मरण पावलेल्यांना पुन्हा जिवंत करणारा
देवाच्या जवळ या
मरण पावलेल्यांना पुन्हा जिवंत करणारा
तुम्हाला प्रिय असलेल्या एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला तुम्ही मृत्यूमुळे गमावले आहे का? असेल तर, तुम्हाला देखील जीवनातील अत्यंत दुःखदायक अनुभवातून जावे लागले आहे. तुमचे दुःख आपल्या सृष्टीकर्त्याला कळते. एवढेच नाही तर, तो मृत्यूला नाहीसा देखील करू शकतो. बायबलमध्ये, मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी अनेक अहवाल नमूद आहेत. त्या अहवालांवरून आपल्याला माहीत होते की देवाने आपल्याला केवळ जीवनच दिले नाही, तर मरण पावलेल्यांना पुन्हा जिवंत करण्याचे सामर्थ्यही त्याच्याजवळ आहे. आता आपण एका पुनरुत्थानाविषयी पाहू या. हे पुनरुत्थान करण्यासाठी देवाने आपल्या पुत्राला, म्हणजेच येशू ख्रिस्ताला सामर्थ्य दिले. या अद्भुत चमत्काराचा अहवाल बायबलमध्ये, लूक ७:११-१५ येथे नमूद आहे.
सा.यु. ३१ चे वर्ष. येशू प्रवास करून गालीलातील नाईन नावाच्या शहराकडे जात होता. (११ वे वचन) तो शहराजवळ येऊन पोहचला तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. बायबल असा अहवाल देते: “तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला तेव्हा पाहा, [लोक] कोणाएका मृत माणसाला बाहेर नेत होते; तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती; आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते.” (१२ वे वचन) त्या विधवा आईला किती दुःख होत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? तिच्यावर दुःखाचे जणू आभाळच कोसळले होते. आधीच तिने आपल्या पतीला गमावले होते आणि आता एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूमुळे, तिची देखभाल करणारा कोणीच उरला नव्हता.
येशूचे लक्ष, मृत मुलाच्या तिरडीबरोबर चालत असलेल्या त्या दुःखी आईकडे गेले. बायबलमधील अहवाल पुढे सांगतो: “तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला रडू नको.” (१३ वे वचन) त्या असहाय विधवेची परिस्थिती पाहून येशूला खूप दुःख झाले. त्याला कदाचित त्याची आई आठवली असेल. एव्हाना तीही विधवा झाली असावी. आणि लवकरच तिला देखील आपल्या मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन करावे लागणार होते.
येशू आणखी जवळ गेला, पण शवयात्रेत सामील व्हायचे होते म्हणून नव्हे. त्याने पुढे होऊन “तिरडीस स्पर्श केला,” तेव्हा लोक स्तब्ध उभे राहिले. नंतर, मृत्यूवर अधिकार देण्यात आलेल्या व्यक्तीच्या वाणीत त्याने म्हटले: “मुला मी तुला सांगतो, ऊठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले.” (१४, १५ वचने) मृत्यूने त्या मुलाला त्याच्या आईपासून हिरावून घेतले होते. पण येशूने जेव्हा “त्याला त्याच्या आईच्या हवाली केले” तेव्हा त्यांचे पुन्हा एक कुटुंब बनले. त्या विधवेचे दुःख कुठल्या कुठे गेले. आता तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.
मरण पावलेल्या तुमच्या प्रिय जनांना पुन्हा भेटण्याचा आनंद तुम्हाला देखील अनुभवायचा आहे का? तुम्ही त्यांना पुन्हा भेटावे अशी देवाची देखील इच्छा आहे. येशूने त्या दुःखी विधवेला दाखवलेल्या सहानुभूतीतून देवाची दया दिसते. कारण येशूने देवाचे व्यक्तिमत्त्व हुबेहूब प्रतिबिंबित केले. (योहान १४:९) बायबलमधून आपल्याला शिकायला मिळते की देवाच्या स्मृतीत असलेल्या मृत व्यक्तींना पुन्हा जिवंत करण्याची देवाची उत्कट इच्छा आहे. (ईयोब १४:१४, १५) त्याचे वचन बायबल आपल्याला एक अद्भुत आशा देते, आणि ती आशा म्हणजे पृथ्वीवर नंदनवनात जगणे आणि आपल्या प्रिय जनांना मेलेल्यांमधून पुन्हा जिवंत होताना पाहणे. (लूक २३:४३; योहान ५:२८, २९) तर मग, मरण पावलेल्यांना पुन्हा जिवंत करणाऱ्या देवाबद्दल आणि आपले प्रिय जन पुन्हा जिवंत होतील याची खात्री आपण कशी बाळगू शकतो याबद्दल आणखी शिकून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल, नाही का? (w०८ ३/१)
[११ पानांवरील चित्र]
“तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले”