व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चांगले वडील कसे होता येईल?

चांगले वडील कसे होता येईल?

चांगले वडील कसे होता येईल?

“बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्‍न होतील.”—कलस्सैकर ३:२१.

वडील आपल्या मुलांना चिरडीस न आणण्याचे कसे टाळू शकतात? यासाठी त्यांनी आधी, पिता यानात्याने त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे जाणून घेतले पाहिजे. मानसिक आरोग्याविषयी एका मासिकात असे म्हटले होते: “पिता आपल्या मुलाच्या भावनिक व बौद्धिक वाढीवर एका क्लिष्ट व अनोख्या मार्गाने खूप परिणाम करू शकतो.”

वडिलांची काय भूमिका असते? अनेक कुटुंबात बहुधा वडीलच मुलांना शिक्षा देताना दिसतात. म्हणून पुष्कळदा आपण एखाद्या आईला, दंगा करणाऱ्‍या तिच्या मुलाला असे म्हणताना ऐकतो: ‘थांब, बाबांना घरी येऊ दे!’ पण मुलांनी जर जबाबदार प्रौढ बनायचे आहे तर पालकांनी केवळ छडीचाच वापर करणे पुरेसे नाही, तर त्यासोबत पालकांच्या वागण्यात करारीपणा देखील असला पाहिजे. आणि एक चांगले वडील बनण्यात पुष्कळ गोष्टींचा समावेश होतो.

दुःखाची गोष्ट म्हणजे सर्वच वडिलांसमोर त्यांना मदत करणारे चांगले उदाहरण नव्हते. काही पुरुष वडील नसलेल्या घरात लहानाचे मोठे झाले. पण इतरांच्या बाबतीत, त्यांचे वडील अतिशय कडक, धाक दाखवणारे होते. ही मुले मग जेव्हा मोठी होतात तेव्हा तीही आपल्या मुलांना अशीच वागणूक देतात. एक वडील मग अशा ढाच्यातून स्वतःला बाहेर काढून एक चांगले वडील कसे बनू शकतात?

चांगले वडील होण्याकरता व्यावहारी व भरवसालायक सल्ला आज उपलब्ध आहे. बायबलमध्ये कौटुंबिक जीवनावर सर्वात उत्तम सल्ला आहे. हा सल्ला फक्‍त एक सिद्धांत नाही. किंवा या सल्ल्याचे पालन केल्यास आपली केव्हाही हानी होणार नाही. बायबलमधील सल्ल्यातून, बायबलचा लेखक यहोवा देव याची असीम बुद्धी दिसून येते. कारण यहोवा देवच कौटुंबिक जीवनाचा जनक आहे. (इफिसकर ३:१४, १५) तुम्ही जर एक वडील असाल तर, तुमच्या भूमिकेविषयी बायबल काय म्हणते ते जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल. *

चांगले वडील बनल्याने, तुमच्या मुलांचे फक्‍त शारीरिक व भावनिकच कल्याण होत नाही तर आध्यात्मिक कल्याणही होते. ज्या मुलाचे आपल्या वडिलांबरोबर खूप प्रेमळ व घनिष्ठ नाते असते त्या मुलाला, देवाबरोबर घनिष्ठ व प्रेमळ नातेसंबंध जोडायला सोपे जाते. कारण, बायबलसुद्धा असेच म्हणते, की यहोवा आपला निर्माणकर्ता आहे आणि तो आपल्या सर्वांचा पिता आहे. (यशया ६४:८) मुलांना आपल्या वडिलांकडून हव्या असलेल्या सहा गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. आणि प्रत्येक बाबतीत, बायबलमधील सल्ल्यांचे पालन केल्याने वडील ही गरज कशी भागवू शकतात ते आपण पाहणार आहोत.

१ मुलांना आपल्या वडिलांच्या प्रेमाची गरज आहे

पिता या नात्याने यहोवाने या बाबतीत सर्वोत्कृष्ट उदाहरण मांडले आहे. यहोवाला त्याचा ज्येष्ठ पुत्र, येशू याच्याविषयी काय वाटते याबद्दल बायबल सांगते: “पिता पुत्रावर प्रीति करितो.” (योहान ३:३५; कलस्सैकर १:१५) यहोवाने अनेक प्रसंगी, त्याच्या पुत्रावर त्याचे प्रेम असल्याचे व तो त्याच्यावर संतुष्ट असल्याचे बोलून दाखवले. येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा यहोवाने आकाशातून अशी वाणी केली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” (लूक ३:२२) यहोवाच्या प्रेमाविषयी येशूला कधी शंका नव्हती. एक पिता देवाच्या या उदाहरणावरून काय शिकू शकतो?

मला तू खूप आवडतोस/आवडतेस, असे आपल्या मुलांना सांगायला लाजू नका. पाच मुलांचे वडील, केल्वीन म्हणतात: “मी माझ्या मुलांना, मी त्यांच्यावर किती प्रेम करतो हे नुसतं बोलून दाखवलं नाही तर प्रत्येक मुलामध्ये जातीनं लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. मी त्यांची लंगोट बदलली, त्यांना अंघोळ घातली.” याशिवाय तुमच्या मुलांनाही हे जाणवले पाहिजे, की तुम्ही त्यांच्यावर संतुष्ट आहात. तेव्हा, त्यांची टीका करू नका, उठता-बसता त्यांना सतत टोकू नका. त्याऐवजी त्यांची तोंडभरून स्तुती करा. डोनीझेटे यांना दोन किशोरवयीन मुली आहेत. ते असे सुचवतात: “पित्याने आपल्या मुलांची स्तुती करण्यासाठी संधी शोधली पाहिजे.” मुलांवर तुम्ही संतुष्ट आहात, हे जेव्हा त्यांना जाणवते तेव्हा स्वतःकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनही योग्य राहतो अर्थात आपण निकामी/कुचकामी आहोत, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होत नाही. परिणामतः, देवाच्या आणखी जवळ येण्यास त्यांना मदत होते.

२ सकारात्मक उदाहरण मांडणे आवश्‍यक

योहान ५:१९ मध्ये म्हटले आहे: “पुत्र पित्याला जे काही करिताना पाहतो त्यावाचून काहीहि त्याला स्वतः होऊन करिता येत नाही.” आपल्या पित्याने जे जे ‘केले’ ते ते येशूने पाहिले व त्यानेही त्याचप्रमाणे केले, असे या वचनात म्हटले आहे. मुले सहसा असेच करतात. उदाहरणार्थ, एक पिता जर आपल्या बायकोला आदराने व सन्मानाने वागवत असेल तर त्याचा मुलगाही मोठा झाल्यावर स्त्रियांना आदराने व सन्मानाने वागवेल. पित्याच्या चांगल्या उदाहरणामुळे, केवळ मुलांच्याच मनावर चांगले परिणाम होत नाहीत, तर पुरुषांकडे बघण्याचा मुलींच्या दृष्टिकोनावरही परिणाम होऊ शकतो.

तुमच्या मुलांना क्षमा मागायला जड जाते का? या बाबतीतही वडिलांचे उदाहरण महत्त्वाचे आहे. केल्वीन यांना एक प्रसंग आठवतो. त्यांच्या दोन मुलांच्या हातून एकदा एक महागडा कॅमेरा खाली पडून फुटला. केल्वीन यांना या गोष्टीचा खूप राग आला. त्यांनी रागाच्या भरात घरातल्या एका लाकडी टेबलावर इतका जोरात दणका मारला की त्या टेबलाचे दोन तुकडेच झाले. नंतर केल्वीन यांना स्वतःचीच खूप लाज वाटली. आपला स्वतःवरचा ताबा सुटला म्हणून त्यांनी घरातल्या सर्वांची, बायकोचीसुद्धा क्षमा मागितली. याचा त्यांच्या मुलांवर चांगला परिणाम झाला, असे त्यांना वाटते; कारण, त्यांच्या मुलांना, माझे चुकले, मला क्षमा करा, असे म्हणायला मुळीच जड जात नाही.

३ मुलांना घरात खेळीमेळीचे वातावरण हवे

यहोवा देव “धन्यवादित” अर्थात आनंदी देव आहे. (१ तीमथ्य १:११) त्यामुळेच तर त्याचा पुत्र, येशू आपल्या पित्याबरोबर राहायला खूप आनंदित होता. नीतिसूत्रे ८:३० मध्ये येशू आणि त्याचा पिता या दोघांतील संबंध कसे होते त्याविषयी सांगितलेले आहे. स्वर्गात असताना बुद्धीचे व्यक्‍तिरुप असे वर्णन केलेल्या येशूने असे म्हटले: ‘मी पित्यापाशी कुशल कारागीर होतो; मी त्याला नित्य आनंददायी होतो.’ म्हणजे, पिता व पुत्रात किती प्रेमळ नाते होते!

मुलांना घरात खेळीमेळीचे वातावरण हवे. मुलांबरोबर खेळण्यासाठी वेळ काढल्याने असे खेळीमेळीचे वातावरण तयार होते. खेळल्याने पालक व बालक यांच्यात एक बंधन तयार होते. फेलीक्स नावाचे एक वडील याजशी सहमत होतात. त्यांचा मुलगा आता टीनएजर आहे. ते म्हणतात: “माझ्या मुलाबरोबर खेळायला मी खास वेळ बाजूला ठेवतो. यामुळे आम्हा बाप-लेकातील संबंध आणखी घनिष्ठ झाले आहेत. आम्ही एकत्र खेळ खेळतो, मित्रांसोबत वेळ घालवतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो. यामुळे आमचं संपूर्ण कुटुंबच एकमेकांच्या खूप जवळ आलंय.”

४ मुलांना देवाविषयी शिकवण्याची गरज आहे

येशूला त्याच्या पित्याने शिकवले. त्यामुळेच तो असे म्हणू शकला: “ज्या गोष्टी मी त्याच्यापासून [पित्यापासून] ऐकल्या त्या मी जगास सांगतो.” (योहान ८:२६) देवाच्या दृष्टीत, आपल्या मुलांना नैतिक व आध्यात्मिक शिक्षण देण्याची जबाबदारी पित्याची आहे. तेव्हा वडील या नात्याने तुम्ही तुमच्या मुलाच्या हृदयावर योग्य तत्त्वे गिरवणे आवश्‍यक आहे. आणि हे तुम्ही मूल कोवळ्या वयाचे असते तेव्हापासूनच सुरू केले पाहिजे. (२ तीमथ्य ३:१४, १५) फेलीक्स यांनी आपल्या मुलाला, तो बाळ होता तेव्हापासूनच बायबलमधल्या कथा वाचून दाखवायला सुरुवात केली. त्यांनी रंगीबेरंगी, रंजक कथांचा तसेच बायबल कथांचं माझं पुस्तक * यांत आढळणाऱ्‍या कथा वाचून दाखवल्या. त्यांचा मुलगा जसजसा मोठा होत गेला तसतसे त्यांनी, त्याच्या वयानुरुप इतर बायबल आधारित प्रकाशनांचा उपयोग करायला सुरुवात केली.

डोनीझेटे म्हणतात: “कौटुंबिक बायबल अभ्यास मुलांना आवडेल असा बनवणं खूप कठीण आहे. आध्यात्मिक गोष्टी आपल्या जीवनात महत्त्वाच्या आहेत हे पालकांनी आपल्या कार्यांतून दाखवून देणे महत्त्वाचे आहे, कारण आपले आईवडील बोलतात एक आणि करतात दुसरं, हे मुलांच्या चटकन लक्षात येतं.” तीन मुलांचे वडील, कार्लोस म्हणतात: “कुटुंबात कशाची गरज आहे यावर चर्चा करण्यासाठी आम्ही दर आठवडी एक सभा भरवतो. त्यावेळी कुटुंबातल्या प्रत्येकाला, कोणत्या विषयावर चर्चा करायची हे सांगायची संधी असते.” केल्वीन यांनी आपल्या मुलांबरोबर ते जिथंही असतील तिथं किंवा ते काहीही करत असले तरीसुद्धा देवाविषयी बोलायचा प्रयत्न केला. यावरून आपल्याला मोशेचे शब्द आठवतात, नाही का? मोशेने म्हटले होते: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.”—अनुवाद ६:६, ७.

५ मुलांना शिस्त लावली पाहिजे

मुलांनी जर यशस्वी व जबाबदार प्रौढ व्हायचे असेल तर त्यांना शिस्त लावली पाहिजे. काही पालकांना वाटते, की मुलांना शिस्त लावणे म्हणजे त्यांना बदडून काढणे किंवा चांगला चोप देणे, शिवीगाळ करणे. परंतु मुलांना शिस्त लावताना पालकांनी इतक्या कठोरपणे वागले पाहिजे, असे बायबलमध्ये कुठेही सांगितलेले नाही. उलट, पालकांनी यहोवाप्रमाणे प्रेमाने शिस्त लावली पाहिजे. (इब्री लोकांस १२:४-११) बायबल म्हणते: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.”—इफिसकर ६:४.

कधीकधी मात्र मुलांना शिक्षा द्यावी लागते. पण शिक्षा देताना मुलाला हे माहीत असले पाहिजे, की ही शिक्षा त्याला का दिली जात आहे. पालक देत असलेल्या शिक्षेमुळे मुलाला केव्हाही, आपण कुणाला नकोए, असे वाटू नये. मुलाला इजा होईपर्यंत बदडून काढले पाहिजे, असे बायबलमध्ये कोठेही सांगण्यात आलेले नाही. (नीतिसूत्रे १६:३२) केल्वीन म्हणतात: “कोणत्याही गंभीर चुका सुधारताना मी नेहमी माझ्या मुलांना हे स्पष्टपणे सांगायचो, की त्यांच्यावरील प्रेमामुळेच मी त्यांना शिक्षा करतोय.”

६ मुलांना संरक्षणाची गरज आहे

धोकेदायक प्रभावांपासून व वाईट लोकांपासून मुलांचे संरक्षण करणे आवश्‍यक आहे. पण हे जग तर “दुष्ट” लोकांनीच जास्त भरले आहे. हे लोक निष्पाप मुलांचे शोषण करण्यासाठी टपूनच बसले आहेत. (२ तीमथ्य ३:१-५, १३) तेव्हा, तुम्ही आपल्या मुलांना सुरक्षित कसे ठेवू शकाल? बायबलमध्ये हा सुज्ञ सल्ला देण्यात आला आहे: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.” (नीतिसूत्रे २२:३) आपल्या मुलांचे संकटापासून संरक्षण करण्याकरता तुम्ही नेहमी सतर्क असले पाहिजे. समस्यांची अपेक्षा करा व या समस्यांपासून मुलांचे संरक्षण करण्याकरता तुम्हाला जी काही खबरदारी घ्यावी लागते ती घ्या. जसे की, तुम्ही जर तुमच्या मुलांना इंटरनेटचा वापर करण्याची परवानगी दिली आहे तर, त्याचा उचितरीत्या उपयोग कसा करायचा हे मुलांना शिकवा. तुम्ही कंप्युटर घरात अशा ठिकाणी ठेवू शकता जिथून तुम्हाला येता-जाता मॉनिटरवर मुले काय पाहत आहेत हे सहज दिसू शकेल.

पित्याने आपल्या मुलांना, या निर्दयी जगात त्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्‍या धोक्यांपासून स्वतःला वाचवण्याकरता तयार व प्रशिक्षित केले पाहिजे. तुम्ही जवळ नसता तेव्हा कोणी तुमच्या मुलांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास काय करायचे, हे तुमच्या मुलांना माहीत आहे का? * आपल्या गुप्तांगांच्या उचित व अनुचित वापराविषयी मुलांना माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे. केव्हीन म्हणतात: “या गोष्टीची शिकवण द्यायचे काम मी इतरांवर सोडले नाही. लैंगिक शिक्षण मुलांचे शिक्षक देतील, असा मी विचार केला नाही. तर ही माझी जबाबदारी आहे, असं मला वाटलं. आणि मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्‍यांपासून दूर कसं राहायचं हे मी स्वतः माझ्या मुलांना शिकवलं.” केव्हीन यांची सर्व मुले सुरक्षित वातावरणात लहानाची मोठी झाली. आता त्या सर्वांची लग्नं होऊन ते आपापल्या संसारात आनंदी आहेत.

देवाची मदत घ्या

एक पिता आपल्या मुलांना देऊ शकत असलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे, त्यांना देवाबरोबर एक मजबूत नातेसंबंध जोडण्यास मदत करणे. याबाबतीत पित्याने मुलांपुढे स्वतःचे चांगले उदाहरण मांडले पाहिजे. डोनीझेटे म्हणतात: “देवाबरोबरचा नातेसंबंध त्यांना स्वतःला किती मौल्यवान वाटतो, हे पित्यांनी आपल्या कार्यांतून मुलांना दाखवले पाहिजे. खासकरून ते जेव्हा समस्यांना व अडीअडचणींना तोंड देत असतात तेव्हा त्यांना देवाच्या मदतीची किती आवश्‍यकता आहे हे मुलांना चांगल्या प्रकारे समजले पाहिजे. याबाबतीतही, पिता मुलांपुढे एक चांगलं उदाहरण मांडू शकतो. त्याच्या प्रार्थनांतून, त्याचा यहोवावर किती भरवसा आहे हे मुलांना दिसून आलं पाहिजे. कौटुंबिक प्रार्थनेच्या वेळी, देव दाखवत असलेल्या चांगुलपणाबद्दल त्याचे वारंवार आभार मानल्यामुळे, देवाला आपला मित्र बनवणं किती महत्त्वाचं आहे ही गोष्ट मुलांच्या मनावर बिंबेल.”

मग, एक चांगले वडील बनण्याचे गुपित काय आहे बरे? मुलांना यशस्वीपणे वाढवण्याच्याबाबतीत सर्वोत्तम जाणकार असलेल्या यहोवाच्या सल्ल्याचे पालन करणे, हे चांगले वडील बनण्याचे गुपित आहे. देवाच्या वचनातील मार्गदर्शनानुसार तुम्ही आपल्या मुलांना वाढवले तर नीतिसूत्रे २२:६ मध्ये वर्णन केलेले उत्तम परिणामही तुम्हाला पाहायला मिळतील. तिथे म्हटले आहे, की मुलाला जर देवाच्या शिक्षणात वाढवले तर “वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” (w०८ १०/१)

[तळटीपा]

^ या लेखातील शास्त्र आधारित सल्ला प्रामुख्याने पित्यासाठी असला तरी, त्यातील अनेक तत्त्व मातेलाही लागू होतात.

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले.

^ लैंगिक शोषणापासून मुलांचे संरक्षण करण्याच्या बाबतीत अधिक माहितीकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले सावध राहा! मे ८, १९९७, पृष्ठे ११-१५ पाहा.

[२१ पानांवरील चित्र]

पित्याने मुलांपुढे स्वतःचे उत्तम उदाहरण मांडले पाहिजे

[२२ पानांवरील चित्र]

पित्याने मुलांना आध्यात्मिक शिक्षणही दिले पाहिजे

[२३ पानांवरील चित्र]

मुलांना प्रेमाने शिस्त लावली पाहिजे