येशूने वापरलेल्या नरक शब्दाचा नेमका अर्थ
येशूने वापरलेल्या नरक शब्दाचा नेमका अर्थ
“तुझा डोळा तुला पाप करायला लावीत असेल तर तो उपटून टाक. दोन डोळे घेऊन नरकात खितपत पडण्यापेक्षा एकाक्ष होऊन देवराज्यात जाणं तुझ्या चांगल्याचं आहे! कारण नरकात लागणारी कीड मरत नाही नि तेथला अग्नी कधीही विझत नाही.”—मार्क ९:४७, ४८.
दुसऱ्या एका प्रसंगी येशूने, न्यायाच्या काळात तो दुष्टांना काय म्हणेल त्याविषयी सांगताना असे म्हटले: “चालते व्हा इथनं! तुम्ही शापित आहां! सैतान अन् त्याचे दूत यांच्यासाठी सिद्ध केलेल्या अनंत अग्नीत जाऊन पडा!” हे शापित “अनंत शिक्षा भोगायला जातील,” असेही त्याने म्हटले.—मत्तय २५:४१, ४६.
येशूचे वरील शब्द वाचल्या वाचल्या कोणाच्याही मनात असाच विचार येईल, की तो नरकाग्नीची शिकवण देतोय. पण बायबलमध्ये तर स्पष्टपणे असे म्हटले आहे, की “मेलेल्यांना काहीच माहीत नसते.” (उपदेशक ९:५) तेव्हा, येशू अर्थातच देवाच्या वचनाच्या विरोधात काहीही बोलणार नाही.
मग येशू जेव्हा एखाद्याला “नरकात” टाकण्याविषयी बोलला तेव्हा त्याच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय होता? येशूने ज्याविषयी सावध केले तो ‘अनंत अग्नी’ खरोखरचा आहे की लाक्षणिक? दुष्ट लोक कोणत्या अर्थाने, “अनंत शिक्षा भोगायला जातील?” या प्रत्येक प्रश्नांचे आपण परीक्षण करून बघूया.
येशू जेव्हा एखाद्याला “नरकात” टाकण्याविषयी बोलला तेव्हा त्याच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय होता? मार्क ९:४७ येथे ज्याचे भाषांतर ‘नरक’ असे केले आहे तो मूळ ग्रीक शब्द आहे जिएन्ना. हा शब्द, गेह हिन्नोम या हिब्रू शब्दातून आला आहे ज्याचा अर्थ “हिन्नोमचे खोरे” असा होतो. हिन्नोमचे खोरे प्राचीन जेरूसलेम शहराला लागूनच होते. इस्राएलच्या राजांच्या काळांत, या खोऱ्यात बालकांचा बळी देण्याची प्रथा होती जी देवाला किळसवाणी वाटत होती. खोट्या उपासनेची ही प्रथा आचरणाऱ्यांना मी मृत्यूदंड देईन, असे देवाने म्हटले होते. त्यामुळे हिन्नोम खोऱ्याला “कत्तलीचे खोरे” असे नाव पडणार होते. ‘या लोकांची प्रेते’ या खोऱ्यात उघडीच पडणार होती. (यिर्मया ७:३०-३४) त्यामुळे यहोवाने असे भाकीत केले, की हिन्नोमचे खोरे हे जिवंत लोकांना यातना देण्याचे ठिकाण नव्हे तर मृत शरीरांचे कचरास्थळ बनेल.
येशूच्या दिवसांत, जेरुसलेमवासी या हिन्नोम खोऱ्यात सर्व कचरा टाकत असत. ते कुविख्यात गुन्हेगारांची शवे देखील या खोऱ्यात टाकून देत आणि तिथे सतत अग्नी जळत ठेवत जेणेकरून ही शवे आणि गावचा सर्व कचरा जाळला जाई.
येशूने जेव्हा न मरणाऱ्या किड्यांचा व कधीही न विझणाऱ्या आगीचा उल्लेख केला तेव्हा त्याच्या मनात, यशया ६६:२४ मध्ये जे म्हटले आहे ते होते. या वचनात यशया म्हणतो, ‘ज्यांनी [देवाविरुद्ध] बंड केले त्यांची प्रेते किडे निरंतर खात राहतील! त्यांना भस्म करणारा अग्नी कधी विझणार नाही.’ येशू आणि त्याच्या श्रोत्यांना माहीत होते, की यशयाच्या पुस्तकातील हे शब्द, पुरण्यास लायक नसलेल्या गुन्हेगारांच्या शवांना लागू होतात.
मत्तय १०:२८) तेव्हा, गेहेन्ना हे चिरकालिक यातना देण्याचे ठिकाण नव्हे तर चिरकालिक मृत्यूचे प्रतीक आहे.
म्हणूनच येशूने हिन्नोम खोरे किंवा गेहेन्ना यांचा उपयोग, ज्यांना पुनरुत्थानाची आशा नाही अशांचा मृत्यू दर्शवण्यासाठी केला. त्यामुळेच त्याने जेव्हा “जो आत्मा [जीवन] नि शरीर अशा दोहोंचाही नरकात नाश करू शकतो अशाला भ्या,” अशी ताकीद दिली तेव्हा, ‘नरक’ हा शब्द वापरताना त्याच्या मनात हेच हिन्नोमचे खोरे अथवा गेहेन्ना होते. (येशूने ज्याविषयी सावध केले तो ‘अनंत अग्नी’ खरोखरचा आहे की लाक्षणिक? येशूने उल्लेख केलेला व मत्तय २५:४१ मध्ये नमूद असलेला ‘अनंत अग्नी’ “सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी सिद्ध” करण्यात आला होता, याची नोंद घ्या. पण खरोखरचा अग्नी आत्मिक प्राण्यांना जाळू शकतो का? की, येशू लाक्षणिक अर्थाने “अग्नी” हा शब्द वापरत होता? याच मत्तयाच्या २५ व्या अध्यायात येशूने उल्लेख केलेली ‘मेंढरे’ व ‘शेरडे’ ही खरोखरची शेरडे-मेंढरे नाहीत. ती दोन प्रकारच्या लोकांना चित्रित करतात. (मत्तय २५:३२, ३३) येशूने ज्या अनंत अग्नीचा उल्लेख केला तो अग्नी लाक्षणिकरीत्या दुष्टांना पूर्णपणे भस्म करतो.
दुष्ट लोक कोणत्या अर्थाने, “अनंत शिक्षा भोगायला जातील?” बहुतेक भाषांतरांमध्ये, मत्तय २५:४६ या वचनात “शिक्षा” हा शब्द वापरलेला असला तरी, कोलासीन या ग्रीक शब्दाचा मूळ अर्थ, “झाडांची वाढ खुंटवणे” किंवा काट-छाट करणे अथवा नको त्या फांद्या छाटून टाकणे, असा होतो. मेंढरासमान लोकांना सार्वकालिक जीवन मिळेल आणि शेरडासमान अपश्चात्तापी लोक “अनंत शिक्षा” भोगतील; अर्थात जीवनापासून त्यांना कायमचे छाटले जाईल.
तुम्हाला काय वाटते?
माणसात अमर आत्मा असतो, अशी शिकवण येशूने कधीही दिली नाही. पण, मृतांचे पुनरुत्थान होईल, ही शिकवण मात्र त्याने अनेकदा दिली. (लूक १४:१३, १४; योहान ५:२५-२९; ११:२५) माणूस मेल्यावर त्याच्यातील काही अंश जिवंत राहतो असा जर येशूचा विश्वास असता तर मृतांना पुन्हा जिवंत केले जाईल, असे त्याने म्हटले असते का?
देव दुष्ट लोकांना क्रूरपणे चिरकाल यातना देत राहील, अशीही शिकवण येशूने कधी दिली नाही. उलट तो म्हणाला: “देवाच्या पुत्रावर श्रद्धा ठेवणाऱ्या कोणाचाही नाश होऊ नये, पण त्या प्रत्येकाला अनंत जीवन लाभावं म्हणून देवानं आपला एकुलता एक पुत्र देणगीदाखल दिला. इतकं त्याचं जगावर प्रेम होतं!” (योहान ३:१६) जे येशूवर विश्वास ठेवत नाहीत ते जिवंत राहणार नाहीत, असे येशूने का बरे सुचवले असेल? जे विश्वास ठेवत नाहीत असे लोक नरकाग्नीत चिरकाल शिक्षा भोगत तडपत राहतील, असेच जर त्याला सुचवायचे असते तर ते त्याने स्पष्टपणे बोलून दाखवले नसते का?
यास्तव, नरक हे यातना देण्याचे ठिकाण आहे, ही बायबलची शिकवण नाही. तर ती, मूर्तीपूजक शिकवण आहे जिला ख्रिस्ती शिकवण म्हणून भासवले जाते. (“नरकाच्या शिकवणीच्या उगमाचा सारांश” हा पृष्ठ ६ वरील चौकोन पाहा.) देव लोकांना नरकात कायमच्या यातना देत नाही. नरकाविषयीचे सत्य माहीत झाल्यावर आता तुम्हाला देवाबद्दल काय वाटते? (w०८ ११/१)
[६ पानांवरील चौकट]
नरकाच्या शिकवणीच्या उगमाचा सारांश
मूर्तीपूजक धर्मांतून सुरु झालेली शिकवण: नरक हे जळते ठिकाण आहे, असा विश्वास प्राचीन इजिप्शियन लोक करायचे. सा.यु.पू. १३७५ चे द बुक अम-टोट नावाच्या पुस्तकात अशा लोकांबद्दल म्हटले आहे ज्यांना, “अग्नीकुंडांमध्ये सरळ डोक्यावर खाली फेकण्यात येईल; आणि . . . तेथून ते कधीही वाचू शकणार नाहीत, व . . . आगीच्या ज्वालांपासून पळून जाऊ शकणार नाहीत.” सुमारे १,९०० वर्षांपूर्वी हयात असलेला ग्रीक तत्त्वज्ञानी प्लुटार्क याने, पाताळात असलेल्यांविषयी असे लिहिले: “तेथे ते भयानक पीडा, लज्जास्पद व अतिशय यातना देणाऱ्या शिक्षा भोगताना अक्षरशः विव्हळत असत.”
यहुदी धर्मातही शिरकाव: पहिल्या शतकातील इतिहासकार, जोसीफस याने असे सांगितले, की एस्सीन्स नावाचा एक यहुदी पंथ, “आत्मा अमर असतो व तो कायम जिवंत राहतो,” असा विश्वास करायचा. जोसीफस पुढे असेही म्हणतो: “ग्रीक लोक देखील असाच विश्वास करायचे. . . . . दुष्कर्मी लोकांना एका अंधाऱ्या व भीतीदायक ठिकाणी पाठवले जाते जिथे शिक्षांना कधी अंतच नसतो, असा त्यांचा विश्वास होता.”
“ख्रिस्ती धर्मात” शिरकाव: सा.यु. दुसऱ्या शतकात, अपोकॅलिप्स ऑफ पीटर नावाच्या अपॉक्रिफा पुस्तकात दुष्टांबद्दल असे म्हटले होते: “त्यांच्यासाठी कधीही न विझणारी आग राखून ठेवण्यात आली आहे.” या पुस्तकात असेही म्हटले होते: “कोपाचा दूत एज्रीएल, अर्धवट जळालेल्या स्त्री-पुरुषांची शरीरे आणतो व ती मनुष्यांचे नरक असलेल्या अंधाऱ्या ठिकाणी फेकून देतो; आणि तिथे एक आत्मिक व्यक्ती त्यांना शिक्षा देते.” सा.यु. दुसऱ्या शतकाच्या आसपास, ॲन्टियोकचा लेखक थिओफिलिस, ग्रीक संदेष्ट्री सिबिल हिच्याविषयी म्हणतो, की तिने दुष्टांच्या शिक्षेविषयी असे भाकीत केले: “तुमच्यावर जळता अग्नी येईल व तुम्ही या ज्वालांमध्ये रोज जळत राहाल.” हे शब्द “खरे, उपयोगी, योग्य व सर्व लोकांच्या भल्याचे आहेत,” असे थिओफिलिसने म्हटले.
नरकाग्नीच्या नावाखाली मध्ययुगातील हिंसाचार: इंग्लंडची राणी मेरी पहिली (१५५३-१५५८) हिला “रक्तरंजित मेरी” असे नाव पडले. तिने जवळजवळ ३०० प्रोटेस्टंट लोकांना खांबांना बांधून पेटवून दिले होते. “पाखंड्यांना जसे नरकाग्नीत चिरकाल जाळले जात आहे, तसेच मीही दैवी सूडाचे अनुकरण करून या लोकांना पृथ्वीवर जाळण्याद्वारे सर्वांत श्रेष्ठ काम करत आहे,” असे तिने म्हटल्याचे सांगितले जाते.
नरकाची सुधारित शिकवण: अलिकडील वर्षांत काही धार्मिक पंथांनी नरकाच्या शिकवणीत सुधारणा केल्या आहेत. उदाहरणार्थ, चर्च ऑफ इंग्लंडच्या डॉक्ट्रिन कमिशनने १९९५ मध्ये म्हटले, की “नरक हे चिरकालिक यातनेचे ठिकाण नाही. तर ते देवाच्या विरोधात असलेला मार्ग निवडण्यास सूचित करते. हा मार्ग देवाच्या अगदीच विरोधात असल्यामुळे व ही निवड कायमस्वरुपी असल्यामुळे, अशी निवड केल्याचा एकच परिणाम होऊ शकतो: त्या व्यक्तीचे अस्तित्व पूर्णपणे मिटणे.”
[७ पानांवरील चौकट/चित्र]
‘अग्नी सरोवर’ काय आहे?
प्रकटीकरण २०:१० मध्ये म्हटले आहे, की सैतानाला ‘अग्नी सरोवरात’ टाकले जाईल व “युगानयुग रात्रंदिवस यातना” दिल्या जातील. सैतानाला जर यातना द्यायच्या आहेत तर देवाला त्याला जिवंत ठेवावे लागेल. पण बायबल तर म्हणते, की येशू त्याचा “नायनाट” करणार आहे. (हिब्रू २:१४) लाक्षणिक धगधगते सरोवर म्हणजे “दुसरे मरण.” (प्रकटीकरण २१:८) बायबलमध्ये हा मृत्यूचा, अर्थात आदामाच्या पापामुळे आलेल्या मृत्यूचा व ज्या मृत्यूतून एखाद्याची पुनरुत्थानाद्वारे सुटका होऊ शकते त्या मृत्यूविषयीचा पहिलाच उल्लेख नाही. (१ करिंथकर १५:२१, २२) ‘अग्नीचे सरोवर’ त्यात असलेल्यांना देईल, असे बायबलमध्ये म्हटलेले नाही. तेव्हा, हे “दुसरे मरण” वेगळ्या प्रकारचे मरण असावे; हे एक असे मरण आहे जे शेवटचे असेल.
मग, ‘अग्नी सरोवरात’ असलेल्यांना युगानयुग यातना दिल्या जातात ते कोणत्या अर्थाने? कधीकधी, “यातना देणे” याचा अर्थ एखाद्याला “आवर घालणे” असा होऊ शकतो. एकदा येशूसमोर भूत लागलेली माणसे येऊन अशी ओरडू लागली: “आमची वेळ येण्यापूर्वीच तुम्ही आमचे हाल करायला [आम्हाला आवरण्यास अर्थात अथांग विवरात डांबून ठेवायला] आलात की काय?” (मत्तय ८:२९; लूक ८:३०, ३१, किंग जेम्स भाषांतर) यास्तव, ‘सरोवरात’ असलेल्या सर्वांना चिरकालिक आवर घालून “यातना” दिल्या जातील किंवा त्यांना “दुसरे मरण” येईल.