आदाम परिपूर्ण होता तरीपण त्याने पाप का केले?
वाचक विचारतात
आदाम परिपूर्ण होता तरीपण त्याने पाप का केले?
आदाम परिपूर्ण होता तरीपण त्याने पाप केले कारण देवाने त्याला इच्छा स्वातंत्र्याची देणगी दिली होती. म्हणजे, जीवनात निवड करण्याचे स्वातंत्र्य व अधिकार दिला होता. तो परिपूर्ण होता याचा अर्थ असा होत नाही, की त्याला जीवनात निवड करण्याचे स्वातंत्र्य नव्हते. खरे तर फक्त देवच पूर्णार्थाने परिपूर्ण आहे. (अनुवाद ३२:३, ४; स्तोत्र १८:३०; मार्क १०:१८) यहोवा व्यतिरिक्त इतर कोणीही किंवा कोणतीही गोष्ट एका मर्यादित अर्थानेच परिपूर्ण आहे.
देवाने आदामाला कोणत्या उद्देशास्तव निर्माण केले होते? आदामाद्वारे इच्छा स्वातंत्र्य असलेल्या बुद्धिमान लोकांची प्रजा बनवण्याचा यहोवाचा उद्देश होता. देवाच्या आज्ञांचे पालन करून हे लोक दाखवून देणार होते, की ते देवावर व त्याच्या मार्गांवर प्रेम करतात. त्यामुळे, आज्ञाधारक प्रवृत्ती ही मानवाच्या विचारसरणीत उपजतच घालण्यात आलेली नाही तर आज्ञाधारक बनण्याची निवड लोक करू शकते. (अनुवाद १०:१२, १३; ३०:१९, २०) यास्तव, जर आदामाकडे अवज्ञेची निवड करण्याची क्षमता नसती तर तो अपूर्ण—अपरिपूर्ण—झाला असता. आदामाने आपल्या इच्छा स्वातंत्र्याचा उपयोग करण्याची निवड कशी केली त्याचे वर्णन बायबलमध्ये देण्यात आले आहे. ‘बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाच्यासंबंधाने’ देवाने दिलेल्या आज्ञेचे उल्लंघन करण्याची निवड आदामाने आपल्या बायकोप्रमाणेच केली.—उत्पत्ति २:१७; ३:१-६.
म्हणजे याचा अर्थ, देवाने आदामाला बनवले तेव्हा त्याच्यात निवड करण्याची खोट होती का? किंवा त्याच्यात सुज्ञ निर्णय घेण्याची किंवा मोहांचा प्रतिकार करण्याची ताकदच नव्हती का? आदामाने पाप करण्यापूर्वी, यहोवाने बनवलेली सृष्टी आणि आदाम व हव्वा यांना न्याहाळून पाहिले आणि अशी पावती दिली, की ‘सर्वकाही फार चांगले आहे.’ (उत्पत्ति १:३१) म्हणजेच, आदामाच्या निर्मितीत कोणतीही खोट नव्हती तर पाप करण्यात पूर्णतः आदामाचीच चूक होती. (उत्पत्ति ३:१७-१९) तो देवावर प्रेम करण्यास व त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास त्याला प्रवृत्त करणारी योग्य मनोवृत्ती दाखवण्यात उणा पडला.
येशू पृथ्वीवर होता तेव्हा तोसुद्धा आदामासारखाच परिपूर्ण मनुष्य होता. पण आदामाच्या इतर वंशजांप्रमाणे येशूमध्ये मोहांना बळी पडण्याची कमजोरी नव्हती कारण देवाच्या पवित्र आत्म्याने त्याची गर्भधारणा झाली होती. (लूक १:३०, ३१; २:२१; ३:२३, ३८) येशूवर कितीतरी मोठे दबाव आले होते तरीसुद्धा त्याने स्वेच्छेने आपल्या पित्याशी एकनिष्ठ राहण्याची निवड केली. आदामाने त्याच्या इच्छा स्वातंत्र्याचा उपयोग करून, यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन केले व यामुळे तो स्वतः दोषी होता.
पण आदामाने देवाची अवज्ञा करण्याचे का निवडले? देवाची अवज्ञा करून त्याची परिस्थिती सुधारेल असे त्याला वाटत होते का? नाही. कारण, प्रेषित पौलाने असे लिहिले: “आदाम भुलविला गेला नाही.” (१ तीमथ्य २:१४) हव्वेने मना केलेल्या झाडाचे फळ आधीच खाल्ले होते आणि आदामाने तिचे म्हणणे ऐकणे जास्त पसंत केले. आपल्या निर्माणकर्त्याला संतुष्ट करण्यापेक्षा त्याला आपल्या बायकोला संतुष्ट करणे जास्त इष्ट वाटले. हव्वेने जेव्हा त्याच्यासमोर ते फळ धरले असावे तेव्हा आदामाने, आपण देवाची आज्ञा मोडली तर देवाबरोबरील आपल्या नातेसंबंधावर काय परिणाम होऊ शकतो यावर थोडे थांबून विचार करायला हवा होता. पण त्याने तसे केले नाही कारण त्याला देवावर निस्सीम, अतुट प्रेम नव्हते. तो बायकोच्या दबावाला सहजपणे बळी पडला.
आदामाने पाप केल्यानंतर त्याला मुले झाली त्यामुळे त्याची सर्व संतती अपरिपूर्णच जन्माला आली. तरीपण आदामाप्रमाणे आपल्या सर्वांजवळ इच्छा स्वातंत्र्याची देणगी आहे. तेव्हा आपण यहोवाच्या चांगुलपणावर कृतज्ञतेने मनन करू या आणि त्याच्यावर निस्सीम प्रेम करू या कारण तो आपल्या आज्ञाधारकतेस व उपासनेस पात्र आहे.—स्तोत्र ६३:६; मत्तय २२:३६, ३७. (w०८ १०/१)