व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनाथांचा पिता

अनाथांचा पिता

देवाच्या जवळ या

अनाथांचा पिता

निर्गम २२:२२-२४

“पितृहीनांचा पिता . . . असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे.” (स्तोत्र ६८:५) या प्रेरित शब्दांतून उपेक्षित असलेल्या लोकांच्या गरजांबद्दल यहोवाला किती काळजी आहे याबद्दल ह्रदयस्पर्शी धडा शिकायला मिळतो. पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे अशा मुलांबद्दल यहोवाला असलेली काळजी त्याने इस्त्राएली लोकांना दिलेल्या नियमशास्त्रातून स्पष्ट दिसून येते. बायबलमध्ये ‘अनाथ’ हा शब्द पहिल्यांदा निर्गम २२:२२-२४ (पं.र.भा.) येथे पाहायला मिळतो. त्याचे आपण परीक्षण करू या.

देव इशारा देतो कीः “तुम्ही कोणत्याच . . . अनाथ मुलाला जाचू नका.” (वचन २२) अनाथ मुलांना लोकांनी मदत करावी म्हणून केलेली ही फक्‍त विनंती नव्हती तर ती देवाची आज्ञा होती. पिता नसलेले मूल असहाय्य होते व कोणीही त्याचा फायदा उचलू शकते कारण त्याचे पालनपोषण करायला व त्याला आधार द्यायला कोणीही नसते. कोणीही अशा मुलाला ‘जाचायचे’ नव्हते. इतर बायबल अनुवादांत ‘जाच’ या शब्दाचे “शोषण,” “दुर्वर्तन”, आणि “एखाद्याचा गैरफायदा उचलणे” असे भाषांतर केले आहे. अनाथ मुलाला वाईट वागणूक देणे देवाच्या नजरेत गंभीर गुन्हा होता. किती गंभीर होता?

नियमशास्त्र पुढे सांगते: “जर तू कोणत्याही रितीने त्यांना जाचशील आणि ती मला हाक मारतील तर मी त्यांचे ओरडणे अवश्‍य ऐकेन.” (वचन २३) या अहवालात २२ व्या वचनात “तुम्ही” असे अनेकवचन वापरले आहे तर २३ व्या वचनात “तू” असे एकवचन वापरले आहे. इस्राएलांनी वैयक्‍तिरित्या व संपूर्ण राष्ट्र मिळून या नियमाचे पालन करणे महत्त्वाचे होते. यहोवाचे अनाथ मुलांकडे लक्ष होते; त्यांच्या मदतीसाठी तो सदैव तयार होता.—स्तोत्र १०:१४; नीतिसूत्रे २३:१०, ११.

पण जर एखाद्याने अशा अनाथ मुलाला वाईट वागणूक दिली व त्याला मदतीसाठी देवाला हाक मारावी लागली तर? अशा व्यक्‍तीविरूद्ध “माझा क्रोध पेटेल आणि तरवारीने मी तुम्हांस जिवे मारीन,” असे यहोवा म्हणतो. (वचन २४) एका बायबल संदर्भ ग्रंथानुसार “वरील वचनात यहोवाच्या क्रोधाचे करण्यात आलेले वर्णन अगदी शब्दशः आहे. अतिक्रोधासाठी ‘माझ्या नाकपुड्या क्रोधाने फुरफुरतील’ हा देखील एक वाक्प्रचार आहे.” हा नियम तोडणाऱ्‍यांना शासन करणे यहोवाने इस्त्राएलमधील कोणत्याही मानवी न्यायाधीशांच्या हातात सोपवले नव्हते हे लक्षात घ्या. एखाद्या असहाय्य मुलास जाचणाऱ्‍याला तो स्वतः शासन करणार होता.—अनुवाद १०:१७, १८.

यहोवा आजही बदललेला नाही. (मलाखी ३:६) आई किंवा वडील नसलेल्या किंवा अनाथ असलेल्या मुलांबद्दल त्याला कळवळा वाटतो. (याकोब १:२७) निष्पाप मुलांचा फायदा उचलणाऱ्‍यांविरूद्ध यहोवाचा धार्मिक क्रोध भडकतो. असहाय्य मुलांशी दुर्वर्तन करणारे ‘परमेश्‍वराच्या क्रोधापासून’ वाचू शकणार नाहीत. (सफन्या २:२) “जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे,” हे या दुष्ट लोकांना कळेल.—इब्री लोकांस १०:३१. (w०९ ४/१)