व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही नात्सी तुरुंग छावणीतून मी कसा वाचलो

मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही नात्सी तुरुंग छावणीतून मी कसा वाचलो

मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही नात्सी तुरुंग छावणीतून मी कसा वाचलो

झोझफ हीझीगर यांच्याद्वारे कथित

“काय वाचताय तुम्ही” असे मी माझ्या तुरुंग सोबत्याला विचारले. तो मला म्हणाला: “हे बायबल आहे. तुम्हाला हवं असल्यास देईन, पण एका अटीवर. त्याच्या मोबदल्यात तुमच्या वाट्याचा आठवड्याभराचा ब्रेड तुम्ही मला द्यायचा.”

माझा जन्म मार्च १, १९१४ रोजी मोझेल या ठिकाणी झाला. त्यावेळी मोझेल हे जर्मनीच्या वर्चस्वाखाली होते. १९१८ मध्ये पहिले महायुद्ध संपले तेव्हा मोझेल फ्रान्सच्या वर्चस्वाखाली आले. मग, १९४० मध्ये जर्मनीने ते पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतले. शेवटी, १९४५ साली दुसरे महायुद्ध संपले तेव्हा मोझेल फ्रान्सचा भाग बनले. यामुळे प्रत्येक वेळी माझे नागरिकत्व बदलत गेले; कधी फ्रान्स, तर कधी जर्मनी. म्हणून, फ्रेंच व जर्मन या दोन्ही भाषा मी उत्तम रीत्या बोलायला शिकलो.

माझे आईवडील कॅथलिक पंथाचे असून अतिशय धार्मिक होते. दररोज रात्री झोपायच्या आधी आम्ही सर्व जण गुडघे टेकून प्रार्थना करायचो. रविवारच्या दिवशी व इतर सुटीच्या दिवशी आम्ही नेमाने चर्चला जायचो. मलाही माझ्या धर्माविषयी फार आवड होती. त्यामुळे मी एका कॅथलिक अभ्यास गटाचा सदस्य बनलो.

यहोवाच्या कार्यात मी व्यग्र झालो

सन १९३५ ची गोष्ट. यहोवाच्या साक्षीदारांपैकी दोन बहिणी आमच्या घरी आल्या तेव्हा माझ्या आईवडिलांबरोबर त्या बोलल्या. पहिल्या महायुद्धात, चर्च व धर्मगुरू किती गोवले होते यावर त्यांच्यात चर्चा झाली. यानंतर, माझ्या मनात बायबलविषयी आवड निर्माण झाली आणि १९३६ मध्ये आमच्या पाळकांना मी बायबलची एक प्रत मागितली. पण, बायबल समजण्यासाठी तुला धर्मशास्त्राचा अभ्यास करावा लागेल असे त्यांनी मला सांगितले. यामुळे बायबलची एक प्रत मिळवून त्याचे वाचन करण्याची माझी इच्छा अधिकच प्रबळ झाली.

सन १९३७ च्या जानेवारी महिन्यात माझ्याबरोबर नोकरी करणारे ऑल्बीन रल्वीट्‌स मला बायबलविषयी सांगू लागले. ते एक यहोवाचे साक्षीदार होते. मी त्यांना विचारले: “तुमच्याकडे तर बायबल असेलच, नाही का?” त्यावर त्यांनी लगेच, त्यांच्याजवळ असलेल्या बायबलच्या जर्मन एल्बरफेल्जर आवृत्तीतून देवाचे नाव यहोवा असल्याचे मला दाखवले आणि ते बायबलही मला दिले. मी मोठ्या उत्साहाने ते बायबल वाचू लागलो आणि जवळच्याच ट्योन्वील नावाच्या गावात साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहू लागलो.

सन १९३७ च्या ऑगस्ट महिन्यात मी ऑल्बीन यांच्याबरोबर पॅरिसमध्ये होणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनाला गेलो. पॅरिसमध्ये मी घरोघरचे प्रचार कार्य करू लागलो. काही काळातच माझा बाप्तिस्मा झाला आणि १९३९ च्या सुरुवातीला मी एक पायनियर अर्थात पूर्ण वेळचा ख्रिस्ती सेवक बनलो. त्यानंतर मेट्‌ज या शहरात जाऊन प्रचार कार्य करण्यास मला नेमण्यात आले. मग जुलै महिन्यात पॅरिसमध्ये असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयात काम करण्याचे आमंत्रण मला मिळाले.

युद्ध काळातील संकटे

शाखा कार्यालयात मी जास्त दिवस काम करू शकलो नाही. कारण १९३९ च्या ऑगस्ट महिन्यात फ्रेंच सैन्यात भरती होण्यास मला बोलावण्यात आले. पण, माझ्या बायबल प्रशिक्षित विवेकामुळे मी युद्धात भाग घेण्याचे नाकारले. त्यामुळे मला तुरूंगात डांबण्यात आले. पुढच्या मे महिन्यात, मी तुरुंगात असतानाच जर्मनीने एकाकी फ्रान्सवर हल्ला केला व ते आपल्या कब्जात घेतले. आणि मी पुन्हा एकदा जर्मनीच्या वर्चस्वाखाली आलो. त्यानंतर जुलै, १९४० मध्ये तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मी माझ्या आईवडिलांकडे राहायला गेलो.

आम्ही नात्सी राजवटीखाली राहत असल्यामुळे गुप्तपणे बायबलचा अभ्यास करायचो. मारीज आनाझीऑक या धाडसी ख्रिस्ती बहिणीकडून आम्हाला टेहळणी बुरूज नियतकालिके मिळायची. एका बांधवाच्या बेकरीत मी तिला अनेकदा भेटायचो. १९४१ पर्यंत, जर्मनीत यहोवाच्या साक्षीदारांवर येणारी अनेक छळसंकटे मी कशीतरी चुकवू शकलो होतो.

एके दिवशी अचानक गेस्टापो माझ्या घरी आले. यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी घालण्यात आली आहे असे त्या अधिकाऱ्‍याने मला स्पष्टपणे सांगितले आणि तुला अजूनही यहोवाचा साक्षीदार राहायचे आहे का? असे मला विचारले. मी त्याला “होय” असे उत्तर दिले तेव्हा त्याने मला त्याच्या मागे येण्यास सांगितले. हे सगळे माझ्या आईला सहन झाले नाही आणि ती बेशुद्ध पडली. हे पाहून गेस्टापो अधिकाऱ्‍याने मला घरी राहून आईची देखभाल करण्यास सांगितले.

मी ज्या कारखान्यात कामाला होतो तिथल्या मॅनेजरला मी “हाइल हिटलर!” असे म्हणून नमस्कार केला नाही तसेच नात्सी पार्टीचा सदस्य होण्याचे साफ नाकारले. त्यामुळे दुसऱ्‍याच दिवशी गेस्टापोने मला अटक केली. माझी चौकशी होत असताना मी इतर साक्षीदार बंधुभगिनींची नावे सांगण्यास नकार दिला तेव्हा माझी चौकशी करणाऱ्‍या अधिकाऱ्‍याने आपल्या रिवॉल्वरची मूठ माझ्या डोक्यात इतक्या जोरात घातली की मी बेशुद्ध पडलो. सप्टेंबर ११, १९४२ रोजी मेट्‌ज झोन्डरगरिक्टने (विशेष न्यायालय) मला “यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळाच्या व बायबल विद्यार्थ्यांच्या वतीने प्रचार करण्याच्या” आरोपाखाली तीन वर्षांचा कारावास सुनावला.

दोन आठवड्यानंतर मला मेट्‌जमधील तुरुंगातून हालवून, मधे अनेक ठिकाणी थांबत थांबत शेवटी ट्‌स्वीब्रूकेन येथील सक्‍तमजुरीच्या छावणीत पाठवण्यात आले. तेथे मला लोहमार्ग दुरुस्तीचे काम देण्यात आले. अवजड रूळ बदलून ते फिट करणे व लोहमार्गावर खडी पसरवणे अशी कामे आम्ही करायचो. ही ढोरमेहनत केल्यावर आम्हाला काय मिळायचे तर सकाळी फक्‍त एक कप कॉफी व ब्रेडचा लहान तुकडा आणि दुपारी व संध्याकाळी एक वाटी सूप. यानंतर जवळच्याच गावातील दुसऱ्‍या एका तुरुंगात माझी रवानगी करण्यात आली. तिथे चांभाराच्या दुकानात मी काम करायचो. कित्येक महिने येथे राहिल्यानंतर मला पुन्हा ट्‌स्वीब्रूकेनमध्ये शेतात काम करण्यासाठी पाठवण्यात आले.

जगत होतो पण फक्‍त भाकरीवर नव्हे

ट्‌स्वीब्रूकेनमधील तुरुंग कोठडीत माझ्यासोबत नेदरलँड्‌सचा एक तरुण राहत होता. त्याची भाषा थोडीफार बोलायला शिकल्यामुळे मी त्याला बायबलविषयी सांगू शकलो. याचा परिणाम असा झाला, की त्याने उत्तम आध्यात्मिक प्रगती केली आणि नदीत बाप्तिस्मा घेण्याची इच्छाही व्यक्‍त केली. पाण्यातून बाहेर आल्यानंतर त्याने मला मिठी मारली आणि म्हटले: “झोझफ, आजपासून मी तुझा ख्रिस्ती बांधव!” या नंतर मला पुन्हा लोहमार्गावर काम करण्यासाठी पाठवण्यात आले तेव्हा आमची ताटातूट झाली.

या वेळी कोठडीत माझ्यासोबत एक जर्मन मनुष्य राहत होता. एके दिवशी संध्याकाळी तो एक लहानसे पुस्तक अर्थात बायबल वाचत होता. हीच ती वेळ होती जेव्हा तो मला माझ्या आठवड्याभराच्या ब्रेडच्या बदल्यात ते बायबल द्यायला तयार झाला होता. तेव्हा मी त्याला म्हणालो होतो: “ठीक आहे!” एका आठवडाभराचे माझे जेवण त्याला देणे त्या परिस्थितीत खरोखरच खूप कठीण होते. पण, त्याचा मला कधीच पस्तावा झाला नाही. “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल,” या येशूच्या शब्दांचा अर्थ मला खऱ्‍या अर्थाने समजू लागला होता.—मत्तय ४:४.

आता माझ्याजवळ बायबल होते पण ते जपून ठेवणे जिकिरीचे होते. इतर कैद्यांना बायबल बाळगण्याची परवानगी होती तशी यहोवाच्या साक्षीदारांना नव्हती. त्यामुळे रात्रीच्या वेळी पांघरुणात लपवून मी बायबल वाचायचो. आणि दिवसा मी ते माझ्या अंगावरच्या शर्टाच्या आत लपवून ठेवायचो. मी नसताना तुरुंग रक्षक माझ्या कोठडीची झडती घ्यायचे त्यामुळे मी ते कधीच कोठडीत ठेवत नसे.

एके दिवशी, हजेरी चालू असताना माझ्या लक्षात आले की मी माझे बायबल कोठडीतच विसरलोय. संध्याकाळी काम सुटल्यासुटल्या मी कोठडीकडे पळतच गेलो. पण बायबल कुठेच दिसले नाही. मी देवाला प्रार्थना केली आणि तुरुंग रक्षकाकडे गेलो. कोणीतरी माझे एक पुस्तक घेतले आहे व मला ते पाहिजे असे मी त्याला सांगितले. पण, माझ्या बोलण्याकडे त्याचे काही लक्ष नव्हते. मला माझे बायबल परत मिळाले. याबद्दल मी मनापासून यहोवाचे आभार मानले!

दुसरा एक प्रसंग. मला अंघोळीसाठी स्नानगृहाकडे पाठवण्यात आले. अंगावरचे मळके कपडे काढताना मी कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा रीतीने बायबल जमिनीवर पडू दिले. तुरुंग रक्षकाची नजर चुकवून, मी पायानेच ते स्नानगृहाकडे सरकवले आणि अंघोळ होईपर्यंत मी ते एका बाजूला लपवून ठेवले. अंघोळ करून बाहेर आल्यानंतर मी पुन्हा ते स्वच्छ कपडे ठेवलेल्या ठिकाणी पायाने सरकवले.

तुरुंगातले चांगलेवाईट अनुभव

सन १९४३ मध्ये एके दिवशी सकाळी सर्व कैद्यांना तुरुंगाच्या आवारात एकत्र करण्यात आले. त्यांच्यात मी अचानक ऑल्बीनला पाहिले. त्यालाही अटक करण्यात आली होती. त्याने माझ्याकडे पाहिले आणि आपल्या छातीवर हात ठेवून मी अजूनही तुझा ख्रिस्ती बांधव आहे असे त्याने मला सूचित केले. आणि मला पत्र लिहील असे त्याने मला खुणेने सांगितले. दुसऱ्‍या दिवशी माझ्याजवळून जाता जाता त्याने कागदाचा एक चिटोरा खाली टाकला. पण, रक्षकाने ते पाहिले आणि यामुळे आम्हा दोघांना दोन आठवड्याची एकांतवासाची शिक्षा झाली. तिथे आम्हाला शिळा ब्रेड व पाणी मिळत असे आणि लाकडाच्या फळ्यांवर पांघरुणाशिवाय झोपावे लागत असे.

या नंतर मला झीकबर्क येथील एका तुरुंगात हालवण्यात आले. तिथे मला एका लोहाराच्या दुकानात काम करावे लागत असे. हे काम खूप कष्टाचे होते आणि अन्‍नही कमी मिळायचे. कधी कधी केक, फळे अशा चविष्ट पदार्थांची स्वप्ने मला रात्री पडायची. पण, सकाळी उठायचो तेव्हा माझ्या पोटात कावळे ओरडायचे आणि घसा कोरडा पडलेला असायचा. मी खूपच अशक्‍त झालो होतो. तरी पण, मी दररोज न चुकता माझे लहानसे बायबल वाचायचो आणि यामुळे माझ्यात जगण्याची आशा टिकून राहिली.

अखेरीस सुटका!

सन १९४५ च्या एप्रिल महिन्यात, एके दिवशी सकाळी अचानक सर्व तुरुंग रक्षक तुरुंगाची फाटके सताड उघडी ठेवून पळून गेले. आणि मी मुक्‍त झालो! पण, तुरुंगातून सुटल्यावर तब्येत बरी होईपर्यंत मला रुग्णालयातच राहावे लागले. मग मे महिन्याच्या अखेरीस मी माझ्या आईवडिलांच्या घरी आलो. मी जिवंत असेल अशी आशाच त्यांनी सोडून दिली होती. पण, मला समोर पाहून आईला इतका आनंद झाला की तिला अश्रू आवरता आले नाही. दुःखाची गोष्ट म्हणजे, आईवडिलांचा सहवास मला जास्त दिवस लाभला नाही कारण काही दिवसांतच ते वारले.

यानंतर ट्योन्वील मंडळीशी मी पुन्हा संपर्क साधला. माझ्या आध्यात्मिक कुटुंबाला पुन्हा भेटून मला किती आनंद झाला होता! इतकी सगळी छळसंकटे सोसून देखील ते किती विश्‍वासू राहिले होते हे मला समजले तेव्हाही मला खूप आनंद झाला होता. पण, माझा जिवलग मित्र ऑल्बीन याचा जर्मनीच्या रेगन्सबर्गमध्ये मृत्यू झाला होता. पुढे मला समजले, की माझा चुलत भाऊ झॉन हीझीगर देखील एक यहोवाचा साक्षीदार झाला होता. पण बायबल प्रशिक्षित विवेकामुळे त्याने लष्करात भरती होण्याचे नाकारले म्हणून त्याला ठार मारण्यात आले होते. पॅरिसमधील शाखा कार्यालयात मी ज्यांसोबत काम केले होते त्या बंधू झॉन केरॉ यांनी देखील पाच वर्षे जर्मनीच्या श्रम छावणीत काढली होती. *

मेट्‌जमध्ये आल्यानंतर मी लगेच आपले प्रचार कार्य सुरू केले. त्यावेळी मिन्झॉनी कुटुंबाशी माझी जवळीक वाढली. त्यांची मुलगी टीना हिचा नोव्हेंबर २, १९४६ रोजी बाप्तिस्मा झाला होता. सेवा कार्यात ती खूप आवेशी होती आणि ती मला फार आवडू लागली. डिसेंबर १३, १९४७ रोजी आमचा विवाह झाला. सन १९६७ च्या सप्टेंबर महिन्यात टीनाने पूर्ण वेळचे प्रचार कार्य सुरू केले आणि जून २००३ मध्ये तिचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे वयाच्या ९८ वर्षांपर्यंत तिने हे कार्य विश्‍वासूपणे पार पाडले. मला टीनाची खूप आठवण येते.

आज वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर मला जाणवते, की माझ्या जीवनात आलेल्या सर्व परीक्षांना मी यशस्वी रीत्या तोंड देऊ शकलो ते केवळ देवाच्या वचनातून मला मिळालेल्या शक्‍तीमुळेच. कितीतरी वेळा मी उपाशी होतो. पण, देवाच्या वचनाचे वाचन केल्यामुळे आध्यात्मिक रीत्या मी तृप्त होतो. आणि यहोवाने मला बलिष्ठ केले. त्याच्या ‘वचनानेच मला जिवंत ठेवले.’—स्तोत्र ११९:५०, NW. (w०९ ३/१)

[तळटीप]

^ टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, १९८९, पृष्ठे २२-२६ (इंग्रजी) यात दिलेली बंधू झॉन केरॉ यांची जीवन कथा पाहा.

[२३ पानांवरील चित्र]

माझा जिवलग मित्र ऑल्बीन रल्वीट्‌स

[२३ पानांवरील चित्र]

मारीज आनाझीऑक

[२४ पानांवरील चित्र]

माझे आठवड्याभराचे अन्‍न देऊन घेतलेले बायबल

[२५ पानांवरील चित्र]

१९४६ मध्ये आमच्या विवाहाआधी टीनाबरोबर

[२५ पानांवरील चित्र]

बंधू झॉन केरॉ आणि त्यांची पत्नी टिटीकॉ