व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तो दया दाखवण्यास शिकला

तो दया दाखवण्यास शिकला

त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा

तो दया दाखवण्यास शिकला

योनाकडे विचार करायला कदाचित भरपूर वेळ होता. त्याला ८०० पेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास करायचा होता. हा पल्ला गाठण्यासाठी कदाचित त्याला जवळजवळ एक महिना किंवा त्याहूनही अधिक दिवस लागणार होते. जवळच्या रस्त्यांनी जायचे की सुरक्षित असलेल्या परंतु फिरून जाणाऱ्‍या रस्त्यांनी जायचे हे ठरवून मग त्याला अनेक डोंगरदऱ्‍यांतून प्रवास करावा लागणार होता. प्रचंड सिरियन वाळवंटाच्या कडेकडेने, युफ्रेटीससारख्या मोठमोठ्या नद्या त्याला पार कराव्या लागणार होत्या. सिरिया, मेसोपोटेमिया व अस्सेरियाच्या शहरांतील, गावांतील विदेशी लोकांमध्ये आश्रय घेत त्याला पुढे जावे लागणार होते. जसजसे दिवस सरत गेले तसतसे प्रत्येक पावलागणिक, त्याला ज्याची भीती वाटत होती त्या शहराच्या म्हणजे निनवेच्या जवळ तो येत होता.

योनाला एक गोष्ट पक्की माहीत होती: आता माघार घेऊन तो या नेमणुकीपासून पळून जाऊ शकत नव्हता. पूर्वी त्याने असा प्रयत्न केला होता. शक्‍तिशाली अस्सेरियन राष्ट्राला न्यायदंडाचा संदेश सांगण्याची कामगिरी यहोवाने योनाला पहिल्यांदा दिली तेव्हा तो, विरुद्ध दिशेला जाणाऱ्‍या एका जहाजात बसून पळून चालला होता. यहोवाने समुद्रात एक मोठे वादळ आणले तेव्हा योनाला जाणवले, की आपल्या बंडखोरीमुळे जहाजावर असलेल्या लोकांचे जीव धोक्यात आले होते. या धैर्यवान खलाशांना वाचवण्यासाठी त्याने त्यांना, मला समुद्रात फेकून द्या, असे सांगितले. खलाशांची इच्छा नसतानाही त्यांनी त्याला समुद्रात फेकून दिले. यातून आपण निश्‍चितच जिवंत वाचणार नाही, असे योनाला वाटत होते. पण यहोवाने, योनाला गिळंकृत करण्यासाठी एक प्रचंड मासा पाठवला. या माशाने त्याला गिळंकृत केले. तीन दिवस योना या माशाच्या पोटात होता. तिसऱ्‍या दिवशी या माशाने योनाला अगदी सुरक्षितपणे समुद्र किनाऱ्‍यावर ओकून टाकले. या अनुभवाचा योनाच्या मनावर खोलवर प्रभाव पडला. तो भयचकित झाला व यहोवाची आज्ञा मानण्यास तयार झाला. *योना अध्याय १ व.

यहोवाने योनाला दुसऱ्‍यांदा जेव्हा निनवेला जाण्यास सांगितले तेव्हा हा संदेष्टा अगदी आज्ञाधारकपणे या लांबच्या प्रवासाला निघाला. (योना ३:१-३) पण यहोवाने त्याला शिकवलेल्या धड्यामुळे तो पूर्णपणे बदलला का? यहोवाने त्याला दया दाखवली, तो बुडत होता तेव्हा त्याला वाचवले, त्याने जेव्हा बंड केले तेव्हा त्याला शिक्षा दिली नाही व ही नेमणूक पार पाडण्यासाठी त्याने त्याला पुन्हा एक संधी दिली. इतके सर्व झाल्यानंतरही योना इतरांना दया दाखवण्यास शिकला का? दया दाखवण्याचा धडा शिकणे अपरिपूर्ण मानवांना सहसा कठीण वाटते. योना ज्या बाबतीत उणा पडत होता त्यातून आपण काय शिकू शकतो हे पाहू या.

न्यायदंडाचा संदेश आणि चकित करणारी प्रतिक्रिया

योनाचा निनवेविषयी यहोवासारखा दृष्टिकोन नव्हता. बायबलमध्ये म्हटले आहे: “निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते.” (योना ३:३) योनाच्या अहवालात यहोवाने तीन वेळा ‘मोठे निनवे’ असा उल्लेख केल्याचे आढळते. (योना १:२; ३:२; ४:११) पण यहोवाला हे शहर मोठे किंवा महत्त्वाचे का वाटत होते?

निनवे हे प्राचीन शहर होते. जलप्रलयानंतर निम्रोदाने पहिल्यांदा बांधलेल्या शहरांपैकी एक होते. ते एक महानगर होते ज्यांत अनेक शहरे होती. निनवेच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत जायला तीन दिवस लागायचे. (उत्पत्ति १०:११; योना ३:३) तेथे भव्य मंदिरे, उंच भिंती व इतर मोठमोठ्या इमारती होत्या. पण यांमुळे ते शहर यहोवा देवाला महत्त्वाचे वाटत नव्हते. तर या शहरात राहणारे लोक यहोवाला महत्त्वाचे वाटत होते. त्या काळी निनवे शहराची लोकसंख्या मोठी होती. हे लोक वाईट कृत्ये करत होते तरीपण यहोवाला त्यांची काळजी होती. यहोवाच्या नजरेत मानवी जीवन मौल्यवान आहे. प्रत्येक व्यक्‍ती आपला पापी मार्ग सोडून पश्‍चात्ताप करून जे बरोबर आहे ते करू शकते हेही त्याला माहीत आहे.

योनाने निनवेत प्रवेश केला तेव्हा १,२०,००० पेक्षा अधिक लोकांना पाहून तो आणखीनच घाबरला असावा. * शहराच्या अगदी मधे जाईपर्यंत त्याला एक दिवस लागला. लोकांची गजबज पाहून, तो कदाचित विचार करू लागला असेल, की संदेश सांगायला कोठून सुरुवात करावी? पण तो इतक्या लोकांना संदेश कसा सांगू शकेल? त्याला त्यांची अस्सेरियन भाषा येत होती का? की यहोवाने चमत्कार करून त्याला ती भाषा बोलण्याची क्षमता दिली होती? याविषयी आपल्याला काही माहीत नाही. योना कदाचित त्याच्या मातृभाषेत म्हणजे हिब्रू भाषेत संदेश सांगत असावा व एखाद्या भाषांतरकाराकरवी तो संदेश निनवेकरांच्या भाषेत त्याने कळवला असावा. काहीही असो, त्याचा संदेश मात्र अगदी साधा होता व लोकांना आवडेल असा नव्हता. “चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल,” असे तो सांगत होता. (योना ३:४) त्याने अगदी निर्भयतेने व वारंवार हा संदेश सांगितला. त्याने खरोखरच खूप धैर्य व विश्‍वास दाखवला. योनाप्रमाणेच आजच्या ख्रिश्‍चनांनी हे गुण दाखवण्याची अधिक गरज आहे.

हळूहळू लोकांचे लक्ष योनाच्या बोलण्याकडे वळू लागले. आपला संदेश ऐकल्यावर लोक मला चोपून काढतील, असा विचार त्याने कदाचित केला असेल. पण असे काहीही झाले नाही. उलट लोक त्याचा संदेश लक्ष देऊन ऐकू लागले. त्याचे शब्द वणव्यासारखे पसरले. पाहता पाहता संपूर्ण शहरातील लोकांमध्ये एकच चर्चा चालली—योना सांगत असलेल्या नाशाची चर्चा. योनाच्या अहवालात म्हटले आहे: “निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेविली, त्यांनी उपास नेमिला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोणताट नेसले.” (योना ३:५) श्रीमंत-गरीब, बलवान व अशक्‍त, आबालवृद्ध सर्वच पश्‍चात्ताप करू लागले. शहरात काय चालले होते त्याची बातमी राजाच्या कानावर गेली.

आणि मग राजालाही देवाचे भय वाटू लागले. त्याला पश्‍चात्ताप करायचा होता. तो आपल्या सिंहासनावरून उठला, त्याने आपला राजसी झगा काढला आणि आपल्या लोकांप्रमाणे गोणताट नेसून तोही “राखेत बसला.” आपल्या ‘सरदारांशी’ सल्ला मसलत करून त्याने, लोकांनी स्वतःहून सुरू केलेल्या उपवासाला राष्ट्रीय स्वरूप दिले. राष्ट्रांतील सर्वांनी गोणताट नेसावे, अगदी आपल्या पाळीव जनावरांनाही ते नेसवावे अशी आज्ञा त्याने दिली. * आपले लोक दोषी आहेत, त्यांच्या हातून कुकर्म व हिंसा झाली आहे, हे त्याने अगदी नम्रपणे कबूल केले. खरा देव आमचा पश्‍चात्ताप पाहून आम्हाला जरूर क्षमा करेल अशी आशा व्यक्‍त करत त्याने म्हटले: “देव कदाचित . . . आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.”—योना ३:६-९.

निनवेकरांचा हृदयपालट इतक्या लवकर कसा काय झाला, यावर काही टीकाकार शंका व्यक्‍त करतात. पण, बायबल विद्वानांचे असे म्हणणे आहे, की प्राचीन काळचे अशा संस्कृतीचे लोक अंधविश्‍वासू व चंचल स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी लगेच बदल केला असावा. काहीही असो, निनवेकरांनी बदल केला हे मात्र निश्‍चित; कारण, स्वतः येशूने निनवेकरांच्या पश्‍चात्तापाचा उल्लेख केला. (मत्तय १२:४१) आणि येशूला, आपण काय बोलतोय हे माहीत होते, कारण या घटना जेव्हा घडत होत्या तेव्हा तो स्वर्गातून सर्वकाही पाहत होता. (योहान ८:५७, ५८) निनवेकरांनी पश्‍चात्ताप दाखवला तेव्हा यहोवाची काय प्रतिक्रिया होती?

देवाची दया आणि मानवाचा आडमुठेपणा

योनाने नंतर लिहिले: “देवाने त्यांचे वर्तन पाहिले म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले; तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांजवर ते आणिले नाही.”—योना ३:१०.

या वचनाचा असा अर्थ होतो का, की यहोवाने निनवेविरुद्ध ठोठावलेला न्यायदंड त्याला स्वतःलाच चुकीचा वाटला? नाही. बायबलमध्ये यहोवाविषयी असे म्हटले आहे: “त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्‍वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीति नाही.” (अनुवाद ३२:४) तर वर उल्लेखित वचनाचा अर्थ, निनवेकरांनी पश्‍चात्ताप दाखवल्यामुळे त्याचा धार्मिक क्रोध शमला, असा होतो. त्याने लोकांत झालेला बदल पाहिला त्यामुळे त्याने त्यांना जी शिक्षा द्यायचे ठरवले होते ती दिली नाही. ही दया दाखवण्याची वेळ होती.

धार्मिक नेते सहसा देवाचे चित्रण जसे करतात तसा यहोवा देव कठोर, भावनाशून्य किंवा क्रूर नाही. उलट तो समंजस, परिस्थितीनुसार बदल करणारा व दयाळू आहे. दुष्टांना शिक्षा देण्याचे तो ठरवतो तेव्हा त्यांना ताकीद देण्यासाठी तो पृथ्वीवरील आपल्या प्रतिनिधींना आधी पाठवतो. निनवेकरांनी जसे केले तसेच दुष्टांनी पश्‍चात्ताप करून आपला मार्ग बदलावा हे पाहण्यास तो उत्सुक असतो. (यहेज्केल ३३:११) यहोवाने आपला संदेष्टा यिर्मया याला असे सांगितले: “एखादे राष्ट्र अथवा राज्य समूळ उपटून नष्ट करीन असे मी एकदा बोललो; तरी पण ज्या राष्ट्रांविरुद्ध हे मी बोललो, ते आपली दुष्टता सोडील तर त्यावर जे अरिष्ट आणण्याचा माझा विचार होता त्याविषयी मला अनुताप होईल.”—यिर्मया १८:७, ८.

मग, योना करत असलेली भविष्यवाणी खोटी होती का? मुळीच नाही. ज्या उद्देशासाठी भविष्यवाणी केली जात होती तो उद्देश साध्य झाला होता. लोकांना ताकीद मिळाली होती. निनवेकरांच्या वाईट मार्गांमुळे त्यांना ही ताकीद दिली जात होती पण नंतर त्यांनी पश्‍चात्ताप केला. निनवेकरांनी पुन्हा दुष्कृत्ये करायला सुरुवात केली असती तर देवाने त्यांच्यावर न्यायदंड आणलाच असता. नंतर नाहीतरी असेच घडले.—सफन्या २:१३-१५.

योनाला वाटले होते, की निनवेकरांचा नाश होईल, पण जेव्हा असे झाले नाही तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती? त्याविषयी बायबलमध्ये असे म्हटले आहे: “योनाला ह्‍यावरून फार वाईट वाटले व त्याला राग आला.” (योना ४:१) योनाने तर देवाला प्रार्थना देखील केली व त्या प्रार्थनेत तो जे काही म्हणाला त्यावरून असे वाटत होते, की जणू काय तो देवाला सुधारत होता! इकडे येऊन काही फायदा झाला नाही, आपण घरीच राहिलो असतो तर बरे झाले असते, असे तो बोलण्याचा प्रयत्न करत होता. यहोवा निनवेकरांचा नाश करणार नव्हता हे त्याला आधीपासूनच माहीत होते म्हणूनच तर तो तार्शिशला पळून गेला होता, असेही योनाने म्हटले. त्यानंतर तो यहोवाला म्हणाला, की मला मरू दे; जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते.—योना ४:२, ३.

योना इतका अस्वस्थ का झाला होता? त्याच्या मनात कोणकोणते विचार येत होते हे आपल्याला माहीत नाही. आपल्याला फक्‍त इतके माहीत आहे, की त्याने निनवेकरांना त्यांच्या नाशाचा संदेश दिला होता. त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवल्यामुळे नाश टळला होता. लोक आपली थट्टा करतील, आपल्याला खोटा संदेष्टा म्हणतील, ही भीती त्याच्या मनात होती का? माहीत नाही. पण, लोकांनी पश्‍चात्ताप दाखवला किंवा यहोवाने दया दाखवायचे ठरवले तेव्हा योनाला आनंद झाला नाही. उलट, त्याला स्वतःचीच खूप दया येऊ लागली, आपले नाव खराब झाले असे त्याला वाटू लागले. पण योनाचा दयाळू देव त्याच्या चांगल्या गुणांकडे पाहत होता. त्याला शिक्षा करण्याऐवजी यहोवाने त्याला अगदी प्रेमाने परंतु अर्थपूर्ण प्रश्‍न विचारला: “तुला क्रोध येणे हे बरे आहे काय?” (योना ४:४) योनाने या प्रश्‍नाचे उत्तर दिले का? बायबलमध्ये याविषयी काही सांगितलेले नाही.

यहोवाने योनाला धडा शिकवला

निराश झालेला हा संदेष्टा निनवेतून निघून घरी जाण्याऐवजी पूर्वेकडे म्हणजे डोंगरांकडे जातो. तेथे तो स्वतःसाठी एक मांडव घालतो व निनवे शहराचे काय होते ते पाहत मांडवाच्या छायेत बसतो. निनवेचा नाश नक्की होईल, अशी त्याला अजूनही आशा होती. यहोवाने या निगरगट्ट बनलेल्या मनुष्याला दया दाखवण्याचा धडा कसा शिकवला?

यहोवा एक चमत्कार करतो. एका रात्रीत तो तुंबीचा (भोपळ्याचा) एक वेल उगवतो. योना सकाळी उठतो तेव्हा तो पाहतो, की त्याने बनवलेल्या मांडवापेक्षा या वेलामुळे त्याला दाट सावली मिळत आहे. हा वेल अतिशय जोमाने वाढलेला वाटत होता, त्याची पाने हिरवीगार व पसरट असल्यामुळे छान सावली पडत होती. आता तो खूष झाला. त्याला “फार आनंद झाला.” चमत्काराने उगवलेला हा वेल पाहून, आपण जे काही करत आहोत त्यावर यहोवाचा आशीर्वाद आहे व तो संतुष्ट आहे, असे कदाचित त्याला वाटू लागले. पण यहोवाला त्याला फक्‍त उन्हापासून संरक्षण द्यायचे नव्हते किंवा त्याचे तापलेले डोके शांत करायचे नव्हते तर त्याला धडा शिकवायचा होता. त्यामुळे यहोवाने एक किडा उत्पन्‍न केला आणि त्या किड्यामुळे भोपळ्याचा वेल सुकून गेला. त्यानंतर यहोवाने योना उन्हामुळे “मूर्च्छित” होईपर्यंत “पूर्वेचा झळईचा वारा वाहविला.” पुन्हा एकदा योना निराश झाला व आपणाला मरू दे असे देवाला म्हणू लागला.—योना ४:६-८.

परत एकदा यहोवाने योनाला विचारले, की आता भोपळ्याच्या वेलावरून तू रागवावे हे बरे काय? आपली चूक सुधारण्याऐवजी योना सबब देऊ लागला: “मरण येईपर्यंत रागवावे हेच मला योग्य वाटते.” योनाला धडा शिकवण्याची वेळ आली होती.—योना ४:९, सुबोध भाषांतर.

यहोवाने योनाला समजावून सांगितले, की जो वेल त्याने लावला व वाढवला नव्हता, जो एका रात्रीत उगवला होता, तो मेल्यामुळे जर त्याला इतके दुःख होत होते, “तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांस कळत नाही अशी एक लाख वीस हजाराहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?”—योना ४:१०, ११. *

यहोवाने दिलेल्या या प्रत्यक्ष उदाहरणातला महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला समजला का? त्या वेलाची काळजी घेण्याकरता योनाने काडीचे काम केले नव्हते. पण यहोवा हा त्या निनवेकरांसाठीसुद्धा जीवनाचा झरा होता व पृथ्वीवरील इतर प्राणीमात्रांप्रमाणे त्याने त्यांची देखील काळजी घेतली होती. एक लाख वीस हजार मानवांच्या आणि त्यांच्या कळपांपेक्षा योना एका साध्यासुध्या वेलाला इतके महत्त्वाचे कसे काय समजत होता? योना स्वार्थी बनला होता म्हणून तो असा विचार करत नव्हता का? त्या वेलामुळे त्याला सावली मिळत होती; पण तो वाळला तेव्हा त्याला खूप वाईट वाटले. निनवेवर त्याला राग येण्याचे कारणही स्वार्थीच नव्हते का? आपले नाव खराब झाले, आपण जे बोललो ते बरोबर होते, हे सिद्ध करण्याची घमेंड त्याच्यात निर्माण झाली नव्हती का?

खरोखरच, किती गहन अर्थाचा हा धडा होता! पण प्रश्‍न येतो, की योना या धड्यातून काही शिकला का? त्याच्या नावाने असलेले पुस्तक, यहोवाने विचारलेल्या प्रश्‍नानेच समाप्त होते. काही टीकाकार अशी तक्रार करतात, की योनाने यहोवाच्या प्रश्‍नाचे उत्तर दिले नाही. पण खरे तर, त्याचे उत्तर तेथे आहे. त्याच्या नावाने असलेले पुस्तकच त्याचे उत्तर आहे. पुराव्यांवरून असे कळते, की स्वतः योनानेच, त्याच्या नावाचे हे पुस्तक लिहिले आहे. कल्पना करा, हा संदेष्टा आपल्या घरी सुखरूप परततो व हा अहवाल लिहितो. स्वतःच्या चुकांबद्दल, त्याने केलेल्या बंडखोरीबद्दल व दया दाखवण्याच्या बाबतीत त्याच्या आडमुठेपणाबद्दल लिहिताना हा वृद्ध, सुज्ञ व नम्र मनुष्य आपले डोके होकारार्थी हलवत आहे. होय, यहोवाच्या सुज्ञ सल्ल्यातून योना धडा शिकला होता. तो दया दाखवण्यास शिकला. आपणही शिकू का? (w०९ ४/१)

[तळटीपा]

^ टेहळणी बुरूज एप्रिल-जून, २००९ अंकातील “त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा—तो स्वतःच्या चुकांतून धडा शिकला” हा लेख पाहा.

^ योनाच्या दिवसांत, इस्राएलची राजधानी असलेल्या समेरियाची लोकसंख्या २०,००० ते ३०,००० इतकी असावी. निनवेच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांशापेक्षाही ती कमी होती. समृद्धीच्या काळात निनवे जगातले सर्वात मोठे शहर असावे.

^ पाळीव जनावरांनाही गोणताट नेसवण्याची प्रथा जरा विचित्र वाटेल परंतु प्राचीन काळात आधीही असे झाले होते. प्राचीन पर्शियन लोकांनी, आपल्या पाळीव प्राण्यांसोबत त्यांच्या एका आवडत्या अधिकाऱ्‍याच्या मृत्यूची शोकसभा घेतली, अशी ग्रीक इतिहासकार हेरोडिटस याने नोंद केली आहे.

^ उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांस कळत नाही असे देवाने ज्या लोकांविषयी म्हटले ते लोक लहान मुलांसारखे देवाच्या दर्जांच्या बाबतीत अजाण होते.

[१६ पानांवरील संक्षिप्त आशय]

निनवेकरांनी जसे केले तसेच दुष्टांनी पश्‍चात्ताप करून आपला मार्ग बदलावा हे पाहण्यास यहोवा उत्सुक आहे

[१७ पानांवरील संक्षिप्त आशय]

दया दाखवण्याचा धडा शिकवण्याकरता यहोवाने भोपळ्याच्या वेलाचा उपयोग केला