व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“ज्याची पाने कोमेजत नाहीत” असे झाड

“ज्याची पाने कोमेजत नाहीत” असे झाड

“ज्याची पाने कोमेजत नाहीत” असे झाड

तुम्ही कधी शहराबाहेरचा गर्द हिरव्या पानांनी नटलेला दाट झाडीचा परिसर पाहिला आहे का? हे दृश्‍य पाहून मन अगदी प्रसन्‍न होते. या ठिकाणी कदाचित पाण्याचा अभाव असेल, असा तुम्ही विचार कराल का? मुळीच नाही. उलट, इथली हिरवीगार झाडी पाहून तुम्ही म्हणाल, की इथे भरपूर पाणी असेल.

बायबलमध्ये अगदी उचितपणे आध्यात्मिक अर्थाने टवटवीत असलेल्या व्यक्‍तींची तुलना मोठ्या सदाहरित झाडांशी करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, पहिल्या स्तोत्राच्या पहिल्या तीन वचनांत दिलेल्या सुरेख वर्णनाचा विचार करा:

“जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गांत उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.”

तसेच, यिर्मया १७:७, ८ या वचनांत असे सांगितले आहे: “जो पुरुष परमेश्‍वरावर भाव ठेवितो, ज्याचा भावविषय परमेश्‍वर आहे तो धन्य! तो जलाशयाजवळ लाविलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदी किनारी पसरील; उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहतील; अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही.”

जी व्यक्‍ती उचित ते करते, देवाच्या नियमशास्त्रात रमते, त्याच्यावर पूर्ण भाव ठेवते त्या व्यक्‍तीचे चित्ररूपी वर्णन करण्यासाठी या दोन्ही उताऱ्‍यांत झाडांचा उपयोग करण्यात आला आहे. यामुळे मग आपल्या मनात असा प्रश्‍न येतो, की अशी व्यक्‍ती आध्यात्मिक अर्थाने कोणकोणत्या प्रकारे एका सदाहरित झाडासारखी असते? उत्तरासाठी आपण वरील वचनांचे बारकाईने परीक्षण करून पाहू या.

“पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले”

वरील वचनांमध्ये उल्लेखलेली झाडे “पाण्याच्या प्रवाहाजवळ” अथवा “जलाशयाजवळ” लावण्यात आलेली आहेत, असे म्हटले आहे. यशया ४४:३, ४ या वचनांमध्येही काहीसे असेच वर्णन आपल्याला वाचायला मिळते. बॅबिलोनच्या दास्यत्वातून सुटून आलेल्या पश्‍चात्तापी यहुद्यांची आपण कशी काळजी घेऊ हे यहोवा देव सांगतो. संदेष्टा यशया याच्याद्वारे यहोवाने असे म्हटले: “मी तृषित भूमीवर पाणी आणि रुक्ष भूमीवर जलधारा ओतीन; . . . वाहत्या पाण्याजवळ जसे वाळुंज उगवते, तसे ते गवतामध्ये उगवतील.” देवाचे संरक्षण व मार्गदर्शन लाभलेले लोक, “जलधारा” व “वाहत्या पाण्याजवळ” लावलेल्या वाळुंजांसारखे बहरतील, असे म्हटले आहे.

आजही, ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते तेथे आपल्याला, एखाद्या विहिरातून, नदीतून, तलावातून किंवा धरणातून शेतांकडे वाहणारे पाण्याचे पाट पाहायला मिळतात. सहसा, शेतीसाठी आणि लागवडीसाठी हा पाणीपुरवठा असतो. कधीकधी, पाण्याचे हे पाट फळांच्या बागांमधून वाहताना दिसतात. काही वेळा, हे पाट जेथून वाहत असतात त्याच्या एका बाजूला शेती असते आणि दुसऱ्‍या बाजूला झाडांची रांग लावलेली दिसते. कदाचित ही रांग, त्या शेताची सीमा असू शकते.

पाण्याजवळ लावलेली झाडे कशी वाढतात? स्तोत्र १:३ मध्ये ‘आपल्या हंगामी फळ देणाऱ्‍या’ झाडाविषयी सांगितले आहे. बायबलमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या देशांमध्ये अंजीर, डाळींब, सफरचंद, खजूर, जैतून (ऑलिव्ह) ही झाडे आहेत. अंजिराचे झाड ३० फूटांपर्यंत वाढू शकते आणि त्याच्या फांद्या पसरट असल्यामुळे ते डेरेदार दिसते. पण वर उल्लेखण्यात आलेल्या इतर फळांची झाडे अंजिराच्या झाडाइतकी वाढत नाहीत. तरीपण ती सदाहरित व बहारदार असू शकतात आणि आपआपल्या हंगामात भरघोस फळे देऊ शकतात.

प्राचीन काळांत, सीरिया व पॅलेस्टाईनमध्ये नद्यांच्या व ओहळांच्याकाठी वाळुंजांची मोठमोठी वृक्षे वाढायची. बायबलमध्ये, जेव्हा जेव्हा वाळुंजांचा उल्लेख येतो तेव्हा तेव्हा त्यांचा संबंध सहसा जलप्रवाह किंवा ‘ओहळ’ यांजशी आहे. (लेवीय २३:४०; यहेज्केल १७:५) विलो नावाचा वृक्ष वाळुंजाच्याच जातीतला आहे. हे वृक्षही मुबलक पाणी असलेल्या ठिकाणी वाढत असल्याचे दिसून येते. या मोठमोठ्या, सदाहरित झाडांवरून आपल्याला, स्तोत्रकर्ता आणि यिर्मया जे काही सांगू पाहत होते ते लगेच समजते. त्या दोघांनाही असे म्हणायचे होते, की देवाच्या नियमांचे पालन करणारे व त्याच्यावर पूर्ण मनाने भरवसा ठेवणारे लोक, आध्यात्मिक अर्थाने सुदृढ राहतात आणि ते ‘जे काही हाती घेतात ते सिद्धीस जाते.’ आपल्याला आणखी काय हवे आहे? आपल्याला जीवनात यशच तर हवे आहे, नाही का?

यहोवाच्या नियमशास्त्रात रमणे

आज लोक वेगवेगळ्या मार्गांनी यशस्वी व्हायचा प्रयत्न करतात. नाव आणि पैसा मिळवण्यासाठी ते राब राब राबतात. आणि बहुतेकदा त्यांची ध्येये व्यावहारिक नसल्यामुळे त्यांना जे हवे असते ते मिळत नाही त्यामुळे ते निराश होतात. मग, जीवनात खरे समाधान व चिरकाल आनंद आपल्याला कसा मिळू शकतो? येशूने डोंगरावर दिलेल्या प्रवचनात या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याला मिळते. त्याने म्हटले: “आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव बाळगणारे आनंदी आहेत. कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” (मत्तय ५:३, NW) होय, खरा आनंद भौतिक वस्तूंनी नव्हे तर आपली आध्यात्मिक गरज ओळखून ती तृप्त केल्यानेच मिळतो. दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे तर, देवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंध जोडून तो तसाच टिकवून ठेवल्यानेच आपल्याला खरा आनंद मिळू शकतो. अशी व्यक्‍ती त्या सदापर्णी वृक्षांसारखी टवटवीत असते जी ‘हंगामी फळे’ देतात. आध्यात्मिक अर्थाने टवटवीत दिसण्यासाठी आपण काय करू शकतो?

स्तोत्रकर्त्याने उल्लेख केलेल्या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण आधी टाळल्या पाहिजेत. तो तीन गोष्टींचा उल्लेख करतो. ‘दुर्जनांच्या मसलतीने चालणे,’ ‘पापी जनांच्या मार्गांत उभे राहणे’ व ‘निंदकांच्या बैठकीत बसणे.’ आपल्याला जर खरोखरच आनंदी व्हायचे असेल तर आपण यहोवाच्या नीतिनियमांची थट्टा करणाऱ्‍या व त्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्‍यांपासून चारहात दूरच राहिले पाहिजे.

यानंतर मग आपण यहोवाच्या नियमशास्त्रात रमले पाहिजे. आपल्याला एखादी गोष्ट किंवा एखादे काम करायला आवडते तेव्हा, ती गोष्ट किंवा ते काम करण्यासाठी आपण सारखे निमित्त शोधत असतो, नाही का? तसेच, देवाच्या नियमशास्त्रात रमणे म्हणजे देवाच्या वचनाची मनापासून कदर करणे, त्याच्याविषयी अधिक शिकून घेण्याची व चांगल्या प्रकारे समजून घेण्याची इच्छा बाळगणे.

आणि शेवटी मग, आपण “रात्रंदिवस मनन” केले पाहिजे. पण, मनन करण्यासाठी आपण बायबलचे नियमितपणे वाचन केले पाहिजे. “अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो,” असे ज्याने गायिले त्या स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपल्यालाही देवाच्या वचनाविषयी वाटले पाहिजे.—स्तोत्र ११९:९७.

होय, यहोवा देवाचे अचूक ज्ञान व समज प्राप्त झाल्यावर आणि त्याच्यावर तसेच त्याने दिलेल्या अभिवचनांवर भरवसा ठेवायला शिकल्यावर आपण आध्यात्मिक अर्थाने नक्कीच टवटवीत होतो. तेव्हा आपण, स्तोत्रकर्त्याने वर्णन केलेल्या त्या आनंदी मनुष्यासारखे होतो ज्याचे ‘हाती घेतलेले सर्व काही सिद्धीस जाते.’ (w०९ ३/१)