देवाचे राज्य आपल्या हृदयात आहे का?
वाचक विचारतात
देवाचे राज्य आपल्या हृदयात आहे का?
पुष्कळ लोक होय, असेच म्हणतील. जसे की, द कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ असा दावा करतो: “देवाचे राज्य याचा अर्थ . . . आपल्या हृदयात देव करत असलेले राज्य.” चर्चमधील पाळक सर्रासपणे ही शिकवण देतात. पण, देवाचे राज्य आपल्या हृदयात आहे, अशी शिकवण बायबलमध्ये देण्यात आली आहे का?
देवाचे राज्य मानवाच्या हृदयात वास करते, या धारणेची सुरुवात खुद्द येशूनेच केली असे काहींचे म्हणणे आहे. “पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे,” असे येशूने जरूर म्हटले. (लूक १७:२१) काही भाषांतरांमध्ये या वचनाचे भाषांतर अशाप्रकारे करण्यात आले आहे: “देवाचे राज्य तुमच्या आत आहे.” पण हे येशूने काढलेल्या उद्गारांचे अचूक भाषांतर आहे का? देवाचे राज्य खरोखरच मानवांच्या हृदयात वास करते, असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता का?
सर्वात आधी आपण, मानवाचे हृदय म्हणजे काय ते पाहू या. बायबलमध्ये जेव्हा हृदयाचा उल्लेख येतो तेव्हा तो लाक्षणिक हृदयाला अर्थात मानवाचे अंतर्मन म्हणजे एका व्यक्तीचे विचार, मनोवृत्ती आणि भावना यांचे उगमस्थान, यांना सूचित करतो. देवाच्या राज्यासारखी पवित्र गोष्ट जी लोकांमध्ये बदल घडवून त्यांना धार्मिक बनवू शकते, ती मानवाच्या हृदयात वास करते ही धारणा आकर्षक वाटेल पण ती तर्काला पटण्यासारखी आहे का?
बायबल आपल्याला असे सांगते: “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.” (यिर्मया १७:९) स्वतः येशूने असे म्हटले: “आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा.” (मार्क ७:२०-२२) आता विचार करा: आपण जगात पाहत असलेले बहुतेक दुःख हे, मानवाच्या पापी हृदयातूनच सुरू झालेले असते, नाही का? मग देवाचे परिपूर्ण राज्य अशा उगमस्थानातून कसे काय येऊ शकते? होय, ज्याप्रकारे रिंगणीच्या झाडांवरून अंजीर निघत नाहीत त्याचप्रकारे मानवाच्या हृदयातून देवाचे राज्य येऊ शकत नाही.—मत्तय ७:१६.
दुसरी गोष्ट. लूक १७:२१ मध्ये लिहिलेले शब्द येशूने ज्या लोकांना उद्देशून म्हटले त्या लोकांबद्दल विचार करा. आधीच्या वचनात असे म्हटले आहे: “देवाचे राज्य केव्हा येईल असे परूश्यांनी विचारले असता त्याने त्यांस उत्तर दिले.” (लूक १७:२०) परूशी लोक येशूचा द्वेष करायचे. हे परूशी देवाच्या राज्यात जाणार नाहीत, असे येशू म्हणाला होता. (मत्तय २३:१३) आता, जर परूशी लोक देवाच्या राज्यात जाणार नव्हतेत तर हे राज्य त्यांच्या हृदयात वास करणे शक्य आहे का? मुळीच शक्य नाही! मग येशूच्या बोलण्याचा काय अर्थ होता?
येशूच्या शब्दांचे भाषांतर करताना, काळजीपूर्वक भाषांतर केलेल्या अनेक बायबल अनुवादांमध्ये, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन प्रमाणेच शब्द वापरण्यात आले आहेत. काही जण म्हणतात, की देवाचे राज्य “तुमच्या मध्ये” आहे. येशूच्या दिवसांतील लोकांच्या आणि परूशांच्या मध्ये हे राज्य कसे होते? यहोवा देवाने त्याच्या राज्याचा राजा होण्याकरता येशूला नियुक्त केले होते. त्यामुळे, हा नियुक्त राजा येशू, लोकांच्या मध्ये होता. त्याने लोकांना या राज्याविषयी शिकवले. त्याने अनेक चमत्कार करून, या राज्यात काय काय साध्य केले जाईल त्याची एक पूर्वझलक दिली. तेव्हा, खऱ्या अर्थाने देवाचे राज्य त्यांच्या मध्ये होते.
देवाचे राज्य मानवाच्या हृदयात वास करते या धारणेला शास्त्रवचनात कसलाही आधार नाही, हे स्पष्ट झाले आहे. शास्त्रवचनानुसार, देवाचे राज्य हे एक वास्तविक सरकार आहे जे पृथ्वीवर आमूलाग्र बदल घडवून आणणार आहे. या राज्याविषयी अनेक संदेष्ट्यांनी भाकीत केले होते.—यशया ९:६, ७; दानीएल २:४४. (w०८ १/१)