दावीद का घाबरला नाही?
आपल्या मुलांना शिकवा
दावीद का घाबरला नाही?
तुम्हाला कधी भीती वाटते का?— * आपल्यातील बहुतेकांना कधीकधी वाटते. मग तुम्ही काय करता?— आपल्यापेक्षा जे मोठे व शक्तिमान आहेत त्यांच्याकडे आपण जातो. जसे आपले पप्पा किंवा मम्मी. याबाबतीत आपण दाविदाच्या उदाहरणावरून बरेच काही शिकू शकतो. त्याने मदतीसाठी देवाला हाक मारली. त्याने एका गीतात देवाला असे म्हटले: “मी तुझ्यावर भरवसा टाकीन. . . . देवावर मी भरवसा ठेविला आहे, मी भिणार नाही.”—स्तोत्र ५६:३, ४.
घाबरायचे नाही, हे दावीद कोणाकडून शिकला असावा असे तुम्हाला वाटते? त्याच्या आईपप्पाकडून?— असंच वाटतं. त्याच्या वडिलांचे नाव इशाय होते. ते येशू ख्रिस्ताचे एक विश्वासू पूर्वज होते. आणि येशू ख्रिस्त देवाचा वचनयुक्त “शांतीचा अधिपति” होता. (यशया ९:६; ११:१-३, १०) इशायाच्या वडिलांचे म्हणजे दाविदाच्या आजोबांचे नाव होते, ओबेद. बायबलमध्ये ओबेदच्या आईच्या नावावरून एक पुस्तक आहे. माहीत आहे कोणते?— रूथ. रूथ एक एकनिष्ठ स्त्री होती. तिच्या नवऱ्याचे नाव होते, बवाज.—रूथ ४:२१, २२.
अर्थात, दाविदाचा जन्म व्हायच्या खूप वर्षांआधीच रूथ आणि बवाज मरण पावले होते. तुम्हाला बवाजाच्या आईचे म्हणजे दाविदाच्या खापर पणजीचे नाव आठवते का? ती यरिहोत राहायची. आणि तिने काही इस्राएली हेरांना वाचवले होते. तिने आपल्या खिडकीच्या बाहेर एक लाल रंगाची दोर बांधली होती त्यामुळे, यरिहोच्या भिंती खाली कोसळल्या तेव्हा ती तिच्या कुटुंबासहित वाचली होती. आठवले का तिचे नाव?— तिचे नाव होते रहाब. ती यहोवाची उपासना करू लागली व आपण तिच्या धैर्याचे अनुकरण करावे म्हणून तिचे उदाहरण बायबलमध्ये दिलेले आहे.—यहोशवा २:१-२१; ६:२२-२५; इब्री लोकांस ११:३०, ३१.
यहोवाच्या या विश्वासू सेवकांविषयी दाविदाच्या आईवडिलांनी नक्कीच त्याला शिकवले असावे कारण, अशा गोष्टी आपल्या मुलांना शिकवाव्यात अशी देवाने सर्व आईवडिलांना आज्ञा दिली होती. (अनुवाद ६:४-९) आणि मग काही वर्षांनंतर, देवाचा संदेष्टा शमुवेल याला देवाने, इशायाचा धाकटा मुलगा दावीद याला इस्राएलचा राजा बनण्याकरता निवडण्यास सांगितले.—१ शमुवेल १६:४-१३.
एकेदिवशी इशाय दाविदाला त्याच्या तीन थोरल्या भावांसाठी जेवण घेऊन जायला सांगतो. दाविदाचे हे भाऊ, देवाचे शत्रू असलेल्या फिलिस्टीन लोकांविरुद्ध लढायला गेलेले असतात. तिथे गेल्यावर दावीद धावत सैन्यात जातो आणि आपल्या भावांपाशी बोलत असतो तेवढ्यात, गल्याथ नावाचा एक पलिष्टी वीर काय बोलत असतो ते तो ऐकतो. तो ‘जिवंत देवाच्या सेनेची’ खिल्ली उडवत असतो. माझ्याबरोबर लढायला कोण येणार, असे जेव्हा गल्याथ म्हणतो तेव्हा सर्व जण घाबरून जातात. आणि दावीद जेव्हा
त्याच्याबरोबर लढायची तयारी दाखवतो तेव्हा राजा शौल त्याला बोलवून घेतो. तो त्याला म्हणतो: ‘तू केवळ एक तरूण आहेस.’मग दावीद शौलाला सांगतो, की एकदा तो आपल्या वडिलांच्या शेरडामेंढरांची राखण करत असताना मेंढरू पळवून नेणाऱ्या एका सिंहाला आणि एकदा एका अस्वलाला त्याने ठार मारले होते. ‘हा पलिष्टीपण त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल’ असे दावीद म्हणतो. मग शौल राजा म्हणतो: “जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.” यानंतर दावीद काय करतो माहीत आहे? तो पाच गुळगुळीत गोटे घेतो, आपल्या धनगरी बटव्यात टाकतो आणि मग आपली गोफण घेऊन या राक्षसाबरोबर लढायाला जातो. गल्याथ जेव्हा या मुलाला म्हणजे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ठेंगणा असलेल्या दावीदाला पाहतो तेव्हा जोरात ओरडून म्हणतो: “असा जवळ ये म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यांस” देतो. दावीद त्याला म्हणतो: “सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे.” आणि मग मोठ्याने म्हणतो: “मी तुझा वध करीन.”
असे बोलून दावीद गल्याथाच्या दिशेने धावत जातो, आपल्या बटव्यातून एक गोटा काढून आपल्या गोफणीत बसून सरळ गल्याथाच्या डोक्याच्या दिशेने भिरकावतो. एकाच गोट्यात गल्याथ खाली कोसळतो. त्याला मेलेले पाहून फिलिस्टीन लोक घाबरतात. ते सैराभैरा पळू लागतात. इस्राएली लोक त्यांचा पाठलाग करून ही लढाई जिंकतात. आपल्या कुटुंबाबरोबर कृपया १ शमुवेल १७:१२-५४ मधील ही संपूर्ण कथा वाचा.
लहान असल्यामुळे तुम्हाला कधीकधी यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्यास भीती वाटत असेल. यिर्मया तरुण होता तेव्हा त्यालाही सुरुवातीला भीती वाटली होती. पण देवाने त्याला सांगितले: “तू भिऊ नको; . . . मी तुझ्याबरोबर आहे.” यिर्मया मग घाबरला नाही. देवाने त्याला जसे सांगितले होते तसे त्याने प्रचारकार्य केले. दावीद आणि यिर्मया यांच्यासारखे तुम्हीसुद्धा यहोवावर भरवसा ठेवलात तर तुम्हाला भीती वाटणार नाही.—यिर्मया १:६-८. (w०८ १२/१)
[तळटीप]
^ तुम्ही हा लेख जर आपल्या मुलाला वाचून दाखवत असाल तर, लेखात काही वाक्यांच्या पुढे जेव्हा एक छोटीशी रेघ तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही तेथे थांबून तो प्रश्न मुलाला विचारला पाहिजे.
प्रश्न:
❍ गल्याथाने देवाच्या सैन्याची खिल्ली उडवली तेव्हा दाविदाने काय केले?
❍ दाविदाने गल्याथाला कसे हरवले?
❍ आपण पण आज कुणालाही घाबरायचे नाही, हे कसे शिकू शकतो?