सबंध जगातल्या लोकांची एकच प्रार्थना
सबंध जगातल्या लोकांची एकच प्रार्थना
लाखो, नव्हे कोट्यवधी लोक एकाच गोष्टीसाठी प्रार्थना करत आहेत अशी कल्पना करा. ते सर्वजण विश्वातील सर्वश्रेष्ठ व्यक्तीला त्यांची एक विशिष्ट मागणी पूर्ण करण्याची विनंती करत आहेत. पण, आपण नेमके कशासाठी प्रार्थना करत आहोत हे त्यांच्यापैकी फार कमी जणांना माहीत आहे. असे घडणे शक्य आहे का? हो शक्य आहे, किंबहुना हा प्रकार दररोजच घडतो. हे सर्व लोक कशासाठी प्रार्थना करत आहेत? देवाचे राज्य येण्यासाठी.
एका अंदाजानुसार, जवळजवळ ३७,००० असे धर्मपंथ आहेत जे स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात आणि येशू ख्रिस्ताला आपला पुढारी मानतात. या पंथांत दोनशे कोटी पेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यांपैकी बहुतेकजण ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या’ ही प्रार्थना म्हणतात. या प्रार्थनेला प्रभूची प्रार्थना असेही म्हटले जाते. तुम्हाला ही प्रार्थना माहीत आहे का? येशूने आपल्या शिष्यांना शिकवलेली ही प्रार्थना अशाप्रकारे सुरू होते: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.”—मत्तय ६:९, १०.
कित्येक शतकांपासून ख्रिस्ती धर्मियांनी चर्चमध्ये अनेकदा ही प्रार्थना श्रद्धापूर्वक म्हटली आहे. चर्चमध्येच नाही तर सुखदुःखाच्या काळात कुटुंबासोबत तसेच व्यक्तिशः देखील कित्येकांनी ही प्रार्थना म्हटली आहे. त्यातील शब्द ते मनःपूर्वक व कळकळीने उद्गारतात. बऱ्याच जणांनी तर ही प्रार्थना तोंडपाठ केली आहे आणि अर्थाचा विचार न करता ते ती नुसतीच म्हणतात. पण ख्रिस्ती धर्मजगताच्या या सदस्यांव्यतिरिक्त इतरजणही आहेत, जे पृथ्वीवर देवाचे राज्य येण्याची वाट पाहत आहेत आणि त्याकरता प्रार्थना करत आहेत.
एका धर्मापुरती सीमित नसलेली प्रार्थना
यहुदी धर्मियांना कादिश नावाची प्रार्थना ओळखीची आहे. ही प्रार्थना यहुदी सभास्थानात दररोज किंवा एखाद्या जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूप्रसंगी म्हटली जाते. पण मृत्यू किंवा शोक या विषयांशी तसा या प्रार्थनेचा काही संबंध नाही. या प्रार्थनेत पुढील इच्छा व्यक्त केली जाते, “तुमच्या आयुष्यकाळात . . . लवकरात लवकर [देव] आपले राज्य आणो.” * सभास्थानात म्हणण्यासाठी असलेल्या दुसऱ्या एका प्राचीन प्रार्थनेत दाविदाच्या घराण्यातील मशीहाचे राज्य येण्याची इच्छा व्यक्त केली जाते.
ख्रिस्तीतर धर्मांच्या काही व्यक्तींनाही देवाच्या राज्याची कल्पना भावली. द टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकानुसार हिंदू, मुस्लिम व ख्रिस्ती धर्मांतील समान दुवे शोधून त्यांच्यातील मतभेद मिटवू इच्छिणाऱ्या १९ व्या शतकातील एक नामांकित भारतीय पुढाऱ्याने असे म्हटले: “पूर्व व पश्चिम यांचा मिलाफ होणार नाही तोपर्यंत खरे देवाचे राज्य वास्तवात उतरणार नाही.” आणि ऑस्ट्रेलियाच्या स्ट्रॅथफील्ड शहराच्या एका इस्लामी महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिकेने अलीकडेच एका वृत्तपत्राला असे लिहिले: “सर्व मुस्लिमांप्रमाणे मीही हे मानते की येशू पुन्हा येईल आणि देवाचे राज्य खऱ्या अर्थाने स्थापन करेल.”
देवाच्या राज्याची वाट पाहणारे आणि त्यासाठी प्रार्थना करणारे कोट्यवधी लोक आहेत यात शंका नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या.
तुम्हाला कदाचित माहीत असेल की आम्ही यहोवाचे साक्षीदार म्हणजेच हे नियतकालिक प्रकाशित करणारे, तुमच्या परिसरात घरोघरी जाऊन लोकांशी बायबलमधील विषयांवर चर्चा करतो. हे लिखाण करण्याच्या वेळी, आम्ही सबंध जगभरात हे कार्य जवळजवळ २३६
देशांत, ४०० हून अधिक भाषांत करत आहोत. आमच्या या प्रचार कार्याचा मुख्य विषय देवाचे राज्य हाच आहे. किंबहुना, लक्ष देण्यालायक गोष्ट म्हणजे या नियतकालिकाचे संपूर्ण नाव टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक असे आहे. आम्ही बरेचदा लोकांना विचारतो की तुम्ही या राज्याकरता प्रार्थना करता का? अनेकजण या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देतात. पण हे राज्य नेमके काय आहे असे विचारल्यावर मात्र बहुतेक लोकांचे उत्तर “माहीत नाही” असेच असते. आणि उत्तर दिले तरी, ते काहीसे अस्पष्ट व संदिग्ध स्वरूपाचे असते.पण ज्याची स्पष्ट व्याख्या देता येत नाही त्यासाठी इतकेजण प्रार्थना का बरे करतात? देवाचे राज्य हा मुळातच एक गुंतागुंतीचा, क्लिष्ट विषय असल्यामुळे असे आहे का? नाही. देवाचे राज्य काय आहे याविषयी बायबलमध्ये अगदी स्पष्टपणे खुलासा केला आहे. आणि राज्याविषयीचा बायबलमधील हा संदेश तुम्हाला या कठीण काळात खरी आशा देऊ शकतो. पुढील लेखात, या आशेविषयी बायबलमध्ये काय सांगण्यात आले आहे ते पाहू या. त्यानंतर आपण हे पाहू की राज्याबद्दल येशूने शिकवलेल्या प्रार्थनेचे उत्तर केव्हा दिले जाईल. (w०८ १/१)
[तळटीप]
^ परि. 6 येशूने शिकवलेल्या प्रार्थनेप्रमाणेच, शोकप्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या कादिश या प्रार्थनेतही देवाचे नाव पवित्र केले जाण्याविषयी उल्लेख आढळतो. काहीजणांचे म्हणणे आहे की कादिश प्रार्थना ही ख्रिस्ताच्या काळाइतकी जुनी किंवा त्याही आधीची आहे. पण या दोन प्रार्थनांचा सारखेपणा पाहून आपल्याला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण येशूने काहीतरी नवीन किंवा वेगळे करून दाखवण्याच्या उद्देशाने आपल्या शिष्यांना प्रार्थना शिकवली नव्हती. त्याने शिकवलेल्या प्रार्थनेतील प्रत्येक विनंती ही शास्त्रवचनांवर आधारित होती. आणि ही शास्त्रवचने त्याकाळात राहणाऱ्या सर्वच यहुद्यांना उपलब्ध होती. खरे तर, येशूने आपल्या यहुदी बांधवांना ज्या गोष्टींबद्दल प्रार्थना करण्याचे प्रोत्साहन दिले, त्या गोष्टींबद्दल त्यांनी पूर्वीपासूनच प्रार्थना करायला हवी होती.