व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

काळजी घेणारा मेंढपाळ

काळजी घेणारा मेंढपाळ

देवाच्या जवळ या

काळजी घेणारा मेंढपाळ

मत्तय १८:१२-१४

‘देवाला माझी काळजी आहे का?’ असा जर तुम्हाला प्रश्‍न पडला असेल, तर तुम्ही एकटेच नाही. आपल्यापैकी बहुतेक जणांना कठीण परिस्थितींना व दुःखांना तोंड द्यावे लागले आहे. म्हणूनच कधीकधी आपल्याला असे वाटते की या विशाल विश्‍वाचा निर्माणकर्ता माझ्याकडे लक्ष देतो का? यहोवा देवाला प्रत्येक व्यक्‍तीची काळजी आहे का, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यहोवाला इतर कोणाहीपेक्षा जास्त जवळून ओळखणाऱ्‍या येशूने पृथ्वीवर असताना एक दृष्टांत दिला. या दृष्टांतातून आपल्याला वरील प्रश्‍नाचे दिलासा देणारे उत्तर मिळते.

यहोवाची तुलना, कळपाची देखभाल आणि काळजी घेणाऱ्‍या एका मेंढपाळाशी करत, येशूने असे म्हटले: “कोणाएका मनुष्याजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यातून एखादे भटकले तर ती नव्याण्णव डोंगरावर सोडून त्या भटकलेल्याचा शोध करण्यास तो जाणार नाही काय? आणि समजा, ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो त्यावरून अधिक आनंद करील, असे मी तुम्हास खचित सांगतो. तसे ह्‍या लहानांतील एकाचाहि नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.” (मत्तय १८:१२-१४) आपल्या प्रत्येक सेवकाची कोमलतेने काळजी घेणाऱ्‍या यहोवाचे वर्णन येशू कशा प्रकारे करतो ते आता आपण पाहू या.

प्राचीन काळातील मेंढपाळ, आपल्या कळपातील प्रत्येक मेंढराची काळजी घेणे आपली जबाबदारी समजायचा. जर एखादे मेंढरू भटकले तर कोणते मेंढरू भटकले आहे हे त्याला लगेच कळायचे. कारण प्रत्येक मेंढराला त्याने एक विशिष्ट नाव दिलेले असायचे. (योहान १०:३) प्रेमळ मेंढपाळ भटकलेल्या मेंढराला कळपात परत आणेपर्यंत स्वस्थ बसत नसे. पण भटकलेल्या मेंढराच्या शोधात जाताना तो उरलेल्या ९९ मेंढरांना धोक्यात टाकत नसे. कारण, मेंढपाळ सहसा इतर मेंढपाळांच्या आसपासच असायचे व त्यांचे कळप एक-दुसऱ्‍यांत मिसळायचे. * यामुळे भटकलेल्या मेंढराच्या शोधात जाणारा मेंढपाळ काही वेळापुरते आपल्या मेंढरांना इतर मेंढपाळांच्या निगराणीत सोडून जायचा. जेव्हा मेंढपाळाला भटकलेले मेंढरू सुरक्षित सापडायचे तेव्हा त्याला किती आनंद होत असावा याची आपण कल्पना करू शकतो. त्या भेदरलेल्या मेंढराला आपल्या खांद्यावर घेऊन तो त्याला परत कळपाच्या सुरक्षित वातावरणात आणत असे.—लूक १५:५, ६.

या दृष्टांताचा अर्थ स्पष्ट करत येशूने म्हटले की, “ह्‍या लहानांतील एकाचाहि नाश व्हावा” अशी देवाची इच्छा नाही. यापूर्वी, येशूने आपल्या शिष्यांना अशी ताकीद दिली होती, की त्यांनी “[त्याच्यावर] विश्‍वास ठेवणाऱ्‍या ह्‍या लहानांतील एकाला” देखील अडखळवू नये. (मत्तय १८:६) तर मग, येशूच्या दृष्टांतातून आपण यहोवाबद्दल काय शिकतो? हेच की, तो आपल्या मेंढरांची मनापासून काळजी घेणारा एक मेंढपाळ आहे. या मेंढरांत अशा ‘लहानांचा’ देखील समावेश आहे, जे जगाच्या दृष्टीत कमी महत्त्वाचे आहेत. होय, देवाच्या नजरेत त्याचा प्रत्येक सेवक खास आणि महत्त्वाचा आहे.

देवाच्या नजरेत तुम्ही महत्त्वाचे आहात याची तुम्हाला खात्री हवी असल्यास, सर्वश्रेष्ठ मेंढपाळ यहोवा देव याच्याबद्दल आणखी जास्त शिकून घ्यायला काय हरकत आहे? आणि तुम्ही कशा प्रकारे त्याच्याजवळ येऊ शकता हेही जाणून घ्यायला काय हरकत आहे? येशूने भटकलेल्या मेंढराचा जो दृष्टांत दिला तो प्रेषित पेत्राने नक्कीच ऐकला असावा. म्हणूनच कदाचित पेत्राने नंतर असे लिहिले: “[देवावर] तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:७) महान मेंढपाळ यहोवा याच्याविषयी अधिक शिकून घेण्याद्वारे व त्याच्याजवळ येण्याद्वारे तुमची देखील प्रेषित पेत्राप्रमाणे खात्री पटेल की यहोवा खरोखरच प्रत्येकाची काळजी घेतो. (w०८ २/१)

[तळटीप]

^ परि. 6 एक-दुसऱ्‍यांत मिसळलेल्या कळपांना परत वेगळे करणे कठीण नव्हते, कारण प्रत्येक मेंढरू आपल्या मेंढपाळाची विशिष्ट हाक ऐकून प्रतिसाद देत असे.—योहान १०:४.