व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला हे माहीत होते का?

तुम्हाला हे माहीत होते का?

तुम्हाला हे माहीत होते का?

मागी लोक येशूला भेटायला केव्हा आले?

मत्तयाच्या शुभवर्तमानात आपल्याला असे सांगण्यात येते की “पूर्वेकडून मागी लोक” येशूला भेटायला आले आणि त्यांनी त्याच्यासाठी भेटवस्तूही आणल्या. (मत्तय २:१-१२) येशूला भेटायला येणाऱ्‍या या मागी लोकांत कितीजण होते हे सांगितलेले नाही. परंपरागत धारणेनुसार तीन ज्योतिषी किंवा “मागी” येशूला भेटायला आले होते पण असे मानण्याकरता कोणताही ठोस आधार नाही. बायबलमधील अहवालात त्यांची नावेही सांगण्यात आलेली नाहीत.

न्यू इंटरनॅशनल व्हर्शन स्टडी बायबलमध्ये मत्तय २:११ या वचनावर अशी टिपणी केली आहे: “परंपरागत धारणेनुसार मेंढपाळांप्रमाणेच मागी लोकही येशूचा जन्म झाला त्याच रात्री त्याला गव्हाणीत भेटायला आले होते. पण ही धारणा चुकीची आहे. ते काही महिन्यांनंतर आले आणि तेव्हा येशू एक ‘बाळक’ होता व आपल्या ‘घरात’ होता.” हे आणखी एका गोष्टीवरून सिद्ध होते. हेरोदने येशूला ठार मारण्याच्या प्रयत्नात बेथलेहेम व जवळपासच्या प्रांतातल्या दोन वर्षांखालील सर्व मुलांची कत्तल करण्याचा आदेश दिला होता. येशूच्या जन्माची “वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती” आणि त्यानुसार त्याने या विशिष्ट वयोगटाच्या मुलांची कत्तल करण्याचा हुकूम दिला.—मत्तय २:१६.

बायबल सांगते की मागी लोक येशूला भेटायला आले व त्यांनी त्याला सोन्याच्या व इतर अमूल्य भेटवस्तू दिल्या. जर ही घटना येशूचा जन्म झाला त्याच रात्री घडली असती, तर ४० दिवसांनंतर जेव्हा मरीयेने येशूला जेरूसलेमच्या मंदिरात समर्पणासाठी आणले तेव्हा तिने फक्‍त दोन पक्षांचा यज्ञ केला नसता. (लूक २:२२-२४) नियमशास्त्रानुसार ही तरतूद, मेंढा अर्पण करण्याची ज्यांची ऐपत नव्हती अशा गरीब लोकांकरता होती. (लेवीय १२:६-८) पण या मौल्यवान भेटवस्तू येशूच्या कुटुंबाला अगदी गरजेच्या वेळी मिळाल्या असे म्हणता येईल. कारण त्यांना ईजिप्तमध्ये जाऊन राहावे लागले तेव्हा तिथला खर्च भागवण्याकरता या मौल्यवान वस्तू त्यांना उपयोगी पडल्या असतील.—मत्तय २:१३-१५.

लाजराच्या कबरेजवळ यायला येशूला चार दिवस का लागले?

येशूने मुद्दामहून तेथे येण्यास उशीर लावला असे दिसते. असे आपण का म्हणू शकतो? योहानाच्या ११ व्या अध्यायात दिलेला अहवाल पाहा.

बेथानी येथे राहणारा येशूचा मित्र लाजर, जेव्हा गंभीररित्या आजारी पडला तेव्हा त्याच्या बहिणींनी येशूला तसा निरोप पाठवला. (१-३ वचने) त्यावेळी येशू बेथानीपासून दोन दिवसांच्या अंतरावर होता. (योहान १०:४०) येशूला निरोप मिळेपर्यंत लाजरचा मृत्यू झाला असावा. येशूने मग काय केले? “तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला” आणि मग बेथानीला जायला निघाला. (६, ७ वचने) अशारितीने, दोन दिवस थांबल्यामुळे आणि मग दोन दिवसांचा प्रवास यामुळे येशू लाजरच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी त्याच्या कबरेजवळ आला.—वचन १७.

यापूर्वी येशूने दोन पुनरुत्थाने केली होती. एक, मृत्यू झाल्यावर लगेच आणि दुसरे, मृत्यू झाल्यावर काही वेळाने पण त्याच दिवशी. (लूक ७:११-१७; ८:४९-५५) पण ज्याचा मृत्यू होऊन चार दिवस झाले होते आणि ज्याचे शरीर कुजू लागले होते अशा व्यक्‍तीला तो पुन्हा उठवू शकत होता का? (३९ वचन) बायबलवरील एका संदर्भ ग्रंथात एक लक्षवेधक मुद्दा आढळतो. या ग्रंथानुसार यहुद्यांची अशी एक धारणा होती की “ज्याचा मृत्यू होऊन चार दिवस झाले असतील” त्याला कोणतीही आशा नाही; कारण “तोपर्यंत शरीर कुजू लागते आणि आत्मा, जो तीन दिवस शरीरावरच तरंगत राहतो तो चौथ्या दिवशी शरीराला सोडून निघून जातो.”

लाजराच्या कबरेजवळ जमलेल्यांपैकी काहीजणांच्या मनात कदाचित शंका असतील. पण काही क्षणांतच ते येशूचे सामर्थ्य आपल्या डोळ्यांनी पाहणार होते. कबरेवरची धोंड काढण्यात आल्यावर येशू मोठ्याने म्हणाला: “लाजरा बाहेर ये!” तेव्हा “जो मेलेला होता तो बाहेर आला.” (४३, ४४ वचने) त्याअर्थी, मृत्यूनंतरही आत्मा जिवंत राहतो ही कल्पना खोटी असून पुनरुत्थानाची आशा हीच मृतांकरता एक खरी आशा आहे.—यहेज्केल १८:४; योहान ११:२५. (w०८ १/१)