व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोणतीही गोष्ट आपल्याला ‘देवाच्या प्रीतीपासून विभक्‍त करावयाला समर्थ’ आहे का?

कोणतीही गोष्ट आपल्याला ‘देवाच्या प्रीतीपासून विभक्‍त करावयाला समर्थ’ आहे का?

देवाच्या जवळ या

कोणतीही गोष्ट आपल्याला ‘देवाच्या प्रीतीपासून विभक्‍त करावयाला समर्थ’ आहे का?

रोमकर ८:३८, ३९

आपल्यात कोण आहे ज्याला, इतरांनी आपल्यावर प्रेम करावे असे वाटत नाही? कुटुंबातील सदस्य, आपले मित्रजन आपल्यावर प्रेम करतात तेव्हा आपण बहरतो. परंतु, मानवी नातेसंबंध अतिशय नाजूक व अनिश्‍चित असतात. ते सहजरीत्या तुटू शकतात किंवा विविध परिस्थितींमध्ये बदलू शकतात. आपण ज्यांच्यावर जिवापाड प्रेम करतो ते कदाचित आपले मन दुखावतील, आपल्याला सोडून जातील, आपला त्याग करतील. पण असा कोणी तरी आहे ज्याचे प्रेम अबाधीत आहे. तो आहे मानवजातीचा सृष्टीकर्ता, यहोवा देव. यहोवा देवाचे आपल्या उपासकांवर किती प्रेम आहे याचे सुरेख वर्णन रोमकर ८:३८, ३९ मध्ये करण्यात आले आहे.

प्रेषित पौल म्हणतो: “माझी खात्री आहे.” कशाविषयीची खात्री? ही खात्री की कोणतीही गोष्ट आपल्याला ‘देवाच्या प्रीतीपासून विभक्‍त करावयाला समर्थ’ नाही. पौल येथे केवळ स्वतःविषयी बोलत नाही. तर जे देवाची सेवा एकनिष्ठपणे करतात अशा सर्वांविषयी, अर्थात ‘आपल्याविषयी’ देखील बोलतो. या मुद्द्‌यावर जोर देण्याकरता पौलाने अनेक गोष्टींचा उल्लेख केला ज्यांपैकी कोणतीही गोष्ट यहोवाला आपल्या भक्‍तिमान सेवकांवर प्रेम करण्यापासून रोखू शकत नाही.

“मरण, जीवन.” यहोवाच्या लोकांचा मृत्यू होतो तेव्हाही त्यांच्यावरील त्याचे प्रेम नाहीसे होत नाही. तो अशा लोकांना आपल्या स्मृतीत ठेवतो आणि येणाऱ्‍या नवीन जगात तो त्यांना पुन्हा जिवंत करणार आहे. हा त्याच्या प्रेमाचा पुरावा आहे. (योहान ५:२८, २९; प्रकटीकरण २१:३, ४) या व्यवस्थीकरणातील जीवनामुळे देवाच्या लोकांवर कोणतीही परिस्थिती गुदरली तरी, त्याचे आपल्या एकनिष्ठ लोकांवरील प्रेम अबाधीत राहते.

“देवदूत, अधिपति.” शक्‍तिशाली लोकांचा किंवा अधिकाऱ्‍यांचा मानवावर सहज प्रभाव पडू शकतो परंतु यहोवावर पडू शकत नाही. शक्‍तिशाली देवदूत, जसे की जो देवदूत नंतर सैतान बनला, तोही देवाला आपल्या उपासकांवर प्रेम करण्याचे थांबवण्यापासून त्याचे मन वळवू शकत नाही. (प्रकटीकरण १२:१०) खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा विरोध करणारी सरकारे देखील देवाचा आपल्या सेवकांप्रती असलेला दृष्टिकोन बदलू शकत नाहीत.—१ करिंथकर ४:१३.

“वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळाच्या गोष्टी.” काळ सरतो त्याप्रमाणे देवाचे प्रेम कमी होत नाही. अशी कोणतीही गोष्ट आता नाही किंवा भविष्यात नसेल जिच्यामुळे देव आपल्या सेवकांवर प्रेम करण्याचे थांबवेल.

“बले.” पौलाने आधी, स्वर्गीय आणि पृथ्वीवरील शक्‍तींचा अर्थात “देवदूत, अधिपति” यांचा उल्लेख केला. पण आता तो ‘बलांचा’ उल्लेख करतो. येथे वापरण्यात आलेल्या ग्रीक शब्दाच्या अनेक अर्थछटा आहेत. त्या शब्दाचा नेमका अर्थ कोणताही असो, एक गोष्ट मात्र निश्‍चित आहे: स्वर्गातील किंवा पृथ्वीवरील कोणतेही बल, यहोवाच्या प्रेमाला त्याच्या लोकांपर्यंत पोहंचण्यास मज्जाव करू शकत नाही.

“उंची खोली.” यहोवाच्या लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्याही उतार-चढावांचा सामना करावा लागत असला तरी, त्यांच्यावरील त्याचे प्रेम अटळ आहे.

“दुसरी कोणतीहि सृष्ट वस्तु.” सर्व सृष्टीचा समावेश असलेली अक्षरशः कोणतीही गोष्ट, यहोवाच्या एकनिष्ठ उपासकांना त्याच्या प्रेमापासून विभक्‍त करू शकत नाही.

प्रेम दाखवण्याच्या बाबतीत लोक बदलू शकतात. परंतु देवावर विश्‍वास टाकणाऱ्‍यांप्रती त्याचे प्रेम अबाधीत राहते. ते चिरकाल टिकते. ही जाणीव आपल्याला यहोवाच्या आणखी जवळ आणते आणि आपले देखील त्याच्यावर प्रेम आहे हे सिद्ध करण्याचा आपण आपल्या परीने होता होईल तो प्रयत्न करतो. (w०८ ८/१)