स्वच्छता राखणे का इतके महत्त्वाचे आहे?
स्वच्छता राखणे का इतके महत्त्वाचे आहे?
हजारो वर्षांपासून साथीच्या रोगांनी व महामाऱ्यांनी मानवजातीला ग्रासून टाकले आहे. साथीचे रोग किंवा महामाऱ्या यायच्या तेव्हा काही लोक असा विचार करायचे, की त्यांच्यावर देवाचा कोप भडकला आहे व अपराध्यांना शिक्षा करण्यासाठीच देवाने या पीडा पाठवल्या आहेत. पण अनेक शतकांपासून, अगदी सबुरीने केलेल्या परीक्षणांनंतर व कसून केलेल्या संशोधनांनंतर असे दिसून आले, की बहुतेकदा या रोगांस व महामाऱ्यांस खरेतर आपल्यासोबत राहणारे सूक्ष्म जीवाणूच कारणीभूत असतात.
वैद्यकीय संशोधकांना असे दिसून आले आहे, की उंदीर, घुशी, झुरळे, माश्या, डास हे रोगाणूंचे वाहक आहेत ज्यांच्यामुळे रोगांचा फैलाव होतो. त्यांना असेही दिसून आले, की बहुतेकदा लोकच अस्वच्छ राहून संसर्गजन्य रोगांना आमंत्रण देत असतात. स्वच्छता राखल्याने बराच फरक पडू शकतो. स्वच्छतेमुळे रोगांपासून आपले संरक्षण होऊ शकते किंवा न राखल्याने आपण प्राणघातक रोगांना बळी पडू शकतो.
अर्थात, स्वच्छतेचे दर्जे रिवाजांनुसार व परिस्थतीनुसार निरनिराळे असू शकतात. वाहते पाणी किंवा ड्रेनेजची योग्य सोय नसलेल्या भागांमध्ये स्वच्छता राखणे खरोखरच कठीण असू शकते. प्राचीन इस्राएल लोकांचे उदाहरण घ्या. ते रानांतून प्रवास करत होते तेव्हा, स्वच्छता राखण्याच्या उत्तम सोयी नव्हत्या तरीही देवाने त्यांना स्वच्छतेच्या बाबतीत सूचना दिल्या होत्या.
देव स्वच्छतेला इतके महत्त्व का देतो? स्वच्छतेच्या बाबतीत व्यावहारिक व योग्य दृष्टिकोन कोणता आहे? आजार कमी करण्याकरता तुम्ही व तुमचे कुटुंब कोणती दक्षता घेऊ शकते?
कॅमेरूनमध्ये राहणारा मॅक्स * शाळा सुटल्यावर घरी येतो. त्याच्या पोटात कावळे ओरडत आहेत, त्याचा घसाही कोरडा पडला आहे. आपल्या लहानशा घरात शिरल्यावर, त्याची वाट पाहत थांबलेल्या त्याच्या कुत्र्याला तो एक घट्ट मिठी मारतो. शाळेचे दप्तर जेवणाच्या टेबलावर ठेवतो आणि जेवणाचे वाढलेले ताट आता आपल्या समोर येईल म्हणून खुर्चीवर बसतो.
मॅक्सची आई स्वयंपाक घरात आहे. मॅक्स आल्याचे तिला कळते व ती लगेच त्याच्यासाठी ताटात गरम गरम भात व उसळ वाढून आणते. पण जेवणाच्या स्वच्छ टेबलावर शाळेचे दप्तर पाहून तिचा चेहरा बदलतो. ती मॅक्सकडे बघते आणि “मॅक्स, हे काय?” असे त्याला विचारते. आईला काय म्हणायचे हे मॅक्सला लगेच समजते. तो पटकन दप्तर उचलून दुसरीकडे ठेवतो आणि हात धुवायला निघून जातो. हात धुवून आल्यावर, “अगं, हात
धुवायला विसरलोच!” असे अपराध्यासारखे पुटपुटत ताटावर तुटून पडतो.काळजी घेणाऱ्या एका आईला आरोग्याच्या व स्वच्छतेच्या बाबतीत बरेच काही करावे लागते. घरातल्या इतर सर्व सदस्यांची तिला साथ असेल तर ती पुष्कळ काही करू शकते. मॅक्सच्या उदाहरणावरून कळते, की मुलांना स्वच्छतेची सतत आठवण करून द्यावी लागते. यासाठी त्यांना दीर्घकाळापर्यंत स्वच्छतेविषयीचे धडे द्यावे लागतील.
मॅक्सच्या आईला हे ठाऊक आहे, की अन्न हे वेगवेगळ्या मार्गांनी दूषित होऊ शकते. त्यामुळे, अन्नपदार्थ हाताळण्याआधी ती तिचे हात स्वच्छ धुते. शिवाय, अन्नावर माश्या बसू नयेत म्हणून ती ते झाकून ठेवते. अन्न नेहमी झाकून ठेवल्यामुळे व घर नीटनेटके ठेवल्यामुळे, उंदीर, घुशी, झुरळे ही नकोशी पाहुणी आपोआप पळून जातात, हेही तिला माहीत आहे.
मॅक्सची आई इतकी काळजी का घेते याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, ती देवाला संतुष्ट करू इच्छिते. ती म्हणते: “बायबलमध्ये म्हटले आहे, की देव पवित्र आहे. त्यामुळं त्याच्या लोकांनीही पवित्र असले पाहिजे.” (१ पेत्र १:१६) “पवित्रतेचा संबंध स्वच्छतेशी आहे. म्हणून, माझं घर, माझ्या घरातले सर्व जण स्वच्छ दिसावेत, असं मला वाटतं. अर्थात घरातले सर्वच जण मला साथ देतात, म्हणून हे शक्य होते.”
घरच्यांची साथ आवश्यक
मॅक्सच्या आईने म्हटले तसे, घराची स्वच्छता ही फक्त एकाचीच जबाबदारी नाही तर घरातल्या सर्वांचीच आहे. काही कुटुंबे वेळोवेळी एकत्र बसून, याबाबतीत चर्चा करतात. घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काय करण्याची गरज आहे, कोणकोणत्या सुधारणा करता येतील यावर ते चर्चा करतात. यामुळे, कुटुंबाला एकत्र येण्याची संधी तर मिळतेच शिवाय, सर्वांच्या हिताची काळजी घेण्याकरता काय केले पाहिजे याची प्रत्येकाला आठवण होते. जसे की, शौचालयाला जाऊन आल्यावर, पैशांची हाताळणी केल्यानंतर व जेवणाआधी हात का धुतले पाहिजेत ते आई मोठ्या मुलांना समजावून सांगू शकते. ही मोठी मुले मग आपल्या लहान भावंडांना या गोष्टीचे महत्त्व पटवून देऊ शकतात.
कुटुंबामध्ये काम वाटून घेतले जाऊ शकते. कुटुंबे, आठवड्यातून एकदा नियमाने घर स्वच्छ करण्याचे व वर्षातून एकदा अथवा दोनदा घराची पूर्ण स्वच्छता करण्याचा आराखडा बनवण्याचे कदाचित ठरवतील. आणि घराबाहेरच्या परिसराच्या स्वच्छतेचे काय? स्टीवर्ट एल. उडल नावाचे पर्यावरणवादी अमेरिकेविषयी असे म्हणतात: “आम्ही अशा एका प्रदेशात राहत आहोत जिथले सौंदर्य हळूहळू नाहीसे होत चालले आहे. कुरूपता वाढत चालली आहे. मोकळ्या जागेचा अभाव जाणवू लागला आहे. सतत वाढत असलेले प्रदूषण, गोंगाट,
दैन्यावस्था यांमुळे एकूण पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.”तुमच्याही आजूबाजूचा परिसर असाच झाला आहे, असे तुम्हाला वाटते का? जुन्या काळात व आजही, मध्य आफ्रिकेतील काही गावांमध्ये, लोकांचे लक्ष वेधण्यासाठी एक माणूस घंटी वाजवत फिरत असतो आणि मोठ्याने ओरडून: गाव स्वच्छ ठेवा, ड्रेनेज व गटारी स्वच्छ करा, झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापा, वाढलेले गवत काढा, कचऱ्याची विल्हेवाट लावा, असे तो नागरिकांना सांगत फिरत असतो.
कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ही एक जगव्याप्त समस्या बनली आहे. आणि अनेक सरकारांसाठी तर ही अशी एक समस्या आहे जिच्यावर त्यांना काहीच उपाय दिसत नाही. काही नगरपालिका कचरा गोळा करत नाहीत. पर्यायाने मग कचऱ्याचा ढीग रस्त्यांवर साठत जातो. अशा वेळी कदाचित स्थानिक नागरिकांना मदतीचे आव्हान दिले जाते. उत्तम नागरिक या नात्याने ख्रिस्ती जन, सरकारी अधिकाऱ्यांच्या आज्ञेचे कुरकुर न करता पालन करतात व मदत करण्यासाठी लगेच पुढे येतात. (रोमकर १३:३, ५-७) खरे ख्रिस्ती तर याबाबतीत एक पाऊल पुढे जाण्यास तयार असतात. आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची त्यांची इच्छा आहे व अशा कामांमध्ये ते पुढाकार घेतात. स्वच्छतेची आठवण करून देण्याकरता त्यांना कोणत्याही घंटीवाल्याची गरज पडत नाही. त्यांना याची जाणीव आहे, की स्वच्छता राखून ते, त्यांना किती चांगले प्रशिक्षण मिळाले आहे व ते किती जबाबदार आहेत हे दाखवू शकतात. स्वच्छतेबाबतचे उत्तम प्रशिक्षण व जबाबदार वर्तन यांची सुरुवात घरापासूनच होते. स्वच्छतेबद्दलच्या अगदी साध्या साध्या गोष्टींचे पालन केल्यास व घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवल्यास आपण निरोगी राहतो तसेच आपला परिसरही स्वच्छ दिसतो.
स्वच्छ राहिल्याने आपल्या देवाचा आदर होतो
स्वच्छ व नीटनेटका पेहराव करणे आपल्या उपासनेचा एक भाग आहे. यामुळे आपण वेगळे लोक आहोत हे लोकांना दिसून येते. फ्रान्सच्या तुलूझ येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनानंतर, जवळजवळ १५ तरुण-तरुणींचा एक गट एका रेस्टॉरंटमध्ये गेला. त्यांच्या शेजारच्या टेबलावर बसलेल्या एका वृद्ध जोडप्याला वाटले, की आता हा घोळका चांगलाच आवाज व चिडवाचिडवी करून गोंधळ घालेल. पण, तसे काही झाले नाही. सभ्य पेहराव करून आलेल्या या तरुण-तरुणींचे उत्तम आचरण व त्यांना शांतपणे बसून गप्पा करत असलेले पाहून या जोडप्याला आश्चर्य वाटले. हे पंधरा जण निघायला लागले तेव्हा त्या जोडप्याने त्यांच्या उत्तम आचरणाची प्रशंसा केली आणि त्यांच्यापैकी एकाला म्हटले, की अशा प्रकारची सभ्य वागणूक तरुणांमध्ये आजकाल क्वचितच पाहायला मिळते.
यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयांना, छापखान्यांना, वसतीगृहांना भेट देणारे लोक, तिथली स्वच्छता पाहून थक्क होतात. या ठिकाणी राहणाऱ्या व सेवा करणाऱ्या स्वयंसेवकांकडून अपेक्षा केली जाते, की त्यांनी रोज स्वच्छ व धुतलेले कपडे घालावेत आणि रोज आंघोळ करावी. केवळ डिओडरंट व अत्तर मारल्याने आपण स्वच्छ होत नाही. पूर्ण वेळ सेवा करणारे हे स्वयंसेवक संध्याकाळच्या वेळी किंवा शनिवारी-रविवारी लोकांच्या घरी प्रचारासाठी जातात तेव्हा त्यांचा स्वच्छ पेहराव पाहून, लोक त्यांचा संदेश ऐकण्यास उत्सुक असतात.
‘देवाचे अनुकरण करणारे व्हा’
‘देवाचे अनुकरण करणारे व्हा,’ असे ख्रिश्चनांना आर्जवण्यात आले आहे. (इफिसकर ५:१) संदेष्टा यशयाने एक दृष्टांत पाहिला ज्यात त्याने देवदूत, निर्माणकर्त्याला, “पवित्र! पवित्र! पवित्र!” असे म्हणत असताना पाहिले. (यशया ६:३) यावरून आपल्याला, देवाच्या सर्वोत्कृष्ट शुद्धतेची व निर्मळतेची प्रचिती येते. म्हणूनच देवही आपल्या सर्व सेवकांकडून पवित्र व स्वच्छ असण्याची अपेक्षा करतो. तो त्यांना म्हणतो: “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.”—१ पेत्र १:१६.
बायबल ख्रिश्चनांना, त्यांना “शोभेल असाच पोशाख” करावा, असे उत्तेजन देते. (१ तीमथ्य २:९, मराठी कॉमल लँग्वेज भाषांतर.) म्हणूनच, प्रकटीकरणाच्या पुस्तकात ‘तेजस्वी, शुद्ध व तागाचे तलम वस्त्र’ देवाच्या नजरेत पवित्र असलेल्यांच्या धार्मिक कार्यांना सूचित करत असल्याचे म्हटले आहे. (प्रकटीकरण १९:८) परंतु, शास्त्रवचनांमध्ये, पापाला सूचित करण्यासाठी डाग किंवा मलिनता या शब्दांचा उपयोग करण्यात आला आहे.—नीतिसूत्रे १५:२६; यशया १:१६; याकोब १:२७.
आज, कोट्यवधी लोक अशा भागांमध्ये राहतात जिथे त्यांना शारीरिक रीत्या, नैतिक रीत्या व आध्यात्मिक रीत्या शुद्ध राहण्यासाठी खरोखरच सतत झटावे लागते. पण लवकरच यावर एक कायमचा उपाय निघणार आहे. देव “सर्व गोष्टी नवीन” बनवणार आहे. (प्रकटीकरण २१:५) देवाने हे वचन पूर्ण केल्यानंतर पृथ्वीवरील सर्व प्रकारचा गलिच्छपणा व अशुद्धता नाहीशी होईल. (w०८ १२/१)
[तळटीप]
^ नाव बदलण्यात आले आहे.
[१० पानांवरील चौकट]
आपण स्वच्छ राहावे अशी देव अपेक्षा करतो
रानांतून जात असताना इस्राएल लोकांना अत्यंत काळजीपूर्वकतेने मानवी विष्ठेची विल्हेवाट लावायची होती. म्हणजे, त्यांना छावणीच्या बाहेर दूरवर शौचास जाऊन विष्ठा झाकून टाकायची होती. (अनुवाद २३:१२-१४) इस्राएलांच्या छावण्यांमध्ये जवळजवळ तीस लाख लोक असल्यामुळे हे खरोखरच एक कंटाळवाणे काम असावे. पण या आज्ञेचे काटेकोरपणे पालन केल्यामुळेच तर ते टायफॉइड व कॉलेरा यांसारखे आजार टाळू शकत होते.
इस्राएल लोकांना, प्राण्यांच्या शवांच्या संपर्कात आलेली कोणतीही वस्तू एकतर स्वच्छ धुवायची होती किंवा नष्ट करायची होती. इस्राएल लोकांना कदाचित देवाच्या या आज्ञेचा अर्थ तेव्हा कळला नसेल. पण तिचे पालन केल्यामुळे ते स्वतःला सर्व प्रकारच्या संसर्गापासून किंवा रोगांपासून वाचवू शकत होते.—लेवीय ११:३२-३८.
निवासमंडपातील आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याआधी, याजकांना फक्त आपले हातच नव्हे तर आपले पायही स्वच्छ धुवायचे होते. या उद्देशासाठी असलेल्या मोठ्या पितळेच्या गंगाळात पाणी भरणे सोपे नव्हते. तरीपण, त्यांना या नियमाचे काटेकोरपणे पालन करावेच लागत होते.—निर्गम ३०:१७-२१.
[११ पानांवरील चौकट]
एका डॉक्टराने दिलेल्या व्यावहारिक सूचना
जिवंत राहण्यासाठी पाणी हे आवश्यक आहे. परंतु दूषित पाणी रोगांस व मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. कॅमेरूनमधील डुआला येथील बंदरावर असलेल्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख, डॉ. जे. म्बाँगे लोबे यांनी एका मुलाखतीत स्वच्छतेच्या संबंधाने काही व्यावहारिक सूचना दिल्या.
ते म्हणाले: “तुम्हाला शंका असेल तर पिण्याचे पाणी उकळून घ्या. पाणी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही जर ब्लीच किंवा इतर रसायनांचा उपयोग करत असाल तर ते ठीक आहे, परंतु, या गोष्टींचा तुम्ही योग्य प्रमाणात उपयोग केला नाही तर ते घातक ठरू शकते. जेवणाआधी व शौचालयाला जाऊन आल्यावर नेहमी साबणाने हात धुवा. साबणाची वडी काही इतकी महाग नसते, त्यामुळे गरीब लोकही ती विकत घेऊ शकतात. वापरलेले कपडे नेहमी धुवा. आणि तुम्हाला जर त्वचा रोग किंवा इतर काही विकार असतील तर गरम पाण्याने कपडे धुवा.”
ते पुढे असेही म्हणाले: “घरातल्या सर्वांनी, घर व घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. शौचालयांकडे व स्वच्छतागृहांकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. आणि मग अशा ठिकाणी झुरळांचा व माश्यांचा सुळसुळाट होतो.” मुलांविषयी बोलताना त्यांनी सावधानीचा असा इशारा दिला: “पाण्याच्या डबक्यांमध्ये आंघोळ करू नका. ही डबकी घातक रोगाणूंनी गच्च भरलेली असतात. रात्री झोपायच्या आधी घरी अंघोळ करा, दात घासा आणि मच्छरदाणी लावून झोपा.” डॉक्टरांनी दिलेल्या या सूचनांमागचा उद्देश, पुढचा विचार करण्यास, त्यानुसार पावले उलचण्यास व संकट टाळण्यास मदत करणारा आहे.
[१० पानांवरील चित्र]
कपडे धुतल्याने तुम्ही त्वचा रोग व इतर विकार टाळू शकता
[१० पानांवरील चित्र]
आपला परिसर स्वच्छ ठेवण्यात ख्रिस्ती लोक पुढाकार घेतात
[१० पानांवरील चित्र]
काळजी घेणारी एक आई आरोग्याच्या व स्वच्छतेच्या बाबतीत बरेच काही करू शकते