व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चमत्काराने बरे करणे देवाकडून होते का?

चमत्काराने बरे करणे देवाकडून होते का?

वाचक विचारतात

चमत्काराने बरे करणे देवाकडून होते का?

यहोवा देवाकडे बरे करण्याची ताकत आहे यात काहीच शंका नाही. तो आपल्या उपासकांना ही ताकत देऊ शकतो हेही तितकेच खरे आहे. उदाहरणार्थ, प्रेषितांच्या काळात पवित्र आत्म्याने मिळालेल्या विशेष वरदानांपैकी चमत्काराने बरे करणे हे एक दान होते. प्रेषित पौलाने लिहिले: “आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्याद्वारे . . . विद्येचे वचन; . . . एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने; . . . एखाद्याला संदेश देण्याची शक्‍ती; एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्‍ती,” देण्यात आली होती.—१ करिंथकर १२:४-११.

शिवाय चमत्कार करण्याची पवित्र आत्म्याची ही दाने संपुष्टात येतील असे पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या याच पत्रात सांगितले. तो म्हणाला: “संदेश असेल तरी ते संपतील. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील; आणि विद्या असली तरी ती संपेल.”—१ करिंथकर १३:८.

येशू व त्याच्या प्रेषितांनी पहिल्या शतकात लोकांना चमत्काराने बरे केले होते. आत्म्याची ही दाने व आजार बरे करण्याची ही शक्‍ती देवाचे गौरव करण्यासाठी वापरली जात होती. शिवाय प्रेषितांच्या या काळात नव्याने बनलेल्या ख्रिस्ती मंडळीला यहोवाची स्वीकृती असल्याचे व तिच्यावर त्याचा आशीर्वाद असल्याचे हे चिन्हही होते. पण या मंडळीची आध्यात्मिकरित्या वाढ झाल्यावर तिच्या विशेष दानांवरून नव्हे तर मंडळीत दाखवला जाणारा दृढ विश्‍वास, आशा आणि प्रीती यांवरून मंडळीला यहोवाची स्वीकृती असल्याचे स्पष्ट दिसणार होते. (योहान १३:३५; १ करिंथकर १३:१३) म्हणूनच सा.यु. १०० सालाच्या सुमारास देवाच्या स्वीकृतीचे चिन्ह असलेली, चमत्काराने बरे करण्याची ही दाने संपुष्टात आली. *

तरीही मग ‘आज मला चमत्काराने बरे होण्याच्या घटना का ऐकायला मिळतात?’ असा तुम्हाला प्रश्‍न पडेल. उदाहरणार्थ, एका वर्तमान पत्रात कॅन्सरग्रस्त असणाऱ्‍या मनुष्याची बातमी आली होती. त्याच्या डोक्यात, मूत्रपिंडावर आणि अगदी त्याच्या हाडांच्या आत कॅन्सरच्या गाठी होत्या. जगण्याची त्याला काहीच आशा नव्हती. एके दिवशी मात्र देव त्याच्याशी “बोलला” व त्यानंतर सर्वच बदलले. बातमीत पुढे म्हटले होते की त्याचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला होता.

अशा प्रकारची बातमी तुम्ही ऐकता तेव्हा स्वतःला असे विचारू शकता: ‘ही बातमी खरी आहे का? तो मनुष्य जे काही म्हणतो त्याचा कागदोपत्री किंवा वैद्यकीय पुरावा आहे का? आणि खरोखरच अशा प्रकारे बरे होण्याचा प्रकार घडला असला तरी देव असे चमत्कार घडवून आणतो असे बायबल शिकवते का?’

शेवटच्या प्रश्‍नाचे उत्तर मिळवणे जास्त महत्त्वाचे आहे. येशूने आपल्या शिष्यांना इशारा दिला होता: “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. . . . त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालविली, व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये [चमत्कार] केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणाऱ्‍यांनो, माझ्यापुढून निघून जा.”—मत्तय ७:१५, २१-२३.

या वचनावरून स्पष्ट होते की चमत्काराने बरे होण्याचे आज जे तथाकथित प्रकार होतात ते देवाकडून नव्हे तर इतर कोणाच्यातरी द्वारे होतात. देवाच्या नावाने चमत्कार करणाऱ्‍या लोकांकडून आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण देवाविषयीचे अचूक ज्ञान घेतले पाहिजे. तसेच देवाने दिलेल्या तर्क करण्याच्या शक्‍तीचा उपयोग केला पाहिजे आणि जे त्याची इच्छा पूर्ण करतात अशा लोकांना आपण ओळखण्यास शिकले पाहिजे.—मत्तय ७:१६-१९; योहान १७:३; रोमकर १२:१, २. (w०९ ५/१)

[तळटीप]

^ असे दिसते की प्रेषितांच्या मृत्यूनंतर दाने मिळण्याचे बंद झाले. त्यासोबतच आत्म्याची ही चमत्कारीक दाने ज्यांना मिळाली होती त्यांच्या मृत्यूनंतर ती पूर्णपणे संपुष्टात आली.