देवाच्या नावाचा वापर करणे चुकीचे आहे का?
देवाच्या नावाचा वापर करणे चुकीचे आहे का?
ज्याला “जुना करार” असेही म्हटले जाते, त्या इब्री शास्त्रवचनांत, देवाचे नाव יהוה (उजवीकडून डावीकडे वाचावे) या रूपात कमीतकमी ७,००० वेळा आढळते. देवाचे हे नाव इब्री भाषेतील, योह्द, हे, वाव व हे या चार अक्षरांपासून बनलेले असून इंग्रजीत ते सहसा YHWH असे लिहिले जाते.
देवाच्या नावाचा वापर करणे चुकीचे आहे अशी अंधविश्वासावर आधारित असलेली एक धारणा पुरातन काळात यहुद्यांमध्ये प्रचलित झाली होती. या धारणेमुळे ते या नावाचा उच्चार करत नसत. आणि लिखाणांतही ते या नावाऐवजी दुसऱ्या संज्ञा वापरू लागले. पण बायबलच्या बऱ्याच भाषांतरकारांनी मात्र “याहवे” किंवा “यहोवा” या नावाचा आपल्या भाषांतरात वापर केला आहे. यांपैकी एक भाषांतर कॅथलिक जेरूसलेम बायबल हे आहे. या भाषांतरानुसार, ‘तुला कोणी पाठवले?’ असे इस्राएलांनी विचारल्यास काय उत्तर द्यावे असे मोशेने देवाला विचारले तेव्हा देवाने त्याला असे उत्तर दिले: “तू इस्राएलाच्या पुत्रांस सांग: ‘याहवे, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव इसहाकाचा देव व याकोबाचा देव याने मला तुम्हाकडे पाठविले आहे.’ हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने लोक पिढ्यानपिढ्या माझा धावा करतील.”—निर्गम ३:१५.
येशूने स्वतः या नावाचा वापर केला. प्रार्थना करत असताना त्याने म्हटले: “मी तुझे नाव त्यांस कळविले आहे आणि कळवीन.” तसेच, प्रभूची प्रार्थना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रार्थनेत येशूने असे म्हटले: “हे आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.”—योहान १७:२६; मत्तय ६:९.
असे असताना, पोप बेनेडिक्ट सोळावा याने अलीकडेच जीझस ऑफ नॅझरेथ या आपल्या पुस्तकात देवाच्या नावाचा वापर करण्याबाबत जे म्हटले ते वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्याने म्हटले: “YHWH या अक्षरांनी सूचित केले जाणारे नाव देवाने स्वतःला संबोधण्याकरता वापरले होते. विदेशी लोकांच्या देवीदेवतांच्या नावांसारखाच या नावाचा उच्चार करून, त्याचा अनादर करण्यास इस्राएल लोकांनी नकार दिला ते अगदी योग्यच होते. याच कारणास्तव, बायबलच्या काही अलीकडील भाषांतरांत या नावाचा, जणू ते एक सर्वसामान्य नाव असल्याप्रमाणे जो वापर करण्यात आला, तो चुकीचा आहे. इस्राएल लोकांसाठी हे नाव नेहमीच गूढ व उच्चार न करण्याजोगे होते.”
तुम्हाला काय वाटते? देवाच्या नावाचा वापर करणे योग्य आहे की अयोग्य? जर यहोवा स्वतःच असे म्हणतो, की “हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने लोक पिढ्यानपिढ्या माझा धावा करतील,” तर कोणालाही हे नाकबूल करण्याचा अधिकार आहे का? (w०८ ७/१)
[२६ पानांवरील चित्र]
येशूने प्रार्थनेत देवाच्या नावाचा वापर केला