‘देवाचे अनुकरण करणारे व्हा’
देवाच्या जवळ या
‘देवाचे अनुकरण करणारे व्हा’
दयाळुपणा. कनवाळूपणा. क्षमाशील. प्रेम. आजच्या जगात हे फक्त शब्दच राहिलेत, फार कमी लोक हे गुण दाखवतात. तुमच्याविषयी काय? आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण हे गुण अंगी बाणवू शकणार नाही, असे कधी तुम्हाला वाटले आहे का? तुमचे टीकात्मक हृदय अशी सबब देईल, की अंगात मुरलेल्या वाईट सवयी किंवा जीवनात आलेले दुःखदायक अनुभव, यांसारख्या काही अडखळणांमुळे तुम्हाला चांगले गुण अंगी बाणवण्यास जड जाते. पण, बायबलमध्ये एक दिलासा देणारे सत्य शिकवण्यात आले आहे—आपल्या सर्वांमध्ये चांगले गुण बाणवण्याचे सामर्थ्य असल्याचे आपल्या निर्माणकर्त्याला ठाऊक आहे.
देवाचे वचन खऱ्या ख्रिश्चनांना असा सल्ला देते: “तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.” (इफिसकर ५:१) देवाला आपल्या उपासकांमध्ये कमालीचा भरवसा आहे हे वरील वचनांतील शब्दांवरून दिसून येते. कसे काय? यहोवा देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरुपाचा व आपल्याशी सदृश असे निर्माण केले. (उत्पत्ति १:२६, २७) त्यामुळे देवाने मानवाला त्याच्यासारख्याच गुणांसहित बनवले. * म्हणून बायबल जेव्हा ख्रिश्चनांना, ‘देवाचे अनुकरण करणारे व्हा’ असे आर्जवते तेव्हा जणू काय यहोवा देव स्वतः त्यांना म्हणतो: ‘मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही अपरिपूर्ण असूनही मी संतुष्ट होईन इतपत चांगले गुण अंगी बाणवण्याची क्षमता तुमच्यात आहे.’
देवाचे कोणते गुण आपण आपल्या अंगी बाणवू शकतो? इफिसकर ५:१ वचनाच्या आसपासच्या वचनात उत्तर सापडते. प्रेषित पौलाने, देवाचे अनुकरण करणारे व्हा असा सल्ला देताना, “तर मग” या शब्दांनी सल्ल्याला सुरुवात केली. याचा अर्थ हे वचन आधीच्या वचनांशी संबंधित आहे. आधीच्या वचनांत दयाळुपणा, कनवाळूपणा, क्षमाशीलता या गुणांचा उल्लेख करण्यात आला आहे. (इफिसकर ४:३२; ५:१) मग, देवाचे अनुकरण करणारे व्हा असा सल्ला देण्यात आलेल्या वचनानंतर, पौलाने ख्रिश्चनांना, निःस्वार्थ प्रेम प्रदर्शित करणारा जीवनमार्ग निवडण्यास आर्जवले. (इफिसकर ५:२) खरेच, दयाळुपणा व कनवाळूपणा दाखवण्याच्या बाबतीत, इतरांना मोठ्या मनाने क्षमा करण्याच्या बाबतीत व प्रेम दाखवण्याच्या बाबतीत यहोवा देवाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण आपल्या सर्वांपुढे आहे.
पण याबाबतीत आपण देवासारखे का झाले पाहिजे? आपण देवासारखे का झाले पाहिजे त्याची जबरदस्त प्रेरणा पौलाच्या शब्दांमध्ये आढळून येते. त्याने म्हटले: “देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.” किती मर्मस्पर्शी विधान आहे हे! यहोवा आपल्या उपासकांना आपल्या प्रिय मुलांप्रमाणे समजतो. एक लहान मुलगा जसे आपल्या बापाप्रमाणे व्हायचा प्रयत्न करत असतो तसेच खरे ख्रिश्चन आपल्या स्वर्गीय पित्यासारखे होण्याचा आपल्या परीने होता होईल तो प्रयत्न करतात.
यहोवा कोणालाही त्याचे अनुकरण करण्याची बळजबरी करत नाही. उलट, त्याने आपल्याला इच्छा स्वातंत्र्य देऊन बहुमानित केले आहे. तेव्हा, देवाचे अनुकरण करायचे किंवा नाही, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. (अनुवाद ३०:१९, २०) एक गोष्ट मात्र विसरू नका. तुमच्यामध्ये देवसदृश्य गुण दाखवण्याची क्षमता आहे. देवाचे अनुकरण करण्याआधी तुम्हाला, त्याच्या गुणांविषयी व मार्गांविषयी शिकून घ्यावे लागेल. बायबल तुम्हाला, अतुलनीय व्यक्तिमत्त्व असलेल्या देवाच्या गुणांविषयी व त्याच्या मार्गांविषयी शिकण्यास मदत करू शकते. याच देवाकडे कोट्यवधी लोक त्याचे अनुकरण करण्याकरता आकर्षित झाले आहेत. (w०८ १०/१)
[तळटीप]
^ कलस्सैकर ३:९, १० या वचनावरून असे सूचित होते, की देवाच्या प्रतिरुपात आपल्याला निर्माण करण्यात आले याचा अर्थ आपण आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल करणे आवश्यक आहे. ज्यांना देवाला संतुष्ट करायचे आहे त्यांनी ‘आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे नवा मनुष्य धारण केला पाहिजे,’ असे त्यांना आर्जवण्यात आले आहे.