व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण अस्तित्वात कसे आलो?

आपण अस्तित्वात कसे आलो?

आपण अस्तित्वात कसे आलो?

या प्रश्‍नाचे उत्तर शोधून काढणे महत्त्वाचे का आहे? पुष्कळ लोकांना असे शिकवले जाते, की पृथ्वीवर जीवनाची सुरुवात अकस्मात झाली. एकापाठोपाठ एक व अकस्मात घडलेल्या अनेक घटनांतून भावनिक, बौद्धिक व आध्यात्मिक क्षमता असलेल्या मानवाची उत्क्रांती झाली, असे त्यांना सांगितले जाते.

पण जरा विचार करा: आपण जर खरोखरच उत्क्रांतीने अस्तित्वात आलो असू आणि आपला कोणी निर्माणकर्ता नसेल तर याचा अर्थ मानवजात एका अर्थाने अनाथच म्हणावी लागेल. असे असल्यास, मानव त्यांच्यापेक्षा बुद्धीने वरचढ असलेल्या कोणालाही मार्गदर्शन मागू शकणार नाहीत—आपल्या समस्या कशा सोडवायच्या याबाबतीत आपल्याला कोणीही मदत करू शकणार नाही. पर्यावरणीय संकटे कशी टाळायची, राजकीय झगडे कसे सोडवायचे, आपल्या व्यक्‍तिगत समस्या कशा सोडवायच्या याबाबतीत मार्गदर्शन मिळण्याकरता आपल्याला मानवी बुद्धीवरच अवलंबून राहावे लागेल.

आपल्याजवळ मानवी बुद्धीवर अवलंबून राहण्याव्यतिरिक्‍त दुसरा पर्याय नाही, या विचाराने तुम्हाला मनःशांती मिळते का? नसेल तर, दुसऱ्‍या एका पर्यायावर विचार करा. हा दुसरा पर्याय मनाला दिलासा तर देतोच शिवाय तो पटण्याजोगाही आहे.

बायबल काय शिकवते

देवाने स्वतः मानवाला निर्माण केले असे बायबल शिकवते. आपण उत्क्रांती म्हटल्या जाणाऱ्‍या एका भावनाशून्य व बुद्धिहीन प्रक्रियेतून अस्तित्वात आलो नाही तर एका प्रेमळ व बुद्धिमान पित्याची लेकरे आहोत. बायबलमधील या स्पष्ट विधानांकडे लक्ष द्या.

उत्पत्ति १:२७. “देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.”

स्तोत्र १३९:१४. “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्‌भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.”

मत्तय १९:४-६. “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्‍नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली, व म्हटले, ह्‍याकरिता पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील? ह्‍यामुळे ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”

प्रेषितांची कृत्ये १७:२४, २५. “ज्या देवाने जग व त्यांतले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभु असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही; आणि त्याला काही उणे आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेहि नाही; कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो.”

प्रकटीकरण ४:११. “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”

बायबलमधील उत्तराने खरी मनःशांती मिळते

देवाने ‘पृथ्वीवरील प्रत्येक वंशास नाव दिले आहे,’ हे बायबलमधून वाचल्यावर इतरांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. (इफिसकर ३:१४, १५) शिवाय, स्वतःकडे व आपल्या समस्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरही त्याचा परिणाम होतो. काय परिणाम होतो ते पुढे सांगण्यात आले आहे.

आपल्याला जेव्हा कठीण निर्णय घ्यावे लागतात तेव्हा आपण मनुष्याच्या परस्परविरोधी मतांमुळे विनाकारण चिंतित होणार नाही. उलट आपण बायबलमधील सल्ल्यावर पूर्णपणे भरवसा ठेवू. का? कारण, ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्‍वरप्रेरित आहे व तो सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे. ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.’—२ तीमथ्य ३:१६, १७.

हे खरे आहे, की बायबलमधील सल्ल्याचे पालन करण्याकरता परिश्रम घ्यावे लागतात आणि स्वतःला शिस्त लावावी लागते. काही वेळा, या सल्ल्याचे पालन करण्याकरता आपल्याला, ज्या गोष्टींकडे आपला अधिक कल असतो त्याच्या विरोधात जाऊन कार्य करावे लागेल. (उत्पत्ति ८:२१) परंतु, आपण जर हे मान्य केले, की एका प्रेमळ स्वर्गीय पित्याने आपल्याला निर्माण केले आहे तर, आपण कोणत्या प्रकारे कार्य केले पाहिजे हे आपल्यापेक्षा त्याला चांगले माहीत आहे ही गोष्ट आपल्या मनास पटेल. (यशया ५५:९) म्हणूनच त्याचे वचन आपल्याला असे आश्‍वासन देते: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतिसूत्रे ३:५, ६) या सल्ल्याचे आपण पालन केले तर आपल्यासमोर जेव्हा आव्हाने येतात किंवा कठीण निर्णय घेण्याचे प्रसंग येतात तेव्हा आपण चिंतित होणार नाही.

लोक जेव्हा आपल्याशी दुजाभावाने वागतात तेव्हा आपण इतरांपेक्षा कमी आहोत या भावनेने आपण त्रस्त होणार नाही. एका विशिष्ट समाजाच्या अथवा संस्कृतीच्या लोकांपेक्षा आपण काहीसे कनिष्ठ आहोत, असा आपण स्वतःबद्दल विचार करणार नाही. त्याऐवजी आपण स्वतःविषयी उचित आत्म-सन्मान बाळगू. का? कारण आपला पिता यहोवा देव “पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.

देव पक्षपाती नाही हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपणही इतरांना दुजाभावाने वागवणार नाही. दुसऱ्‍या समाजापेक्षा स्वतःच्या समाजाला श्रेष्ठ मानण्याकरता कोणताच रास्त आधार नाही हे आपल्याला समजेल कारण देवाने “एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे.”—प्रेषितांची कृत्ये १७:२६.

आपल्याला निर्माण करण्यात आले आहे आणि आपल्या निर्माणकर्त्याला आपली काळजी आहे ही जाणीव खरी मनःशांती प्राप्त करण्याची केवळ सुरुवात आहे. परंतु ही आंतरिक शांती आपल्याला टिकवून ठेवायची असेल तर आणखी काही जाणून घेणे आवश्‍यक आहे. (w०८ २/१)

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

मनुष्य उत्क्रांतीने अस्तित्वात आला का?

[५ पानांवरील चित्र]

आपल्या निर्माणकर्त्याला आपली काळजी आहे ही जाणीव आपल्याला खरी मनःशांती देऊ शकते