व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

एखाद्या व्यक्‍तीला जसे जारकर्म व कामातुरपणासाठी ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केले जाते तसे अशुद्धपणासाठीसुद्धा केले जाऊ शकते का?

होय, एक व्यक्‍ती जर अपश्‍चात्तापीपणे जारकर्म किंवा काही प्रमाणात अशुद्धपणा अथवा कामातुरपणा करत असेल तर तिला मंडळीतून बहिष्कृत केले जाऊ शकते. ज्या अपराधांमुळे एखाद्याला बहिष्कृत केले जाऊ शकते त्या अपराधांसोबत या तिन्ही पापांचा देखील प्रेषित पौल उल्लेख करतो. तो असे लिहितो: “देहाची कर्मे तर उघड आहेत; ती ही: जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा. . . . मी तुम्हाला . . . सांगून ठेवतो की, अशी कर्मे करणाऱ्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.”—गलतीकर ५:१९-२१.

जारकर्म (ग्रीक, पोर्निया) हा शब्द, देवाच्या नजरेत स्वीकृती असलेल्या विवाहाच्या बाहेर ठेवल्या जाणाऱ्‍या सर्व प्रकारच्या बेकायदेशीर लैंगिक संबंधांना लागू होतो. यांत, व्यभिचार, वेश्‍यावृत्ती, अविवाहित स्त्रीपुरुषांतील लैंगिक संबंध, मौखिक व गुदमैथुन तसेच जिच्याशी विवाह झालेला नाही अशा व्यक्‍तीचे लैंगिक अवयव चोळणे, या सर्व गोष्टींचा समावेश होतो. जी व्यक्‍ती पश्‍चात्ताप न करता जारकर्म करीत राहते तिचा मंडळीसोबत काहीही संबंध राहत नाही.

कामातुरपणा (ग्रीक, ॲसेल्जिया) यांत, “स्वैराचार, ओंगळपणा, निर्लज्जपणा व दुराचार” यांचा समावेश होतो. द न्यू थेअर्स ग्रीक-इंग्लिश शब्दकोश, ॲसेल्जिया या ग्रीक शब्दाची व्याख्या अशा प्रकारे करतो: “संभोगाची अनावर इच्छा, . . . धक्कादायक कृत्य, निर्जल्लपणा व उर्मटपणा.” आणखी एका शब्दकोशानुसार, कामातुरपणा म्हणजे, “समाजमान्य असलेल्या सर्व गोष्टींची सीमा पार करणारे वर्तन.”

वर सांगितल्याप्रमाणे, “कामातुरपणा” यांत दोन मर्यादांचा समावेश होतो: (१) हे आचरणच देवाच्या नियमांचे घोर उल्लंघन करणारे आहे, आणि (२) कामातूर व्यक्‍तीची मनोवृत्ती अनादरणीय व निर्लज्जपणाची असते.

तेव्हा, “कामातुरपणा” म्हणजे, क्षुल्लक स्वरूपाचे वाईट वर्तन नव्हे तर, देवाच्या नियमांचे घोर उल्लंघन करणारे वर्तन आहे. कामातूर व्यक्‍तीची मनोवृत्ती निर्लज्ज किंवा अनादरणीय असते. अधिकार, नियम व दर्जे यांबद्दल तिला अजिबात आदर नसतो उलट यांचा तिला तिटकारा वाटत असतो. प्रेषित पौलाने कामातुरपणाची तुलना विषयविलास याजशी केली. (रोमकर १३:१३, १४) गलतीकर ५:१९-२१ मध्ये, कामातुरपणाची गणना, एखाद्याला देवाच्या राज्याचा वारसा मिळण्यास अपात्र ठरवणाऱ्‍या वर्तनात केली असल्यामुळे, ख्रिस्ती मंडळीत अशी एखादी व्यक्‍ती असल्यास तिची कानउघाडणी केली जाऊ शकते अथवा तिला मंडळीतून बहिष्कृतही केले जाऊ शकते.

अशुद्धपणा (ग्रीक, अकॉथॉरसिया) यांत, “जारकर्म,” “अशुद्धपणा” आणि “कामातुरपणा” या तिन्हींचा देखील समावेश होतो. यांत सर्व प्रकारच्या अशुद्धतेचा समावेश आहे. मग तो लैंगिक गोष्टींत असो, बोलण्यात असो, वर्तनात असो अथवा आपल्या उपासनेच्या बाबतीत असो. “अशुद्धपणा” यांत अनेक प्रकारची गंभीर पापे समाविष्ट आहेत.

दुसरे करिंथकर १२:२१ मध्ये पौल, “ज्यांनी पूर्वी पाप करून आपण आचारलेल्या अशुद्धपणाचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्‍चाताप केला नाही,” अशा लोकांचा उल्लेख करतो. येथे, ‘अशुद्धपणाचा’ ‘जारकर्म व कामातुरपणा’ यांच्यासोबत उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे काही प्रकारचे अशुद्ध वर्तन आचरणाऱ्‍या व्यक्‍तीविरुद्ध न्यायिक कार्यवाही केली जाऊ शकते. पण अशुद्धपणा यांत अशा बऱ्‍याच गोष्टींचा समावेश आहे ज्यांच्यासाठी न्यायिक कार्यवाहीची गरज नाही. एक घर जसे काही प्रमाणात घाणेरडे असते किंवा खूपच गलिच्छ असते तसेच अशुद्धपणाचे स्तर वेगवेगळे असतात.

इफिसकर ४:१९ मध्ये पौल म्हणतो, की काही लोक “कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्वप्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वत:ला कामातुरपणास वाहून घेतले आहे.” अशा प्रकारे पौल कामातुरपणाप्रमाणे ‘अशुद्धपणाचा’ देखील ‘हावरेपणाच्या’ यादीत समावेश करतो. बाप्तिस्मा घेतलेली व्यक्‍ती ‘हावरेपणाने अशुद्ध’ आचरण करीत असेल तर तिला घोर अशुद्ध वर्तनामुळे बहिष्कृत केले जाऊ शकते.

समजा, मागणी झालेल्या एखाद्या जोडप्याच्या हातून अनेक प्रसंगी, मनात कामवासना उत्पन्‍न होईल अशा प्रकारे लैंगिक अवयवांना कुरवाळण्याचे वर्तन घडले असेल. अशा वेळी, या लोकांनी अनादरणीय मनोवृत्ती दाखवून कामातूर वर्तन केले नसले तरी त्यांच्या वर्तनात हावरेपणा होता हे वडीलजन पाहतील. त्यामुळे त्यांच्या वर्तनात घोर अशुद्धपणा होता म्हणून वडीलजन त्यांच्याविरुद्ध न्यायिक कार्यवाही करतील. एखादी व्यक्‍ती दुसऱ्‍या व्यक्‍तीला फोनवरून वारंवार अगदी उघडपणे लैंगिक गोष्टींबद्दल बोलत असेल व याबाबतीत आधी तिची कानउघाडणी करण्यात आली होती व तरीसुद्धा तिचे वर्तन बदलले नसेल तर तिच्याविरुद्ध देखील घोर अशुद्ध वर्तनासाठी न्यायिक कार्यवाही केली जाऊ शकते.

अशा प्रकारची न्यायिक कार्यवाही करताना वडिलांनी समजबुद्धी दाखवली पाहिजे. न्यायिक कार्यवाही करण्याची गरज आहे किंवा नाही हे ठरवण्याकरता त्यांनी, जे काही झाले व किती प्रमाणात झाले याची पाहणी करावी. याचा अर्थ असा होत नाही, की शास्त्रवचनातला सल्ला न स्वीकारणारी व्यक्‍ती कामातूर आहे असा आरोप तिच्यावर करावा, किंवा न्यायिक कार्यवाही होण्याआधी एखाद्या व्यक्‍तीने विशिष्ट पाप किती वेळा केले होते हे मोजत बसावे. वडिलांनी प्रत्येक प्रकरणाची काळजीपूर्वक व प्रार्थनापूर्वक पाहणी करावी आणि नेमके काय झाले होते व असे किती वेळा झाले होते, गैरवर्तनाचे स्वरूप, हद्द, हेतू या सर्व गोष्टी तपासून पाहाव्यात.

घोर अशुद्ध वर्तनात, केवळ लैंगिक पापांचाच नव्हे तर इतर गोष्टींचाही समावेश होतो. उदाहरणार्थ, बाप्तिस्मा घेतलेला एखादा तरुण, थोडे दिवस सिगारेट ओढत असावा पण याविषयी त्याने आपल्या आईवडिलांना सांगितले असावे. पुन्हा धुम्रपान न करण्याचे तो ठरवतो. त्याचे पाप अशुद्धपणात मोडत असले तरी, ते घोर अशुद्ध वर्तनात किंवा ‘हावरेपणाने केलेल्या अशुद्ध’ वर्तनात मोडण्याइतपत वाढलेले नाही. अशा वेळी एक अथवा दोन वडिलांनी या मुलाच्या आईवडिलांच्या समक्ष त्याला सल्ला देणे पुरेसे असेल. परंतु हा तरुण जर नेहमीच तंबाखूचे सेवन करत असेल तर हे वर्तन मुद्दामहून आपले शरीर अशुद्ध करणारे आहे व यामुळे घोर अशुद्ध वर्तनात मोडले जाणारे हे प्रकरण हाताळण्यासाठी वडिलांना कदाचित न्यायिक समिती बसवावी लागेल. (२ करिंथकर ७:१) हा तरुण, पश्‍चात्ताप करत नसेल तर वडिलांना त्याला मंडळीतून बहिष्कृत करावे लागेल.

काही ख्रिश्‍चनांना पोर्नोग्राफी पाहण्याची सवय जडली असेल. देवाच्या नजरेत हे पाप आहे व आपल्या एका बांधवाला ही सवय आहे हे ऐकून वडिलांना धक्का बसेल. परंतु सर्वच प्रकारची पोर्नोग्राफी पाहिल्याने न्यायिक समिती बसवावी लागते, असे नाही. उदाहरणार्थ, एखाद्या बांधवाने अनेक वेळा सॉफ्ट-कोर (लैंगिक कृत्यांचे वर्णन व दृश्‍ये) पोर्नोग्राफी पाहिली असावी. आता त्याला स्वतःची लाज वाटू लागते व तो वडिलांना आपल्या पापाची कबूली देतो आणि पुन्हा असे पाप न करण्याचे वचनही देतो. अशा वेळी वडीलजन ठरवतील, की या बांधवाचे वर्तन, ‘हावरेपणाने केलेल्या अशुद्ध’ वर्तनात मोडण्याइतपत वाढले नाही किंवा त्याने कामातूर वर्तन दर्शवणारी निर्लज्ज मनोवृत्ती दाखवली नाही. जरी न्यायिक कार्यवाही करण्यात आली नसली तरीसुद्धा, हे वर्तन देखील अशुद्धपणात मोडणारे वर्तन असल्यामुळे वडीलजन त्याला शास्त्रवचनांतून कडक सल्ला देतील व नंतरही त्याला आवश्‍यक असलेली मदत देण्याचे ठरवतील.

परंतु एखादा ख्रिश्‍चन अनेक वर्षांपासून लपून-छपून हार्ड-कोर (अतिशय उघडपणे चित्रित करण्यात आलेली लैंगिक समागमाची कृत्ये), अतिशय हिणकस व अश्‍लील प्रकारची पोर्नोग्राफी पाहत असावा व आपले पाप झाकून ठेवण्याचा तो बराच प्रयत्नही करत असावा. तो पाहत असलेल्या पोर्नोग्राफीत, सामूहिक बलात्कार, बॉन्डेज (लैंगिक संबंधांच्या वेळी स्वतःला अथवा जोडीदाराला बांधणे), विकृत प्रकारचा लैंगिक छळ, स्त्रियांबरोबरचे अतिशय पाशवी वर्तन किंवा मुलांची पोन्रोग्राफी यांचा समावेश होतो. मडंळीतल्या इतरांना जेव्हा या बांधवाच्या सवयीबद्दल कळते तेव्हा त्याला स्वतःची खूप लाजू वाटू लागते. त्याची निर्लज्ज मनोवृत्ती नसते पण तरीही वडिलांना वाटेल, की त्याने “स्वत:ला” या वाईट सवयीला “वाहून घेतले आहे” व त्याचे ‘हावरेपणाने केलेले अशुद्ध’ वर्तन म्हणजेच घोर अशुद्ध आचरण आहे. त्यामुळे ते न्यायिक समिती बसवतील. पाप करणाऱ्‍याने पश्‍चात्ताप करून कोणत्याही प्रकारची पोर्नोग्राफी पाहणार नाही असे ठरवले नाही तर त्याला मंडळीतून बहिष्कृत केले जाईल. त्याने जर इतरांनाही त्याच्याबरोबर पोर्नोग्राफी पाहायला बोलवले असेल, म्हणजे पोर्नोग्राफी पाहण्याचे त्यांना प्रोत्साहन देत असेल तर कामातूर वर्तन दर्शवणारी निर्लज्ज मनोवृत्ती तो दाखवत असतो.

बायबलमध्ये वापरण्यात आलेला “कामातुरपणा” यात नेहमी, गंभीर व लैंगिक स्वरूपाच्या पापांचा समावेश होतो. एखाद्याचे वर्तन कामातूर होते किंवा नाही हे ठरवताना वडिलांनी, त्याच्या वर्तनात निर्लज्जपणा, ओंगळपणा, गलिच्छपणा, लाजिरवाणे व समाजात धक्कादायक समजले जाणारे आचरण होते किंवा नाही हे पाहावे. एखाद्या व्यक्‍तीने यहोवाच्या नियमांचे घोर उल्लंघन केले आहे परंतु तिची निर्लज्ज मनोवृत्ती नाही तर तिचे पाप ‘हावरेपणात’ मोडू शकते. त्यामुळे, याबाबतीत, किती प्रमाणात घोर अशुद्ध वर्तन होते ते पाहून वडिलांनी प्रत्येक प्रकरण हाताळावे.

एखाद्याने घोर अशुद्ध वर्तन केले आहे किंवा कामातूर आचरण केले आहे हे ठरवण्याचे काम अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे, कारण यांत लोकांचे जीवन गोवलेले आहे. म्हणून न्यायिक समितीत असणाऱ्‍यांनी सर्व प्रकरणे प्रार्थनापूर्वक हाताळावीत. यासाठी त्यांनी देवाकडे पवित्र आत्मा, समजबुद्धी व समंजसपणा मागावा. वडिलांनी मंडळीतला शुद्धपणा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते जो निर्णय देतील तो देवाच्या वचनावर तसेच ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकडून’ आलेल्या मार्गदर्शनावर आधारित असेल. (मत्तय १८:१८; २४:४५) आणि या दुष्ट दिवसांत तर वडिलांनी पुढील शब्द पहिल्यापेक्षा अधिकच लक्षात ठेवावेत: “तुम्ही काय करिता याचा विचार करा; तुम्ही न्याय कराल तो मानवासाठी नाही तर परमेश्‍वरासाठी करावयाचा आहे.”—२ इतिहास १९:६.

(w०६ ७/१५)