मेल्यानंतर माणसाचे काय होते?
मेल्यानंतर माणसाचे काय होते?
‘सर्व, म्हणजे दुष्ट सुद्धा अमर आहेत. सर्वांना, कधीही न विझणाऱ्या आगीत अनंत बदल्याची शिक्षा मिळाली आहे.’ —क्लेमेंट ऑफ अलेक्झॅन्ड्रिया, सा.यु. दुसऱ्या व तिसऱ्या शतकातील लेखक.
नरक हे यातना देण्याचे ठिकाण आहे असा क्लेमेंटप्रमाणे विश्वास करणारे लोक दावा करतात, की माणूस अमर आहे. पण बायबल या शिकवणीला दुजोरा देते का? पुढे काही प्रश्न दिले आहेत आणि बायबल या प्रश्नांची उत्तरे कसे देते ते पाहा.
पहिला मनुष्य आदाम याने पाप केल्यानंतर देवाने त्याला कोणती शिक्षा दिली? आदामाला देवाने नरकात चिरकाल यातना भोगण्याची शिक्षा दिली नाही. तर देवाने त्याला काय शिक्षा दिली त्याचे, मराठीतील कॉमन लँग्वेज अनुवादात पुढील प्रकारे भाषांतर करण्यात आले आहे: “निढळाच्या घामानं कमावलेली भाकर तू खाशील. – अगदी ज्या मातीचा तू बनवलेला आहेस त्या मातीला पुन्हा मिळेपर्यंत! कारण तू आहेच माती अन् फिरून मातीला मिळशील!” (प्रारंभी ३:१९) आदामाच्या शरीरातला कोणताही भाग त्याच्या मृत्यूनंतर जिवंत राहील, असा अर्थ देणारे कोणतेही शब्द देवाच्या तोंडून निघाले नाहीत.
आपल्याविषयी काय? बायबलमध्ये उपदेशक ३:२० यांत असे म्हटले आहे: “दोघेही [माणूस आणि प्राणी] एकाच ठिकाणी जातात. दोघांनाही मातीपासून तयार केले आहे. दोघेही मातीलाच मिळणार.” तसेच प्रेषित पौलाने असे लिहिले: “एका माणसामुळे [आदामामुळे] या जगात पापाचा शिरकाव झाला. त्या पापामुळे मृत्यूदेखील आला. मृत्यूचे साम्राज्य साऱ्या मानवजातीवर पसरले; याचे कारण साऱ्या मानवजातीने पाप केले.” (रोमन ५:१२) या वचनानुसार सर्व मानवजात पापी झाल्यामुळे ती मरण पावते.
मरण पावलेल्यांना ऐकू येते का, ते पाहू शकतात का, बोलू शकतात का किंवा विचार करू शकतात का? देवाचे वचन बायबल म्हणते: “आपण मरणार आहोत हे जिवंतांना माहीत असते. उलट मेलेल्यांना काहीच माहीत नसते. . . . तू ज्या अधोलोकात जात आहेस तिथे काम, विचार, विद्वत्ता अगर ज्ञान नाही.” (उपदेशक ९:५, १०) जर मेलेल्यांना “काहीच माहीत नसते” व त्यांना कसलेही “विचार” नसतात तर मग नरकातील यातना ते कसे काय भोगतील बरे?
येशू ख्रिस्ताने मृत्यूची तुलना कोणत्याही प्रकारच्या जागेपणाशी केली नाही तर झोपेशी केली. * (योहान ११:११-१४) पण काही जण म्हणतील, की नरक तप्त असते व दुष्कर्म्यांना नरकाग्नीत टाकले जाते, अशी येशूनेच शिकवण दिली नाही का? तर आता आपण येशूनेच वापरलेल्या नरक या शब्दाचा नेमका काय अर्थ होतो ते पाहूया. (w०८ ११/१)
[तळटीप]
^ आणखी सविस्तर माहितीकरता याच मासिकातल्या पृष्ठे १६ व १७ वरील, “येशू काय शिकवतो—मृतांसाठी असलेल्या आशेविषयी” हा लेख पाहा.