व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा जे भाकीत करतो ते खरे ठरते

यहोवा जे भाकीत करतो ते खरे ठरते

यहोवा जे भाकीत करतो ते खरे ठरते

“मीच देव आहे, दुसरा कोणी देव नव्हे, मजसमान कोणीच नाही. मी आरंभीच शेवट कळवितो. होणाऱ्‍या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे.” (यशया ४६:९, १०) हे यहोवा देवाचे शब्द आहेत. अचूक भविष्य सांगण्याची कुवत यहोवा देवात आहे.

मानव अचूक भविष्य सांगू शकत नाही, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे, सर्व सत्य शोधकांनी, बायबल हे भविष्यवाणींचे पुस्तक आहे या विचाराने प्रवृत्त होऊन, बायबलचा लेखक देव आहे का हे शोधून काढले पाहिजे. आपण, बायबलमधील काही भविष्यवाण्या पडताळून पाहूया ज्या खऱ्‍या ठरल्या आहेत.

प्राचीन संस्कृती

बॅबिलोन, इडम (अदोम), मोॲब (मवाब) आणि ॲमॉन (अम्मोन) या शहरांचा कायमचा नाश होईल, असे देवाने भाकीत केले होते. (यिर्मया ४८:४२; ४९:१७, १८; ५१:२४-२६; ओबद्या ८, १८; सफन्या २:८, ९) विविध राष्ट्रीय गट या नात्याने या सर्व लोकांचे नामशेष होण्यावरून, देवाचे भविष्यसूचक वचन किती अचूक आहे हे सिद्ध होते.

काहीजण म्हणतील, की एक राष्ट्र मग ते कितीही बलाढ्य असले तरी, कालांतराने नामशेष होतच असते. परंतु या तर्कामुळे एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते. ती म्हणजे, बायबल फक्‍त त्या राष्ट्राचे नामशेष होण्याविषयीच भाकीत करत नाही तर आणखीही सविस्तर माहिती देते. उदाहरणार्थ, बॅबिलोन शहराला कशाप्रकारे उलथून टाकले जाईल याबद्दलचे सविस्तर वर्णन बायबलमध्ये देण्यात आले आहे. मेदी सैन्य या शहरावर विजय मिळवेल, सैन्याचा नेता कोरेश असेल आणि शहराभोवती असलेली संरक्षक नदी आटेल, हे सर्व बायबलमध्ये भाकीत करण्यात आले होते.—यशया १३:१७-१९; ४४:२७–४५:१.

विजय मिळवलेली सर्वच राष्ट्रे कायमची नामशेष होतील, असे बायबलमध्ये भाकीत करण्यात आलेले नाही. तर, बॅबिलोन्यांकरवी जेरूसलेमला उलथून टाकले जाईल, असे भाकीत करताना देवाने म्हटले, की जेरूसलेम शहर पुन्हा एकदा वसेल. धरून आणलेल्या बंदिवानांना पुन्हा सोडून देण्याची बॅबिलोनी लोकांची पद्धत नव्हती तरीसुद्धा जेरूसलेमवासी पुन्हा जेरूसलेमला येऊन ते शहर वसवतील, असे देवाने भाकीत केले. (यिर्मया २४:४-७; २९:१०; ३०:१८, १९) देवाने केलेले भाकीत खरे ठरले. यहुद्यांचे वंशज आजही वेगळे लोक म्हणून हयात आहेत.

ईजिप्तला जागतिक सत्ता म्हणून उलथून पाडण्यात येईल; “तरी पुढे त्यात पूर्वकालाप्रमाणे पुनः वस्ती होईल,” असे यहोवाने भाकीत केले. कालांतराने, या प्राचीन साम्राज्याचे “एक हलकेसे राज्य” होणार होते. (यिर्मया ४६:२५, २६; यहेज्केल २९:१४, १५) हेही भाकीत खरे ठरले. आणखी एक उदाहरण आहे ग्रीसचे. यहोवाने असे भाकीत जरूर केले की, ग्रीसला जागतिक सत्ता म्हणून उलथून पाडले जाईल पण, हे राष्ट्र नामशेष होईल, असे यहोवाने म्हटले नाही. ज्या संस्कृती नामशेष होतील व ज्या होणार नाहीत, याविषयी यहोवाने जी भाकीते केली त्यावरून आपण काय शिकतो? हेच शिकतो, की देवाच्या वचनात अस्सल व विश्‍वसनीय भविष्यवाण्या लिखित आहेत.

आश्‍चर्यचकित करणारी माहिती

वर उल्लेख केल्याप्रमाणे यहोवाने बॅबिलोनचे पतन कशाप्रकारे होईल त्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच, टायरच्या पतनाविषयी भाकीत करताना यहेज्केल पुस्तकात असे म्हटले आहे, की त्यातील पाषाण, लाकूड, माती ‘वगैरे सर्व काही पाण्यात बुडून जाईल.’ (यहेज्केल २६:४, ५, १२) ही भविष्यवाणी सा.यु.पू. ३३२ मध्ये पूर्ण झाली. अलेक्झॅन्डर द ग्रेटने आपल्या सैन्याकडून, शहराचा जो जमिनीवरील मुख्य भाग उद्ध्‌वस्त झाला होता त्यातील अवशेषांचा, टायर या बेटाकडे जाण्याकरता एक पूल बांधण्याकरता उपयोग करवून घेतला व या बेटावरही त्याने विजय मिळवला.

दानीएल ८:५-८, २१, २२ आणि ११:३, ४ मध्ये लिहून ठेवण्यात आलेल्या भविष्यवाणीत, एका असामान्य महान ‘ग्रीसच्या राजाविषयी’ देखील महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली होती. हा शासक, त्याच्या ऐन सत्तेच्या शिखरावर असतानाच मारला जाईल आणि त्याचे राज्य चार भागात विभागले जाईल. हे राज्य त्याच्या वंशजांमध्ये नव्हे तर दुसऱ्‍यांमध्येच विभागले जाईल, असे भाकीत करण्यात आले. या भविष्यवाणीला लिहून २०० पेक्षा अधिक वर्षे पूर्ण झाल्यानंतर अलेक्झॅन्डर द ग्रेट तो बलशाली राजा शाबीत झाला. इतिहास आपल्याला सांगतो, की ऐन तारुण्यातच त्याचा अकाली मृत्यू झाला आणि कालांतराने त्याचे साम्राज्य त्याच्या वंशजांमध्ये नव्हे तर त्याच्या चार सेनापतींमध्ये विभागण्यात आले.

ही भविष्यवाणी, घटना घडल्यानंतर लिहिण्यात आली, असा टीकाकारांचा दावा आहे. पण, दानीएलाच्या पुस्तकात वर उल्लेख करण्यात आलेल्या अहवालाचे जरा बारकाईने परीक्षण करून पाहा. भविष्यवाणीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, त्यातील बारीकसारीक माहिती उल्लेखनीय आहे. पण, घटना घडून गेल्यानंतर केलेली बनावट भविष्यवाणी अशा दृष्टिकोनातून पाहिले तर बारीकसारीक माहितीचा किती अभाव आहे, हे दिसून येत नाही का? अलेक्झॅन्डरनंतर हयात असलेला एखादा भामटा आपल्या वाचकांना प्रभावित करण्यासाठी एखादी भविष्यवाणी करायचा प्रयत्न करत होता तर त्याने, अलेक्झॅन्डरच्या मृत्यूनंतर लगेचच त्याचे दोन पुत्र त्याचे राज्य स्थापन करायचा प्रयत्न करतात पण त्यांची कत्तल होते, हा मुद्दा का सांगितला नाही? सर्व चार सेनापती अलेक्झॅन्डरच्या साम्राज्याच्या विविध भागांवर अनेक दशकांनंतर आपापले राज्य स्थापन करतील, हे त्याने का सांगितले नाही? आणि, हा महान राजा व त्याचे चार सेनापती यांची नावे त्याने का सांगितली नाहीत?

बायबलमधील ही भविष्यवाणी घटना घडल्यानंतर लिहिण्यात आली होती, हा अनेक वर्षांपासून केला जाणारा परंतु सिद्ध करता येत नसलेला दावा, असे लोक करतात जे, पुराव्यांचे परीक्षण करण्याआधीच, भविष्यातील घटनांचे भाकीत करणे अशक्य आहे असे ठरवून टाकतात. बायबल हे देवाचे वचन आहे, हे स्वीकारण्यास ते नकार देत असल्यामुळे ते मानवी दृष्टिकोनातूनच सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण देण्यास भाग पाडतात. काहीही असो, देवाने मात्र आपणच बायबल भविष्यवाणींचा लेखक आहोत हे सिद्ध करण्यासाठी पुरेशी भविष्यसूचक माहिती पुरवली आहे. *

बायबलमधील विशिष्ट भविष्यवाण्या आणि त्यांची पूर्णता यांच्यावर मनन करण्यासाठी तुम्ही जर वेळ काढलात तर या भविष्यवाणींवरील तुमचा विश्‍वास आणखी मजबूत होईल. बायबलमधील भविष्यवाणींचा अभ्यास करायला काय हरकत आहे? याबाबतीत तुम्हाला, बायबल नेमके काय शिकवते? * या पुस्तकाच्या पृष्ठ २०० वरील माहितीचा उपयोग होऊ शकेल. तुम्ही जर या सूचनेचे पालन करणार असाल तर आपला विश्‍वास मजबूत करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घ्या. माहिती पटापट वाचून काढण्याची घाई करू नका. तर, यहोवा जे काही भाकीत करतो ते न चुकता पूर्ण होते, या वस्तुस्थितीवर मनन करा. (w०८ १/१)

[तळटीपा]

^ परि. 13 बायबल भविष्यवाण्या घटना घडल्यानंतर लिहिण्यात आल्या होत्या या दाव्याच्या खंडनाबाबत अधिक माहितीकरता, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, तुमची काळजी करणारा निर्माणकर्ता आहे का? (इंग्रजी), पुस्तकाची पृष्ठे १०६-११ पाहा.

^ परि. 14 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

[२४ पानांवरील चौकट/चित्र]

जगण्यासाठी तत्त्वे

विचार करण्याजोगा आणखी एक मुद्दा. ज्या देवाने जागतिक साम्राज्यांच्या उदय व पतनाविषयी अचूकपणे भाकीत केले तोच जगण्यासाठी असलेल्या बायबलमधील तत्त्वांचा स्रोत देखील आहे. यांपैकी काही तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत:

तुम्ही जे पेरता त्याचेच तुम्हाला पीक मिळेल.गलतीकर ६:७.

घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त आनंद आहे. प्रेषितांची कृत्ये २०:३५.

आत्म्यात दीन असल्याने अर्थात आध्यात्मिक गरजा पूर्ण केल्याने आनंद मिळतो.मत्तय ५:३.

या तत्त्वांनुसार तुम्ही जर जगलात तर तुम्ही आनंदी व यशस्वी व्हाल याची खात्री बाळगू शकता.

[२२, २३ पानांवरील चित्रे]

देवाच्या वचनात या संस्कृतींचा कायमचा अंत होईल असे भाकीत करण्यात आले होते. . .

इडम

बॅबिलोन

. . . पण यांचा कायमचा अंत होईल असे भाकीत केले नाही

ग्रीस

ईजिप्त

[चित्राचे श्रेय]

Pictorial Archive (Near Eastern History) Est.

WHO photo by Edouard Boubat

[२३ पानांवरील चित्र]

अलेक्झॅन्डर द ग्रेट