व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुलांना वळण लावताना

मुलांना वळण लावताना

कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरूकिल्ल्या

मुलांना वळण लावताना

जॉन: * माझ्या हातून एखादी चूक झाल्यास मला शिक्षा करण्याआधी माझे आई-वडील मी ती चूक का केली व कशामुळे केली हे समजून घेण्याचा खरोखरच प्रयत्न करायचे. हीच गोष्ट मी माझ्या मुलींच्या बाबतीत करतो. पण माझी बायको, ॲलसन हिच्या घरातील वातावरण जरा निराळे होते. शिस्त लावण्याची तिच्या आईवडिलांची पद्धत वेगळीच होती. मुलांच्या हातून एखादी चूक घडल्यावर ते कोणताही विचार न करता त्यांना सरळ शिक्षाच करायचे. मला वाटते कधी कधी माझी बायकोही अशाच कठोर रीतीने आमच्या मुलांना वळण लावते.

कॅरल: मी केवळ पाच वर्षांची असताना आमचे वडील आम्हाला वाऱ्‍यावर टाकून गेले. त्यांना माझी किंवा माझ्या तीन धाकट्या बहिणींची काळजी नव्हती. वडील सोडून गेल्यामुळे आईला कामाला जावं लागलं. आम्हाला हवं ते देण्यासाठी ती खूप कष्ट करायची. आणि ती कामाला जायला लागल्यामुळं लहान बहिणींना सांभाळण्याची जबाबदारी साहजिकच माझ्यावर येऊन पडली. अशा प्रकारे अगदी लहान वयात पालकाची भूमिका निभावण्यातच माझं बालपण हरवून गेलं. आज देखील मी खेळकर कमी व गंभीरच जास्त आहे. त्यामुळं माझ्या मुलांच्या हातून चुका होतात तेव्हा त्या गोष्टींचा नको तितका विचार करून, चिंता करून मी अस्वस्थ होते. अमूक चूक मुलांच्या हातून का घडली व कोणत्या मनःस्थितीत त्यांनी ती चूक केली, हे मला जाणून घ्यायचं असतं. याच्या अगदी उलट माझा नवरा मार्क आहे. त्याचे वडील प्रेमळ, पण कडक देखील होते व आईची ते खूप काळजी घ्यायचे. म्हणूनच माझा नवरा आमच्या मुलींकडून काही चूक झाल्यास जास्त विचार करत बसत नाही. तर नेमकं काय झालं होतं ते पाहतो, त्यावर तोडगा काढतो आणि समस्या तिथंच मिटवतो.

जॉन व कॅरल यांनी वर जे काही सांगितले आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे, लहानपणी तुमचे जसे संगोपन झाले असेल तसेच तुम्ही तुमच्या मुलांचे संगोपन कराल. पती-पत्नीची कौटुंबिक पार्श्‍वभूमी वेगवेगळी असते तेव्हा मुलांना वळण लावण्याच्या बाबतीत दोघांचे दृष्टिकोनही सहसा वेगवेगळे असू शकतात. आणि यामुळे कधीकधी त्यांच्या विवाहात समस्या येऊ शकतात.

यासोबतच पालकांची दमछाक होते तेव्हा समस्येत आणखीनच भर पडू शकते. नव्यानेच आईवडील झालेल्या जोडप्यांना कळून चुकते की मुलांना वळण लावणे इतके सोपे नाही. यात त्यांचा बराच वेळ जातो, ते खूप थकून जातात. जोन आणि डारन यांनी आपल्या दोन मुलींचे संगोपन केले. त्याविषयी जोन असे म्हणते: “माझ्या मुलींवर मी खूप प्रेम करते पण त्या अशा काही गोष्टी करायच्या ज्यामुळे मी चिडायचे. जसे की त्यांनी ठराविक वेळीच झोपले पाहिजे असं मला वाटायचं पण त्यांची झोपायची इच्छा नसायची. त्या रात्री-अपरात्री कधीही उठायच्या. मी बोलत असताना त्या मधेमधे बोलायच्या. त्यांचे बूट, कपडे आणि खेळणी कोठेही टाकायच्या आणि फ्रीजमधून काढलेल्या वस्तू पुन्हा आत ठेवायच्या नाहीत.”

दुसऱ्‍या मुलाच्या बाळंतपणानंतर जॅक यांच्या बायकोला पोस्टपार्टम डिप्रेशन (गंभीर स्वरूपाचे नैराश्‍य) झाले. तो म्हणतो: “पुष्कळदा असं व्हायचं की मी कामावरून खूप थकून-भागून यायचो आणि मग मध्यरात्रीपर्यंत तान्ह्‌या बाळासाठी जागरण करावं लागायचं. यामुळे थोरल्या मुलीला वळण लावण्याकडं आमचं दुर्लक्ष व्हायचं. आम्हा दोघा पती-पत्नीचं जास्त लक्ष बाळाकडं असल्यामुळं तिला राग यायचा.”

अशा दमलेल्या पालकांचे मुलाला वळण लावण्याच्या बाबतीत दुमत होते तेव्हा लहान-सहान कुरबुरींचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात होऊ शकते. हे वाद सोडवले नाहीत तर ते चिघळून जोडप्यात दरी निर्माण होऊ शकते. यामुळे मुलांना पालकांचा गैरफायदा घेण्याची संधी मिळते. आपली मनमर्जी करण्यासाठी कोणत्या पालकाकडे धाव घ्यायची हे त्यांना सांगावे लागत नाही. तेव्हा, एखाद्या जोडप्याला बायबलची कोणती तत्त्वे मुलांना योग्य तालीम देण्यासोबतच आपले वैवाहिक बंधन टिकवण्यास मदत करू शकतात?

एकमेकांसाठी वेळ काढा

पती-पत्नीतील जवळीक ही मुलांचा जन्म होईपर्यंतच नव्हे तर ती मोठी होऊन घर सोडून गेल्यावरही टिकून राहिली पाहिजे. याच जवळीकीविषयी बायबल सांगते: “देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्तय १९:६) उलट, मुलांविषयी देवाचा काय उद्देश आहे हे याच उताऱ्‍यात सांगितलेले आहे. मुले मोठी झाल्यावर ती आपल्या “आईबापास सोडून” जातील असे त्यात म्हटले आहे. (मत्तय १९:५) खरे तर, मुलांचे संगोपन हा वैवाहिक जीवनातील मुख्य घटक नव्हे तर केवळ एक टप्पा आहे. तेव्हा, पालकांनी मुलांना वळण लावण्याकरता अवश्‍य वेळ काढला पाहिजे. पण त्यासोबतच त्यांनी आपले वैवाहिक बंधनही मजबूत ठेवले पाहिजे. कारण बंधन मजबूत असले तरच पालक आपल्या मुलांचे संगोपन योग्य प्रकारे करू शकतात.

मुलांचे संगोपन करताना पती-पत्नी आपले वैवाहिक बंधन मजबूत कसे ठेवू शकतात? शक्यतो, मुलांपासून एकांत साधून नियमितपणे एकमेकांबरोबर वेळ घालवा. असे केल्याने तुम्हाला कुटुंबाच्या संबंधाने असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करायला आणि केवळ एकमेकांच्या सहवासाचा पूर्ण आनंद घ्यायला वेळ मिळेल. पण नियमितपणे असा वेळ काढणे नेहमीच शक्य नसते. आधी उल्लेख केलेल्या ॲलिसन नावाच्या आईने असे म्हटले: “आम्ही दोघं नवरा-बायको एकमेकांबरोबर वेळ घालवावा म्हटलं की अगदी त्याच वेळी, आमच्या लहानीचं काही तरी होतं, किंवा आमच्या सहा वर्षीय मुलीसमोर एक ‘मोठा पेच’ निर्माण होतो. जसे की, तिला तिचे रंगाचे खडूच सापडत नाहीत.”

वर उल्लेख करण्यात आलेले जोन व डारन यांनी एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी काय केले? आपल्या मुलींनी अमूक वेळीच झोपायला गेले पाहिजे, असा त्यांनी घरात एक नियमच बनवला. जोन म्हणते: “एका ठराविक वेळी आम्ही ‘दिवे’ घालवायचो. यावरून मुलींना समजायचं, की त्यांची आता झोपायची वेळ झाली आहे. त्यामुळे डारन व मला निवांतपणे बोलायला वेळ मिळायचा.”

आपल्या मुलांसाठी झोपायची एक ठराविक वेळ घालून दिल्याने, पती-पत्नीला तर एकमेकांसोबत वेळ घालवता येतोच शिवाय मुलांनाही यातून एक धडा शिकता येतो. तो म्हणजे, आपण ‘आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नये,’ हा धडा ते शिकतात. (रोमकर १२:३) झोपायच्या या नियमाचे पालन करण्यास शिकवलेल्या या मुलांना कालांतराने याची जाणीव होते, की कौटुंबिक वर्तुळात त्यांचा महत्त्वपूर्ण भाग असला तरी, तेच फक्‍त महत्त्वपूर्ण नाहीत. त्यांनी हेही जाणले पाहिजे, की त्यांनी कुटुंबातल्या नियमांनुसार वागले पाहिजे, कुटुंब त्यांच्या इशाऱ्‍यावर चालणार नाही.

हे करून पाहा: झोपी जाण्याची एक वेळ ठरवा आणि बनवलेल्या नियमाचे पालन करण्याची नियमितपणे सक्‍ती करा. ठरवलेल्या वेळेनुसार तुमचे मूल का झोपत नाही, याचे ते कारण देत असेल जसे की त्याला पाणी प्यायचे आहे तर एखाद वेळी सूट द्या. पण तुमचे मूल तुमच्याकडे सतत वेगवेगळ्या गोष्टींची मागणी करून ठरवलेल्या वेळेनुसार झोपी न जाण्यासाठी कारणे सांगत असेल तर त्याचे ऐकून घेऊ नका. तुमचे मूल तुमच्याकडे आणखी पाच मिनिटे जागे राहण्यासाठी मागत असेल व तुमचीही तशी इच्छा असेल तर बरोबर पाच मिनिटांचा घड्याळाचा गजर लावा. पाच मिनिटांनंतर जेव्हा गजर वाजू लागतो तेव्हा मूलाच्या आणखी मागण्या पूर्ण न करता सरळ त्याला झोपायला सांगा. “तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही,” असे असावे.—मत्तय ५:३७.

मुलांसमोर दुमत नको

“माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको.” (नीतिसूत्रे १:८) या वचनाचा असा अर्थ होतो, की पिता व माता या दोघांचाही आपल्या मुलांवर अधिकार आहे. पण पती-पत्नीचे एकाच प्रकारच्या वातावरणात संगोपन झालेले असले तरीसुद्धा, मुलांना वळण लावण्याच्या बाबतीत आणि अमूक प्रसंगी कुटुंबाने ठरवलेल्या कोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे याबाबतीत त्यांच्यात दुमत होऊ शकते. असे झाल्यास, पालक यावर यशस्वीपणे मात कशी करू शकतात?

आधी उल्लेखलेला जॉन म्हणतो: “मला वाटतं, नवरा-बायकोचे मतभेद हे मुलांसमोर होऊ नयेत.” पण असे करणे, वाटते तितके सोपे नसते. जॉन पुढे म्हणतात: “आईवडिलांच्या वागण्याकडं मुलांचं खूप बारीक लक्ष असतं. आम्ही जरी मोठ्यानं आमच्या मुलीसमोर भांडलो नसलो तरी, आम्ही पतीपत्नी एकमेकांबरोबर ज्याप्रकारे वागतो त्यावरून तिला पटकन कळतं, की आईपप्पात नक्कीच काहीतरी बिनसलंय.”

जॉन आणि ॲलसन ही समस्या कशी सोडवतात? ॲलसन म्हणते: “जॉन आमच्या मुलीला वळण लावत असताना, मला जर काही पटलं नाही तर मी आमची मुलगी दूर गेल्यानंतरच म्हणजे तिला ऐकू येणार नाही इतक्या दूर गेल्यानंतरच मग त्याला माझे विचार सांगते. नाहीतर, पप्पा-मम्मीत असलेल्या ‘दुमताचा गैरफायदा’ आपण घेऊ शकतो, असं तिला वाटेल. आणि जरी तिला आमच्यात दुमत आहे असं जाणवलं तरी मी तिला सांगते, की कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं, यहोवानं ठरवलेल्या मस्तकपदाच्या व्यवस्थेचं पालन करणं आवश्‍यक आहे. आणि जशी मी तिच्या पप्पांच्या मस्तकपदाचा आदर करून त्यांच्या अधीन राहते तसेच तिनंही आईवडिलांच्या आज्ञेत राहणं आवश्‍यक आहे.” (१ करिंथकर ११:३; इफिसकर ६:१-३) जॉन म्हणतो: “आम्ही सगळे घरात असतो तेव्हा मुलींना वळण लावण्याच्या बाबतीत मीच पुढाकार घेतो. पण एखाद्या गोष्टीविषयी ॲलसनला अधिक माहिती असेल तर मी तिला वळण लावण्याच्या बाबतीत पुढाकार घेऊ देतो आणि मग तिला पाठिंबा देतो. काही गोष्टी मला पटल्या नाहीत तर मी त्यांच्याविषयी नंतर तिच्याशी बोलतो.”

मुलांना वळण लावण्याच्या विषयावरून होणाऱ्‍या दुमतांचा तुमच्या वैवाहिक संबंधावर परिणाम होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता? आणि परिणामतः तुमच्या मुलाच्या मनात तुमच्याबद्दल असलेला आदर कमी होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता?

हे करून पाहा: दर आठवडी एक वेळ ठरवा आणि त्या वेळी, मुलांना वळण लावण्याच्या विषयांवर बोला, ज्या विषयांवर तुमचे एकमत नाही, त्यांवर मन मोकळेपणे बोला. तुमच्या विवाह सोबत्याच्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न करा. आई या नात्याने किंवा वडील या नात्याने प्रत्येकाचे मुलांवर तितकेच प्रेम आहे, ही गोष्ट लक्षात राहू द्या.

संगोपन करत असतानाही जवळीक राखा

मुलांना वळण लावणे ही काही तोंडची गोष्ट नाही. कधीकधी यात तुमचा बराच वेळ जाऊ शकतो, तुम्ही पार गळून जाऊ शकता. पण आज ना उद्या तुमची मुले त्यांचा वेगळा संसार थाटतील आणि मुले होण्याआधी तुमच्यात जशी जवळीक होती तशीच जवळीक तुम्हाला पुन्हा जाणवेल. मुलांच्या संगोपनामुळे तुमचे वैवाहिक बंधन मजबूत झालेले असेल की कमजोर झालेले असेल? या प्रश्‍नाचे उत्तर, उपदेशक ४:९, १० मध्ये दिलेले तत्त्व तुम्ही कसे लागू करता त्यावर निर्भर असेल. तिथे असे म्हटले आहे: “एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल.”

पालक जेव्हा सोबत मिळून मुलांचे संगोपन करतात तेव्हा त्याचे परिणामही खूप समाधानकारक असतात. आधी जिचा उल्लेख करण्यात आला आहे ती कॅरल आपल्या मनातील भावना या शब्दांत मांडते: “माझ्या नवऱ्‍यात खूप चांगले गुण आहेत हे मला माहीत होतं. पण, जोडीनं मुलांचं संगोपन केल्यामुळं मला त्याच्या व्यक्‍तिमत्त्वातील इतरही चांगले गुण पाहायला मिळाले. आमच्या मुलींना त्यानं कसं प्रेमानं वाढवलं हे पाहून माझ्या मनात त्याच्याबद्दलचं प्रेम आणि आदर आणखी वाढला.” ॲलसनविषयी जॉन म्हणतो: “माझी बायको हळूहळू मुलांची काळजी घेणारी एक आई कशी झाली हे मी पाहिलं आहे त्यामुळे तिच्याबद्दलचं माझं प्रेम आणखी वाढलं, मला तिचा अभिमान वाटतो.”

मुलांचे संगोपन करताना तुम्ही जर तुमच्या सोबत्याबरोबर वेळ घालवलात आणि एकमेकांना साथ दिली तर तुमची मुले जसजशी मोठी होतील तसतसा तुमचा विवाह आणखी मजबूत होईल. आणि तुमच्या मुलांकरता हे एक चांगले उदाहरण ठरेल, नाही का? (w०९ २/१)

[तळटीप]

^ नावे बदलली आहेत.

स्वतःला विचारा . . .

▪ मुलांपासून एकांत साधून दर आठवडी मी माझ्या विवाह सोबत्यासोबत किती वेळ घालवतो वा घालवते?

▪ मुलांना वळण लावताना मी माझ्या सोबत्याला पाठिंबा कसा देतो वा देते?