‘मनोहर वचनांनी’ आपल्या कुटंबाचे मनोबल वाढवा
‘मनोहर वचनांनी’ आपल्या कुटंबाचे मनोबल वाढवा
घड्याळाचा काटा जसजसा पुढे सरकत होता, तसतसा डेव्हिडचा पाराही चढत होता. कारमध्ये बसून बायकोची वाट पाहताना त्याची नजर सारखी घड्याळावर जात होती. शेवटी त्याची बायको डायान घराबाहेर आली, तेव्हा त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला.
“किती वेळ थांबायचं मी प्रत्येक वेळेस?” तो तिच्यावर खेकसला. “नेहमी उशीर लावतेस! कधीच कसं वेळेवर होत नाही तुझं?”
डायानचा चेहरा एवढासा झाला. तिला रडू कोसळलं. ती तशीच धावत घरात गेली. त्या क्षणी डेव्हिडला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याच्या रागाच्या उद्रेकामुळे समस्या सुटण्याऐवजी आणखीनच वाढली होती. आता काय करावं? त्यानं गाडी बंद केली, दीर्घ श्वास सोडला आणि तिच्या मागोमाग तोही घरात गेला.
या उदाहरणात वर्णन केलेला प्रकार बरेचदा घडतो, नाही का? तुम्हाला कधी आपण बोललेले शब्द मागे घ्यावेसे वाटले आहे का? आपण विचार न करता बोलतो, तेव्हा सहसा आपल्या तोंडून असे शब्द निघतात की ज्यांबद्दल आपल्याला नंतर पस्तावा होतो. म्हणूनच बायबल म्हणते: “धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो.”—नीतिसूत्रे १५:२८.
पण बोलण्याआधी स्पष्टपणे विचार करणे नेहमीच सोपे नसते. विशेषतः जेव्हा आपण रागात असतो, घाबरलेले असतो किंवा आपल्या भावना दुखावल्या जातात तेव्हा विचार करून बोलणे आपल्याला जड जाते. आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण स्वतःच्या कुटुंबातल्या सदस्यांशी बोलत असतो तेव्हा, आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवण्याच्या प्रयत्नात आपण नकळत त्यांच्यावर दोष लावतो किंवा त्यांची टीका करतो. यामुळे त्यांच्या भावना दुखावू शकतात आणि वादविवादांचे रूपांतर भांडणात होऊ शकते.
असे घडू नये म्हणून आपण काय करू शकतो? आपल्या भावनांवर आपल्याला नियंत्रण कसे ठेवता येईल? बायबलचा एक लेखक शलमोन याच्या लिखाणातून आपण या बाबतीत उपयोगी सल्ला मिळवू शकतो.
काय बोलावे व कसे बोलावे याचा विचार करा
बायबलमधील उपदेशक या पुस्तकाचा लेखक शलमोन याने जीवनाच्या व्यर्थतेविषयी विचारशील कथन केले. या विषयावर त्याच्या भावना किती उत्कट होत्या, हे उपदेशक पुस्तकातील मजकूर वाचल्यावर आपल्या लक्षात येते. त्याने म्हटले: ‘मला जीविताचा वीट आला.’ एका ठिकाणी तर त्याने म्हटले “सर्व काही व्यर्थ!” (उपदेशक २:१७; १२:८) तरीसुद्धा, उपदेशक या पुस्तकात केवळ शलमोनाच्या नैराश्याच्या भावना व्यक्त केलेल्या नाहीत. जीवनाच्या फक्त नकारात्मक बाबींविषयीच बोलणे शलमोनाला योग्य वाटले नाही. या पुस्तकाच्या शेवटी शलमोन आपल्याला सांगतो की त्याने ‘सत्य व मनोहर वचने शोधण्याचा प्रयत्न केला.’ (उपदेशक १२:१०) दुसऱ्या एका भाषांतरात म्हटले आहे की त्याने “या गोष्टी सर्वात चांगल्या व अचूक पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला.”—कंटेमप्ररी इंग्लिश व्हर्शन.
साहजिकच शलमोनाला याची जाणीव होती की आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. एका अर्थाने, त्याने वारंवार स्वतःला हे विचारले: ‘मी जे सांगणार आहे ते खरोखरच सत्य व अचूक आहे का? जर मी हे शब्द वापरले तर इतरांना ते मनोहर, म्हणजेच ऐकायला चांगले वाटतील का?’
सत्याची “मनोहर वचने” शोधल्यामुळे तो भावनांच्या ओघात वाहवत न जाता, आपले विचार व्यक्त करू शकला.परिणामस्वरूप, त्याने केलेले लिखाण हे केवळ उत्कृष्ट साहित्यच ठरले नाही, तर जीवनाच्या अर्थासंबंधी देवाने प्रेरित केलेल्या बुद्धीचे स्रोत ठरले. (२ तीमथ्य ३:१६, १७) शलमोनाने हा नाजूक विषय ज्याप्रकारे हाताळला, त्यावरून आपल्याला आपल्या प्रियजनांसोबत अधिक चांगल्याप्रकारे संवाद साधण्यासंबंधी काही शिकता येईल का? एक उदाहरण पाहा.
भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिका
समजा, एक मुलगा शाळेतून घरी येतो. त्याच्या हातात त्याचे प्रगतीपत्रक आहे. त्याचा चेहरा हिरमुसलेला आहे. त्याचे वडील त्याच्या प्रगतीपत्रकावर विषयांची यादी पाहतात. एका विषयात तो नापास झाला आहे, हे पाहताच वडिलांना राग येतो. मुलाने कितीतरी वेळा आपला गृहपाठ करण्याकडे दुर्लक्ष केले होते, हे त्यांना आठवते. त्यांना म्हणावेसे वाटते: “पाहिलेत आळशीपणाचे परिणाम! असंच करत राहिलास तर काहीच मिळवणार नाहीस तू आयुष्यात!”
पण या नकारात्मक भावनांच्या आहारी जाऊन काहीही बोलण्याआधी वडिलांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, ‘मी विचार करतोय ते खरे किंवा अचूक आहे का?’ हा प्रश्न त्यांना आपल्या भावनांना वस्तूस्थितीपासून वेगळे करण्यास मदत करेल. (नीतिसूत्रे १७:२७) आपला मुलगा एका विषयात नापास झाला म्हणून खरच का तो आयुष्यात काहीही मिळवू शकणार नाही? तो मुळातच आळशी आहे का की विषय कठीण वाटत असल्यामुळे तो गृहपाठ करण्यास टाळमटाळ करतो? बायबलमध्ये वारंवार सौम्य, व वाजवी दृष्टिकोनाने विचार करण्याच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे. (तीत ३:२; याकोब ३:१७) मुलांचे मनोबल वाढवण्याकरता आईवडिलांनी ‘सत्य वचने’ बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
योग्य शब्दांची निवड करा
आपल्याला काय म्हणायचे आहे हे ठरवल्यावर वडील स्वतःला असे विचारू शकतात, ‘मला जे सांगायचं आहे ते माझ्या मुलाला ऐकायला चांगलं वाटावं आणि मान्य करायला सोपं जावं म्हणून मी ते शब्दांत कशाप्रकारे मांडू शकतो?’ योग्य शब्दांची निवड करणे अर्थातच सोपे नसते. पण आईवडिलांनी हे आठवणीत ठेवले पाहिजे की किशोरवयीन मुले सहसा टोकाचा विचार करतात. त्यांच्या मते कोणतीही गोष्ट एकतर पांढरी नाहीतर काळी असते. त्यामुळे, एकदा अपयश पदरी पडले की ते अपयश किंवा ती कमजोरी त्यांना खूपच मोठी वाटू लागते. त्या एका अपयशामुळे आपल्यातच काहीतरी खोट आहे असे त्यांचे मत बनते. आईवडिलांनी अवाजवी प्रतिक्रिया दाखवल्यास मुलांचे हे नकारात्मक विचार त्यांच्या मनात आणखी पक्के रुतून बसतात. कलस्सैकर ३:२१ म्हणते: “आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्न होतील.”
“नेहमी” आणि “कधीच” अशाप्रकारचे टोकाचे शब्द आपण वापरतो तेव्हा, आपण फारसा विचार न करता एक सामान्य नियम ठोकून देतो आणि वस्तुस्थितीची अतिशयोक्ती करतो. “तू काहीच कामाचा नाहीस,” असे आई किंवा वडिलांनी म्हटल्यावर मुलाला स्वतःविषयी सकारात्मक विचार करण्याकरता वावच राहत नाही. जर वारंवार असे घडले आणि मुलाला वारंवार अशाप्रकारची टीका ऐकावी लागली तर हळूहळू तो असा विचार करू लागेल की आपल्यात काहीच करण्याची कुवत नाही. असा विचार नैराश्यजनक तर आहेच पण तो खोटाही आहे.
त्यापेक्षा, कोणत्याही परिस्थितीच्या सकारात्मक पैलूवर जोर देणे केव्हाही जास्त चांगले. आपल्या उदाहरणातील वडील असे म्हणू शकतात: “बेटा, या विषयात नापास झाल्यामुळे तू निराश झाला आहेस असं वाटतं. सहसा तू चांगला अभ्यास करतोस आणि गृहपाठ पण वेळेवर पूर्ण करतोस. पण या एका विषयाबद्दल मला वाटतं की आपण बसून बोलायला हवं. म्हणजे तुला कोणत्या अडचणी आहेत आणि त्या कशा दूर करता येतील हे आपल्याला ठरवता येईल.” आपल्या मुलाला मदत करण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे ठरवण्याकरता वडील त्याला काही वेचक प्रश्न विचारू शकतात. यामुळे त्यांना समजेल की मुलाच्या या समस्येला कारणीभूत ठरणारी दुसरी कोणती कारणे आहेत का?
अशाप्रकारे प्रेमळपणे व विचारपूर्वक प्रतिक्रिया दाखवणे, हे निश्चितच चिडून आरडाओरडा करण्यापेक्षा जास्त परिणामकारक ठरेल. बायबल आपल्याला आश्वासन देते, “ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांस आरोग्य देणारी आहेत.” (नीतिसूत्रे १६:२४) मुलेच नाही तर कुटुंबातले सगळेच सदस्य शांतीपूर्ण व प्रेमळ वातावरणात जास्त आनंदी व समाधानी राहू शकतात.
“अंतःकरणात जे भरले आहे”
लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या डेव्हिडच्या उदाहरणावर आता आपण विचार करू या. त्याने अविचारीपणे आपल्या पत्नीवर भडकण्याऐवजी, जर थोडे थांबून “सत्य व मनोहर” शब्द निवडले असते तर जास्त चांगले झाले असते असे तुम्हाला वाटत नाही का? अशाप्रकारच्या परिस्थितीत पतीने स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजेत: ‘वक्तशीरपणाच्या बाबतीत जरी माझ्या पत्नीने सुधारणा करण्याची गरज असली तरी, ती प्रत्येक वेळेस उशीर करते हे खरं आहे का? या विषयावर तिच्याशी बोलण्याची नीतिसूत्रे २९:११.
ही सर्वात उत्तम वेळ आहे का? रागावून टीका केल्याने तिला सुधारणा करण्याची प्रेरणा मिळेल का?’ थोडे थांबून स्वतःला असे प्रश्न विचारल्यामुळे आपल्याला नकळत आपल्या प्रिय व्यक्तींची मने दुखवण्याचे टाळता येईल.—पण आपल्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केल्यास, जर पुन्हापुन्हा त्या चर्चेचे रूपांतर भांडणात होत असेल तर आपण काय करावे? असे जर घडत असेल तर कदाचित आपण निवडलेल्या शब्दांमागील भावनांचे आपल्याला जरा खोलात जाऊन परीक्षण करावे लागेल. आपण जे बोलतो त्यावरून, आणि विशेषतः जेव्हा आपण दुःखी असतो किंवा तणावाखाली असतो तेव्हा आपण जे बोलतो त्यावरून आपण मुळात कशाप्रकारची व्यक्ती आहोत याविषयी बरेच काही प्रकट होते. येशूने म्हटले: “अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.” (लूक ६:४५) दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, आपल्या शब्दांवरून बरेचदा आपल्या मनात दडलेले विचार, इच्छा व दृष्टिकोन दिसून येतात.
जीवनाबद्दल जर आपला दृष्टिकोन वास्तववादी, सकारात्मक, व आशावादी असेल, तर मग आपल्या संभाषणाचे विषय व आपली बोलण्याची पद्धत यांवरून ते दिसून येईल. दुसरीकडे पाहता, जर आपला स्वभाव कडक, निराशावादी आणि टीकात्मक असेल, तर आपण जे बोलतो आणि ज्याप्रकारे बोलतो त्यामुळे दुसऱ्यांचे धैर्य खचू शकते. आपली विचारसरणी किंवा आपले संभाषण कितपत नकारात्मक झाले आहे याची आपल्याला कदाचित जाणीवही नसेल. आपल्याला कदाचित असे वाटत असेल की आपली विचार करण्याची पद्धत योग्यच आहे. पण स्वतःची अशी फसवणूक करून घेण्यापासून आपण सावध राहिले पाहिजे.—नीतिसूत्रे १४:१२.
आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याजवळ देवाचे वचन आहे. बायबल आपल्याला आपल्या विचारांचे परीक्षण करण्यास तसेच, कोणते विचार योग्य आहेत आणि कोणते अयोग्य हे ओळखण्यास मदत करते. (इब्री लोकांस ४:१२; याकोब १:२५) आपला मूळ स्वभाव कसाही असो आणि लहानपणी आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संस्कार झालेले असोत, पण जर आपली मनापासून इच्छा असेल तर आपल्यापैकी प्रत्येकजण आपली चुकीची विचारसरणी व आचरण बदलण्याचा निश्चय करू शकतो.—इफिसकर ४:२३, २४.
बायबलची मदत घेण्यासोबतच आपल्या संभाषणाची पद्धत कशी आहे हे ठरवण्याचा आणखी एक सोपा मार्ग आहे. तो म्हणजे इतरांना विचारणे. उदाहरणार्थ, तुमच्या जोडीदाराला किंवा मुलांना तुमच्या संभाषण शैलीविषयी त्यांचे प्रामाणिक मत विचारा. तुम्हाला चांगल्याप्रकारे ओळखणाऱ्या एखाद्या प्रौढ मित्राशी किंवा मैत्रिणीशी याविषयी बोला. पण एक गोष्ट मात्र नक्की, त्यांचे म्हणणे कबूल करण्यासाठी आणि आवश्यक बदल करण्यासाठी तुम्हाला नम्र व्हावे लागेल.
बोलण्याअगोदर विचार करा!
शेवटी काय, जर आपल्या बोलण्याने आपल्याला इतरांच्या भावना दुखवायच्या नसतील तर नीतिसूत्रे १६:२३ यात जे सांगितले आहे त्याचे आपण पालन केले पाहिजे: “शहाणा [म्हणजेच सुज्ञ] माणूस नेहमी बोलण्याआधी विचार करतो आणि तो जे शब्द बोलतो ते चांगले आणि ऐकण्यायोग्य असतात.” (ईझी टू रीड व्हर्शन) भावनांवर नियंत्रण ठेवणे नेहमीच सोपे नसते हे कबूल आहे. पण जर इतरांवर दोष लावण्याऐवजी किंवा त्यांना तुच्छ लेखण्याऐवजी आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द निवडणे आपल्याला सोपे जाईल.
अर्थात आपल्यापैकी कोणीही परिपूर्ण नाही. (याकोब ३:२) कधीकधी आपण सर्वचजण विचार न करता नको ते बोलून जातो. (नीतिसूत्रे १२:१८) पण देवाच्या वचनाच्या साहाय्याने आपण बोलण्याआधी विचार करायला आणि आपल्या भावना व हितापेक्षा इतरांच्या भावनांचा व हिताचा विचार करायला शिकू शकतो. (फिलिप्पैकर २:४) इतरांशी बोलताना आणि विशेष करून आपल्या कुटुंबातील सदस्यांशी बोलताना आपण “सत्य व मनोहर वचने” निवडण्याचा निश्चय करू या. असे केल्यास, आपल्या बोलण्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तींच्या भावना दुखावणार नाहीत आणि त्यांचे धैर्य खचणार नाही, उलट त्यांना सांत्वन मिळेल आणि त्यांचे मनोबल वाढेल.—रोमकर १४:१९. (w०८ १/१)
[१२ पानांवरील चित्र]
आपल्या बोलण्याचा नंतर आपल्याला पस्तावा होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?