व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपवास धरल्याने आपण देवाच्या आणखी जवळ येतो का?

उपवास धरल्याने आपण देवाच्या आणखी जवळ येतो का?

उपवास धरल्याने आपण देवाच्या आणखी जवळ येतो का?

‘उपवासाच्या दिवशी तुम्ही देवाचा जास्त विचार करता. भौतिक गोष्टी आपल्या जीवनात महत्त्वाच्या नाहीत, हे आपल्याला त्या दिवशी जाणवते.’—एक कॅथलिक स्त्री.

‘उपवास धरल्याने तुम्ही देवाशी एकरूप होऊ शकता.’—एक यहुदी रब्बी.

‘आमच्या धर्मात उपवासाला खूपच महत्त्व आहे. देवावर माझी किती श्रद्धा आहे व त्याचा मी किती आभारी आहे हे मी उपवास धरून दाखवू शकतो. मी देवावर प्रेम करत असल्यामुळे उपवास धरतो.’—बहाय धर्माचा एक अनुयायी.

जगातील अनेक धर्मांत तसेच बौद्ध, हिंदू, मुस्लिम, जैन व यहुदी धर्मांतही उपवास धरणे सर्वसामान्य रीत आहे. काही विशिष्ट काळासाठी आहार वर्ज्य केल्याने आपण देवाच्या जवळ येऊ शकतो, असा पुष्कळ लोकांचा समज आहे.

तुम्हाला काय वाटते? तुम्ही देखील उपवास धरावा का? देवाचे वचन बायबल यांत उपवास धरण्याविषयी काय सांगितले आहे?

बायबल काळातील उपवास

बायबल काळातील लोक देवाची स्वीकृती असलेल्या विविध कारणांसाठी उपवास धरायचे. काही जण, अत्यंत दुःख झाले आहे किंवा पापांचा पश्‍चात्ताप झाला आहे हे दाखवण्यासाठी (१ शमुवेल ७:४-६), देवाची मर्जी किंवा मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी (शास्ते २०:२६-२८; लूक २:३६, ३७), एखाद्या गोष्टीचे ध्यान करताना मन एकाग्र करण्यासाठी उपवास धरायचे.—मत्तय ४:१, २.

परंतु बायबलमध्ये अशाही उपवासांबद्दल सांगितलेले आहे जे देवाला स्वीकारयोग्य नव्हते. जसे की, राजा शौलाने एका भूतविद्याप्रवीण स्त्रीकडे विचारपूस करायच्या आधी उपवास धरला होता. (लेवीय २०:६; १ शमुवेल २८:२०) ईजबेलसारख्या व प्रेषित पौलाला ठार मारण्याचा कट करणाऱ्‍या धर्मांध लोकांसारख्या वाईट लोकांनी देखील उपवास धरले होते. (१ राजे २१:७-१२; प्रेषितांची कृत्ये २३:१२-१४) परूशी लोक तर नित्यनियमाने उपवास धरत असल्याचे सर्वांना माहीत होते. (मार्क २:१८) तरीपण येशूने या परूशांना धिक्कारले, त्यांच्या उपवासांनी ते देवाला प्रभावीत करू शकले नाहीत. (मत्तय ६:१६; लूक १८:१२) तसेच, यहोवाने काही इस्राएलांच्या वाईट वर्तनामुळे व चुकीच्या हेतूंमुळे त्यांनी केलेल्या उपवासांकडे दुर्लक्ष केले.—यिर्मया १४:१२.

या उदाहरणांवरून स्पष्ट कळते, की फक्‍त उपवास धरल्यानेच देव प्रसन्‍न होत नाही. पण देवाच्या अनेक प्रामाणिक मनाच्या सेवकांनी उपवास धरला तेव्हा देवाने त्याला मान्यता दर्शवली. मग, ख्रिश्‍चनांनी उपवास धरावा का?

ख्रिश्‍चनांनी उपवास धरणे सक्‍तीचे आहे का?

वर्षातून एकदा प्रायश्‍चित्ताच्या दिवशी “तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे,” अर्थात उपवास करावा अशी आज्ञा मोशेला दिलेल्या नियमशास्त्रात यहुद्यांना देण्यात आली होती. (लेवीय १६:२९-३१; स्तोत्र ३५:१३) अशा प्रकारे उपवास करण्याची आज्ञा यहोवाने आपल्या लोकांना एकदाच दिली होती. * मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करणारे यहुदी या आज्ञेचे पालन करीत असत. परंतु, आज ख्रिश्‍चनांना मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करावे लागत नाही.—रोमकर १०:४; कलस्सैकर २:१४.

नियमशास्त्रानुसार येशूने देखील उपवास धरला होता पण तो नेहमीच उपवास धरायचा असा बायबलमध्ये कोठेही उल्लेख नाही. उपवास धरल्यावर कसे वागले पाहिजे, हे त्याने आपल्या शिष्यांना सांगितले पण त्याने त्यांना उपवास धरण्याची आज्ञा दिली नाही. (मत्तय ६:१६-१८; ९:१४) मग आपले शिष्य आपल्या मृत्यूनंतर उपवास धरतील, असे येशू का म्हणाला? (मत्तय ९:१५) त्याने त्यांना उपवास धरण्याची आज्ञा दिली नाही. येशूच्या बोलण्याचा फक्‍त एवढाच अर्थ होतो, की त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या शिष्यांना खूप दुःख होईल व अन्‍नावरून त्यांची वासना उडून जाईल.

बायबलमध्ये आरंभीच्या दोन ख्रिश्‍चनांची उदाहरणे दिलेली आहेत ज्यांनी, मनात चांगला हेतू बाळगून उपवास धरला तेव्हा देवाने त्यांचा उपवास मान्य केला. (प्रेषितांची कृत्ये १३:२, ३; १४:२३) * यावरून कळते, की ख्रिश्‍चनांना उपवास धरण्याची सक्‍ती नाही. तरीपण काही जण उपवास धरतील. अशांनी, विशिष्ट धोक्यांविषयी सावधगिरी बाळगली पाहिजे.

धोक्यांपासून सावध राहा

उपवासाच्या बाबतीत एक धोका म्हणजे स्वतःला अतिधार्मिक समजणे. नम्रतेचा आव आणण्याविरुद्ध बायबल ताकीद देते. (कलस्सैकर २:२०-२३) नियमितरीत्या उपवास धरल्यामुळे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणाऱ्‍या गर्विष्ठ परूशाच्या येशूने दिलेल्या उदाहरणावरून स्पष्ट कळते, की देवाला अशा प्रकारची मनोवृत्ती मुळीच आवडत नाही.—लूक १८:९-१४.

आपण उपवास धरतो, असे लोकांना सांगत फिरणे किंवा इतरांनी सांगितल्यामुळे उपवास धरणे या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. मत्तय ६:१६-१८ मध्ये येशूने असा सल्ला दिला, की उपवास धरण्याची गोष्ट खासगी आहे म्हणजे ती देव आणि तुम्ही, फक्‍त तुम्हा दोघांतली गोष्ट असली पाहिजे. तिची दवंडी पिटवायची नसते.

उपवास धरल्याने आपल्या पापांची आपोआप भरपाई होईल, असा आपण मुळीच विचार करू नये. आपला उपवास देवाने स्वीकारावा असे जर आपल्याला वाटत असेल तर उपवासासोबत आपण त्याच्या आज्ञांचेही पालन करणे आवश्‍यक आहे. (यशया ५८:३-७) पापांची क्षमा, उपवास धरल्याने नव्हे तर मनापासून पश्‍चात्ताप केल्याने होते. (योएल २:१२, १३) ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे व्यक्‍त होणाऱ्‍या यहोवाच्या अपात्र कृपेनेच आपण क्षमा मिळवू शकतो, यावर बायबलमध्ये जोर देण्यात आला आहे. कोणतीही कार्ये करून किंवा उपास-तापास करून आपण क्षमा मिळवू शकत नाही.—रोमकर ३:२४, २७, २८; गलतीकर २:१६; इफिसकर २:८, ९.

यशया ५८:३ मध्ये लोकांच्या आणखी एका सर्वसामान्य चुकीच्या ग्रहाविषयी सांगितलेले आहे. इस्राएली लोक असे दाखवत होते, की जणू उपवास धरल्यामुळे यहोवा त्यांना काहीतरी देण्यास बांधील होता; म्हणजे उपवास धरून ते जणू काय देवावर उपकारच करत होते. त्यांनी असे विचारले: “आम्ही उपास करितो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणीत नाहीस?” आजही अनेकांना असेच वाटते. उपवास धरून ते देवाला त्यांच्यासाठी काही तरी करण्यास भाग पाडू शकतात. ही अशा प्रकारची मनोवृत्ती आपण टाळली पाहिजे. ती अतिशय अनादरणीय आहे शिवाय शास्त्रावर आधारित नाही.

उपवासाद्वारे, स्वतःला फटके मारण्याद्वारे किंवा इतर मार्गांनी शरीराला छळण्याद्वारे आपण देवाची मर्जी प्राप्त करू शकतो, असे काहींना वाटते. पण देवाच्या वचनात या गोष्टीचे खंडन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या ‘देहदंडनाद्वारे’ शरीराच्या लालसांवर मात करणे ‘योग्य नाही.’—कलस्सैकर २:२०-२३.

संतुलित दृष्टिकोन

उपवास धरणे सक्‍तीचे नाही; शिवाय ते चुकीचे देखील नाही. वर उल्लेखण्यात आलेले धोके टाळल्यास काही बाबतीत ते फायदेकारक ठरू शकते. परंतु, आपली उपासना स्वीकारयोग्य बनवण्याकरता आपण केवळ उपवास धरण्यावरच अधिक लक्ष केंद्रित करू नये. यहोवा “आनंदी देव” आहे आणि त्याच्या सेवकांनी देखील आनंदी असावे अशी त्याची इच्छा आहे. (१ तीमथ्य १:११, NW) त्याचेच वचन असे म्हणते: “मनुष्यांनी आमरण सुखाने राहावे व हित साधावे यापरते इष्ट त्यांस काही नाही. . . . प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीहि देवाची देणगी आहे.”—उपदेशक ३:१२, १३.

आपण आनंदाने उपासना केली पाहिजे. परंतु बायबलमध्ये उपवासाला कधीही आनंदासोबत जोडण्यात आलेले नाही. शिवाय, आहार वर्ज्य केल्याने आपल्या तब्येतीवर विपरीत परिणाम होणार असेल किंवा आपल्या सृष्टीकर्त्याने सर्व ख्रिश्‍चनांवर सोपवलेले कार्य म्हणजे, राज्याच्या सुवार्तेचे प्रचार कार्य करण्यास शक्‍ती उरणार नसेल तर उपवासाचे उलट परिणाम होऊ शकतात.

आपण स्वतः उपवास धरू इच्छितो किंवा नाही ही पूर्णतः व्यक्‍तिगत बाब आहे; याबाबतीत आपण इतरांचा न्याय करू नये. खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये या विषयावर कसलाच वाद असू नये कारण, “खाणे व पिणे ह्‍यात देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांति व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्‍यात ते आहे.”—रोमकर १४:१७. (w०९ ४/१)

[तळटीपा]

^ एस्तेरने धरलेला उपवास देवाने सांगितला नव्हता तरीपण असे दिसते, की देवाने तो स्वीकारला. आज, एस्तेरच्या उपवासाच्या सणाआधी पुरीमचा यहुदी सण पारंपरिकपणे साजरा केला जातो.

^ काही बायबल अनुवादांमध्ये उपवासाचे उल्लेख आढळतात जे जुन्या ग्रीक हस्तलिपींमध्ये नाहीत.—मत्तय १७:२१; मार्क ९:२९; प्रेषितांची कृत्ये १०:३०; १ करिंथकर ७:५, किंग जेम्स व्हर्शन.

[२६ पानांवरील संक्षिप्त आशय]

परूशी लोक उपवास धरताना नम्रतेचा आव आणत असत

[२७ पानांवरील संक्षिप्त आशय]

“खाणे व पिणे ह्‍यात देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांति व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्‍यात ते आहे”

[२७ पानांवरील चौकट]

चाळीस दिवसांच्या उपवासाविषयी काय?

चाळीस दिवसांचा उपवास ख्रिस्ताचा ४० दिवसांचा उपवास म्हणून धरला जातो. पण येशूने आपल्या शिष्यांना हा उपवास धरण्याची कधी आज्ञा दिली नाही शिवाय त्याच्या शिष्यांनी तो उपवास धरल्याचा बायबलमध्ये काही पुरावा देखील नाही. ईस्टरआधीच्या ४० दिवसांच्या उपवासाचा सर्वात पहिला विश्‍वसनीय उल्लेख, सा.यु. ३३० मधील अथानासियसच्या पत्रांत आढळतो, असे म्हटले जाते.

येशूने त्याच्या मृत्यूआधी नव्हे तर त्याच्या बाप्तिस्म्यानंतर उपवास धरला होता. त्यामुळे, काही धर्म ईस्टरच्या आधी उपवास धरतात हे जरा विचित्रच आहे. परंतु उत्तर गोलार्धात, वर्षाच्या सुरुवातीच्या काळात प्राचीन बॅबिलोनी, ईजिप्शियन व ग्रीक लोकांमध्ये ४० दिवसांचा उपवास धरण्याची प्रथाच होती. “ख्रिश्‍चनांनी” ही प्रथा त्यांच्याकडून स्वतःच्या धर्मात सामावून घेतली.