे लांब केस होते. तिने पुन्हा आमच्याकडे मागे वळून पाहण्याचा प्रयत्नच केला नाही. पण पुढच्या आठवडी आम्हाला पुन्हा पाहून तिला खूप आश्‍चर्य वाटलं. कारण या वेळेला आम्ही सुटा-बुटात व टाय लावून आलो होतो.

त्यानंतर मीगल आणि मी यहोवाच्या साक्षीदारांच्या एका विभागीय संमेलनाला सुद्धा उपस्थित राहिलो. यासारखा अनुभव पूर्वी आम्हाला कधी आला नव्हता—सर्व वयोमानाच्या लोकांमधील खरे बंधूप्रेम आम्ही पहिल्यांदा पाहत होतो. आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, हे संमेलन अगदी त्याच थिएटरमध्ये होतं जिथं मी त्या गाण्याच्या मैफलीसाठी गेलो होतो. पण या प्रसंगी तिथलं वातावरण प्रसन्‍न होतं आणि आमच्या मनाला उभारी येईल असं संगीत आत चाललं होतं.

आमचा संपूर्ण गट बायबलचा अभ्यास करू लागला. आठ महिन्यांनंतर म्हणजे, जुलै २६, १९७४ रोजी मीगल आणि मी बाप्तिस्मा घेतला. आम्ही दोघं तेव्हा २० वर्षांचे होतो. आमच्या गटातील इतर चौघांनी काही महिन्यांनंतर बाप्तिस्मा घेतला. मी घेतलेल्या बायबल प्रशिक्षणानं मला माझ्या अतिसहनशील आईला घरकामात मदत करण्यास व मला मिळालेल्या नवीन विश्‍वासाविषयी तिला सांगण्यास प्रवृत्त केलं. आम्ही माय-लेकरं एकमेकांच्या जवळ आलो. मी माझ्या धाकट्या भावंडांना मदत करण्यात माझा बहुतेक वेळ खर्च करायचो.

हळूहळू माझ्या आईनं आणि माझ्या भावडांपैकी एकाला सोडून इतर सर्वांनी बायबलमधील सत्य स्वीकारलं आणि त्यांनी यहोवाचा साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतला. सन १९७७ साली मी सोलदादशी लग्न केलं. ही तीच मुलगी होती जी, आम्ही जेव्हा राज्य सभागृहात पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा आम्हाला पाहून आश्‍चर्यचकित झाली होती. काही महिन्यातच आम्ही दोघंही पायनियर बनलो. पायनियर हे यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पूर्ण वेळेचे सुवार्तेचे प्रचारक असतात.

माझ्या प्रिय बहिणीची सुटका होते

माझी धाकटी बहीण मॉरिवी लहान असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यामुळे तिच्या मनावर जबरदस्त प्रभाव पडला होता. ती जेव्हा किशोरावस्थेत पोहचली तेव्हा तिने अनैतिक जीवनशैली निवडली होती. यांत अंमली पदार्थांचे सेवन, चोऱ्‍या, वेश्‍याव्यवसाय या सर्व गोष्टी होत्या. वयाच्या २३ व्या वर्षी तिला तुरुंगात टाकण्यात आलं. तिथंही तिची स्वच्छंदी जीवनशैली होती.

यावेळेपर्यंत मी यहोवाच्या साक्षीदारांमध्ये प्रवासी सेवक म्हणून अर्थात विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करू लागलो होतो. सन १९८९ मध्ये सोलदादला व मला मॉरिवी ज्या तुरुंगात होती त्या क्षेत्रात नेमणूक मिळाली. तुरुंग अधिकाऱ्‍यांनी अलिकडेच मॉरिवीकडून तिच्या मुलाला हिरावून घेतलं होतं. त्यामुळे ती पार उद्‌ध्वस्त झाली होती. तिच्यात जगण्याची कसलीच उमेद राहिली नव्हती. एकदा मी तिला भेटायला गेलो आणि तिला बायबलचा अभ्यास करण्यास सुचवलं. ती लगेच तयार झाली. एक महिना अभ्यास केल्यानंतर तिनं अंमली पदार्थांचं सेवन आणि तंबाखूचा वापर करण्याचं सोडून दिलं. यहोवा तिला आपल्या जीवनात बदल करण्यास कसं बळ देत होता, हे पाहून मला किती आनंद होत होता!—इब्री लोकांस ४:१२.

अभ्यास करायला सुरुवात केल्यापासून काही दिवसांतच मॉरिवी आपल्या सहकैद्यांना आणि तुरुंग अधिकाऱ्‍यांना बायबलमधून ती शिकत असलेल्या सत्य गोष्टी सांगू लागली. एका तुरुंगातून दुसऱ्‍या तुरुंगात तिची रवानगी होत असे तरीपण तिनं तिचं प्रचार कार्य चालू ठेवलं. एका तुरुंगात तर तिने एका कोठडीतून दुसऱ्‍या कोठडीत प्रचार कार्यही केलं. अनेक वर्षांमध्ये मॉरिवीनं, विविध तुरुंगात अनेक महिला सहकैद्यांबरोबर बायबल अभ्यास सुरू केले.

एकदा मॉरिवीनं माझ्यापुढे, तिला यहोवाला आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घ्यायचं आहे, अशी इच्छा व्यक्‍त केली. पण तिला तुरुंग सोडायची परवानगी नव्हती आणि तुरुंगात तिला बाप्तिस्मा देण्याची कोणाला परवानगी नव्हती. त्या तुरुंगाच्या भ्रष्ट वातावरणात तिनं आणखी चार वर्ष कसेबसे काढले. कोणत्या गोष्टीनं तिला आपला विश्‍वास मजबूत ठेवण्यास मदत केली होती? स्थानीय मंडळीत ज्या वेळेला सभा असायची अगदी त्याच वेळेला ती त्या कार्यक्रमाची आपल्या तुरुंगाच्या कोठडीत उजळणी करायची. तिचा नियमित बायबल अभ्यासाचा आणि प्रार्थनेचा एक नित्यक्रम होता.

कालांतराने मॉरिवीची एका उच्च-सुरक्षा तुरुंगात रवानगी करण्यात आली जेथे एक पोहण्याचा तलाव होता. या बदललेल्या परिस्थितीमुळे आता आपल्याला बाप्तिस्मा घेता येईल असं तिला वाटलं. आणि असंच घडलं. मॉरिवीला सरतेशेवटी परवानगी मिळाली. अशाप्रकारे मी तिथं तिच्या बाप्तिस्म्याचं भाषण देण्यासाठी गेलो. तिच्या जीवनातल्या सर्वात महत्त्वाच्या क्षणी मी तिच्याबरोबर तिथं हजर होतो.

मॉरिवीनं सत्य स्वीकारण्याआधी तिच्या अनैतिक जीवनशैलीमुळे तिला एड्‌स झाला. तरीपण नंतर, तिच्या उत्तम वर्तनामुळे तिची तुरुंगातून लवकर सुटका करण्यात आली. १९९४ सालच्या मार्च महिन्यात तिची सुटका झाली. ती घरी आईसोबत राहू लागली आणि त्यानंतर दोन वर्षांनंतर तिचा मृत्यू झाला. पण या दोन वर्षांत ती सक्रिय ख्रिस्ती म्हणून जगली.

विनाशकारक भावनांवर मात करणे

माझ्या पूर्वीच्या जीवनशैलीच्या परिणामांपासून मीही पूर्णपणे मुक्‍त झालेलो नाही. माझ्या वडिलांच्या हातून मला जो त्रास सहन करावा लागला होता आणि किशोरवयात मी ज्याप्रकारचं जीवन जगलो होतो त्याचा माझ्या व्यक्‍तिमत्त्वावर परिणाम झाला आहे. प्रौढ झाल्यावर अपराधीपणाच्या आणि आत्म-सन्मान गमावल्याच्या भावनांनी मी अनेकदा त्रस्त झालो आहे. कधीकधी मी खूप निराश झालो आहे. तरीपण देवाच्या वचनानं मला, अस्वस्थ करणाऱ्‍या या भावनांवर मात करण्यात अमूल्य मदत दिली आहे. यशया १:१८ आणि स्तोत्र १०३:८-१३ यासारख्या वचनांवर सतत मनन केल्यामुळे इतक्या वर्षांपासून माझ्या मनात वारंवार येणाऱ्‍या अपराधीपणाच्या भावना मी मारू शकलो आहे.

निरर्थकपणाच्या भावनांवर मात करण्याकरता आणखी एक उपयोगी आध्यात्मिक शस्त्र म्हणजे प्रार्थना. मी कितीदातरी यहोवाला अश्रू गाळत प्रार्थना केली आहे. तरीपण, १ योहान ३:१९, २० मधील शब्दांतून मला बळ मिळाले आहे: “आपण सत्याचे आहो हे ह्‍यावरून आपल्याला कळून येईल; आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरविते त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ; कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते.”

मी “भग्न व अनुतप्त” हृदयाने यहोवाला प्रामाणिकपणे प्रार्थना करत असल्यामुळे मला जाणवते की मी पूर्वी स्वतःला जितकं वाईट समजत होतो तितका वाईट नाही. यहोवाचा शोध घेणाऱ्‍या सर्वांना बायबल असे आश्‍वासन देते, की जे आपल्या गत वर्तनाबद्दल मनापासून पश्‍चात्ताप करतात व देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे वळतात त्यांना तो तुच्छ लेखत नाही.—स्तोत्र ५१:१७.

जेव्हा जेव्हा माझ्या मनात शंकेच्या भावना येतात तेव्हा तेव्हा मी, फिलिप्पैकर ४:८ मध्ये सांगितलेल्या आध्यात्मिक गोष्टींनी अर्थात सद्‌विचारांनी माझं मन भरण्याचा प्रयत्न करतो. मी २३ वे स्तोत्र आणि डोंगरावरील प्रवचन तोंडपाठ केलं आहे. माझ्या मनात नकारात्मक भावना येतात तेव्हा मी या अध्यायातील वचनं बोलत राहतो. ही अशाप्रकारची मानसिक साफ-सफाई, मला रात्रीची झोप लागत नाही तेव्हा खूप फायदेकारक ठरली आहे.

आणखी एक मदत मला माझ्या पत्नीकडून व इतर प्रौढ ख्रिस्ती बंधूभगिनींनी दिलेल्या प्रोत्साहनातून मिळाली आहे. सुरुवातीला मला त्यांचे प्रोत्साहनदायक शब्द देखील टोचायचे. पण बायबलनं मला, खरे प्रेम ‘सर्व काही खरे मानते,’ हे समजण्यास मदत केली. (१ करिंथकर १३:७) आणि हो, मी देखील हळूहळू माझ्या कमतरता नम्रपणे मान्य करायला शिकलो आहे.

माझ्या मनात येणाऱ्‍या विनाशकारक भावनांचा अनुभव घेतल्याने मला एक लाभ देखील झाला आहे. तो म्हणजे, मला सहानुभूतीशील प्रवासी पर्यवेक्षक बनण्यास मदत झाली आहे. आम्ही पती-पत्नीनं दोघांनी प्रत्येकी जवळजवळ ३० वर्ष सुवार्तेचे पूर्ण वेळेचे प्रचारक म्हणून सेवा केली आहे. इतरांची सेवा केल्यामुळे मिळणाऱ्‍या आनंदामुळे माझ्या मनात येणाऱ्‍या नकारात्मक भावना आणि माझ्या कटू अनुभवांच्या आठवणी पुसट होतात.

यहोवानं माझ्यावर आशीर्वादांचा जो वर्षाव केला त्याबद्दल जेव्हा मी विचार करतो तेव्हा स्तोत्रकर्त्याप्रमाणे मलाही असे म्हणावेसे वाटते: “परमेश्‍वराचा धन्यवाद कर; . . . तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करितो; तो तुझे सर्व रोग बरे करितो; तो तुझा जीव विनाशगर्तेंतून उद्धरितो; तो तुला दया व करुणा ह्‍यांचा मुकुट घालितो.”—स्तोत्र १०३:१-४. (w०८ १/१)

[तळटीप]

^ परि. 14 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, पण सध्या छापले जात नाही.

[३० पानांवरील संक्षिप्त आशय]

अपराधीपणाच्या आणि आत्म-सन्मान गमावल्याच्या भावनांनी मी अनेकदा त्रस्त झालो आहे. तरीपण देवाच्या वचनानं मला, अस्वस्थ करणाऱ्‍या या भावनांवर मात करण्यात अमूल्य मदत दिली आहे

[२७ पानांवरील चित्रे]

माझा भाऊ होसे लुईस आणि माझा मित्र मीगल यांनी माझं वाईट आणि चांगलं उदाहरण अनुसरलं

[२८, २९ पानांवरील चित्र]

१९७३ मध्ये मॉर्सियो कुटुंब

[२९ पानांवरील चित्र]

तुरुंगात असताना मॉरिवी

[३० पानांवरील चित्र]

माझी पत्नी सोलदादबरोबर