व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव काही प्रार्थनांचे उत्तर का देत नाही?

देव काही प्रार्थनांचे उत्तर का देत नाही?

वाचक विचारतात

देव काही प्रार्थनांचे उत्तर का देत नाही?

एखाद्या प्रेमळ पित्याशी त्याची मुले मनमोकळेपणाने बोलतात तेव्हा त्याला आनंद होतो. त्याच प्रकारे, यहोवा देवाला आपण प्रार्थना करतो तेव्हा त्यालाही आनंद होतो. पण त्याच वेळी, एका सुज्ञ पित्याप्रमाणेच देव सर्वच विनंत्या पूर्ण करत नाही. आणि असे करण्यामागे काही ठोस कारणे आहेत. त्याची ही कारणे गूढ, मानवांच्या समजण्यापलीकडली आहेत का? की, यांविषयी त्याने बायबलमध्ये काही माहिती प्रकट केली आहे?

प्रेषित योहान याविषयी खुलासा करतो: “त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्‍यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.” (१ योहान ५:१४) याचा अर्थ, आपल्या विनंत्या देवाच्या इच्छेनुसार असल्या पाहिजेत. काही लोक अशा गोष्टींसाठी प्रार्थना करतात ज्या देवाच्या इच्छेच्या अगदी विरोधात असतात. उदाहरणार्थ, लॉटरीचे बक्षीस जिंकण्यासाठी किंवा एखादी पैज जिंकण्यासाठी काही जण देवाला प्रार्थना करतात. इतर जण मनात चुकीचा हेतू ठेवून प्रार्थना करतात. शिष्य याकोबाने अशा अनुचित गोष्टींसाठी प्रार्थना करण्याविरुद्ध ताकीद दिली होती. त्याने म्हटले: “तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही; कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता.”—याकोब ४:३.

या उदाहरणाचा विचार करा. एका फुटबॉल सामन्याच्या आधी दोन विरोधी संघ सामना जिंकण्यासाठी देवाला प्रार्थना करतात. देव या दोन संघांच्या परस्परविरोधी प्रार्थनांचे उत्तर देईल अशी साहजिकच आपण अपेक्षा करू शकत नाही. हीच गोष्ट आधुनिक काळातील युद्धांबद्दलही म्हणता येईल, ज्यांत दोन्ही विरोधी पक्ष आपल्याला विजय मिळावा अशी देवाजवळ प्रार्थना करतात.

जे देवाच्या नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्या प्रार्थना देव ऐकत नाही. यहोवाला एकदा आपल्या ढोंगी उपासकांना असे म्हणावे लागले: “तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकितो; तुम्ही कितीहि विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्‍ताने भरले आहेत.” (यशया १:१५) बायबल म्हणते: “धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करितो त्याची प्रार्थनादेखील वीट आणणारी आहे.”—नीतिसूत्रे २८:९.

दुसरीकडे पाहता, जे यहोवाच्या इच्छेनुसार वागण्याचा मनस्वी प्रयत्न करतात अशा उपासकांच्या प्रामाणिक प्रार्थनांकडे यहोवा नेहमी लक्ष देतो. पण, तो त्यांची प्रत्येक विनंती पूर्ण करेल असा याचा अर्थ होतो का? नाही. यासंदर्भात बायबलमधील काही उदाहरणे पाहू या.

मोशेचा देवासोबत अतिशय घनिष्ठ नातेसंबंध होता. तरीसुद्धा, त्याच्या प्रार्थना देखील “[देवाच्या] इच्छेनुसार” असणे गरजेचे होते. देवाने प्रकट केलेल्या त्याच्या उद्देशाच्या विरोधात, मोशेने कनान देशात प्रवेश करण्याची परवानगी मागितली. तो यहोवाला म्हणाला: “मला पलीकडे जाऊ दे आणि यार्देनेपलीकडे असलेला तो उत्तम देश . . . माझ्या दृष्टीस पडू दे.” मोशेच्या हातून घडलेल्या पापामुळे त्याला कनान देशात प्रवेश करता येणार नाही हे त्याला यापूर्वीच सांगण्यात आले होते. त्यामुळे, आता मोशेची विनंती मान्य करण्याऐवजी यहोवाने त्याला सांगितले: “पुरे, ही गोष्ट पुन्हा माझ्याजवळ काढू नको.”—अनुवाद ३:२५, २६; ३२:५१.

प्रेषित पौलाने आपल्या ‘शरीरातील एक काटा’ काढून टाकण्याविषयी प्रार्थना केली होती. (२ करिंथ. १२:७) पौलाने कदाचित त्याच्या डोळ्यांच्या व्याधीला किंवा विरोधकांच्या व ‘नामधारी बंधूंच्या’ सततच्या छळाला “काटा” म्हटले असावे. (२ करिंथ. ११:२६; गल. ४:१४, १५) त्याने लिहिले: “हा माझ्यापासून दूर व्हावा म्हणून मी प्रभूला तीनदा विनंती केली.” ‘शरीरात हा काटा’ असल्यामुळे पौलाला सतत त्रास होत होता हे तर खरे आहे. पण, हा त्रास असूनही तो विश्‍वासूपणे प्रचार कार्य करत राहिल्यास त्यावरून हे सिद्ध होणार होते की देव आपल्या सेवकांना साहाय्य करण्यास समर्थ आहे आणि त्याच्या साहाय्यावर पूर्णपणे विसंबून राहिल्यामुळेच पौल आपल्या सेवेत टिकून आहे. हे माहीत असल्यामुळे, पौलाची विनंती मान्य करण्याऐवजी देवाने त्याला सांगितले: “अशक्‍तपणातच [माझी] शक्‍ति पूर्णतेस येते.”—२ करिंथ. १२:८, ९.

आपल्या विनंत्या मान्य करणे खरोखर आपल्या हिताचे आहे किंवा नाही हे आपल्यापेक्षा यहोवाला चांगल्या प्रकारे कळते. तो बायबलमध्ये प्रकट केलेल्या त्याच्या प्रेमळ उद्देशांनुसार, नेहमी आपल्या भल्याकरता कार्य करतो. (w०९ १/१)