व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचे राज्य काय आहे?

देवाचे राज्य काय आहे?

देवाचे राज्य काय आहे?

येशूच्या प्रचाराचा मुख्य विषय काय होता? येशूने स्वतःच सांगितल्याप्रमाणे त्याच्या प्रचाराचा मुख्य विषय देवाचे राज्य हा होता. (लूक ४:४३) लोक त्याचे उपदेश ऐकायचे, तेव्हा त्यांना या राज्याचा उल्लेख बरेचदा ऐकायला मिळायचा. तेव्हा ते गोंधळून जायचे का? हे राज्य काय आहे असे ते येशूला विचारायचे का? नाही. येशूच्या जीवनाचा अहवाल देणाऱ्‍या बायबलमधील पुस्तकांत आपल्याला असे आढळत नाही. त्याअर्थी, देवाचे राज्य हा विषय त्या लोकांच्या ओळखीचा होता असा निष्कर्ष आपण काढू शकतो का?

खरे पाहता, यहुद्यांच्या प्राचीन पवित्र ग्रंथांत या राज्याचे वर्णन करण्यात आले होते. त्यांत हे राज्य काय आहे आणि त्यामार्फत काय साध्य केले जाईल याविषयी अगदी सुस्पष्ट व सुनिश्‍चित पद्धतीने सांगण्यात आले होते. आज तर आपल्याला त्या यहुद्यांच्या तुलनेत या राज्याबद्दल कितीतरी जास्त प्रमाणात माहिती उपलब्ध आहे आणि ही माहिती आपण त्याच पद्धतीने मिळवू शकतो. अर्थात, बायबलचा वापर करून. तर आता आपण देवाच्या राज्याविषयी बायबलमध्ये शिकवण्यात आलेले सात महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊ या. यांपैकी पहिले तीन मुद्दे जाणून घेणे येशूच्या काळातल्या यहुद्यांना व त्याही आधी राहणाऱ्‍या लोकांना सहज शक्य होते. त्यानंतरचे तीन मुद्दे पहिल्या शतकात एकतर ख्रिस्ताने किंवा त्याच्या प्रेषितांनी प्रकट केले. शेवटला मुद्दा आपल्या काळात स्पष्ट झाला आहे.

१. देवाचे राज्य एक वास्तविक सरकार आहे व ते सर्वकाळ टिकून राहील. बायबलमधील पहिल्या भविष्यवाणीतून हे स्पष्ट झाले की विश्‍वासू मानवजातीची सुटका करण्यासाठी देव एका तारणकर्त्याला पाठवील. त्याला “संतति” म्हणण्यात आले आणि तो आदाम, हव्वा व सैतान यांनी केलेल्या बंडामुळे जे भयानक दुष्परिणाम घडून आले ते नाहीसे करील असे भाकीत करण्यात आले. (उत्पत्ति ३:१५) बऱ्‍याच काळानंतर, विश्‍वासू राजा दावीद याला या ‘संततिविषयी’ किंवा मशीहाविषयी अत्यंत रोमांचक अशी माहिती देण्यात आली. हा मशीहा एक राजा बनून शासन करील; त्याचे सरकार इतर सर्व सरकारांपेक्षा वेगळे असेल आणि ते सर्वकाळ टिकेल असे त्याला सांगण्यात आले.—२ शमुवेल ७:१२-१४.

२. देवाचे राज्य सर्व मानवी सरकारांना नष्ट करेल. संदेष्टा दानीएल याला एक दृष्टान्त देण्यात आला व त्या दृष्टान्तात त्याला सबंध इतिहासात, अगदी आपल्या काळापर्यंत जी निरनिराळी साम्राज्ये एकापाठोपाठ येणार होती त्यांची झलक दाखवण्यात आली. दानीएलाच्या त्या दृष्टान्ताच्या शेवटी येणारे हे रोमांचक विधान पाहा: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” त्याअर्थी, या जगातली सर्व राज्ये, किंवा सरकारे व त्यांनी घडवून आणलेली युद्धे, अत्याचार, व भ्रष्टाचार कायमचा नाहीसा होईल. दानीएलाच्या भविष्यवाणीतून आपल्याला कळते की देवाचे राज्य लवकरच सबंध पृथ्वीवर राज्य करेल. (दानीएल २:४४, ४५) हे एक वास्तविक सरकार असून, हे एकच सरकार पृथ्वीवर अस्तित्वात राहील. *

३. देवाचे राज्य युद्धे, रोगराई, दुष्काळ, इतकेच काय तर मृत्यूही काढून टाकेल. बायबलमधील भविष्यवाण्या, देवाचे राज्य या पृथ्वीवर कोणते बदल घडवून आणेल यावर प्रकाश टाकतात. हे सरकार जे साध्य करेल ते आजपर्यंत कोणतीही मानवी संस्था साध्य करू शकलेली नाही आणि भविष्यातही साध्य करू शकणार नाही. कल्पना करा—युद्धाची सर्व शस्त्रे कायमची नष्ट करण्यात आली आहेत! “तो दिगंतापर्यंत लढाया बंद करितो.” (स्तोत्र ४६:९) डॉक्टर, इस्पितळे किंवा कोणत्याही प्रकारचे आजार राहिलेले नाहीत. “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) दुष्काळ नाहीत, अन्‍नाचा तुटवडा, कुपोषण किंवा उपासमार नाही. “पृथ्वीवरील डोंगरांच्या माथ्यांवर भरपूर धान्य होईल.” (स्तोत्र ७२:१६, पं.र.भा.) अंत्यविधी, शोकसभा, स्मशानभूमी, शवालये आणि या सर्वांशी संबंधित असलेले प्रचंड दुःख राहणार नाही. मानवाच्या अजिंक्य शत्रूला म्हणजेच मृत्यूला शेवटी पराजित केले जाईल. देव “मरणाला कायमचे गिळून टाकील, आणि प्रभू यहोवा सर्व मुखांवरील आसवे पुसून टाकील.”—यशया २५:८, पं.र.भा.

४. देवाच्या राज्याचा देवानेच निवडलेला एक शासक आहे. मशीहाने स्वतःला नियुक्‍त केलेले नाही आणि त्याला अपरिपूर्ण मानवांनीही निवडले नाही. तर यहोवा देवाने स्वतः त्याला निवडले आहे. मशीहा व ख्रिस्त या पदव्यांवरूनच हे सिद्ध होते. या दोन्ही शब्दांचा अर्थ “अभिषिक्‍त” असा होतो. तर हा राजा अभिषिक्‍त आहे अर्थात त्याच्या खास पदावर त्याला यहोवाने नियुक्‍त केले आहे. त्याच्याविषयी देव असे म्हणतो: “पाहा, हा माझा सेवक, याला मी आधार आहे; पाहा हा माझा निवडलेला, याजविषयी माझा जीव संतुष्ट आहे; याच्याठायी मी आपला आत्मा घातला आहे; तो राष्ट्रांस न्याय प्राप्त करून देईल.” (यशया ४२:१; मत्तय १२:१७, १८) आपल्याला कोणत्या प्रकारच्या शासकाची गरज आहे हे आपल्या निर्माणकर्त्यापेक्षा आणखी कोणाला माहीत असू शकते?

५. देवाच्या राज्याच्या शासकाने सर्व मानवजातीसमोर आपली योग्यता सिद्ध करून दाखवली आहे. भाकीत केलेला मशीहा नासरेथचा येशू असल्याचे कालांतराने सिद्ध झाले. त्याचा जन्म देवाने निश्‍चित केलेल्या कुळात झाला. (उत्पत्ति २२:१८; १ इतिहास १७:११; मत्तय १:१) पृथ्वीवर असताना, मशीहाविषयी शेकडो वर्षांपूर्वी सांगितलेल्या अनेक भविष्यवाण्या त्याच्या बाबतीत खऱ्‍या ठरल्या. तो मशीहा असल्याची साक्ष स्वर्गातूनही देण्यात आली. ती कशी? देवाने स्वतः आकाशवाणी करून येशू आपला पुत्र असल्याचे कबूल केले; देवदुतांनीही त्याची ओळख भाकीत केलेला मशीहा यारितीने करून दिली. शिवाय, येशूने शेकडो, कित्येकदा तर हजारो लोकांसमोर जे अनेक चमत्कार केले ते त्याने देवाच्या सामर्थ्याने केले हे अगदी स्पष्टच होते. * येशूने पुन्हा पुन्हा हे दाखवले की भविष्यात तो कशाप्रकारचा शासक असेल. लोकांना मदत करण्याचे त्याच्याजवळ केवळ सामर्थ्यच नव्हते, तर त्यांना मदत करण्याची त्याला मनापासून इच्छा देखील होती. (मत्तय ८:१-३) तो निःस्वार्थ, दयाळू, धैर्यवान व नम्र होता. पृथ्वीवरील त्याच्या जीवनाचा अहवाल बायबलमध्ये सर्वांकरता उपलब्ध आहे.

६. देवाच्या राज्यात ख्रिस्तासोबत १,४४,००० सहशासक राज्य करतील. येशूने सांगितले की इतरजणही स्वर्गात त्याच्यासोबत राज्य करतील. यांत त्याच्या प्रेषितांचाही समावेश असेल. या गटाला त्याने ‘लहान कळप’ म्हणून संबोधले. (लूक १२:३२) नंतर, प्रेषित योहानाला सांगण्यात आले की या लहान कळपातील सदस्यांची संख्या १,४४,००० इतकी असेल. त्यांच्यावर स्वर्गात ख्रिस्ताच्या सोबत राजे व याजक म्हणून कार्य करण्याची अतिशय खास जबाबदारी सोपवली जाईल.—प्रकटीकरण ५:९, १०; १४:१, ३.

७. देवाचे राज्य सध्या स्वर्गात सुरू आहे आणि ते सबंध पृथ्वीवर राज्य करू लागण्यास सुसज्ज आहे. हा शेवटला मुद्दा सर्वात रोमांचकारी आहे. येशूला स्वर्गात राजपद बहाल करण्यात आले आहे हे सिद्ध करण्यासाठी बायबलमध्ये भरपूर पुरावा आहे. तो सध्या, म्हणजे आपल्या काळात स्वर्गात राज्य करत आहे आणि फार लवकर तो सबंध पृथ्वीवरही राज्य करू लागेल आणि याआधी उल्लेख केलेल्या अद्‌भुत भविष्यवाण्या पूर्ण करेल. पण देवाचे राज्य सध्या स्वर्गात सुरू आहे हे आपण खात्रीने कसे म्हणू शकतो? आणि ते पृथ्वीवर केव्हा राज्य करू लागेल? (w०८ १/१)

[तळटीपा]

^ परि. 5 यांसारख्या भविष्यवाण्या स्पष्ट करतात की देवाचे राज्य हे आपल्या अंतःकरणात असते असे जे बऱ्‍याच जणांना शिकवण्यात आले आहे ते मुळात खरे नाही. “वाचक विचारतात” हा पृष्ठ १३ वरील लेख पाहावा.

^ परि. 8 उदाहरणार्थ, मत्तय ३:१७; लूक २:१०-१४; योहान ६:५-१४ ही वचने पाहावीत.