देवाच्या नावाचा उच्चार कसा करायचा हे निश्चित माहीत नाही तर मग त्याचा उपयोग का करावा?
वाचक विचारतात
देवाच्या नावाचा उच्चार कसा करायचा हे निश्चित माहीत नाही तर मग त्याचा उपयोग का करावा?
प्राचीन हिब्रू भाषेत देवाच्या नावाचा उच्चार नेमका कसा केला जात होता हे आज कोणालाही सांगता येत नाही. परंतु, देवाचे व्यक्तिगत नाव बायबलमध्ये सुमारे ७,००० वेळा येते, ही नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे. येशू पृथ्वीवर असताना त्याने देवाचे नाव प्रकट केले आणि ते नाव पवित्र करण्यासंबंधी त्याने आपल्या शिष्यांना सूचनाही दिल्या. (मत्तय ६:९; योहान १७:६) यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. ती ही, की देवाचे नाव ख्रिश्चनांकरता अतिशय महत्त्वाचे आहे. पण मग, त्या नावाच्या मूळ उच्चाराविषयी आज इतकी साशंकता का आहे? याची दोन प्रमुख कारणे आहेत.
पहिले कारण, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी यहुद्यांमध्ये असा अंधविश्वास पसरला, की देवाच्या नावाचा उच्चार करणे चूकीचे आहे. त्यामुळे बायबल वाचताना एखादा वाचक जेव्हा यहोवा या नावापर्यंत यायचा तेव्हा तो यहोवा असे वाचण्याऐवजी “प्रभू” असे वाचायचा. अशाप्रकारे, लोकांनी देवाच्या नावाचा उच्चार करायचे सोडून दिल्यामुळे, तो उच्चार कसा करायचा हे ते कालांतराने विसरून गेले.
दुसरे कारण. मराठी व इतर भाषांतील संक्षिप्त रुपे जशी स्वरांविना लिहिली जातात त्याच प्रकारे प्राचीन हिब्रू भाषा देखील स्वरांविना लिहिली जात असे. लिहिलेला मजकूर वाचताना वाचक, त्याला जितके आठवायचे त्यानुसार, गाळलेले स्वर घालून मजकूर वाचायचा. कालांतराने, हिब्रू शब्दांच्या उच्चाराचे पूर्णपणे विस्मरण होऊ नये म्हणून एक पद्धत शोधून काढण्यात आली. हिब्रू बायबलमधल्या प्रत्येक शब्दाला स्वरचिन्ह जोडण्यात आले. पण, देवाच्या नावाच्या बाबतीत मात्र, नावाऐवजी वापरला जाणारा शब्द कसा उच्चारायचा त्याची आठवण करून देण्यासाठी “प्रभू” या शब्दाकरता असलेली स्वरचिन्हे जोडण्यात आली किंवा मग काहीच जोडण्यात आले नाही.
यामुळे राहिली ती फक्त चार अक्षरे ज्याला टेट्राग्रमॅटन म्हणतात. एका शब्दकोशात टेट्राग्रमॅटन या शब्दाचा अर्थ, “बायबलनुसार देवाचे विशेषनाम असलेली चार हिब्रू अक्षरे, ज्यांचे सहसा YHWH or JHVH असे लिप्यंतर केले जाते.” त्यामुळे, YHWH याला स्वरचिन्हे व स्वर जोडल्यावर मराठीत व इतर अनेक भाषांत “यहोवा” हे सर्वपरिचित व स्वीकृत रूप तयार होते.
परंतु काही विद्वान, “याव्हे” हा देवाच्या नावाचा उचित उच्चार आहे असे प्रतिपादन करतात. हा उच्चार मूळ उच्चाराच्या जवळपास आहे का? हे कोणालाच माहीत नाही. खरे तर, इतर विद्वानांनी असा उच्चार का करू नये त्याची कारणे दिली आहेत. अर्थात, बायबलमध्ये दिलेल्या नावांचा आज आधुनिक भाषांमध्ये ज्याप्रकारे उच्चार केला जातो तो मूळ हिब्रू भाषेनुसार वाटत नाही; तरीपण यावर कोणी आक्षेप घेत नाही. कारण, ही नावे आपल्या भाषेचा भाग बनली आहेत व ती चटकन ओळखली जातात. हेच, यहोवाच्या नावाच्या बाबतीतही लागू होते.
पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना, देवाच्या नावासाठी पाचारण करण्यात आलेले लोक, असे म्हटले जायचे. त्यांनी हे नाव इतरांना सांगितले आणि या नावाचा धावा करण्याचे उत्तेजन दिले. (प्रेषितांची कृत्ये २:२१; १५:१४; रोमकर १०:१३-१५) तेव्हा, आपण कोणतीही भाषा बोलत असलो, तरी देवाच्या नावाचा उपयोग केला पाहिजे, त्याचे महत्त्व जाणले पाहिजे आणि ते नाव ज्या तत्त्वांचे प्रतिनिधीत्व करते त्यानुसार जगले पाहिजे, अशी खुद्द यहोवाचीच इच्छा आहे. (w०८ ८/१)